Hanumant Pavale Agrowon
यशोगाथा

Vegetable Farming: एकात्मिक शेती पद्धतीसह उत्तम आर्थिक नियोजन

Farmer Success Story: पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्याच्या नाणेगाव येथील हनुमंत पवळे यांनी खरिपात भात, हिवाळ्यात भाजीपाला, दुग्ध व्यवसाय आणि आंबा बाग यांचा समावेश असलेली एकात्मिक शेती पद्धत यशस्वीपणे राबवली आहे.

गणेश कोरे

Integrated Farming Method: पुणे जिल्ह्यात मुळशी तालुक्यातील नाणेगाव येथील हनुमंत पवळे यांनी खरिपात भात, हिवाळ्यात भाजीपाला, जोडीला दुग्ध व्यवसाय, आंबा बाग शेती अशी एकात्मिक शेती पद्धती विकसित करून उत्कृष्ट पद्धतीने आर्थिक नियोजनही साधले आहे. यंदाच्या उन्हाळ्यात त्यांनी ठिबक व मल्चिंग पेरपचा वापर करून उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करून २८ गुंठ्यांत विविध भाजीपाला पिकांचा प्रयोगही यशस्वी केला आहे.

पुणे जिल्ह्यातील मुळशी हा डोंगराळ, पावसाचे प्रमाण जास्त असलेला तालुका म्हणून ओळखला जातो. या भागात उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. डोंगरउतारावर विखुरलेली, तुकड्या-तुकड्यांतील शेती या भागात पाहण्यास मिळते. तालुक्यातील नाणेगाव येथील हनुमंत पवळे यांची पाच एकर डोंगराळ शेती आहे.

अनेक वर्षांपासून त्यांना शेतीचा अनुभव आहे. खरिपात ते भातपीक घेतात. हा हंगाम संपल्यानंतर हिवाळ्यात धरण व नदीच्या उपलब्ध पाण्यावर ते वांगी, वाटाणा, बटाटा किंवा अन्य भाजीपाला सुमारे २० गुंठ्यात घेतात. जानेवारी- फेब्रुवारीनंतर पाणी कमी पडायला सुरुवात झाल्यानंतर मात्र कोणत्याच पिकांचा पर्याय उरत नाही. अशावेळी वर्षभराचे उत्पन्नाचे चक्र सुरू राहावे यादृष्टीने ते आपल्या दुग्ध व्यवसायावर लक्ष केंद्रित करतात.

उन्हाळी हंगामात तंत्रवापरातून भाजीपाला

नाणेगावात लुपीन फाउंडेशन आणि ॲटलस कॉप्को कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने उपलब्ध पाण्यावर बहुविध पीक पद्धती घेण्यासंबंधीचे प्रशिक्षण शिबिर मागील वर्षी डिसेंबरमध्ये घेण्यात आले. त्यात ठिबक सिंचन आणि मल्चिंग पेपर वापराविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या पीक पद्धतीचा उन्हाळ्यात प्रयोग करण्यासाठी पवळे यांची निवड झाली. त्यासाठी त्यांना ठिबक सिंचन व पॉली मल्चिंग पेपरचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. स्वभांडवल गुंतवून पवळे यांनी २८ गुंठ्यांत सुमारे सहा

भाजीपाला पिके घेण्याचे नियोजन केले. पवळे म्हणाले, की दर उन्हाळ्यात माझ्याकडील बोअरवेलला एक इंची पाणी उपलब्ध होते. ते केवळ गाईंना देण्यात येते. मात्र ठिबक व मल्चिंग पेपरच्या वापराने या पाण्याचा वापर उन्हाळी पिकांसाठीही करता आला. यंदाच्या २० जानेवारीच्या दरम्यान लागवडीस सुरुवात झाली. प्रत्येकी चार- पाच दिवसांच्या अंतराने कारले, दोडका, काकडी, पावटा, भेंडी व कलिंगड यांची थोड्या थोड्या गुंठे क्षेत्रावर लागवड केली. सुमारे २१ दिवसांत सर्व पिकांची लागवड पूर्ण झाली.

उत्पादन व उत्पन्न

दरवर्षीचा भाजीपाला शेतीचा अनुभव व अभ्यास यांच्या साह्याने व्यवस्थापन चांगले केले. एकूण लागवड क्षेत्रापैकी काकडीचे सुमारे २१ तोडे झाले. प्रति तोड्यात सुमारे १०० किलोच्या आसपास माल मिळाला. त्यास प्रति किलो १८ ते २० रुपये मिळाला. दोडका व कारल्याचे प्रत्येकी १८ ते २० तोडे झाले. प्रति तोड्यात ३० किलोपर्यंत उत्पादन मिळाले. दोडक्याला ५० रुपये तर कारल्याला प्रति किलो ३५ रुपये दर मिळाला. भेंडीचे २८ तोडे झाले. त्यातून सुमारे ११०० किलो उत्पादन तर किलोला ४० रुपये मिळाला.

पावट्याची सध्या काढणी सुरू असून, दोन तोडे पूर्ण झाले आहेत. प्रति तोड्याला ३० किलो उत्पादन मिळाले आहे. आणखी ८ तोडे होतील अशी अपेक्षा आहे. कलिंगडाचे पाच टनांच्या आसपास उत्पादन तर १३ रुपये प्रति किलो दर मिळाला आहे. अशा प्रकारे मिश्र पीकपद्धतीतून पाच ते सहा महिन्यांच्या कालावधीत सुमारे अडीच लाख वा त्याहून अधिक उत्पन्न मिळाले आहे. लुपीन फाउंडेशनचे प्रकल्प अधिकारी संदीप झणझणे आपल्या उपक्रमाविषयी म्हणाले, की शेतकऱ्यांनी शेती विकू नये व त्यातच चांगली प्रगती करावी या उद्देशाने प्रोत्साहन देण्याचे आमचे प्रयत्न आहेत. पवळे यांनी २८ गुंठ्यात बहुविध पीक पद्धतीने यशस्वी भाजीपाला उत्पादन घेतले आहे. त्यांच्यासारख्या शेतकऱ्यांचा प्रेरणा अन्य शेतकऱ्यांना मिळावी असा आमचा उद्देश आहे.

शेतकरी कट्ट्यावर विक्री

पिंपरी येथील भाजीपाला बाजारात शेतकरी कट्टा भरतो. पवळे सांगतात, की येथे शेतकऱ्यांना आपला दर ठरवता येतो. या ठिकाणी शहरात भाजीपाला विक्री दुकाने असणारे व्यापारी थेट खरेदीसाठी येतात.येथे व्यापाऱ्यांसोबत बोली लावता येते. मात्र आपल्याला परिसरातील बाजारांतील आवक- जावक, तेथील दर यांची पूर्ण माहिती वा अभ्यास हवा. तरच मनासारखा दर मिळवता येते असे पवळे सांगतात. गावाहून या कट्ट्यावर पवळे स्वतःच्या गाडीतून माल घेऊन येतात.

आदर्श आर्थिक नियोजन

पवळे यांनी अनेक वर्षांपासून आर्थिक नियोजन उत्तम प्रकारे ठेवले आहे. ते सांगतात, की शेतीत कर्ज घेण्याची निकड भासतेच. अनेक वेळा बॅंकांचा अनुभव खूप क्लेशदायक असतो. बॅंकांनीच आपल्याला कर्ज घेण्यासाठी विनंती करावी अशी आपली पत निर्माण करायचे ठरवले. सुमारे सात वर्षांपासून दुग्ध व्यवसायातील व शेतीतील उत्पन्नातून ठरावीक गुंतवणूक करीत गेलो. त्यामुळे बॅंकेचे व्यवहार, उलाढाल समाधानकारक राहिली. त्यामुळेच गोठ्यासाठी कर्ज घेता आले. एकही हप्ता रखडला नाही.

चारचाकीही घेतली. बॅंकेत पत तयार करीत गेल्यानेच कर्ज घेण्यास कोणतीही अडचण न येता नुकताच आठ लाख रुपयांचा ट्रॅक्टर खरेदी करता आला. परिसरातील शेतकऱ्यांना तो भाडेतत्त्वावर वापरण्यास देण्याचे नियोजन देखील आहे. शेती, पूरक व्यवसायातून उत्पन्नाचे स्रोत तयार करण्याबरोबर आंबा बागेलाही उत्पन्नाचा हुकमी स्रोत तयार केला आहे. दोन भावांत मिळून साडेसहा एकरांची आंबा बाग आहे.

त्यातील आंब्यांची थेट विक्री पुणे येथे केली जाते. त्यातून काही लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. याशिवाय खरिपातील ५० टक्के भातापासून बियाणे तयार केले जाते. त्याची परिसरातील भात उत्पादकांना ६५ रुपये प्रति किलो दराने विक्री केली जाते. स्वउत्पादित इंद्रायणी तांदळालाही पवळे यांनी थेट ग्राहक तयार केले आहेत. त्याचीही ६० ते ६५ रुपये प्रति किलो दराने विक्री होते.

शेतीत राबते संपूर्ण कुटुंब

संपूर्ण पवळे कुटुंब शेतीत कार्यरत आहे. हनुमंत यांना पत्नी संगीता यांची मोठी साथ आहेच. शिवाय मोठा मुलगा शुभम दुग्ध व्यवसाय तर धाकटा मुलगा स्वप्नील शेती पाहतो. बारावीत शिकणारी मुलगी ऐश्‍वर्या देखील अभ्यास सांभाळून शेतीत मदत करते. चौदा गाई, १० कालवडी आणि दोन बैल असे पशुधन आहे. दररोजचे १२० लिटरच्या दरम्यान दूध संकलन होते. शंभर लिटरच्या खाली संकलन कधीही गेलेले नसल्याचे पवळे सांगतात. पुण्यात घरोघरी रतीब घालणाऱ्या व्यावसायिकांना ते दूध पुरवतात.

हनुमंत पवळे ९७६७१४३०९४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT