Agriculture Success Story : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात आंबळे हे गाव ऊस पिकासाठी प्रसिद्ध आहे. गावातील आकाश माने या पंचवीस वर्षे वयाच्या तरुणाची सहा एकर बागायती शेती आहे. त्यात ऊस हे मुख्य पीक असून कांदा, भाजीपाला व आंबा आदी पिके घेण्यात येतात. वडील संतोष शेतीचा भार सांभाळण्याबरोबर चिंच, आंबे खरेदी विक्रीचे देखील काम करतात.
आकाशने कराड (जि. सातारा) येथील कृषी महाविद्यालयातून २०२१ मध्ये कृषी विषयातील पदवी घेतली. त्यानंतर पुणे येथील अन्नद्रव्ये विषयातील एका खासगी कंपनीत तो नोकरी करू लागला. नोकरीत असतानाच त्याला स्वतःचा व्यवसाय असावा असे वाटे. त्यादृष्टीने प्रयत्नही सुरू होते. सुमारे सहा महिने हा अनुभव घेतल्यानंतर राजीनामा देत पूर्णवेळ शेतीतच करिअर करण्याचा निर्णय घेतला.
वराहपालनाची शोधली संधी
सुमारे दहा वर्षांपूर्वी वडिलांनी वराहपालन व्यवसाय दोन वर्षे केला होता. मात्र काही अडचणीमुळे त्यांना तो बंद करावा लागला होता. दरम्यान मध्यंतरीच्या काळात आकाशचे मेहुणे ज्या ठिकाणी राहतात त्या आसपास एक शेतकरी वराहपालन करायचे. त्यांचा व्यवसाय चांगल्या प्रकारे सुरू होता.
त्यावरून मेहुण्यांनी या व्यवसायाचा विचार करण्याचे सुचविले. त्यानंतर आकाश यांनी यू-ट्यूबवर या व्यवसायाचा बारकाईने अभ्यास केला. त्याचबरोबर पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यांतील काही अनुभवी वराहपालकांचे फार्म्स अभ्यासले. संगोपन, बाजारपेठ व अर्थकारण असे मुद्दे तपासल्यानंतर व सारासार विचार केल्यानंतर या व्यवसाय करण्यासाठी योग्य असल्याच्या निष्कर्षापर्यंत आकाश आला.
व्यवसायाची सुरुवात
सन २०२२ मध्ये आकाशने वराहपालनात पाऊल ठेवले. सुरुवात करण्यापूर्वी शिरवळ येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातून या व्यवसायाचे शास्त्रीय प्रशिक्षण घेतले. पालनासाठी अमेरिकन व्हाइट यॉर्कशायर जातीची निवड केली. ही जात भारतात अधिक प्रमाणात वापरण्यात येते. पांढरा रंग व त्यावर थोडे काळे ठिपके पाहण्यास मिळतात. या जातीच्या मादीचे प्रजनन जलद होते. कमी वेळेत अधिक पिले मिळतात.
वजनही चांगले मिळत असून मांसासाठी मागणी चांगली आहे. पुणे जिल्ह्यातील राहू पिंपळगाव येथील वराहपालकाकडून याच यॉर्कशायर जातीची २६ पिले आणली. दोन महिन्यांनी पुन्हा २० पिलांची भर टाकली. हळूहळू संगोपनाचे तंत्र आत्मसात होत गेले. वराहांच्या संख्येतही टप्प्याटप्प्याने वाढ होत गेली. आजमितीला मादी ८०, नर सहा व अन्य पिले अशी एकूण संख्या २२० पर्यंत आहे.
व्यवस्थापनातील बाबी
सुरुवातीला ३० बाय २० फूट आकाराचे शेड उभारले होते. लहान- मोठे धरून सुमारे ४६ वराहांचे संगोपन होईल अशी त्याची क्षमता होती. आता संख्या वाढल्याने टप्प्याटप्प्याने दोन शेड्स बांधले आहेत. ते बंदिस्त स्वरूपाचे असून पिंजरा पद्धतीचा वापर आहे. प्रत्येक पिंजऱ्यात दोन ते तीन वराह ठेवण्यात येतात. शेडमध्ये स्वच्छतेवर भर दिला असून शहाबादी फरशीचा वापर केला आहे. शेडच्या अवतीभोवती वर्षभर हिरवळ राहील अशी व्यवस्था केली आहे.
