Dairy Business : दुग्धोत्पादनातून ‘भारतमाता’ समूहाची आघाडी

Milk Production : नांदेड शहरामुळे दूग्ध व्यवसायात असलेली संधी ओळखून समूहातील महिलांनी दुग्ध व्यवसायाला चांगली गती दिली आहे.
Dairy Business
Dairy Business Agrowon

Agriculture Success Story : नांदेडपासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या किकी गावातील शेतकरी कुटुंबातील दहा महिलांनी एकत्रित येऊच २०१९ मध्ये महिला स्वयंसाह्यता गट स्थापन केला. हा गट स्थापन करण्यापूर्वीही महिला एकमेकींना शेती कामामध्ये तसेच गरजेवेळी आर्थिक मदत करीत होत्या.

या कामाला त्यांनी व्यापक स्वरूप देण्यासाठी १३ डिसेंबर २०२१ मध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानाच्या माध्यमातून (उमेद) भारतमाता महिला स्वयंसाह्यता समूहाची नोंदणी केली. ‘उमेद’च्या प्रतिनिधींनी समूहातील दहा महिलांना विविध पूरक उद्योग तसेच आर्थिक बचत आणि व्यवहाराबाबत चांगले मार्गदर्शन केले. प्रारंभापासून समूहाची साप्ताहिक बैठक दर शुक्रवारी होते. यामध्ये कामकाजाचा आढावा तसेच मासिक बचत, कर्ज वाटप, कर्ज मागणी, व्याज आकारणी, व्यवसाय निवड याबाबत चर्चा केली जाते.

Dairy Business
Mahanand Dairy : ‘महानंद’ची श्वेतपत्रिका काढा

भारतमाता महिला स्वयंसाह्यता समूहाच्या अध्यक्ष म्हणून रेखा गजानन किरकन, सचिव मीरा शंकर किरकन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समूहातील सदस्यांमध्ये रिधा रंगनाथ किरकन, सुरेखा सुरेश किरकन, शिवनंदा ज्ञानेश्‍वर किरकन, चंद्रकला आनंदा किरकन, संगीता विठ्ठल किरकन, अनिता माधव किरकन, अनिता सुधाकर किरकन आणि सोनाली सुनील विभूते यांचा समावेश आहे. समूहाचे बँक खाते नांदेड येथील एचडीएफसीच्या शाखेत काढण्यात आले. महिन्याची वैयक्तित बचत तसेच ‘उमेद’कडून मिळालेल्या आर्थिक मदतीतून समूहाने दुग्ध व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे अध्यक्षा रेखा किरकन यांनी सांगितले.

पूरक उद्योगांना गती ः

भारतमाता महिला स्वयंसाह्यता महिला समूहाची स्थापना झाल्यानंतर बचतीतून गरज असलेल्या सदस्यांची आर्थिक अडचण सोडविण्याचे काम सुरू झाले. समूहातील महिलांना एक टक्का व्याज दराने कर्जाचे वितरण करण्यात आले. यातून महिलांना घरखर्चात हातभार लागला. यानंतर एकत्रित स्वरूपात एखादा व्यवसाय सुरू करण्यासंदर्भात चर्चा झाली. या सदस्यांच्या घरी पहिल्यापासूनच गायी, म्हशी आहेत.

तसेच नांदेड शहर जवळ असल्याने दुधाची विक्री करण्यासाठी सोईचे असल्याने समुहाने जातिवंत दुधाळ म्हशी, संकरित गायींची खरेदी करून दुग्ध व्यवसायाला चालना देण्याचे ठरविले. यासाठी समूहाला बँकेकडून अर्थसाह्याची गरज होती. तसेच ‘उमेद’कडूनही हातभार लागल्याने पशुपालनाला गती आली.

