Sugarcane Update : सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात कुंडल गाव आहे. द्राक्षासह ऊस पिकातही हा परिसर प्रसिद्ध आहे. येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना (Dr. G. D. Bapu Lad Cooperative Sugar Factory) आपल्या सभासद शेतकऱ्यांकडील उसाची एकरी उत्पादकता वाढविण्यासाठी सुधारित लागवड तंत्रज्ञान कार्यक्रम काही वर्षांपासून राबवीत आहे.
एकरी ९० टन, १०० टन व सन २०१५ मध्ये एकरी १५१ टन उत्पादनाचे लक्ष ठेवून शेतकऱ्यांच्या शेतात प्रयोग राबविण्याचे धोरण कारखान्याने ठेवले. यात विविध सामग्रीसाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले. त्यातून तंत्रज्ञान वापरास अधिक उत्तेजन मिळाले.
पाण्याचा अतिरिक्त वापर टाळण्यासाठी ठिबक सिंचनासाठी प्रोत्साहित केले. एक एकर ठिबक संच बसविण्यासाठी जेवढा खर्च येतो, त्याच्या ९० टक्के रक्कम कर्जरूपाने उपलब्ध करून दिली
माझी नर्सरी-माझी लागवड ही योजना कारखाना अंतर्गत सुरू असून, शेतकरी स्वतःच्या शेतात नर्सरी उभारतात. उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांमध्ये निकोप स्पर्धा व्हावी यासाठी विक्रमी एकरी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना कारखाना पातळीवर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक, रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन सन्मान केला जातो.
राबविलेला लागवड तंत्र कार्यक्रम
-उत्पादनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी मशागत तितकीच महत्त्वाची ठरते. पूर्वमशागतीनंतर नांगरट, रोटर व सरी काढण्याच्या कामांत किमान दीड महिना रान तापविण्याच्या कामाला महत्त्व
दिले जाते. त्यातून १५ टक्क्यांपर्यंत रोग- किडीना अटकाव केला जातो.
-साडेचार बाय दोन फूट अंतरावर बहुतांशी लागवड. काही ठिकाणी हे अंतर पाच बाय दोन फूट.
-माती व ऊस पान-देठ परीक्षण अनिवार्य. त्यानुसार कृषी विद्यापीठांनी विकसित केलेल्या ‘सॉफ्टवेअर’ची मदत घेऊन एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन.
-प्रमाणित बेणेमळ्यातील बेण्याचा वापर
-हुमणी नियंत्रणासाठी एकात्मिक उपाययोजना
-सेंद्रिय खतांबरोबर रासायनिक मिश्रण करून खतांची भट्टी लावली जाते. १५ दिवसांनंतर मिश्रण खताचा वापर. त्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते
-ताग, धैंचा आदी हिरवळीच्या खतांचा वापर वाढवण्यासाठी ७५ टक्के अनुदानावर
बियाणे. त्याचबरोबर कारखाना प्रक्षेत्रावर गांडूळ खत उत्पादन- तीनशे रुपये प्रति ५० किलो बॅग नाममात्र दराने विक्री.
-स्फुरदयुक्त सेंद्रिय खताच्या वापराला उत्तेजन. कृषी विद्यापीठ व ‘व्हीएसआय’कडील जिवाणू खतांचा वापर.
-कारखाना कार्यक्षेत्रातील बहुतांश सर्व ठिकाणी पाचटाचा वापर. हा वापर दोन पद्धतीने होतो. ऊस ८ ते १० कांड्यांवर असताना बुडाखालील पाने काढून आच्छादन. त्यामुळे ओलावा टिकून राहतो. दुसरी पद्धत म्हणजे ऊस तुटल्यानंतर खोडव्यातील पाचट सरीत वापरले जाते. पाचट कुट्टीचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना तीन हजार रुपये प्रति एकरी खर्च दिला जातो.
-कारखान्याकडे ४२ कपांच्या प्लॅस्टिक ट्रेंमधून सशक्त रोपे तयार केली जातात. जे शेतकरी गादीवाफ्यावर रोपे तयार करतील त्यांना १०० टक्के अनुदानावर सात लिटर जिवाणू खते देण्यात येतात.
