अकोला : ‘‘महिलांच्या उद्यमशीलतेला चालना देण्याच्या उद्देशाने त्यांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळणे गरजेची आहे. स्वयंसहायता बचत गटांमधून महिला अत्यंत दर्जेदार व गुणवत्तापूर्ण उत्पादने तयार करतात, अशा उत्पादनांच्या विक्रीसाठी जिल्ह्यात स्वतंत्र मॉल उभारू. यामध्ये महिलांच्या बचतगटांनी उत्पादित केलेली उत्पादने विक्री केली जातील,’’ अशी घोषणा पालकमंत्री बच्चू कडू यांनी केली.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात (Agriculture University) आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. विलास भाले होते. जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी (CMO) अधिकारी सौरभ कटियार, अपर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांतप्पा खोत, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे, शिक्षण विस्तार संचालक डॉ. राजेंद्र गाडे, महिला आर्थिक विकास महामंडळ समन्वयक वर्षा खोब्रागडे, कृषी अधिष्ठाता डॉ. ययाती तायडे, विठ्ठल सरप, मोरेश्वर वानखडे आदी उपस्थित होते.
कृषी विद्यापीठ व कृषी विज्ञान (Agriculture Science) केंद्राच्या विविध प्रशिक्षणातून प्रेरणा घेऊन शेतीपूरक उद्योग करणाऱ्या उद्यमशील महिलांचा या वेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पालकमंत्री कडू पुढे म्हणाले, ‘‘जीवनात बदल घडत असतात आणि ते महत्त्वाचेही असतात. स्त्री शक्ती संसार उभा करणारी शक्ती आहे. शासन नेहमीच प्रयत्न करणाऱ्यास सहायकारी असते. महिला कौशल्याने उत्पादने तयार करतात. त्यांच्या गुणवत्तेला तोड नाही. मात्र, त्यांच्या विपणनाची पुरेशी व्यवस्था नाही. ही व्यवस्था आपल्यास्तरावर निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यात येत्या ११ एप्रिलला महात्मा फुले जयंतीच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व बचतगटांच्या प्रमुखांशी हितगूज करून धोरण ठरविण्यात येईल. त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी धोरण ठरविण्यात येईल,’’ असे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी कुलगुरू डॉ. विलास भाले, जिल्हाधिकारी(IAS) निमा अरोरा यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. राजेंद्र गाडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. किशोर बिडवे यांनी, तर आभार संजीव सलामे यांनी मानले.
यांना केले सन्मानित
कार्यक्रमात नंदाताई शंकरराव पिंपळशेंडे (रा. वेडली, जि. चंद्रपूर), कल्पना दामोदर (रा. सुनगाव, ता. जळगाव जामोद, जि. बुलडाणा), लताताई देशमुख (रामनगर ता. रिसोड), वंदना धोत्रे (रा. विवरा ता. पातूर जि. अकोला), क्षिप्रा मानकर (अमरावती), प्रतिभा चौधरी (रा. नवेगाव, जि. गडचिरोली), छायाताई कुइटे (रा. बेलखेड ता. तेल्हारा जि. अकोला), सिंधूताई निर्मळ (रा. भेंडवळ, ता. जळगाव जामोद, जि. बुलडाणा), इंदिरा कांबळे (रा. कोली, ता. बाभुळगाव, जि. यवतमाळ), विमल गोरे (रा. सोनखास, जि. वाशीम), भावना भोजराज भाकडे (रा. वर्धा), प्रीती मधुकर ढोबाळे (रा. उमरी, ता. कारंजा, जि. वर्धा)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.