
Nagpur News: करकम्बी या महाराष्ट्रातील पहिल्या आणि देशातील पंधराव्या वराह (डुक्कर) जातीची नोंद कर्नाल (हरियाना) येथील राष्ट्रीय पशू आनुवांशिकी संशोधन संस्थेमध्ये करण्यात आली आहे. महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत कार्यरत असलेल्या शिरवळ (जि.सातारा) येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञांनी या जातीवर विशेष संशोधन केले आहे.
देशाच्या विविध भागांतील वैशिष्ट्यपूर्ण पशूंची नोंद राष्ट्रीय पातळीवरील पशू जात नोंदणी समितीकडे करावी लागते. त्यानुसार महाराष्ट्रातील पहिल्या वराह नोंदीसाठी डिसेंबर २०१७ मध्ये क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयमध्ये वराहातील अखिल भारतीय सहवर्गीकरण संशोधन प्रकल्प सुरू झाला.
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात करकम्ब गावशिवारासह सोलापूर, सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्यांतील ग्रामीण, कोरडवाहू भाग तसेच वेड्या बाभळीच्या वनात करकम्बी वराह जात दिसते, असे गेल्या पाच वर्षांतील अभ्यासाअंती समोर आले आहे. २० व्या पशुगणनेनुसार या चार जिल्ह्यांत १७ हजार ४५१ इतकी करकम्बी वराहांची संख्या आहे.
करकम्बी वराह जातीबाबत क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉ. गोकूळ सोनवणे म्हणाले, की जन्मानंतर १२ महिन्यांनी या वराहाचा वापर मांस उत्पादनासाठी होतो. याचा मांस उतारा वजनाच्या ६५ ते ६७ टक्क्यांपर्यंत मिळतो. या वराहाने ४.७ किलो उष्टावळ अन्न खाल्ल्यास एक किलो वजनात रूपांतर होते.
जन्माच्या वेळी वजन अर्धा किलोपर्यंत असते. वर्षभरात हे वजन २५ ते २८ किलोपर्यंत पोहोचते. मादी पिलांचे योग्यप्रकारे संगोपन करते, त्यामुळे मरतूक प्रमाण कमी आहे. पहिले दोन महिने पिले मादीचे दूध पितात. त्यानंतर विलगीकरण करता येते. विदेशी वराह जातीमध्ये सडाच्या आठ जोड्या दिसतात. करकम्बी मादीला सडाच्या पाच जोड्या आहेत.
वराह जातीतील संशोधनाची राष्ट्रीय पातळीवर नोंद झाल्याबद्दल सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद मेश्राम यांनी तज्ज्ञांचे अभिनंदन केले आहे. येत्या काळात या जातीच्या वराह पालनाला चालना मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.
‘माफसू’चे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, शिक्षण संचालक डॉ. शिरीष उपाध्ये, संशोधन संचालक डॉ. नितीन कुरकुरे आणि विस्तार संचालक डॉ. अनिल भिकाने यांच्या मार्गदर्शनाखाली हा वराह संशोधन प्रकल्प राबविण्यात आला. वराहातील अखिल भारतीय सहवर्गीकरण संशोधन प्रकल्पाचे प्रमुख सेवानिवृत्त तज्ज्ञ डॉ. मुकुंद आमले तसेच डॉ. गोकूळ सोनवणे, डॉ. विठ्ठल धायगुडे यांनी या संशोधनासाठी विशेष परिश्रम घेतले. या संशोधनातून महाराष्ट्रातील पहिल्या वराह जातीची नोंद राष्ट्रीय पातळीवर झाली आहे.
करकम्बी वराहाची
वैशिष्ट्ये :
वडार, कैकाडी, सलगर, टकारी यांच्याद्वारे वराह संगोपन.
लांब, निमुळता चेहरा, तोंड लांब आणि सरळ, कान आखूड, छोटे, शंखाकृती तसेच वरच्या बाजूला असतात.
९९ टक्के वराहाचा रंग काळा असतो. अपवादात्मकस्थितीत चेहरा आणि खुरावर पांढरे डाग आणि शरीरावर लांब केस असतात.
पूर्ण वाढ झालेल्या प्रौढ नराचे वजन ४५ ते ५० किलो, मादीचे वजन ४० ते ४५ किलो.
नराला सिंहासारखी मानेवर आयाळ.
एकावेळी दोन ते दहा पिले जन्म देण्याची क्षमता. मात्र पिले जास्त झाल्यास मरतूक वाढते.
मुक्त व्यवस्थापनासाठी उपयुक्त, नैसर्गिक वातावरणात चांगली रोग प्रतिकारशक्ती.
टाकाऊ अन्नघटकांपासून मांस तयार करण्याची अधिक क्षमता.
मांस चवदार असल्याने चांगली मागणी. सांधेदुखी, वेदना कमी करण्यासाठी चरबीचा वापर.
ब्रश तयार करण्यासाठी केसांचा वापर.
विष्ठेपासून खत निर्मिती शक्य.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.