-एकरी रोपांची संख्या पाच हजार. एका बेटात १० ते १२ ऊस संख्या ठेवली जाते.
-६२ टक्के क्षेत्रावर ठिबक सिंचन वैयक्तिक
-१६ क्षेत्रावर सामुदायिक ठिबक सिंचन
-९६ टक्के क्षेत्रावर पाचट आच्छादन
-९० टक्क्यांवर रुंद सरीचा वापर
-कारखान्याकडील लागवड- आडसाली- ४० टक्के, पूर्वहंगामी- २० टक्के. सुरू- १० टक्के.
-वाण- को ८६०३२ (७८ टक्के)
-फेब्रुवारी २०१८ मध्ये कारखान्याने सभासदांच्या ऊसशेतात ड्रोनद्वारे फवारणीचा प्रयोग केला. आजमितीस तो सुरू आहे.
उत्पादन
कारखाना कार्यक्षेत्रात पूर्वी सभासदांचे एकरी उत्पादन एकरी ३० टनांपर्यंत होते. आता ही सरासरी उत्पादकता ४६ ते ४८ टनांपर्यंत पोहोचली आहे. खोडव्याचे हेक्टरी उत्पादन ९० टनांपर्यंत आहे. ८०० हून अधिक शेतकऱ्यांनी एकरी १०० टन वा त्यापुढील उत्पादनाचा पल्ला गाठला आहे.
एक हजारांपर्यंत शेतकरी एकरी ९० टनांपर्यंत पोहोचले आहेत. सेंद्रिय कर्ब पूर्वी .३५ टक्का होता. तो आता .७० टक्क्यापर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच मातीची सुपीकताही वाढली आहे.
बारा वर्षांपासून मी कारखान्याच्या नर्सरीतून उसाची रोपे आणून लागवड करीत होतो. चार वर्षांपासून ही रोपनिर्मिती माझ्या शेतातच तयार करत आहे. त्यासाठी पायाभूत बेणेमळा तयार केला जातो. त्यासाठी शेतातील नऊ महिन्यांचा दर्जेदार ऊस निवडला जातो. त्यानंतर घरीच यंत्राद्वारे एक डोळा टिपरी वेगळी करून गादीवाफ्यावर रोपे तयार करण्याची प्रक्रिया केली जाते. प्रति रोप तयार करण्यासाठी सुमारे ७० ते ८० पैसे खर्च येतो. यामुळे अतिरिक्त खर्चात बचत होते.विजयकुमार पवार, बांबवडे, ता. पलूस, ९८९०६४५३२७
एका विद्यार्थ्यांप्रमाणे राहून ऊस उत्पादनवाढीचे तंत्रज्ञान सातत्याने शिकतो आहे. जमिनीचा सेंद्रिय कर्ब, सामू, पोत यांचे महत्त्व जाणून मातीपरीक्षण करूनच खतांचा वापर करतो.पंकज भोसले, ९९७५९१९१३५
कारखान्यामार्फत शिवार फेरीचे आयोजन केले जाते. त्यानुसार राहुरी येथील कृषी विद्यापीठ, पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्र, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील शास्त्रज्ञांकडून मिळालेले मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे.संजय जाधव, दुधोंडी, ८०५५२२८२११
कारखान्याने विविध योजना शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवल्या. अर्थसाह्य व अनुदान दिले. तंत्रज्ञान प्रत्यक्षात शेतकरी वापरतो का याचीही शहानिशा केली जाते. त्यामुळे कारखाना आपल्या सोबत आहे याचा प्रत्यय शेतकऱ्यांना येत आहे.विलास जाधव, ऊस विकास अधिकारी, ७७२२०५३८४१
संपलेल्या हंगामात एक हजार एकर क्षेत्रावर आम्ही ‘सॅटेलाइट मॅपिंग’द्वारे ऊसतोडणीचा प्रयोग राबवला. कारखाना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना सर्वतोपरी सेवा देत आहे.आमदार अरुण लाड, ‘चेअरमन’, क्रांती साखर कारखाना
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.