Cashew Nut Processing Industry : कणकवलीच्या प्रणिता लाड यांनी काजू प्रक्रिया उद्योग केवळ सावरलाच नाही, तर विस्तारलाही!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव वाघाचीवाडी (ता. कणकवली) येथील श्रीमती प्रणिता प्रसाद लाड यांनी पती निधनाच्या धक्क्यातून सावरत काजू प्रकिया उद्योग फक्त सावरलाच नाही, तर नव्या उमेदीने विस्तारलाही आहे. गुणवत्ता आणि दर्जावर भर दिल्याने काजू प्रकिया उद्योगातून दरवर्षी ४० लाखांची उलाढाल केली जाते.
Cashew nut processing industry
Cashew nut processing industryAgrowon
Published on
Updated on

Cashew Business Update : मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव येथील वाघाचीवाडीमध्ये प्रणिता आपल्या पती प्रसाद लाड यांच्यासोबत भातशेती करीत असत. मात्र केवळ भातशेतीतून अपेक्षित अर्थार्जन होत नसल्याने त्यांनी काजू प्रकिया उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण घेत प्रसाद यांनी २०१० मध्ये छोटेखानी उद्योग सुरू केला.

या व्यवसायात नव्यानेच उतरल्याने उत्पादनासह बाजारपेठेपर्यंत धावपळ होत होती. मात्र अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने हा व्यवसाय पत्नी प्रणिता यांच्यावर सोपवत त्यांनी एका खासगी संस्थेमध्ये नोकरी सुरू केली.

घरी प्रणिता या काजू बीवर प्रकियेपासून पॅकिंगपर्यंतची सर्व कामे करायच्या. सहा ते सात वर्षांत या छोटेखानी व्यवसायात त्यांचा चांगला जम बसला. कुटुंबाची आर्थिक घडी बसू लागली होती.

मात्र सन २०१७ मध्ये गणेशोत्सवाच्या अनुषंगाने काजू प्रक्रियेची लगबग सुरू असतानाच प्रसाद लाड यांची प्रकृती अचानक बिघडली. उपचारासाठी प्रयत्न करण्याची संधीही न मिळता त्यांची प्राणज्योत मालवली. त्याचा मोठा धक्का प्रणिता यांच्यासह कुटुंबाला बसला.

Cashew nut processing industry
Cashew MSP : काजू बीला हमीभावाची मागणी शेतकरी का करतायत?

मित्रमंडळीचे सहकार्य

गणेशोत्सवाकरिता मोठ्या प्रमाणात काजूगरांचे उत्पादन तयार करून ठेवण्यात आले होते. मात्र प्रसाद यांच्या जाण्यामुळे सर्व लाड कुटुंब शोकाकूल स्थितीत होते. इतक्या मालाची वेळीच विक्री झाली नाही तर मोठे नुकसान होणार होते.

अशा कठीण प्रसंगात प्रसाद यांचे अनेक मित्र कुटुंबाच्या मदतीला धावून आले. काजू प्रकिया उद्योगातील त्यांच्या अन्य मित्रांचे ऋणानुबंधही कामाला आले. या सर्वांनी गणेशोत्सवाकरिता उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीची व्यवस्था केली. त्यामुळे मोठे नुकसान वाचले.

व्यवसाय सुरू ठेवण्याचा निर्धार

पतीच्या निधनानंतर काजू प्रकिया उद्योग सुरू ठेवावा की बंद करावा, असा प्रश्‍न निर्माण झाला. मात्र दोन मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाच्या अर्थार्जनाचा एकमेव स्रोत असलेला हा व्यवसाय सुरू ठेवण्याचा सल्ला प्रणिताचे दीर चंद्रकांत वासुदेव लाड यांनी दिला.

सोबतच आवश्यक ते पाठबळही दिले. पती निधनाचा मानसिक धक्का मोठा होता. त्यातून हळूहळू स्वतःला सावरत प्रणिता यांनी काजू प्रक्रियेला सुरुवात केली. प्रक्रियेची सर्व पूर्वीपासूनच करत असल्यामुळे त्याची भीती नव्हती. पण पती मार्केटिंग करत असल्याने त्याचा अजिबात अनुभव नव्हता.

तरिही त्यांनी धाडस करत काजू उत्पादन सुरू केले. स्थानिक काजू बीवर प्रकिया करून दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण काजूगर बाजारपेठेत देऊ लागल्या. बाजारपेठेतील मागणी देखील वाढली. गेली पाच-सहा वर्षांत या व्यवसायात त्यांनी टप्प्याटप्प्याने वाढ करीत आज त्या ४० लाखांची उलाढाल करत आहेत.

Cashew nut processing industry
Cashew Cultivation : वैभववाडी तालुक्यातील उदय सावंत यांनी केलीय उत्तम काजूची लागवड

वैशिष्ट्ये

- काजू प्रकिया उद्योगातील १३ वर्षांचा अनुभव.

- वर्षभरात स्थानिक २५ टन काजू बी खरेदी करून त्यावर प्रकिया केली जाते.

- ६ लाखांचे कर्ज घेऊन कटिंग मशिन, बॉयलर, ड्रायर, ग्रेडिंग, पॅकिंग इ. यंत्रे खरेदी केली.

- प्रतिकिलो ६५० ते ९५० रुपयांनी काजूगरांचे दर आहेत. काजूगरांमध्ये पाच ग्रेडिंग केल्या जातात. याशिवाय पाकळी, कणी, तुकडा याची देखील विक्री केली जाते.

- श्री काजू प्रकिया उद्योग नावाखाली ब्रॅण्डिंग.

- मुंबई, नाशिक, फोंडा, विरार या भागांत काजूला बाजारपेठ मिळते.

- काजू प्रकिया उद्योगांची उलाढाल आता ४० लाखांपर्यंत पोहोचली आहे.

- चार ते पाच महिलांना कायमस्वरूपी रोजगाराची उपलब्ध केला आहे.

- या प्रकिया उद्योगातून मिळणाऱ्या उत्पन्नातून दोन्ही मुलांना उच्चशिक्षण दिले. एक मुलगा मुंबईत नोकरी करतो, तर दुसरा मुलगा त्यांना काजू प्रकिया उद्योगात मदत करू लागला आहे.

-काजू बी खरेदी करणे, ती वाळविणे, त्यावर प्रकिया करणे यावर आजही स्वतः प्रणिता लक्ष देतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com