Rural Dairy Entrepreneurs Success : अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनईपासून उत्तरेला मुळा नदीचा पट्टा आहे. पाण्याची उपलब्धता वाढल्यानंतर परिसरातील दहा ते पंधरा गावे दूध व्यवसायाकडे वळली. मुळा नदीकाठी असलेले पाचशेच्या जवळपास कुटुंबे व साडेतीन हजार लोकसंख्येचे अंमळनेर हे त्यापैकीच एक गाव.
ज्ञानेश्वर आयनर हे लोकनियुक्त सरपंच तर शांताबाई चांगदेव मोरे उपसरपंच आहे. ग्रामपंचायतीचे नऊ सदस्य आहेत. राहुरी जवळील मुळा धरणाच्या निर्मितीनंतर धरणग्रस्त झालेली अनेक कुटुंबे या भागात स्थायिक झाली. नदीचे वरदान असल्याने परिसर बागायती, हिरवागार.
मात्र गावाची खरी ओळख दुग्ध व्यवसायातूनच झाली आहे. पाचशे कुटुंबांपैकी साडेचारशेच्या जवळपास कुटुंबे दुग्धोत्पादनासह अन्य पूरक व्यवसायात गुंतली आहेत. त्यातूनच शेतकरी आर्थिक सक्षम झाले आहेत. शिवारातील समृद्धी त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येते.
दुग्ध व्यवसायास चालना
अंमळनेर गावातील अनेक कुटुंबे अल्प किंवा अत्यल्प भूधारक आहेत. साधारण चाळीस वर्षांपूर्वी गावात दूध व्यवसायाला सुरुवात झाली. पूर्वी कमी प्रमाणात व्यवसाय होता. पंचवीस वर्षांपासून त्यात वाढ होत गेली.
सुरुवातीच्या काळात गावात सर्व मिळून तीनशेपर्यंत जनावरे असतील. अनेकांनी अल्प भांडवलात व्यवसाय सुरू करत घरच्या गाई- म्हशींपासून मिळणाऱ्या कालवडींचा सांभाळ करत व्यवसायात टप्प्याटप्प्याने वाढ केली. सध्या एकूण चार हजारांच्या आसपास दुभती जनावरे असावीत. त्यात वीस टक्के म्हशी आहेत.
गावात लहान-मोठी ११ दूध संकलन केंद्रे आहेत. पूर्वी तीन हजार लिटरच्या आसपास असणारे दररोजचे दूधसंकलन आता पंधरा हजार लिटरच्या आसपास पोहोचले आहे. बाहेरगावांतील केंद्रांमधूनही संकलन होते. दुग्ध व्यवसायात तरुणांसह महिलांचा पुरुषांहून अधिक वाटा राहिला आहे.
पहाटे पाचपासून सायंकाळी उशिरापर्यंत गोठा व्यवस्थापनातील सर्व कामांमध्ये त्याच आघाडीवर असतात. दूध यंत्रिक पद्धतीने काढण्यातही त्या पारंगत झाल्या आहेत. सुमारे दोनशे शेतकरी कमी-जास्त प्रमाणात शेळीपालन करतात. मोजकेच शेतकरी कुक्कुटपालनात आहेत. मात्र आता त्यालाही अधिक प्राधान्य देण्याचा विचार असल्याचे कुक्कुटपालक अनिल पाटील माकोने यांच्यासह येथील तरुणांनी सांगितले.
आर्थिक सक्षमता
तीनशेच्या जवळपास कुटुंबांनी मुक्तसंचार गोठ्याचा अवलंब केल्याने कष्ट सुकर झाले आहेत. दररोज ताजे उत्पन्न मिळत असल्याने आर्थिक नियोजन करणे सोपे झाले. काहींनी व्यवसायातील पैशांमधून पाइपलाइन करून शिवारात पाणी आणले. देखणी घरे बांधली. मुलांना उच्चशिक्षण देणे त्यांना शक्य झाले.
एकेकाळी काही कुटुंबे मजुरी करायची. आता यशस्वी दुग्धोत्पादक म्हणून त्यांची ओळख झाली आहे.अनेकांना रोजच्या कामांतून एक दिवसही उसंत मिळत नाही. त्यामुळे शेतीसाठी आसपासच्या भागांमधून मजूर आणावे लागतात.
व्यवसायातील अडचणी, गाईंचे ब्रीड, कालवडी खरेदी यासह विविध विषयांवर ग्रामस्थ चर्चा करतात. तरुण शेतकऱ्यांकडून त्यासाठी ‘सोशल मीडिया’चा वापर होतो. वर्षाला या व्यवसायातून पंचवीस कोटींपेक्षा अधिक रकमेची उलाढाल होत असावी असा अंदाज आहे.
