Agri Tourism Centre Agrowon
यशोगाथा

Agriculture Tourism : गावच चालवतंय कृषी पर्यटन केंद्र

सुदर्शन सुतार

Agriculture Tourism Chinchani : सातारा जिल्ह्यात १९७८ च्या दरम्यान कण्हेर धरणाची निर्मिती झाली. त्यामुळे येथील चिंचणी गावाचे सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली माळरानावर पुनर्वसन झाले.

आषाढीला पंढरपूर येथे जाणारे श्री. संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री. संत तुकाराम महाराज यांच्यासह सर्व पालखी सोहळे येथे एकत्र येतात. त्यामुळे `टप्पा` नावाने ओळखले जाणारे हे श्रद्धा आणि आस्थेचे ठिकाण आहे.

असे आहे चिंचणी गाव

सुमारे ६५ कुटुंबे व ३७५ लोकसंख्येचे चिंचणी गाव आहे. पुनर्वसनात प्रत्येक कुटुंबाला राहण्यासाठी चार गुंठे जागा आणि दोन एकर शेती मिळाली. साताऱ्यातील सह्याद्री आणि जावळीच्या खोऱ्यातील

महाबळेश्वरच्या पायथ्याला हिरवाईने नटलेलं निसर्गसंपन्न चिंचणी गाव थेट सोलापूरसारख्या दुष्काळी भागात वसलं. ही बाब ग्रामस्थांसाठी असह्य आणि वेदनादायी होती. पण आपल्या मूळ गावाप्रमाणेच हा परिसर नव्याने उभारण्याची धडपड त्यांनी सुरु केली. गावातील मोहन अनपट यांच्यासारखं धडाडीचं, निःस्वार्थी आणि प्रत्येक उपक्रमात पुढाकार घेणारं नेतृत्व चिंचणीला मिळालं.

मग गावालाही सोलापूर सोशल फाउंडेशनसह श्रमिक मुक्ती दलाचे डॅा. भारत पाटणकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार बबनराव शिंदे आदी लोकप्रतिनिधींचं वेळोवेळी साह्य मिळालं. पूर्वी पिराची कुरोलीमध्ये हे गाव ग्रुप ग्रामपंचायत म्हणून समाविष्ट होते. आज त्यास स्वतंत्र मान्यता मिळाली आहे. आणखी

वैशिष्ट्य म्हणजे गावातील कोणीही राजकारणात नाही किंवा कोणत्याही पक्षाचे सदस्यत्व गावातील कोणी घेतलेले नाही. जाणीवपूर्वक राजकारणापासून दोन हात लांब राहण्याचा गावकऱ्यांचा प्रयत्न आहे.

महिलांच्या सहभागाचे कृषी पर्यटन केंद्र

एकेकाळी सह्याद्रीच्या कुशीत आयुष्य व्यतीत केलेल्या गावकऱ्यांनी आपत्तीत संधी शोधली. चिंचणीलाही निसर्गरम्य बनवण्यासाठी १५ एकरांच्या गावठाणात तब्बल दहा हजार झाडांची वनराई फुलवली. शासनाने त्याची दखल घेत छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराने गावाला सन्मानित केलं.

त्यामुळे गावकऱ्यांचा उत्साह आणखी वाढला. ही वनराई, निसर्गरम्यता व रोजगारसंधी लक्षात घेऊन गावात ग्रामीण पर्यटन केंद्र सुरु करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. ग्रामदैवत वरदायिनी देवीच्या नावाने महिलांच्या नावे वरदायीनी महिला बहुउद्देशीय सामाजिक सेवा सहकारी संस्थेची स्थापना केली. त्या माध्यमातून पर्यटन संचालनालय नोंदणीकृत चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र' सुरू झाले.

चाळीस तोळे सोने ठेवले गहाण

कृषी पर्यटन केंद्राचा आराखडा तयार झाला. पण भांडवल नव्हते. मग महिलांनीच मार्ग काढत आपल्याकडील तब्बल ४० तोळे सोने गहाण ठेवण्यासाठी दिले. मग काय, अवघ्या काही महिन्यांतच काम सुरु झाले.

तेरा जून,२०२२ मध्ये केंद्राची सुरवातही झाली. केवळ दोन वर्षे पूर्ण होता होता गावाने ग्रामीण जीवनशैली आणि खाद्यसंस्कृतीच्या अनुभव देत पर्यटकांची पसंती मिळवली. त्यातून गहाण ठेवलेले सोने सुटलेच. पण महिला आणि पुरुषांना रोजगार उपलब्ध झाला.

विकासात आघाडी

वृक्षराजीने गाव समृद्ध आहेच. पण पिण्याचे पाणी, प्रशस्त रस्ते, वीज आदी सुविधाही पुरेशा प्रमाणात आहेत. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत हागणदारीमुक्त अभियानात पहिल्याच वर्षी चिंचणीने पहिला क्रमांक मिळवला. जलशुद्धीकरण प्रकल्पाद्वारे पाच रुपयांमध्ये वीस लिटर शुद्ध पाणी मिळते. सर्व कुटुंबे ‘रेन वॅाटर हार्वेस्टिंग’ करतात. त्यातून वर्षाला सुमारे तीन लाख कोटी लिटर पाणी जमिनीत मुरते.

ग्रामीण जीवनशैलीचा अनुभव

गावाच्या प्रवेशद्वारालाच श्री विठ्ठलाची प्रतिकात्मक मोठी ‘फ्रेम’ स्वागत करते. त्यात विविध भाषांतील शब्दांची झालेली देवाण-घेवाण उलगडून सांगितली आहे. प्रत्येकाच्या घरासमोर आंबा, जांभूळ, सीताफळ, पेरू, चिकू, नारळ, जंगली, वनौषधी झाडे लक्ष वेधतात. बहुतांश झाडांना ठिबक सिंचन आहे.

मध्यवर्ती भागात वसलेले मुख्य पर्यटन केंद्र खुणावते. ग्रामपंचायतीच्या प्रशस्त आधुनिक इमारतीसह ग्रामदैवत वरदायिनी मंदिर, रम्य वातावरणातील जिल्हा परिषदेची शाळा, अंगणवाडी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीची अभ्यासिका, सार्वजनिक वाचनालय, घसरगुंडी, झोके आदी खेळाचे विविध साहित्य पाहण्यास मिळते. खुली व्यायामशाळाही आहे. ग्रामीण वस्तू संग्रहालयात कणगीं, जुन्या काळातील घर, माजघर, व्हरांडा, अंगणातील दगडी विहीर, रहाट, देखणी बैलगाडी आदी गोष्टी पर्यटकांचे आकर्षण ठरतात.

ग्रामीण जेवणाचा स्वाद

पर्यटनाची सैर झाल्यानंतर अस्सल ग्रामीण जेवणाच्या आस्वादासाठी पाट-चौरंगावरील बैठक व्यवस्था लक्ष वेधते. बेसन, ठेचा, वांगी, पातवड्याची आमटी, गव्हाची गुळात बनवलेली खीर, चुलीवरील गरमागरम भाकरी असा बेत असतो. हुरड्याच्या हंगामात तर पर्यटकांना आधी ‘बुकिंग’ करावे लागते.

आगटीवर भाजलेल्या लुसलुशीत कणसाचा हुरडा, सोबत विविध चटण्या, गोडी शेव, रेवड्या असा फक्कड बेत असतो. त्याशिवाय पपई, पेरू, शेंदाड, डाळिंब, बोरं, हरभऱ्याचा डहाळा असा रानमेवा सोबतीला असतो.

गावातच मिळतोय रोजगार

पर्यटन केंद्राची मालकी आणि उत्पन्न सार्वत्रिक ठेवण्यात आले आहे प्रत्येकाने आपली जबाबदारी वाटून घेतली आहे. काही कुटुंबे स्टॉल उभारून वस्तू, पदार्थांची विक्री करतात. कोणत्या ना कोणत्या रूपात गावात रोजगार उपलब्ध होतो. अशा पद्धतीने कार्यपद्धती सांभाळणारं राज्यातील हे बहुधा पहिलंच गाव असावं. सुमारे शंभर एकरांपर्यंत शेती गावाच्या भोवताली आहे. या क्षेत्रावर विविध प्रकारचा सेंद्रिय शेतमाल पिकवून पर्यटकांना त्याची चव चाखायला लावायचा गावकऱ्यांचा मानस आहे.

आम्ही आधीच पुनर्वसित आहोत. त्यात पुन्हा रोजगारासाठी स्थलांतरित होण्याऐवजी गावातच पर्यटन केंद्राच्या माध्यमातून रोजगारक्षमता विकसित केली. जिकिरीचे, कष्टाचे हे काम गावकऱ्यांच्या एकीतून शक्य झाले. त्यातून पर्यटकांना आणि आम्हालाही मिळणारा आनंद अवर्णनीय आहे.
मोहन अनपट- ९८६०९५९५६५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weekly Weather : राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

Retreating Monsoon : परतीचा पाऊस थांबायचे नावच घेईना

Khandesh Rain : पावसामुळे खानदेशातील प्रमुख नद्या झाल्या प्रवाही

Crop Damage : शिरूरमधील शेतकऱ्यांचे वादळ, पावसामुळे पिकांचे नुकसान

Maharashtra Politics : छत्रपती शिवरायांचे विचार घेऊनच काँग्रेसचा लढा

SCROLL FOR NEXT