Animal Husbandry Agrowon
यशोगाथा

Animal Husbandry : शेतीला मिळाली पशुपालनाची जोड

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Animal Care : सातेफळ (ता.अंबाजोगाई, जि.बीड) येथील माऊली जाधव यांच्या एकत्र कुटुंबाकडे ३२ एकर शेती आहे. यामध्ये हंगामनिहाय विविध पिकांचे चांगल्या प्रकारे नियोजन केले आहे. दररोज सायंकाळचे जेवण एकत्र घेणाऱ्या जाधव यांच्या एकत्र कुटुंबात एकूण १२ सदस्य आहेत. आजी सरजूबाई संभाजी जाधव या कुटुंबाच्या प्रमुख. सर्वांकडून कामाचा हिशेब घेणे, सर्वांवर लक्ष ठेवणे, समान न्याय देणे ही त्यांची भूमिका. वडील गोविंद संभाजी जाधव कोणत्या क्षेत्रात कुठले पीक घ्यायचे याचे नियोजन, सर्व पिकांची फवारणी आदी जबाबदारी सांभाळतात.

आई सौ. लक्ष्मी गोविंद जाधव यांच्याकडे पीक व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. चुलते धनंजय संभाजी जाधव शेतातील मोटार, ट्रॅक्‍टर, कडबा कुट्टी, सोयाबीन रीपर, मोटार सायकल, चारचाकी, मळणीयंत्राचे व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळतात. काकू सौ. सारिका धनंजय जाधव यांच्याकडे महिला मजुरांचे नियोजन असते.

बहिणी पूजा गोविंद जाधव, वैष्णवी धनंजय जाधव, मनस्विनी धनंजय जाधव या शिक्षणासोबतच कुटुंबासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीची जबाबदारी सांभाळतात. माऊली गोविंद जाधव आणि भाऊ श्रीनिवास धनंजय जाधव यांच्याकडे जनावरांची जबाबदारी, शेतीमाल व जनावरे, निविष्ठा खरेदी आणि विक्री तसेच लागवडीसाठी नवीन बियाणे निवड ही जबाबदारी असते. माऊली यांची पत्नी सौ. आरती यांच्याकडे घरकामासोबत धान्य स्वच्छता, प्रतवारी, पॅकिंग, लेबलिंग इत्यादीची जबाबदारी आहे.

विविध पिकांची लागवड

माऊली जाधव हे कृषी पदवीधर आहेत. बाजारपेठ आणि जमिनीच्या मगदुराप्रमाणे त्यांची शेतीमधील पीक नियोजनाचे गणित बसवले आहे. जाधव यांच्या एकत्र कुटुंबाकडे ३२ एकर शेती आहे. पीक नियोजनाबाबत माऊली जाधव म्हणाले की, २०१७ मध्ये साडेतीन एकरापासून प्रमाणित पद्धतीने सेंद्रिय शेतीला सुरवात केली. टप्याटप्याने संपूर्ण शेतीचे एनपीओपी प्रमाणीकरण केले आहे.

गेली सहा वर्षे आम्ही सेंद्रिय पद्धतीने पीक उत्पादन घेत आहोत. खरिपात सोयाबीन, तूर, हळद, भाजीपाला लागवड असते. रब्बीमध्ये दगडी ज्वारी, गहू, हरभरा, खपली गहू, जवस, करडई, अंबाडी, गावरान कारळा, काबुली हरभरा लागवड केली जाते. याशिवाय बांधावर रानभाज्या, कर्टूले, वाघाटे, गरजेफळ, सुरणकंद आदी पिकांची लागवड असते.

सेंद्रिय पद्धतीने उत्पादित शेतीमालाची प्रतवारी आणि पॅकिंग करून सोशल मिडियाचा वापर करून अंबाजोगाई परिसरात जोडलेल्या ग्राहकांना विक्री केली जाते. सेंद्रिय पद्धतीने उत्पादित गहू ४५ रुपये, हरभरा ७० रुपये, दगडी ज्वारी ५५ रुपये, खपली गहू १०० रुपये, मूग ११० रुपये प्रति किलो या दराने विक्री केली जाते. उत्पादन खर्चानुसार दर कमी जास्त होतात. सेंद्रिय पद्धतीने उत्पादित सोयाबीनची खरेदी एका कंपनीतर्फे केली जाते. विदर्भातील पुसद, वर्धा, मराठवाड्यातील धाराशीव, लातूरसह पुणे शहरातील ग्राहक आमच्यासोबत जोडले गेले आहेत.

