Integrated Farming Agrowon
यशोगाथा

Integrated Farming : एकात्मिक शेतीचे आदर्श मॉडेल

सुदर्शन सुतार

Integrated Farming Model : सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यातील खुनेश्‍वर येथील विजयसिंह चव्हाण यांची ३२ एकर शेती आहे. त्यात १० एकर द्राक्षे, चार एकर ऊस, प्रत्येकी अडीच एकर डाळिंब व कांदा आणि पाच एकरांत शेततळे आहे. जोडीला पूरक व्यवसाय आहेत. पदवीधर असलेले विजयसिंह आई नर्मदाबाई यांच्या साथीने पूर्णवेळ शेती करतात.

मोठे बंधू अंकुश केंद्रीय संचार ब्युरोमध्ये सोलापूर विभागाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी, तर दुसरे बंधू सचिन दक्षिण सोलापूर पंचायत समितीत कृषी विस्तार अधिकारी आहेत. दोन्ही बंधू शेतीत जमेल तशी मदत करतात. तिघे मिळूनच शेतीतील निर्णय घेतात. कुटुंबाच्या या एकजुटीमुळेच एकात्मिक शेती पद्धतीचा विकास झाला आहे.

वडिलांची इच्छा केली पूर्ण

विजयसिंह यांचे वडील कै.. रामचंद्र प्रयोगशील शेतकरी होते. सन १९९० च्या दशकात त्यांनी भागात प्रथमच द्राक्ष शेतीचा प्रयोग केला. त्यात यश मिळवलेही. पण काही अडचणींमुळे बाग काढावी लागली. ही रुखरुख त्यांच्या मनात राहिली.

पुढे विजयसिंह यांनी २००८ च्या सुमारास पुन्हा द्राक्ष बाग लावली. टप्प्याटप्प्याने आजमितीला १० एकरांवर ती फुलवण्यासह बेदाण्याच्या उत्कृष्ट उत्पादनात नाव मिळवले आहे. वडिलांची तेव्हाची रुखरुख आज पूर्ण केल्याचे समाधान त्यांना आहे.

शेती व्यवस्थापनातील ठळक बाबी

कष्टपूर्वक, नियोजनबद्ध कामकाज. नवनवीन प्रयोग आणि तंत्रांचा अवलंब. पहाटे साडेपाचच्या सुमारास शेतीकामांना सुरुवात.

सोनाका, थॉम्पसन द्राक्ष वाण. एकरी १० टनांपर्यंत उत्पादकता.

एकरी पाच ते सहा टनांपर्यंतचे बेदाणा उत्पादन. तो शीतगृहात ठेवून समाधानकारक दर मिळतो त्या वेळी विक्री.

डाळिंबाचे सुपर भगवा वाण. एकरी १० ते १२ टनांपर्यंत उत्पादन.

संपूर्ण शेतीवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे.

हिरवळीच्या खतांचा वापर. त्यासाठी ताग, धैंचाची लागवड.

सोलर व लाइट ट्रॅपचा वापर करून कीड नियंत्रण.

द्राक्ष, डाळिंबाच्या संपूर्ण क्षेत्राला स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणाली (ड्रीप ऑटोमेशन).

मोबाइल आधारित रिमोट सेन्सरचा त्या अंतर्गत वापर. रासायनिकसह जैविक निविष्ठाही या यंत्रणेद्वारे देण्याची सुविधा.

चाऱ्यासाठी बांधावर चोहोबाजूंनी चारागवत. बांधाचा उत्तम वापर करीत नैसर्गिक कुंपण म्हणून आंबा, नारळ, सीताफळ, आंबा, शेवगा, गुंजपत्ता, पानफुटी, अश्‍वगंधा, शतावरी, इन्शुलिन प्लॅन्ट, वाळा, गवती चहा, अडुळसा आदींची लागवड.

एकसमान पाणी देणारे तंत्र

संपूर्ण बागेला एका टोकाच्या रांगेपासून ते शेवटच्या टोकाला असलेल्या रांगेपर्यंत पाणी पिकांना एकसमान व समान दाबाने मिळावे यासाठी स्वतः तंत्र विकसित केल्याचे

विजयसिंह सांगतात. ‘कंटिन्यूयस लूप ॲण्ड ड्रेन इरिगेशन सिस्टिम’ असे त्यास नाव दिले आहे.

यात सबमेन लाइन तीन इंच. त्यातून जाणारी १६ एमएम लॅटरल ही दोन इंची पाइप ‘ड्रेन लाइन’ला जोडली आहे. प्रत्येक रांगेत दोन लॅटरल्स. प्रत्येक १० रांगांमध्ये ड्रेनलाइन जोडली आहे. या रांगांच्या लॅटरलमधील पाणी ड्रेनलाइनमध्ये येते. कमी दाब असलेल्या बाजूला पाणी जाते.

त्यामुळे प्रत्येक ड्रीपरला समान दाब मिळतोच. ‘ड्रीपर’ चोकअप होण्याचे प्रमाण कमी होते.

लॅटरलची एण्डकॅप काढून स्वच्छ करण्याऐवजी एकाच ड्रेन व्हॉल्व्हमधून पाणी बाहेर काढून

मी वेळेत, कमी मजुरांत स्वच्छता. ‘ड्रेन व्हॉल्व्ह’चा वापर करून आवश्यक वेळी मोकळे पाणी देता येते.

पूरक व्यवसायांची भक्कम जोड

आठ जर्सी गायी, तीन म्हशी व एक देशी गाय आहे. मुक्तसंचार व बंदिस्तही गोठा आहे. प्रतिदिन ७० ते ८० लिटर दूध मिळते. फलटण येथील डेअरीला त्याचा पुरवठा होतो. देशी गाईचे दूध घरी वापरले जाते. विजयसिंह यांच्या आईने एका शेळीपासून संगोपनाला सुरुवात केली. त्यातून ४६ पर्यंत संख्या वाढवली. आज ३२ उस्मानाबादी शेळ्या आणि तीन बकरे आहेत. दरवर्षी ७ ते ८ बकऱ्यांची विक्री होते. मागील दोन वर्षांत चार लाखांचे उत्पन्न त्यातून मिळवले आहे.

शेततळ्यातील मत्स्यपालन

पाच कोटी लिटरच्या शेततळ्यात तीन वर्षांपासून मत्स्यपालन सुरू केले आहे. यात कटला, राहू या मागणी असलेल्या माशांचे दरवर्षी सुमारे १५ हजार बीज सोडण्यात येते. वर्षभरात रोहू एक ते दोन किलो तर कटला दोन ते तीन किलो वजनाचा होतो. ८० ते ८५ रुपये प्रति किलो दराने विक्री होते. खाद्यावर सव्वा लाखाहून अधिक खर्च होतो. घरच्या घरीही मका, सोयाबीनपासून खाद्यनिर्मिती केली आहे.

सेंद्रिय निविष्ठा निर्मिती

गांडूळ खत निर्मितीसाठी सात हौद. त्यात शेण आणि गोमूत्र संकलित केले जाते. प्रति एक टन खतनिर्मिती अशी हौदाची क्षमता. व्हर्मिवॉशचे स्वतंत्र टँकमध्ये संकलन. जिवामृत स्लरीची निर्मिती. द्राक्ष आणि डाळिंबाला नियमितपणे त्याचा वापर.

दोन बायोगॅस संयंत्रेही उभारली आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT