Agriculture Success Story : एकेकाळी केली मजुरी, आज शेतीत भरारी

Farming Success : सातारा जिल्ह्यातील सासकल (ता. फलटण) येथील बबन मुळीक यांना एकेकाळी मोलमजुरी करावी लागली. मात्र स्वतःच्या शेतीतील प्रगतीचा ध्यास घेऊन त्यांनी प्रयोगशील वृत्तीतून द्राक्षे, डाळिंब, सीताफळ आदी फळबाग शेती त्यांनी विकसित केली.
Agriculture
AgricultureAgrowon
Published on
Updated on

विकास जाधव

Successful Farming : सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याचा काही भाग दुष्काळी आहे. त्यामुळे शेती आणि त्यास दुग्ध व्यवसायाची जोड याप्रकारे येथील शेतकऱ्यांनी आपले अर्थकारण सावरले आहे. तालुक्यात सासकल या गावचे बबन रामचंद्र मुळीक हे सुमारे ६३ वर्षे वयाचे शेतकरी आहेत. आता शरीर पूर्वीसारखे तितकी साथ देत नसले तरी मुळीक यांचा शेतीतील उत्साह, प्रयोग करण्याची धडपड तरुणांनाही लाजवेल अशीच आहे.

सुरुवातीचे दिवस

मुळीक कुटुंबाने आज शेतीतून प्रशंसनीय प्रगती साधली असली, तरी एकेकाळी त्यांना जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. हालाखीच्या परिस्थितीत बबन यांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतले. शेती पाच एकर होती. पण त्यात पिकत काहीच नव्हते. विकास करायचा तर भांडवल नव्हते. त्या वेळी परिसरातीसकापूस उत्पादकांकडे तसेच अन्य शेतीत बबन मजुरीला जायचे. पुढे त्यांच्यासह सहा जणांनी एकत्र येऊन बँकेचे कर्ज घेत १९८३ मध्ये सामुदायिक विहीर घेतली. त्याआधारे पाइपलाइन करून शेतापर्यंत पाणी आणले. दूध संकलनासह सासकल ते फलटण हे दहा किलोमीटर अंतर दररोज सायकलवरून जाऊन- येऊन करीत रोघरी दुधाचे रतीब घालण्याचेही खडतर कष्ट वेचले.

Agriculture
Agriculture Success Story : नाईकनवरे बंधूंनी माळरान जमीन केली कसदार

द्राक्षाची शेती

कष्टांची सवय अंगवळणी पडलेल्या बबन यांनी १९८६ मध्ये २५ गुंठे क्षेत्रावर द्राक्ष लागवडकेली. आगाप छाटणी घेऊन दिवाळीच्या दरम्यानच ते आपली द्राक्षे बाजारात आणू लागले. उत्पन्न चांगले मिळू लागले तशी बाग साडेतीन एकरांपर्यंत पोहोचवली. सुमारे ३५ वर्षे द्राक्ष शेतीचा मोठा अनुभव घेतला. अवकाळी पाऊस व दुष्काळ या बाबींची जोखीम टाळण्यासाठी तीन वर्षांपूर्वी हे पीक घेणे थांबवले.

डाळिंबाचा प्रयोग

सन १९८९ मध्ये शासकीय फळबाग लागवडीतून दोन एकरांत डाळिंबाचा प्रयोग केला. द्राक्षाच्या अनुभवातून या बागेचे व्यवस्थापन तंत्रही उत्तम प्रकारे हाताळले. आज डाळिंबाचे चार एकरांपर्यंत क्षेत्र नेले आहे. या पिकात ३२ वर्षांहून आधिक दांडगा अनुभव तयार झाला आहे. १५ बाय ९ फूट अंतरावर भगवा वाणाची लागवड आहे. जानेवारीच्या दरम्यान आंबे बहर धरण्यात येतो. अन्य शेतकऱ्यांच्या तुलनेत दोन महिने आधी माल बाजारात येईल असा प्रयत्न असतो. एकरी १० ते १२ टनांपर्यंत उत्पादकता मिळते. मुंबई, केरळ, आंध्र प्रदेशातील व्यापारी जागेवर येऊन खरेदी करतात. फळांचे वजन, आकार, चकाकी, दर्जेदारपणा, रंग व गोडी या बाबी पाहाता तीन वर्षांपासून किलोला १०० ते १३० रुपये किंवा त्याहून अधिक दर मिळाला आहे. यंदाच्या जून- जुलैमधील डाळिंबाला १२५ रुपये दर मिळाला.

