Dairy Farming Success Story : दूध व्यवसायात अग्रेसर ‘निमगाव वाघा’

Success Story of Milk Farmer : निमगाव वाघा (ता.जि. नगर) हे कोरडवाहू गाव. परंतु येथील शेतकऱ्यांनी गावाला दूध उत्पादकांचे गाव म्हणून नगर जिल्ह्यात वेगळी ओळख मिळवून दिली आहे. या गावाने दुग्ध व्यवसायातून अर्थकारण बदलले. गावातील ८० टक्के कुटुंब ही पशुपालनात आहेत.
Animal Husbandry
Animal HusbandryAgrowon

Animal Husbandry And Dairy Milk Business : नगर शहराच्या पश्‍चिमेला बारा किलोमीटर अंतरावर निमगाव वाघा गाव शिवार आहे. देशात प्रसिद्ध असलेल्या हिवरे बाजारला जाताना हे गाव लागते. सुमारे साडेसहा हजार लोकसंख्या आणि सहाशेच्या जवळपास कुटुंब असलेले गाव शिवार कोरडवाहू आहे. शेतीसाठी शाश्‍वत पाण्याचा स्रोत नाही. त्यामुळे शिवारात असलेल्या छोट्या तलावाचा काहीसा आधार मिळाला आहे.

दुष्काळाशी सतत सामना करावा लागणाऱ्या या गावाने सुमारे साठ वर्षांपूर्वी दूध व्यवसायाची दिशा पकडून दुष्काळावर मात करत पूरक व्यवसायाला सुरुवात केली. आता गावातील तिसरी पिढी दूध व्यवसायात आहे. पूर्वीच्या काळी देशी गाई, म्हशींचे संगोपन केले जायचे. त्याचवेळी गावातील बहुतांश कुटुंबांकडे दोन-चार जनावरेच असायची, अशी माहिती ज्येष्ठ शेतकरी रंगनाथ फलके आणि पैलवान कादरभाई शेख यांनी सांगितले.

नव्या पिढीकडे पशुपालनाची जबाबदारी

अनेक वर्षांपासून संघर्षातून जपलेल्या दूध व्यवसाय पुढे सुरू ठेवत गावातील तरुण पिढी शेतीसोबत दूध व्यवसायात गुंतली आहे. एकमेकांच्या सल्ल्याने अनेक शेतकरी गाईंच्या संख्येत वाढ करत आहे. साधारण वीस वर्षापूर्वी गाव शिवारात चार ते पाच हजार दुभती जनावरे होती, आता त्यात मोठी वाढ झाली आहे.

गाव शिवार दुष्काळी आहे. शाश्‍वत पाण्याचा स्रोत नाही. येथे असलेल्या जुन्या काळातील पाच गाव तलाव, बंधारे, नाला यातून मिळणाऱ्या पाण्याचा काटकसरीने वापर करत चारा उत्पादन घेतले जाते. आता दरवर्षी गावशिवारात ४० टक्के क्षेत्रावर चारा लागवड असते.

Animal Husbandry
Dairy Farming : दुग्ध व्यवसाय, संकलन, प्रक्रियेतून भक्कम केले शेतीचे अर्थकारण

सध्या गाव शिवारात सहा हजारांहून अधिक संकरित गाई आणि दोन हजारांहून अधिक जातिवंत दुधाळ म्हशी आहेत. गावात पाच दूध संकलन केंद्र कार्यरत आहेत. दररोज सुमारे वीस हजार लिटरच्या जवळपास दूध संकलन होते.

गावात दुग्ध व्यवसायातून वर्षभरात तीस कोटींची उलाढाल होते. दूध धंद्याच्या जोरावर बहुतांश शेतकऱ्यांनी चांगली घरे बांधली आहेत. तसेच मुलांना उच्चशिक्षणासाठी दूध व्यवसायाची मदत झाली आहे.

गावामध्ये पूर्वी साधे गोठे होते. मात्र अलीकडच्या दहा वर्षांत गाईंच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने सुमारे अडीचशेच्या वर शेतकऱ्यांनी मुक्तसंचार गोठे केले आहे. बहुतांश शेतकरी आता दूध काढणी यंत्राचा वापर करतात.

पशूपालनातील अडचणी, नवीन गाय किंवा कालवड खरेदी, पशुखाद्य, दुधाचे दर आणि यासह अन्य विषयावर चर्चा करण्यासह एकमेकांच्या मदतीसाठी गावातील तरुण शेतकऱ्यांकडून सोशल मीडियाचा योग्य वापर होत आहे.

शेतीला दूध व्यवसायाची जोड मिळाल्याने मजुरीचा शोध घ्यायची गरज पडत नाही. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला या व्यवसायातून घरीच पुरेसे काम उपलब्ध झाले आहे. दूध व्यवसायाच्या कामांत महिलांचा सक्रिय सहभाग असतो. शेती कामाला येथे मजुरांची कायम टंचाई असते. गरजेच्या वेळी अन्य गावांहून मजूर आणावे लागतात.

गाव शिवारात साधारण पावणे सातशे हेक्टर लागवड योग्य क्षेत्र आहे. त्यातील शंभर हेक्टरवर कापूस, दिडशे हेक्टरवर ऊस आणि पन्नास हेक्टरवर इतर पीक वगळता सुमारे तीनशे हेक्टरवर चारा पिकांची लागवड आहे. पशुपालनातून आर्थिक सक्षमता आल्याने आर्थिक प्रगतीला दिशा मिळाली आहे.

Animal Husbandry
Milk Rate : राज्यातील ३० टक्के दुधात भेसळ ; राधाकृष्ण विखे-पाटील

मुरघास ठरले फायद्याचे

निमगाव वाघा येथे बहुतांश वेळा चाऱ्याची टंचाई निर्माण होते. अनेक वेळा दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागते. त्यामुळे साधारण आठ ते दहा वर्षांपासून पशुपालकांनी मुरघास निर्मिती सुरू केली. बहुतांश पशुपालक वर्षाला १० ते ३० टनांपर्यंत मुरघास तयार करतात. केवळ मुरघासामुळे मागील दहा वर्षांत अनेक वेळा दुष्काळी परिस्थितीवर मात करता आली.

हा भाग कोरडवाहू असल्याने ज्वारी, बाजरीपासूनही चारा मिळतो. मात्र गरज पडली तर संकट काळात नगरहून चारा विकत आणला लागतो. मागील दहा वर्षांत दोन ते तीन वेळा गावाला दुष्काळाला सामोरे जावे लागले होते. त्या वेळी टॅंकरने पाणी आणून जनावरे जगवली असे राजे शिवछत्रपती दूध संकलन केंद्राचे संचालक भारत फलके यांनी सांगितले.

जमीन सुपीकतेवर भर

पशुपालनामुळे पुरेशा प्रमाणात शेणखताची उपलब्धता आहे. दरवर्षी गावामध्ये बारा ते पंधरा हजार टन शेणखत उपलब्ध होते. त्यामुळे शिवारात पिके, चारा पिकांना शेणखत वापराचे प्रमाणही अधिक आहे. प्रत्येक शेतकरी शेणखताचा वापरावर भर देत आहे. फार कमी प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केला जातो. यामुळे चांगल्या गुणवत्तेचा चारा, पीक उत्पादनात वाढ, मातीतील सेंद्रिय कर्ब वाढ झाल्याचा येथील शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

आमचा भाग कोरडवाहू आहे. त्यामुळे आमच्या आजोबांनी शेतीला जोड म्हणून दूध व्यवसाय सुरू केला. त्याची जबाबदारी आता आमच्या तिसऱ्या पिढीवर आली आहे. सध्या माझ्याकडे २८ म्हशी, २३ गाई आहेत. शेतीला पशुपालनाचा चांगला आधार मिळाला आहे. या व्यवसायाने आमच्या गावाला वेगळी ओळख मिळाली आहे.
कुमार फलके, पशुपालक
आमच्या गावाला शाश्‍वत पाणी नाही, परंतु शेतकऱ्यांनी दूध व्यवसायातून आदर्श निर्माण केला आहे. या व्यवसायाने आमच्या गावाला वेगळी ओळख दिली. पूरक व्यवसायातून संकटावर मात करणे शक्य आहे, हे आमच्या गावाने दाखवून दिले. आमच्या केंद्रातर्फे दररोज ‘ॲग्रोवन’चे १०० अंक पशुपालकांपर्यंत पोहोचवितो. त्यातून नवीन तंत्रज्ञानाची ओळख होत आहे.
भारत फलके ९८३४४५९३९६ (संचालक, राजे शिवछत्रपती दूध संकलन केंद्र)

अडचणीतून शोधतोय मार्ग

सत्तर वर्षांपेक्षा अधिक काळापासून दूध व्यवसाय जपलेल्या पशुपालकांना सातत्याने अडचणीला सामना करावा लागतो. अलीकडच्या दहा वर्षांत सातत्याने दुधाचे दर पडत आहेत. दुष्काळासारख्या गंभीर संकटालाही सामोरे जावे लागत आहे. कोरोनाच्या काळात मोठा आर्थिक फटका सोसावा लागला. दोन वर्षे दर कमी होते.

आठ महिन्यांपूर्वी दर वाढले. परंतु पुन्हा दोन महिन्यांपासून पुन्हा दहा रुपयांनी दर खाली आले आहेत. पडत्या दराचा शेतकऱ्यांना गेल्या एका महिन्यात सुमारे साठ लाखांचा आर्थिक फटका सोसावा लागला आहे

अशीच परिस्थिती राहिली, तर वर्षभरात सुमारे सव्वासात कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे. यंदा दुष्काळी परिस्थिती आहे. चाऱ्याची टंचाई आहे. पशुखाद्याचे दर वाढत असल्याने दूध उत्पादक अडचणीत आहे. त्यातूनही हा व्यवसाय टिकविण्यासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

या परिसरातील बहुतांश गावे कोरडवाहू असल्यामुळे ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, तूर या पिकांची लागवड जास्त प्रमाणात आहे. बहुतांश शेतकऱ्यांची शेती पावसावरच अवलंबून आहे. मात्र गावातील शेतकऱ्यांनी केवळ कोरडवाहू शेतीवर अवलंबून न राहता दूध व्यवसायाची जोड दिली. आता या व्यवसायाची जबाबदारी नव्या पिढीने हाती घेतली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com