पशूपालनास सुरवात

२००१ ते ०६ दरम्यान जाधव कुटुंबाने पाच जर्सी, दोन म्हैस व एक देशी गाईच्या संगोपनातून दुग्ध व्यवसायाला सुरवात केली. कालांतराने मजुरांची अडचण, दुधाला मिळणारा कमी दर यामुळे दूध उत्पादन आणि खर्चाचा ताळमेळ बसत नव्हता. २००२ मध्ये माऊली जाधव यांनी देशी गाईंची संख्या वाढवली. टप्याटप्याने त्यांनी गीर, साहिवाल आणि देवणी गोवंश गोठ्यामध्ये आणला.

रेतनासाठी त्यांनी लिंग आधारित रेतमात्रेचा वापर सुरू केला आहे. सध्या त्यांच्या गोठ्यात १ गीर गाय, १ सहिवाल गाय, १ देवणी गाई, ४ म्हशी, ४ लाल कंधारी बैल, १ रेडा तसेच तीन शेळ्या, चार कोंबड्या आहेत. जनावरांना चाऱ्यासाठी दगडी ज्वारीचा कडबा, मका, सोयाबीन, तूर, हरभरा भुस्सा तसेच नेपियर, मारवेल गवताचा वापर केला जातो. कोरडा आणि ओला चारा जनावरांना कुट्टीकरून दिला जातो.

वर्षाकाठी किमान दोन गोऱ्हे किंवा दोन, तीन कालवडी गोठ्यात तयार होतात. आवश्‍यकतेनुसार गोधन घरी ठेवले जाते आणि शिल्लक गोधनाची परिसरातील शेतकऱ्यांना विक्री केली जाते. याशिवाय सेंद्रिय शेती, बायोगॅस तसेच दशपर्णी अर्क, जीवामृत, बीजामृत तयार करण्यासाठी त्यांना शेण, गोमुत्राची उपलब्धता होते. गतवर्षी माऊली जाधव यांनी देशी गाईंच्या शेणापासून दिवाळीत पणत्या तयार केल्या होत्या. पणती विक्रीतून त्यांना १८ हजार रुपये मिळकत झाली.

देशी गाईंपासून मिळणारे दूध कुटुंबासाठी जेवढं लागतं तेवढं ठेवून उरलेले विकले जाते. साधारणतः दररोज तीन लिटर दुधाची विक्री होते. ग्राहक घरी येऊन प्रति लिटर ६० रुपये दर देऊन दूध विकत घेतात.

पशुपालन आणि सेंद्रिय शेतीमध्ये कृषी पदवी शिक्षणाचा चांगल्या प्रकारे वापरकरून एकत्र कुटुंबात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या माऊली जाधव यांना ॲग्रोवनतर्फे २०२३ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील कृषी प्रदर्शनात ‘प्रयोगशील शेतकरी सन्मान’ पुरस्कार देवून गौरविण्यात आले होते.

बायोगॅस, मुक्त संचार गोठा

२०१७ साली जाधव यांनी बायोगॅस उभारणी केली. स्वयंपाकासाठी याचा वापर केला जातो. जनावरांच्या संगोपनासाठी १०० बाय ५० फूट आकाराचा मुक्त गोठा तयार केला आहे. त्यामुळे जनावरांचे व्यवस्थापन सोपे झाले. जनावरांना पुरेसा व्यायाम मिळत असल्याने आजारी पडत नाही, त्यांच्यावर उपचारासाठी होणारा खर्च कमी झाला आहे.

मुक्त गोठ्यातील खत हे चांगल्या प्रतीचे मिळते. सेंद्रिय शेतीसाठी पुरेशा प्रमाणात शेणखत, गोमूत्राची उपलब्धता झाली. यातून जमिनीचा पोत सुधारला. शेण,गोमूत्रापासून गांडूळखत, व्हर्मिवॉश निर्मिती करून सेंद्रिय शेतीसाठी वापर केला जातो. देशी गोपालनासह शेती कामांमध्ये वडील गोविंद जाधव, भाऊ श्रीनिवास जाधव आणि चुलते धनंजय जाधव यांची मोलाची साथ मिळत आहे.

- माऊली जाधव ८२०८८४००२५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT