Group Farming
Group Farming Agrowon
यशोगाथा

Group Farming : समूह शेतीतून मिळाली आर्थिक दिशा

राजेश कळंबटे

वेहेळे-राजवीर वाडी (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे २०१४ मध्ये प्रगती आणि भाग्यश्री शेतकरी महिला स्वयंसाह्यता गटाची (Women Self Help Group) सुरुवात झाली. यासाठी शुभांगी राजवीर, श्रुती राजवीर यांनी पुढाकार घेतला होता.

या महिला गटांना दिशांतर संस्थेचे राजेश जोष्टे यांनी मार्गदर्शन केले. संस्थेच्या मार्गदर्शनानुसार राजवीरवाडीतील तीस कुटुंबांनी सरकारी योजनेवर अवलंबून न राहता श्रमदानातून शेतीसाठी पाण्याची व्यवस्था (Agriculture Water Management) केली.

गटाला सेंद्रिय शेती (Organic Farming), जिवामृत, दशपर्णी अर्क निर्मिती आणि वापर तसेच हंगामनिहाय विविध भाजीपाला (Vegetable Cultivation) पिकांच्या लागवडीबाबत प्रशिक्षण मिळाले.

महिला गटाने २०१४ मध्ये रब्बी हंगामात (Rabbi Season) सात एकर क्षेत्रावर पडवळ, दोडका, काकडी, कारले, लालमाठ, मुळा, भेंडी, मिरची, घेवडा आणि कलिंगडाची लागवड केली.

तीन महिन्यांमध्ये उत्पादन सुरू झाले. यातून चांगला आर्थिक नफा मिळाला. दोन वर्षांपूर्वी या दोन्ही बचत गटांचे एकत्रीकरण करून अन्नपूर्णा महिला स्वयंसाह्यता गट तयार झाला.

सध्या अन्नपूर्णा बचत गटामध्ये शुभांगी राजवीर (अध्यक्ष), दीपाली राजवीर (उपाध्यक्ष), श्रुती राजवीर (सचिव), अनसूया राजवीर, जयश्री राजवीर, सुलोचना राजवीर, अरुणा राजवीर, शारदा राजवीर, मयूरी राजवीर, सविता घाणेकर, संध्या राजवीर या सदस्या कार्यरत आहेत.

भाजीपाला विक्रीचे नियोजन ः

भाजीपाला विक्रीसाठी बचत गटाने वेहेळे गावामध्ये पहिल्यांदा शिवारफेरीचे आयोजन केले. यामध्ये चिपळूण शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांना बोलावण्यात आले होते.

शिवारफेरीमध्ये १५० लोकांनी सहभाग घेत भाजीची चव चाखली. त्यामुळे आपसूकच चिपळूण शहरात भाजीपाल्याची जाहिरात झाली.

सेंद्रिय पद्धतीने उत्पादित ताजी भाजी ग्राहकांच्या पसंतीस उतरली. हाच प्रयोग मोरवणे, मांडवखरी यांसारख्या गावांमध्ये राबविण्यात आला.

मोरवणे गावातून आता दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाजी विक्रीला जाते. वेहेळे-राजवीर वाडीतील महिलांनी पालिकेच्या सहकार्याने चिपळूण शहरातील सांस्कृतिक केंद्रापुढे भाजी, कलिंगड विक्रीसाठी स्टॉल उभारला आहे.

श्रमानुसार मोबदला ः

गटाला समूह शेतीसाठी विविध कंपन्यांच्या सीएसआर फडांमधून खते, बियाणे, यंत्रसामग्रीसाठी सुमारे पाच लाखांची मदत मिळाली. शेतीमधून किती प्रमाणात भाजीपाला उत्पादन झाले, किती भाजीपाला विक्री झाला याचा हिशेब महिला ठेवतात.

गटाने शेतीमाल वाहतुकीसाठी चारचाकी घेतली आहे. भाजीपाल्याबरोबरच मसाला पिकांच्या उत्पादनाचे प्रशिक्षण गटातील सदस्यांनी घेतले आहे. पहिल्याच वर्षी विविध पिकांच्या विक्रीतून गटाला पावणेसहा लाख रुपये उत्पन्न मिळाले.

गटातील महिलांनी शेतीमधील श्रमानुसार मोबदला वितरण ही पद्धत अवलंबिली आहे. पूर्वी तासाला सरासरी २५ रुपये प्रमाणे मोबदला दिला जात होता. आता ३० रुपये प्रति तास असा मोबदला मिळतो.

प्रत्येक सदस्या प्रति दिन सरासरी आठ तास शेतीमध्ये काम करते. महिलांना गटातील बचतीचा गरजेनुसार उपयोग होतो. वर्षाच्या शेवटी आर्थिक जमाखर्च मांडून पुढील वर्षासाठी लागणाऱ्या पैशांची तजवीज केली जाते.

उत्पन्नात झाली वाढ ः

गटाच्या अध्यक्षा श्रीमती शुभांगी राजवीर म्हणाल्या, की दिशांतर संस्थेच्या मदतीने आम्ही दुबार शेतीची संकल्पना सत्यात उतरली. पूर्वी फक्त भातशेती करत होतो.

दुसऱ्याच्या शेतीमध्ये मजुरी हेच कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन होते. आता तीनही हंगाम शेतीचे नियोजन करतो. गटाने सुरू केलेल्या भाजीपाला व्यवसायातून वार्षिक उत्पन्न वाढले.

शेडनेटमध्ये भाजीपाला लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. शेतामध्येच एका बाजूला शेडनेट लावून तयार केलेल्या खोलीत अळंबी उत्पादन घेतो.

गेल्या वर्षी आमच्या गटाने विविध भाजीपाला, कलिंगड, भुईमूग, हळद, मका, झेंडू, कडधान्य, लाल तांदूळ विक्रीतून साडेसात लाख रुपयांची उलाढाल केली. गटातील दहा महिलांनी मजुरी म्हणून साडेचार लाख रुपये वाटून घेतले आहेत.

बारमाही पाण्याची सोय ः

महिला बचत गटांना चिपळूण तालुक्यातील दिशांतर संस्थेची मदत फायदेशीर ठरली. संस्थेचे अध्यक्ष राजेश जोष्टे तसेच सीमा यादव, अजित नाचणकर, अल्ताफ सरगुरोह, शर्वरी साडविलकर, उदय बापट, संतोषी चव्हाण यांनी महिला बचत गटांना शेती विकास आणि पूरक उद्योगासाठी चांगल्या प्रकारे सहकार्य केले आहे.

शाश्‍वत पाणीपुरवठ्यासाठी महिला गटाने सहायक कृषी अधिकारी आर. के. जाधव, ‘आत्मा‘चे पंकज कोरडे यांच्या मार्गदर्शनानुसार वेहेळे गावाजवळून वाहणाऱ्या नदीमध्ये बंधारे घातले.

त्यामुळे परिसरातील विहिरी, कूपनलिकांची पाणीपातळी वाढली आहे. सामूहिक जलव्यवस्थापनाच्या प्रयोगाची दखल शासनाच्या बरोबरीने लायन्स क्लब, रोटरी क्लब यासारख्या संस्थांनी घेतली.

त्यांनी वेहेळे- राजवीरवाडीतील लोकांचा सन्मान केला. शेतीमध्ये पत, पैसा आणि प्रसिद्धी मिळू शकते हे लक्षात आल्यानंतर जवळच्या मोरवणे गावातील दोन माजी सैनिकांनी सेवानिवृत्तीच्या पैशामधून शेती विकसित करण्यास सुरुवात केली आहे.

संपर्क ः शुभांगी राजवीर, ९३२५५३७०३२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT