Dairy Farmer Agrowon
यशोगाथा

Dairy Business : चौतीस वर्षांपासून दुग्ध उत्पादकांच्या सेवेत ‘बलभीम’

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Success Story of Milk Farmer : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील इस्लामपूर हे मुख्य शहर आहे. येथून सुमारे १० किलोमीटरवर कृष्णा नदीवर बोरगाव वसले आहे. ऊस व भाजीपाला ही प्रमुख पिके व जोडीला दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. शेतकऱ्यांत आर्थिक सुबत्ता येण्यास या व्यवसायाचे मोठे योगदान आहे. सुमारे ३५ वर्षांपूर्वीचा काळ सांगायचा तर सहकाराचे जाळे गावागावांत विणले जात होते.

त्याच दृष्टिकोनातून गावातील कै. धोंडीराम पाटील यांनी जाणत्या लोकांना एकत्र केले. त्यातून ‘बलभीम’ संस्थेची २६ नोव्हेंबर १९७९ मध्ये स्थापन केली. कै. पाटील गावचे सरपंच व राजारामबापू सहकारी दूध संस्थेचे संचालकही होते. अनेक प्रतिकूल परिस्थितीशी सामना करीत संस्थेची वाटचाल सुरू राहिली.

शेतकऱ्यांकडून दूध संकलन करणे व त्याचा गावातील गवळींना पुरवठा करणे असे संस्थेचे सुरुवातीचे काम होते. मिरज येथे शासकीय दूध डेअरी सुरु झाल्यानंतर तिथे पुरवठा सुरू झाला. सन १९७९ मध्ये दुधाला १.१० ते १.३० रुपये प्रति लिटर दर होता. त्यामुळे दूध उत्पादकांच्या हाती म्हणावी तशी रक्कम देण्यासाठी अडचणी यायच्या.

प्रक्रियेत उडी अन् दर्जेदार निर्मिती

सन १९९० पर्यंत दूध संकलन व विक्री एवढेच स्वरूप होते. त्या वेळी संस्थेची जबाबदारी कै. धोंडीराम पाटील यांचे पुत्र कै. अशोकराव यांच्याकडे आली. त्यांनी दूधप्रक्रियेचे महत्त्व ओळखले. त्यासंबंधी संस्थेच्या संचालकांसोबत विचारविनिमय करून १९९३ मध्ये प्रक्रिया विभाग सुरू केला.

कोल्हापूर व परिसरातील काही प्रसिद्ध दूध संस्थांना भेटी देऊन प्रक्रियायुक्त उत्पादनांच्या निर्मितीची माहिती घेतली.सुरुवातीला खवानिर्मिती झाली. पण त्याचे अचूक व्यावसायिक गणित जमत नव्हते. मग परिसरातील प्रसिद्ध आचाऱ्याची मदत घेतली. मनुष्यबळाचीही गरज होती. त्यासाठी गावातील होतकरू लोकांना प्रक्रिया उद्योगात समाविष्ट केले.

त्यांना संबंधित आचाऱ्याकडून प्रशिक्षण दिले. खवा, पेढा व त्यानंतर सन २००० पासून श्रीखंड, आम्रखंड, पनीर, ताक, दही अशी टप्प्याटप्प्याने उत्पादनांची श्रेणी तयार होऊ लागली. कोल्हापूर येथे श्रीखंडासह अन्य पदार्थ तयार करण्यासाठीचे संस्थेतील काही लोकांना तीन महिन्यांचे प्रशिक्षण दिले. त्यातून दर्जेदार उत्पादने तयार होऊ लागली.

बलभीम ब्रॅण्डने या उत्पादनांना बाजारपेठ मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले. आज कै. अशोकराव यांचे पुत्र धैर्यशील संचालक या पदावरून संस्थेची धुरा सांभाळत आहेत. बीईचे (सिव्हिल) शिक्षण घेऊन सुमारे दहा वर्षे ते त्यांनी पुण्यात बांधकाम व्यवसायाचा अनुभव घेतला. कोरोना काळात वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांना पुणे सोडून बोरगाव येथे येणे भाग पडले.

मार्केटिंगसाठी घेतलेले प्रयत्न

‘बलभीम’ ब्रॅण्ड तयार झाला होता. पण त्यांचे मार्केटिंग प्रभावी होणे गरजेचे होते. त्यासाठी वाळवा तालुक्यात विक्री व्यवस्था उभारण्यास सुरुवात झाली. आपल्या उत्पादनांचा दर्जा दुकानदारांना पटवून देण्यास सुरुवात केली.

हळूहळू पलूस आणि कडेगाव तालुके काबीज केले. ‘माउथ टू माउथ’ असा प्रसार होऊ लागला. बाजारपेठेत उत्पादनांना मागणी वाढली. मग २००९ मध्ये संयंत्रांची खरेदी करून नव्या तंत्रज्ञानाने उत्पादने तयार होऊ लागली. त्यामुळे मागणीनुसार पुरवठा करणे सोपे झाले.

धैर्यशील पाटील, ९९७५२७४७४७

(संचालक, ‘बलभीम’)

‘बलभीम’ संस्था व उत्पादनांविषयी

उत्पादने दर (रुपये) वार्षिक उत्पादन (अंदाजे)

किलोत

पेढा ४८० ११,२३४

बासुंदी १५५ २१,३४३

श्रीखंड १५० १८,९८१

आम्रखंड १५५ ६५३०

पनीर २८० ६,९४४

तूप ५५० ५३५

(टीप ः किमान ५० किलो खरेदी केल्यास प्रति किलोचे दर)

संस्थेची ठळक वैशिष्ट्ये

म्हशीच्या दुधाला प्रति लिटर साडेचार रुपये तर गायीच्या दुधाला दोन रुपये रिबेट दिला जातो. अधिकाअधिक रिबेट देण्याचा प्रयत्न. त्यामुळे शेतकरी संस्थेला दूध घालण्यासाठी येतो.

वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी अभ्यास दौरे.

हरियाना, गुजरातहून जनावरे खरेदी केल्यास आठहजार रुपये अनुदान.

दूध उत्पादक, सभासदांना दिवाळीत सवलतीच्या दरात उपपदार्थ.

कामगारांचा वार्षिक विमा. ‘शेअर’च्या रकमेवर १५ टक्के लाभांश.

उत्पादनांच्या पुरवठ्यासाठी इलेक्ट्रिकल वाहनाची सुविधा.

प्रक्रिया उद्योगाला लागणाऱ्या विजेसाठी सौरऊर्जेचा वापर.

सभासद संख्या- ८५

संस्थेला दूध पुरवणारे शेतकरी- ११५

दररोजचे दूध संकलन- सुमारे १३०० लिटर

प्रति दिन प्रक्रिया - ६०० लि..

पदार्थ विक्रीसाठी दोन काउंटर्स.

वाळवा, पलूस, कडेगाव या तीन तालुक्यांतील ६० गावांतील २०० दुकानांत विक्री.

वार्षिक उलाढाल- सुमारे तीन कोटी चार लाख (मागील वर्षीची)

मागील वर्षी एका दुग्ध उत्पादकाला (प्रातिनिधिक) दुधाला दिलेला उच्चांकी सरासरी दर (प्रति लिटर)

म्हैस- ७७.०२ रु. गाय-४४.०६ रु.

दुधाचा सरासरी दर (प्रति लिटर)

म्हैस- ५९.१७ रु. गाय- ३६.४० रु.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT