Agro Tourism Centre : नैसर्गिक, पर्यावरणपूरक तंत्रज्ञानातून साकारले ‘वृंदावन’

Tourism day : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथील गंगाधर केळकर यांनी कोकिसरे नारकरवाडी येथे नयनरम्य वृदांवन कृषी पर्यटन केंद्र साकारले आहे.
Agro Tourism
Agro TourismAgrowon
Published on
Updated on

एकनाथ पवार
जागतिक पर्यटन दिन विशेष

Vrindavan Agro Tourism Center : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथील गंगाधर केळकर यांनी कोकिसरे नारकरवाडी येथे नयनरम्य वृदांवन कृषी पर्यटन केंद्र साकारले आहे. नैसर्गिक, पर्यावरण पूरक तंत्र व भौगोलिक रचनेचा सुरेख वापर व मेळ घालत विविध सुविधा येथे उभ्या केल्या आहेत. साहजिकच रम्य, शांत असे हे स्थळ पर्यटकांसाठी आकर्षणाचे व विरंगुळ्याचे केंद्र ठरले आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक पर्यटन संस्थेची स्थापना २७ सप्टेंबर १९७० रोजी झाली. त्यानंतर १९८० पासून २७ सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यटनातून रोजगाराच्या नव्या वाटा निर्माण व्हाव्यात या हेतूने राज्य शासनाने ३० एप्रिल १९९७ मध्ये सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केले. त्यानंतर जिल्ह्यातील पर्यटन विकासाला गती प्राप्त होऊ लागली. जिल्ह्याला १२१ किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. स्वच्छ, सुंदर किनारे पर्यटनाला पोषक ठरले आहेत. जिल्ह्याच्या विचार करता पश्‍चिम पट्ट्यात पर्यटन अधिक बहरले. अंबोली हिल, सावंतवाडीदेखील पर्यटनात पुढे आले. त्या तुलनेत सह्याद्रीकडील किंवा पूर्वपट्ट्यात पर्यटन वाढले नाही. मात्र अलीकडील काही वर्षांत कृषी पर्यटनासारखे प्रयोग या भागात होऊ लागले असून पर्यटन केंद्राची निर्मिती होऊ लागली आहे.

केळकर यांचे पर्यटन केंद्र

जिल्ह्यातील वैभववाडी येथे गंगाधर शंकर केळकर राहतात. त्यांचे मूळ गाव कुंभवडे. प्रतिकूल परिस्थितीत स्थापत्य अभियांत्रिकीची (सिव्हिल) पदविका त्यांनी घेतली. वैभववाडी शहरात गणपतीची मखरनिर्मिती व विक्री किंवा तत्सम व्यवसाय केले. पुढे शिक्षणानुरूप बांधकाम व्यवसायात पाऊल ठेवले. लहान प्रकल्प हाती घेत ते पूर्ण केले. अशाच एका प्रकल्पासाठी वैभववाडी-फोंडा मार्गानजीक कोकिसरे नारकरवाडी येथे नऊ एकर जमीन खरेदी केली. त्यातील सात एकर जमीन ‘प्लॉटिंग’ किंवा बांधकाम प्रकल्पासाठी वापरणे शक्य होते. उर्वरित दोन एकर जमीन ही खाचखळग्यांची, चढ-उताराची असल्याने प्रकल्पाच्या दृष्टीने उपयोगी नव्हती. दहा बारा वर्षांहून अधिक काळ बांधकाम व्यवसायात कार्यरत असलेले केळकर मनी स्वप्न बाळगून होते. तालुक्यात बारमाही वाहणारा नापणे धबधबा, नाधवडे येथील उमाळा, ऐनारी गुहा अशी पर्यटनस्थळे आहेत. परंतु पर्यटकांची अपेक्षित रेलचेल नसल्याची त्यांना खंत होती. त्यामुळे या भागात वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन केंद्र आपणच विकसित करावे असे त्यांना सतत वाटे. अशावेळी नऊ एकरांपैकी उपयोगात न येणाऱ्या दोन एकर क्षेत्राकडे पर्यटन केंद्राची संधी म्हणून त्यांनी पाहिले. कोकिसरे नारकरवाडी परिसरावर निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केली आहे. पश्‍चिमेकडे गडकिल्ल्याप्रमाणे असलेला सालवा डोंगर, नजीकच्या गर्द हिरव्या झाडीतून वाट काढत जाणारी कोकण रेल्वे, उत्तरेला कासारव्हाळ आणि मुख्य रस्त्यापासून ६०० मीटर रस्त्यावर असे हे ठिकाण आहे. पक्ष्यांचा किलबिलाट येथे सतत कानी पडतो. काही प्राणी सहज नजरेस पडतात. अशावेळी कल्पनाशक्तीला वाव देत जमिनीच्या विचित्र रचनेचा पुरेपूर वापर करण्याचे केळकर यांनी ठरविले.


Agro Tourism
Agri Tourism Center : पालघरमधील निधी गावड यांनी नारळ, सुपारीच्या बागेत साकारले कृषी पर्यटन केंद्र

नैसर्गिक, पर्यावरणपूरक तंत्राचा वापर

बांधकाम व्यवसायात असल्याने त्यातील आधुनिक तंत्रज्ञानाची
माहिती होती. परंतु येथील नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक रचनेला धक्का न लावता तंत्राचा वापर वापरण्याचा निर्णय घेतला. दरीसारखा मोठा उतार, खोली, खड्डे असलेल्या ठिकाणी स्वीमिंग पूल’ तसेच गॅबियन तंत्रज्ञानाचा वापर करीत काळ्या दगडाचा धबधबा तयार केला. पावसात जमीन खचेल अशा ठिकाणीच सिमेंट कॉक्रिटीकरण केले. कोकणात घरांच्या कामांसाठी तेथील लाल चिऱ्यांचा वापर केला जातो. इथेही केळकर यांनी सिमेंटचा भाग कमीत कमी ठेवत चिऱ्यांचाच वापर केला. सन २०१४ पासून उभारणीचे काम सुरू
करीत आजमितीस टप्प्याटप्प्याने एकेक सुविधा तयार केल्या. यात लहान मुलांसाठी, मध्यम व मोठ्यांसाठी असे तीन स्वीमिंग पूल, पर्यटकांसाठी निवासी सोय, वाढदिवस किंवा अन्य कार्यक्रमांसाठी ‘हॉल’, मुलांना बागडण्यासाठी मोकळी जागा अशी रचना त्यांनी तयार केली. चाळीस फूट लांबी व २० फूट उंचीची ‘ट्रेकिंग’साठीची चढण तयार केली. सुरुवातीची कामे स्वगुंतवणुकीतून केली. याशिवाय
बँकेकडून २५ लाखांचे कर्जही घेतले आहे. मनातील पर्यटन स्थळाच्या स्वप्नाने प्रत्यक्ष आकार घेतला. कौटुंबिक पातळीवर चर्चा करून त्याचे वृदांवन असे नामकरण केले.

Agro Tourism
Agro tourism : कृषी पर्यटनातून मिळू शकतो चांगला रोजगार

कोरोनाचे संकट व त्यावर मात

वृंदावनचे काम २०१९-२० पर्यंत बहुतांश पूर्ण झाले होते. त्यामुळे पर्यटकांसाठी खुले करावे असा विचार असतानाच कोरोना- लॉकडाउनचे संकट आले. दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली. हा काळ खूप कठीण होता. परंतु केळकर डगमगले नाहीत. नोव्हेंबर २०२१ मध्ये त्यांनी नव्या जोमाने आपले दोन एकरांत साकारलेले केंद्र पर्यटकांसाठी खुले केले. व्हॉट्‍सॲप, फेसबुक तसेच अन्य माध्यमांतून प्रचार केला. लहानांपासून वृद्धांपर्यंत विविध सोयीसुविधा असल्यामुळे पर्यटकांची गर्दी होऊ लागली.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे केंद्राचे नोंदणीकरण केले आहे. पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली, सातारा यांसह गुजरात, कर्नाटकातून येथे पर्यटक येऊ लागले आहेत. सन २०१२१ मध्ये दोन हजार पर्यटक व १० लाखांची उलाढाल, पुढील वर्षी पर्यटकांची संख्या तीन हजार, उलाढाल १५ लाख, तर यंदा आतापर्यंत सात हजार पर्यटक व २० लाखांची उलाढाल करण्यापर्यंत व्यवसायाने पल्ला गाठला आहे.

पर्यटन केंद्र- ठळक बाबी

-पर्यटकांना कोकणातील फळे चाखता यावीत यासाठी आंबा, काजू, जांभूळ, करवंद, नारळ, सुपारी, जाम, पेरू, चिकू आदी झाडांची लागवड.
-तालुक्यातील दहा स्थानिकांना रोजगार उपलब्ध केला.
-शाळांमार्फत येणाऱ्या सहलींना ५० टक्के सवलतीचे धोरण ठेवले आहे. त्यामुळे अशा सहलींना
मोठी चालना मिळाली.
-वृदांवनला भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांना परिसरातील धबधबा, गुहा, धार्मिक स्थळे पाहण्याची सोय.

गंगाधर केळकर, ९१७५४०६७६४, ९४२२३९४६२५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com