जमिनी झाल्या सुपीक
गावशिवारात सुमारे ७२० हेक्टर क्षेत्र असून ६६९ हेक्टर लागवडीखालील क्षेत्र आहे. खरिपात कापूस तर रब्बीत कांदा हे प्रमुख पीक असते. एकूण क्षेत्राच्या चाळीस टक्के क्षेत्रावर चारा तर वीस टक्के क्षेत्रावर ऊस आहे. गावात वर्षाला तीन ते चार हजार टन मुरघास तयार होतो. त्यातून अनेक वेळा दुष्काळी परिस्थितीवर मात करता आली.
अंमळनेरचे दुग्धोत्पादक सांगतात की रासायनिक खते व पाणी यांचा अमर्याद वापर केल्याने जमिनी नापीक, क्षारपड होण्याचा अनेक गावांचा अनुभव आहे. आमच्या गावात मात्र वर्षभर शेणखताचा मुबलक वापर होतो. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर अल्प होत आहे. जनावरांना दर्जेदार चारा मिळून दुधाची प्रत सुधारली आहे.
कापूस उत्पादनात वाढ झाली असून, एकरी १० ते १४ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. कांद्याची टिकवणक्षमता वाढली आहे. गावातील जमिनी सुपीक होण्यास मदत मिळत आहे. येथील शेतकरी आसपास तसेच शेजारील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही शेणखत विक्री करतात असे येथील प्रगतिशील शेतकरी एकनाथराव घावटे यांनी सांगितले.
वाळू जपल्याचे फलित
मुळा नदीकाठच्या हद्दीतील अंमळनेरसह पानेगाव, करजगाव, वांजूळपोयी, तिळापूर, निंभारी, गोमळवाडी, मांजरी आदी गावांतही दुग्ध व्यवसाय आहे. सोबतच नदीतील वाळू त्यांनी पन्नास वर्षांपासून जपली आहे. सरकारी यंत्रणांनी अनेक वेळा वाळूचे लिलाव करून ती उचलण्याचा प्रयत्न केला.
परंतु राजकीय, वैयक्तिक व अन्य मतभेद बाजूला सारून गावांनी वेळोवेळी वाळू लिलावाला विरोध केला. आंदोलने, उपोषणे झाली. त्याचाच परिणाम म्हणून आज हा संपूर्ण भाग पाणीदार आहे. अल्प खोलीवर विहिरींना पाणी असते. दुष्काळाच्या झळा या भागाला बसल्या नाहीत. पाणी उपलब्धतेमुळे शेती समृद्ध होऊन पूरक व्यवसायांनाही चालना मिळाली.
सामाजिक उपक्रमात अग्रेसर
गावाची सामाजिक उपक्रमांमध्येही आघाडी आहे. सरपंच ज्ञानेश्वर आयनर म्हणाले, की सरकारी पातळीवर नव्या योजनांच्या अंमलबजावणीचे आदेश आले की ग्रामस्थांना त्याबाबत कळवले जाते. तरुण, ज्येष्ठ नागरिक, महिलांच्या मदतीने दरवर्षी एक हजारांपर्यंत वृक्ष लागवड करून त्याची जबाबदारी ग्रामस्थांवरच सोपवली जाते.
विविध क्षेत्रांत प्रावीण्य मिळवलेल्या तरुणांचा गौरव केला जातो. वृक्ष गणना होते. वृक्षतोड आणि विंधन विहिरी (बोअर) घेण्याला दहा वर्षांपासून बंदी आहे. बारा वर्षांपूर्वी ज्येष्ठ नागरिक शिवाजी सीताराम आयनर यांच्या नेतृत्वाखाली तंटे मिटविण्याचे काम सुरू असून, तीन लाखांचे सरकारचे पारितोषिक गावाने पटकावले आहे.
ज्ञानेश्वर आयनर ७४९९२१६८५८ (सरपंच, अंमळनेर)
वीस वर्षांपासून दुग्ध व्यवसायात आहोत. अल्प जनावरांपासून सुरू केला हा व्यवसाय भरभराटीला आला आहे. आठ ते दहा दिवसांनी रोख पैसे हाती येतात. कुटुंबाला व्यवसायाचा मोठा आधार झाला आहे. शेणाची उपलब्धता होत असल्याने शेतीही सुधारली आहे.ठकाजी खंडू कोळेकर ९९२१८३२६२३ एकनाथ यादव घावटे ९८८१३८१३१५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.