Detergent Powder  Agrowon
यशोगाथा

Agro Processing Industry : उसाच्या साखरेवर आधारित पर्यावरणपूर्वक डिटर्जंट पावडर

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Success Story of Manufacture of Industrial Products : केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शेतमाल मूल्यवर्धन व कृषी प्रक्रिया उद्योगाचा मोठा व्यासंग जपला आहे. त्यापुढे जाऊन विविध शेतमालांवर प्रक्रिया करून त्यापासून औद्योगीक उत्पादनांची निर्मिती करण्यासही चालना दिली आहे.

धापेवाडा (जि. नागपूर) येथे त्यांनी शेतमाल प्रक्रिया उद्योग उभारला आहे. श्री. गडकरी यांनी उभारलेल्या मानस उद्योग समुहाच्या अंतर्गत साखर कारखानाही कार्यान्वित आहे. तब्बल एक हजारांवर ऊस उत्पादक या कारखान्याशी जुळलेले आहेत.

साखर व या उद्योगातील अन्य नियमित उपपदार्थांव्यतिरिक्त साखरेपासून अन्य औद्योगीक मूल्यवर्धित उत्पादने तयार करता येतील का असा विचार श्री. गडकरी यांनी केला. त्यानंतर या प्रकल्प उद्योगात संशोधन सुरू झाले. त्यातून साखरेवर आधारित ‘शुगर सरफॅक्टंट’ हे उत्पादन तयार करण्यास येथील शास्त्रज्ञांना यश मिळाले.

डिटर्जंट पावडर व डिशवॉश उत्पादने (ग्राहकोपयोगी वस्तू) निर्मितीत वापरल्या जाणाऱ्या काही घटकांपैकी ॲसिड स्लरीचा समावेश असतो. मात्र हा रासायनिक घटक आहे. त्याला पर्याय म्हणून ‘शुगर सरफॅक्टंट’ चा वापर या प्रकल्पात करण्यात आला व त्याला यश मिळाले आहे.

त्यामुळे ही ग्राहकोपयोगी उत्पादने पर्यावरणपूरक व जैवविघटनशील (बायोडिग्रेडेबल) होण्यास मदत झाली आहे. या सरफॅक्टंटचे पेटंट घेण्यासाठी संबंधित सरकारी विभागाकडे अर्जनोंदणी करण्यात आली आहे. श्रध्दा गुप्ता या प्रकल्पाच्या प्रमुख आहेत. प्रति दिन पंधराशे मे. टन डिटर्जंट पावडर उत्पादन अशी या प्रकल्पाची क्षमता आहे. त्यादृष्टीने अत्याधुनिक यंत्रसामग्री व प्रयोगशाळेची उभारणी करण्यात आली आहे.

उत्पादनांना आवश्‍यक ती सर्व सरकारी प्रमाणपत्रे व संमत्या घेण्यात आल्या आहेत. डिटर्जंट उद्योगातील कंपन्यांनाही आपले पर्यावरणपूरक उत्पादन देण्यासाठी या प्रकल्पाने तयारी दर्शविली आहे. याचबरोबर या प्रकल्पात ‘हॅण्डवॉश’ निर्मितीही करण्यात आली आहे. यामध्ये कडुनिंब, तुळस व लव्हेंडर आदी औषधी व सुगंधी वनस्पतींचा समावेश करण्यात आला आहे.

मसाला उद्योगाचा विस्तार

धापेवाडा येथे डिटर्जंट उद्योगाच्या जोडीला मसाला उत्पादन उद्योगाचीही उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी मिरची, हळद, धने, जिरे, गरम आदी सुमारे वीस प्रकारचे मसाले तयार होतात.‘ब्लेंडेड’ वर्गवारीनुसार चिकन, पावभाजी, छोले अशा १५ प्रकारांचा समावेश आहे. पाच टन प्रति दिवस अशी क्षमता या उद्योगाची आहे.

अन्ननिर्मिती मिरचीचा वापर अधिक होत असल्याने सर्वाधिक तीन टन उत्पादन मिरची पावडरीचे होते. बाजारपेठेतील मागणी व विक्रीचा अंदाज घेऊन महिन्याला एकूण ८० ते १०० टन मसाला उत्पादन केले जात आहे. यात ५० ग्रॅम, ५०० ग्रॅमपासून ते व्यावसायिक एक, पाच ते ५० किलोपर्यंत ग्राहकांच्या मागणीनुसार पॅकिंग केले जाते.

कच्चा मालाचा देशभरातून पुरवठा

आंधप्रदेशातील गुंटूर, वारंगल, कर्नाटक राज्य येथून मिरची तर नांदेड, वसमत, हिंगोली या भागातून हळदीची कच्चा माल या रूपात खरेदी केली जाते. केरळ भागातून वेलची, जायफळ सारख्या मसाला घटकांची खरेदी होते. धनियाची खरेदी कोटा (राजस्थान) येथून होते. वायगाव हळद हा विदर्भाचा मानबिंदू आहे. अन्य वाणांच्या तुलनेत यात कुरकुमीनचे प्रमाण जास्त म्हणजे ५ ते ६ टक्‍के आहे. त्याचा रंग गडद आहे.

त्यामुळे वायगाव हळदीचा प्रक्रियेसाठी अधिक वापर होतो. काही भागात सेलम वाणाच्या हळद पावडरीलाही मागणी राहते. त्यानुसार तसेही उत्पादन तयार केले जाते. अधिकाधिक कच्चा माल शेतकऱ्यांकडून घेण्याचा प्रयत्न आहे. नरेंद्र काळे या प्रकल्पाचे प्रमुख आहेत. सर्व उत्पादने सरकारी मानकांनुसार तयार केली जातात. ॲगमार्क प्रमाणीकरणही लाभले आहे, सियान असा उत्पादनांचा ब्रॅंड तयार केला आहे.

देशांतर्गत व परदेशातही मागणी

सर्व मसाला उत्पादने स्थानिक बाजारपेठा, सुपर मार्केटस, हॉटेल व्यावसायिक, व्हेंडर्स यांना पुरविली जातात. दुबई येथील प्रसिद्ध सुपर मार्केट तसेच रशियालाही उत्पादनांची निर्यात होऊ लागली आहे. व्यावसायिक संस्थांमध्ये ‘सेंट्रल पोलिस कॅन्टीन’, रेल्वे विभाग यांनाही मसाल्यांचा पुरवठा होत आहे.

ओल्या मसाल्यांवर सुरू संशोधन

देशातील तसेच जागतिक बदलती बाजारपेठ ओळखून येथील प्रकल्पात ‘रेडी टू कूक’ उत्पादनांच्या श्रेणीत ओले मसाले निर्मितीवर संशोधन सुरू असल्याचे काळे यांनी सांगितले. .यात तंदुरी, पावभाजी. सांबार, पावभाजी, गरम आदी मसाल्यांचा समावेश आहे. सँडविच, बिर्याणी आदींमध्ये त्यांचे महत्त्व आहे. सध्या परदेशात विदेशात अशा प्रकारचा ‘ट्रेंड’ आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून गाव परिसरातील ५० जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यात महिलांचे प्रमाण ८० टक्के आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीची भरपाई मंजूर

Buffalo Conservation : वारणाच्या जातिवंत म्हैस संवर्धन, पैदास योजनेतून म्हशी वितरणास प्रारंभ

Cotton Crop Damage : अतिपावसाने कापसाला कोंब

Crop Insurance : विमा कंपनीला पीक नुकसानीच्या सव्वा लाख पूर्वसूचना

Crop Loan : खानदेशात पीककर्ज वितरणात राष्ट्रीय बँका मागे

SCROLL FOR NEXT