Aarti and Appasaheb Saste Agrowon
यशोगाथा

Dairy Industry : दुग्ध व्यवसायामुळे बसली संसाराची आर्थिक घडी

Success Story of Farmer : सातारा जिल्ह्यातील मांडवखडक (ता. फलटण) येथील आरती व अप्पासो सस्ते या दांपत्याने दोन गायींपासून सुरू केलेला दुग्ध व्यवसाय नियोजन, चिकाटी, शिकण्याच्या प्रवृत्तीतून तब्बल ३० गायींवर नेला आहे.

विकास जाधव 

विकास जाधव

सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यातील मांडवखडक हे सुमारे दोन हजार लोकसंख्येचे गाव आहे. या गावात आरती व अप्पासो नामदेव सस्ते हे अल्पभूधारक शेतकरी कुटुंब आहे. त्यांचे लग्न २००७ मध्ये झाले, त्या वेळी एकत्रित कुटुंबाची केवळ दोन एकर शेती होती.

२०१४ नंतर कुटुंबाचे विभाजन झाल्यानंतर त्यांच्या वाट्याला केवळ अर्धा एकर शेती व दोन बैल आले. स्वतःची आणि थोडी वाट्याने शेती करून कुटुंबाचा गाडा चालवला जात होता. त्याला पूरक म्हणून २०१४ मध्ये सस्ते कुटुंबाने दुग्ध व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.

दुग्ध व्यवसायाचा श्रीगणेशा

सस्ते दांपत्याने एक गाय खरेदी केली. वाणिज्य पदवीधर असलेल्या आरतीताईंना खरेतर गायी संगोपनातील कसलाही अनुभव नव्हता. पण त्यांनी जबाबदारी स्वीकारली. खरेदी केलेली गाभण गायी प्रसूतीवेळीच मरण पावली. हा मोठा धक्का होता. पण निराश न होता आपल्याकडील एक बैल विकून दुसरी एच.एफ. गाय खरेदी केली.

या गायीची चांगली काळजी घेत त्यांनी व्यवसायाला गती दिली. या काळात दहा ते १२ लिटर दूध मिळत होते. त्यातून उत्पन्न हाती पडू लागल्यामुळे या व्यवसायत गोडी वाढू लागली. पहिल्या गायीचा भाकड काळ सुरू होण्याआधी दुसरा बैल विकून दुसरी गाय खरेदी केली. यानंतर पुढील तीन चार वर्षे मात्र स्वतःच्याच गोठ्यामध्ये वासरांपासून गायींची संख्या पाचपर्यंत वाढवली. या वेळी बंदिस्त स्वरूपात संगोपन करत असत.

मुक्तसंचार गोठा

आरतीताईंनी गोपालनातील अनेक बारकावे समजून, शिकून घेतले. त्यात त्यांना मुक्तसंचार गोठ्याविषयी समजले. आरतीताईंकडे गायीची संख्या वाढत चालली होती. त्यावर मार्ग म्हणून घरासमोरील पूर्वीच्या ४० बाय ४० फूट बंदिस्त गोठ्याचाच विस्तार करत १०० बाय ४० फूट मुक्तसंचार गोठा केला.

चारी बाजूंनी तारेचे कुंपण घालून निम्मा बंदिस्त व निम्मा मुक्तसंचार या पद्धतीची रचना केली. त्यात पूर्वीपासून उभी असलेली दोन मोठी झाडे आत घेतली. यामुळे गायींसाठी दुपारच्या उन्हात सावलीही मिळाली. सुरुवातीच्या दोन गायीनंतर बाहेरून एकही गायी खरेदी न करता लहान-मोठ्या आज त्यांच्याकडे ३० गायी आहेत. त्यात एचएफ जातीच्या २९, एक जर्शी व एक देशी गाय आहे. त्यांच्यापासून दोन्ही वेळचे मिळून प्रतिदिवस २७० लिटर दूध मिळत आहे.

...असे चालते व्यवस्थापन

सकाळी सहापासूनच गोठ्यातील कामे सुरू होतात. मुक्त गायी सकाळी गोठ्यात बांधून दुभत्या जनावरांना साडेतीन किलो, तर कालवडींना अडीच किलो पशुखाद्य दिले जाते. वजन व दूध क्षमतेनुसार खाद्यांत वाढ केली जाते.

धारा काढण्यापूर्वी गायीच्या कास स्वच्छ धुतल्या जातात.

धार काढण्याची मशिन दररोज गरम पाण्याने धुऊन घेतली जाते. यामुळे सडांना संसर्गाचा धोका कमी होतो.

हिरवा चारा देऊन मशिनच्या साह्याने धारा काढल्या जातात.

त्यानंतर गायी मुक्त संचार गोठ्यात सोडल्या जातात. सकाळी अडीच तास व संध्याकाळी अडीच तास जनावरे गोठ्यात बांधली जातात.

स्वतःच्या अर्धा एकरात सुपर नेपिअर गवत लावले आहे. उर्वरित मका व अन्य चारा विकत घेतला जातो. दिवसाला १५०० ते १७०० रुपये खर्च होतो.

बंदिस्त गोठ्यातील रोज आणि मुक्तसंचार गोठ्यातील शेण प्रत्येक दहा दिवसाला बाहेर काढले जाते. यातून एक चारचाकी ट्रेलर शेणखत मिळते.

वर्षातून एकदा लाळ्या खुरकूत, लम्पी लस देतात. जंतनिर्मूलन औषधे तीन वेळा दिली जातात.

प्रत्येक गायीला टॅगिंग केले आहे.

गायीच्या सर्व नोंदी ठेवल्या जातात. यामध्ये गायींची वंशावळ व पैदाशीच्या महत्त्वाच्या नोंदींचा समावेश असतो.

तज्ज्ञांची मदत

दुग्ध व्यवसाय करताना फलटण येथील गोविंद मिल्क व तेथील तज्ज्ञांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळते. गोठ्यातील बहुतांश सर्व कामे आरतीताई आणि अप्पासो दोघे विभागून करतात. अप्पासो चाऱ्याचे नियोजन व अन्य कामे,

तर आरतीताई गोठा व आर्थिक नियोजनाचे काम सांभाळतात. त्यांची मुले यश हा बारावी (शास्त्र) व शिवम् हा चौथीमध्ये शिकत आहे. त्यांच्या नावावरूनच व्यवसायास ‘यश शिवम् डेअरी फार्म’ नाव दिले आहे.

अर्थकारण

गायींची संख्या ३० असून, वर्षभर नियमित दुधाचे उत्पादन मिळत राहील, अशा प्रकारे साखळी बसवली आहे. या गायीच्या देखभालीसाठी प्रतिदिन सहा ते साडेसहा हजार रुपये खर्च येतो. यामध्ये लसी, औषधे, वैद्यकीय देखभाल, पशुखाद्य, क्षेत्र कमी असल्याने विकत घ्यावा लागणारा मक्यासारखा हिरवा चारा इ. घटकांचा समावेश आहे.

गायीपासून दोन्ही वेळेचे मिळून सरासरी २६० ते २७० लिटर दूध उत्पादन मिळते. सरासरी २८ रुपये दराने या दुधाचे साडेसात हजार रुपये उत्पन्न येते. खर्च वजा जाता एक ते दीड हजार रुपये शिल्लक राहतात. दुधाच्या उत्पन्नासोबतच दरमहा शेणखताची विक्री यामुळे दरमहा ४५ हजार रुपये शिल्लक राहतात.

सध्या त्यांच्याकडे ३० लिटर दूध देणाऱ्या चार गायी, तर बाकी सर्व सरासरी २५ लिटर दूध देणाऱ्या गायी आहेत. या गायींची बाजारातील सरासरी किंमत एक ते सव्वा लाख रुपये गृहीत धरता आज चिकाटीतून त्यांनी ४० लाख रुपयांचे भांडवल तयार केले आहे. त्यातही वंशावळ जपत जातिवंत गायी तयार केल्या जात असल्यामुळे वाढीव किंमतही मिळू लागली आहे. नुकतीच उत्तम दूध देणाऱ्या गायीला पावणेदोन लाख रुपये प्रमाणे मागणी झाली आहे.

‘लम्पी’चा फटक

मध्यंतरी सस्ते यांच्या गोठ्यास लम्पी या विषाणूजन्य रोगाचा फटका बसला. लम्पी रोगाच्या संसर्गामुळे जातिवंत पाच गायी मृत झाल्या. गायीना वाचविण्यासाठी सुमारे दीड लाख रुपये खर्च करूनही गायी जगल्या नाहीत. त्यामुळे सात लाख रुपये किमतीच्या गायी व उपचार असा साडेआठ लाख रुपयांचे नुकसान झाले. पण त्याच वेळी उत्तम व्यवस्थापनातून या संसर्गजन्य रोगापासून अन्य गायींचा बचाव करण्यात यश आले, हेच समाधान!

- आरती सस्ते, ९३०७११०२३६

- अप्पासो सस्ते, ८६०५४२५५९५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parali Election Update : मुंडे, सत्तार, महाजन, वळसे पाटील आणि विखे पाटील; कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

Maharashtra Election : मराठवाडा, विदर्भात भाजपची मुसंडी; सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीची आघाडी

Daytime Electricity : शेतीला दिवसा वीज द्या, महावितरणला दिले निवेदन

Maharashtra Election Results 2024 : मुख्यमंत्री शिंदे, फडणीस, अजित पवार, मुंडे आघाडीवर, भुजबळ, दिलीप वळीसे-पाटील पिछाडीवर

Assembly Election Result : कोल्हापुरातून मुश्रीफ, महाडिक आघाडीवर तर सांगलीत जयंत पाटील, विश्वजीत कदम, गाडगीळ यांची आघाडी

SCROLL FOR NEXT