सीताफळाची जोड

सन २०१४ पासून सीताफळाची जोड दिली आहे. एक एकरात एनएमके-१ या वाणाचीलागवड आहे. पहिले उत्पादन घेतले त्या वेळी मृग बहरातील फळांनी ७० रुपये प्रति किलोचा दर व पावणेतीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले होते. टप्प्याटप्प्याने वाढ करत आज साडेतीन एकरांपर्यंत सीताफळ बागेचा विस्तार केला आहे. एकरी नऊ टनांपर्यंत उत्पादन व प्रति किलो ७० ते ८० रुपये दर मिळत आहे.

Agriculture
Agriculture Success Story : नैसर्गिक उमाळ्यावर फुलली शेती, बहरले पर्यटन

ॲव्होकॅडो व सफेद जांबचा प्रयोग

सातत्याने प्रयोगशील वृत्ती जोपासलेल्या बबन यांनी ॲव्होकॅडो फळाची दोन एकरांत प्रायोगिक लागवड केली आहे. बोरगाव येथील कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनातून कर्नाटकातून त्याची रोपे आणली आहेत. बबन यांचा मुलगा निखील यांनी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून सफेद जांब या फळाची दोन रोपे आणली होती. त्यातील एका झाडापासून ३५ हजारांचे उत्पन्न घेण्यात मुळीक यशस्वी झाले. आज त्याची अर्धा एकरांत लागवड आहे.

मातीचे आरोग्य जपण्यावर भर

सेंद्रिय- रासायनिक ८०- २० टक्के यानुसार मुळीक शेती करतात. जमिनीचे आरोग्य जपण्याला त्यांनी सर्वोच्य प्राधान्य दिले आहे. पिकांचे अवशेष, पालापाचोळा यांचा ते पुनर्वापर करतात. गोमूत्र, शेणखतासाठी दोन देशी गायींचे संगोपन केले आहे. गांडूळ खत स्वतः तयार करतात. व्हर्मिवॅाश, जिवामृत, बोर्डो मिश्रण आदींच्या वापरासह टॅक्ट्ररचलित यंत्राच्या साह्याने स्लरी देतात. फळमाशी, रसशोषक किडींना प्रतिबंध करण्यासाठी सापळ्यांचा वापर करतात. प्रतिबंधात्मक फवारण्यांवर भर असतो. फळबागा लहान असताना त्यात पपई, दुधी भोपळा, चवळी आदी पिके घेतात.

प्रशंसनीय प्रगती

पत्नी संगीता यांच्या साथीमुळेच शेतीत सारी प्रगती साधणे शक्य झाल्याचे बबन सांगतात. शेतीतील उत्पन्नातूनच चार एकर शेती खरेदी केली. आज एकूण नऊ एकर शेती आहे. टुमदार बंगला बांधला आहे. चारचाकी वाहन, ट्रॅक्टर, त्यावर आधारित यंत्रे आदी सुविधा आहे. मुलांना उच्चशिक्षित केले आहे. कृषी विभागाच्या फळबाग व अन्य योजनांचे सहकार्य मिळाले आहे. मुळीक ‘ॲग्रोवन’चेही नियमित वाचक आहेत.

सेंद्रिय पद्धतीवर अधिकाधिक भर देत सेंद्रिय भाजीपाला, ज्वारी, बाजरी, कडधान्ये पिकवून स्वयंपूर्णतः मिळविली आहे. सकस अन्न व देशी गायीचे दूध कुटुंबातील सर्व सदस्यांना मिळत आहे. सोबतीला शेतीतले कष्ट आहेत. त्यामुळे आमच्या सर्वांच्या शरीर प्रकृती ठणठणीत आहेत याचे वेगळे समाधान आहे.

बबन मुळीक

९५७९७१४५६३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com