Food Production Agrowon
यशोगाथा

Food Production : गुणवत्तापूर्ण पदार्थ निर्मितीतून साधली प्रगती

विकास गाढवे

Success Story of Food Business : बोरगाव (ता.जि. लातूर) येथील शिवाजी आडसुळे यांनी ‘खेड्याकडे चला’ ही महात्मा गांधी यांची हाक प्रत्यक्षात आणली आहे. एकेकाळी पुणे शहर परिसरात आचाऱ्याच्या हाताखाली पदार्थ निर्मिती करणाऱ्या आडसुळे यांनी गावी परतून स्वतः पदार्थ निर्मिती व्यवसाय उभारून शून्यातून त्यात चांगली प्रगती साधली आहे. मुरकुल या मुख्य पदार्थासह सुमारे २० ते २२ पदाथांच्या निर्मितीतून ५० पर्यंत ग्राहकांना रोजच्या रोज मालाचा पुरवठा करून आश्‍वासक मासिक उलाढाल साधली आहे.

लातूर - बार्शी राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव (ता. जि. लातूर) आहे. येथील शिवाजी रामलिंग आडसुळे यांनी अन्नप्रक्रिया व्यवसायात पंचक्रोशीत शून्यातून आपली ठळक ओळख तयार केली आहे. मोठी आर्थिक प्रगती साधली आहे. अर्थात, त्यामागील पार्श्‍वभूमी देखील महत्त्वाची आहे. आडसुळे भूमिहीन आहेत. त्यांचे आईवडील शेतीत मजुरी करायचे. थोरले भाऊ रोजगाराच्या निमित्ताने पुण्यात स्थायिक झाले. त्यांचा वाहन व्यवसाय आहे. शिवाजी यांनीही वयाच्या सोळाव्या वर्षीच रोजगाराच्या निमित्ताने पुणे गाठले. पिंपरी- चिंचवड भागात एका मिठाईच्या दुकानात आचाऱ्याच्या हाताखाली ते विविध पदार्थ बनवायला शिकले. दहा वर्षे घेतलेले हे धडे व अनुभवातून ते पदार्थ निर्मितीत पारंगत झाले.

गावी सुरू केली उत्पादन निर्मिती

पुण्यातील नोकरी सोडून शिवाजी १९८९ मध्ये गावी परतले. हाताशी भांडवल नसल्याने काही काळ शेतमजुरी केली. पण पदार्थ निर्मितीचा व्यवसाय त्यांना सतत खुणावत होता. थोडेफार भांडवल जमा झाल्यानंतर ते बाजारपेठेत सातत्याने मागणी असलेल्या मुरकूल निर्मितीत उतरले. खाद्यनिर्मितीचा दांडगा अनुभव जोडीला असल्याने अन्य उत्पादनांची निर्मिती व विक्रीही सुरू केली.

सातत्याने कष्ट, बाजारपेठांत कोणच्या पदार्थांना किती मागणी आहे याचा अभ्यास या जोरावर त्यांनी एकेक पदार्थाचे उत्पादन वाढवण्यास सुरुवात केली. ‘आडसुळे कुरकुरे फूड प्रॉडक्ट’ या नावाने सध्या व्यवसाय जोमात सुरू आहे. मैदा व ज्वारीपासून मुरकूल, तांदळापासून पापडी, बाजरीपासून खरवडी, खारी बुंदी, वाटाणे, फुटाणे, खारेमुरे असे विविध स्वरूपातील २० ते २२ प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. वाट्या, चांदणी, इंग्रजी मुळाक्षरे व विविध प्राण्यांच्या आकारात मुरकूल तयार केले जातात. वाट्यांना वरणभातासोबत खाण्यासाठी मोठी मागणी आहे.

बाजारात तयार केली पत

पदार्थांना वेगळी चव वा स्वाद देण्याचा प्रयत्न केल्याने बाजारपेठेत उत्पादनांना मागणी चांगली आहे. दररोज तयार केलेल्या मालाची त्याच दिवशी विक्री होतो. माल कमी दर्जाचा आहे किंवा खराब आहे म्हणून बारा वर्षांत एकदाही तो विक्रेत्यांकडून परत आलेला नाही अशी पत शिवाजी यांनी तयार केली आहे. पदार्थ तयार करण्यासाठी बाजार समितीत जाऊन ते शेतकऱ्यांकडून कच्च्या मालाची थेट खरेदी करतात. गावातील दुकानदार व हॉटेल व्यावसायिक मिळून पन्नास जणांकडे शिवाजी रोजच्या रोज मालाचा पुरवठा करतात. शिवाय पुणे येथे असलेल्या भावाकडेही माल पाठविण्यात येतो. आपल्या भागात महिन्याला एक लाख रुपये, तर पुण्यात दोन लाख रुपये उलाढाल होत आहे. व्यवसायातून सुमारे ३५ टक्क्यांपर्यंत नफा होतो.

प्रक्रिया यंत्रांची खरेदी

काही काळापूर्वी प्रक्रिया उद्योगातील बहुतांशी कामे मनुष्यबळाकरवी करावी लागायची. रात्री उशिरापर्यंत पॅकिंगचे काम चालायचे. दुकानदारांना माल पुरवठा करण्यासाठी दिवसभर दुचाकीवरून भटकंती करावी लागायची. पुरेशी झोप मिळत नसे. त्यामुळे शिवाजी यांत्रिकीकरणाकडे वळले. दीड वर्षापूर्वी पॅकिंगचे व पापड निर्मिती यंत्र अनुक्रमे सव्वा लाख रुपये व ४२ हजार रुपयांना खरेदी केले आहे. कृषी विभागाच्या मदतीने पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची मदत त्यास मिळाली आहे. तर बँक ऑफ महाराष्ट्रकडून एक लाख ७८ हजार रुपयांचे अर्थसाह्य मिळाले आहे. यंत्रामुळे रात्रीचे जागरण बंद झाले आहे. विभाग व जिल्हास्तवरील अनेक अधिकाऱ्यांनी भेटी देऊन मार्गदर्शन केले आहे.

रोजगाराच्या आहेत संधी

शिवाजी सांगतात की उद्योगासाठी अनेकवेळा भांडवल कमी पडते. बँकाकडून पुरेसे कर्ज मिळत नाही. अडवणूक केली जाते. तरीही येत्या काळात बटाटे चिप्स, कुरकुरे, पेढा, चिवडा, फरसाण उत्पादन सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी आधुनिक यंत्रणा खरेदी करायाची आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी आहेत. शेतकऱ्यांच्या मुलांना लहानमोठ्या उद्योग व्यवसायायातून स्वयंरोजगार साधता येतो.

कुटुंबाच्या साथीने प्रगती

शिवाजी यांच्यासोबत पत्नी मंगल, बारावी शिक्षणानंतर ‘आयटीआय’ चा अभ्यासक्रम पूर्ण केलेला मुलगा अशोक व सून आश्‍विनी असे सर्व जण व्यवसायात राबतात. पहाटेपासूनच कुटुंबाचा व्यवसायातील दिनक्रम सुरू होतो. वयाच्या ५१ व्या वर्षीही आडसुळे यांचा उत्साह व धडपड कौतुकास्पद आहे. व्यवसायातून पाच ते सहा स्थानिक महिलांना रोजगार उपलब्ध केला आहे. दररोज पंधराशे रुपये मजुरीसाठी खर्च होतो. उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी उद्योगाला जोडून भांडे व कपडे विक्रीचा व्यवसाय शिवाजी करतात. शिवणकाम येत असल्याने कपडे शिवण्याचे कामही ते करतात. सोयाबीन काढणी हंगामात शेतकऱ्यांकडून खरेदी करून त्याचीही विक्री करतात. उद्योग व व्यवसायाचे परवाने घेऊन ठेवले आहेत. व्यवसायाच्या बळावरच तीन मुलींची लग्ने साधता आली. एक आरसीसी घर बांधले. प्रक्रिया उद्योग वाढवण्यासाठी एक प्लॉटही घेतला आहे. मालाचा पुरवठा करण्यासाठी चारचाकी वाहन घेतले आहे.

शिवाजी आडसुळे, ९८९०४५३८७२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan Scheme : पी.एम.किसान योजना; अठराव्या हप्त्यास शेतकरी मुकणार, तेरा हजार खाती आधार लिंकविना

Indian Agriculture : शिळ्या कढीला ऊत

Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुका तीन टप्प्यांत

Budget Update : अर्थसंकल्पातून प्रत्येक समाज घटकाला न्याय : अजित पवार

Watershed Mismanagement Case : पाणलोट गैरव्यवहारप्रकरणी फौजदारी कारवाई करा

SCROLL FOR NEXT