समूहाची वाटचाल सुरू झाल्यानंतर २०२० मध्ये ‘उमेद’कडून १५ हजार रुपयांचा फिरता निधी उपलब्ध झाला. यासोबतच एचडीएफसी बँकेकडून १८ महिने मुदतीचे एक लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले. या कर्जातून महिलांनी पिठाची गिरणी, शेळ्या, शिलाई यंत्र, देशी गाय खरेदी करून व्यवसाय सुरु केला. या कर्जामुळे प्रत्येक सदस्याला व्यवसायाची संधी मिळाली. यातून मिळालेल्या नफ्यामुळे सदस्यांनी १८ महिन्यांचे कर्ज १२ महिन्यांत परत केले. यामुळे बँकेत समूहाची पत वाढली. परिणामी, दुसरे कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा झाला.

Dairy Business
Mahanand Dairy : महानंद’मध्ये आनंदी ‘आणंद’ गडे

पशुपालनाला मिळाली गती ः

साधारणपणे २०२१ मध्ये समूहाला दोन लाख वीस हजारांचे वाढीव कर्ज मिळाले. या कर्जातून महिलांनी सहा संकरित गायींची खरेदी केली. गायींपासून दुधाचे उत्पादन वाढले. गावातच दूध संकलन केंद्रामध्ये या दुधाची विक्री सुरू झाली. या दुधाला फॅटनुसार सरासरी ३८ ते ४० रुपये दर मिळू लागला. दररोज दोन हजारांचे उत्पन्न समूहाला मिळू लागले. दुग्धोत्पादनातून प्रत्येक सदस्या कर्जाचा १,८४० रुपयांचा हप्ता भरू लागल्या. तसेच उर्वरित पैशातून घर खर्चाला हातभार लागला.

या पैशातून गायींचा खुराक, चारा, पोषण आहार देण्याची सोय झाली. आर्थिक बचतीमधून महिलांनी ऑगस्ट २०२३ मध्ये दोन लाख २० हजार रुपयांच्या कर्जाची परतफेड केली. दोन वेळा घेतलेले कर्ज वेळेत परत केल्यामुळे तिसऱ्या वेळचे कर्ज घेण्यासाठी अडचण आली नाही. समूहाने एचडीएफसी बँकेचे दोन वेळा घेतलेले कर्ज परत केल्यानंतर तुप्पा येथील भारतीय स्टेट बँकेने कर्ज प्रस्ताव मंजूर केला. या वेळी तीन लाख रुपयांचे कर्ज महिला समूहाला मिळाले.

यासोबत ‘उमेद’कडून ६० हजार रुपयांचा सूक्ष्म गुंतवणूक निधी (सीआयएफ) मिळाला. समुहाकडे तीन लाख साठ हजाराचे भांडवल जमा झाले. यात काही महिलांनी हातभार लावला. या पैशातून समुहाने १० जातिवंत दुधाळ म्हशी खरेदी केल्या. या समूहातील महिलांकडे एकूण ४५ गायी, म्हशी आहेत.

यातून चांगल्या प्रकारे दुग्धोत्पादन होत आहे. गावातील खासगी डेअरीच्या संकलन केंद्रामध्ये दूध दिले जाते. फॅटनुसार दुधाला चांगला दर मिळतो. याचबरोबरीने दरवर्षी समूहातर्फे शेणखत विक्रीतून पन्नास हजाराची उलाढाल होते. येत्या काळात दूध प्रक्रिया उद्योग उभारण्याचे नियोजन समूहाने केले आहे.

‘उमेद’चे मिळाले सहकार्य...

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवन्नोती अभियानाच्या (उमेद) पाठबळावर भारतमाता महिला स्वयंसाह्यता समूहाने आजपर्यंत प्रगती केली आहे. यासाठी प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन पातेवार, नांदेड तालुका अभियान व्यवस्थापक डी. बी. ढवळे, नांदेड तालुका व्यवस्थापक आश्‍लेषा कुलकर्णी यांचे मार्गदर्शन मिळते, असे अध्यक्षा रेखा किनकन यांनी सांगितले.

संपर्क ः रेखा गजानन किरकन, ९३०७२८५५३९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com