त्यामुळे उन्हाच्या झळा शेडमध्ये थेट पोहोचू शकत नाहीत. शेडमधील वातावरण, आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत होते. उन्हाळ्यात शेडवर शेडनेट असते. तसेच पाण्याची फवारणीही वेळोवेळी केली जाते. या ऋतूत दिवसातून चार वेळा पाण्याने धुतले जाते. त्यामुळे वराहांच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी शेडमध्ये बल्ब्ज लावण्यात येतात. सर्व बाबींचे काटेकोर नियोजन केल्याने जनावरांची वाढ चांगली होऊन मरतुक कमी होण्यास मदत होते.
खाद्य- पाणी
खाद्य म्हणून सोयाबीन तसेच मिनरल मिक्श्चरचा वापर होतो. सोबतच भाजीपाला वर्गीय पिके उदा. पालक, मेथी, चुका शेतात पिकवून खाऊ घालतात. त्यामुळे जनावरांना पोषणमूल्ये चांगल्या प्रमाणात मिळतात. शेतात पिकविलेल्या मक्याचा वापर होतो. प्रति एक वेळेस दीड किलो असे दिवसातून दोन वेळा मिळून तीन किलो खाद्य प्रति मादीला देण्यात येते. पाण्यासाठी टाकी व निपल सिस्टीमचा वापर केला आहे.
कुटुंब राबल्याचा फायदा
आकाश व्यवसायात स्वतः राबतो. शिवाय आई सारिका यांचीही व्यवस्थापनात मोठी मदत होते. कुटुंबाचे अधिकाधिक श्रम व्यवसायाच्या प्रगतीसाठी फायदेशीर ठरल्याचे आकाश सांगतो. दोन मजूरही तैनात केले आहेत. शेतातच शेड असल्याने शेतातील दैनंदिन कामे करून व्यवसायाकडे लक्ष देता येते.
वराहपालनात पाऊल टाकले तेव्हा सुरुवातीला काही लोकांकडून नकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आकाशने व्यवसायात चिकाटी व सातत्य राखले. काळ लोटला तसा समाजाचा दृष्टिकोनही बदलत गेला. आज हेच वराहपालन शेतीपेक्षा अधिक उत्पन्न मिळवून देत असल्याचे आकाश ठामपणे सांगतो.
विक्री व्यवस्था केली मजबूत
आकाशने यू-ट्यूब, फेसबुक आदींच्या माध्यमातून विक्री व्यवस्था मजबूत केली. महाराष्ट्रातील वराहपालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरूनही व्यवसायाचे प्रमोशन केले. व्यापाऱ्यांशी संपर्क करून त्यांचे नेटवर्क तयार केले. त्यातूनच पुणे, मुंबई येथील व्यापारी थेट फार्मवर येऊन खरेदी करतात. महिन्याला सुमारे ३० ते ४० पर्यंत पिलांची विक्री होते. दोन ते अडीच महिन्यांच्या पिलाला साडेपाच हजार रुपयांपर्यंत दर मिळतो.
८० ते १०० किलो वजनाच्या मादीला १७० ते १८० रुपये प्रति किलो दर मिळतो. वीस हजार ते २५ हजार रुपये अशीही प्रति नग विक्री होते. वराहाची पैदास जलद होत असल्याने विक्रीस ती लवकर उपलब्ध होतात. वर्षाला काही लाख रुपयांचा किंवा एकूण उत्पन्नाच्या ४० ते ५० टक्क्यांपर्यंत नफा मिळतो. बाहेरून खाद्य विकत घ्यावे लागत असल्याने त्याचा खर्च महत्त्वाचा ठरतो.
आकाश माने ८५३०५४९०९५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.