Agriculture Success Story : पुणे शहरापासून साधारण ३५ किलोमीटरवर हवेली तालुक्यात टिळेकरवाडी गाव आहे. लोकसंख्या दीड हजार ते दोन हजारांच्या आसपास आहे. भौगोलिक क्षेत्र ८६८ हेक्टर असून, मुळा-मुठा नदीमुळे परिसर बागायती झाला आहे. कुटुंब संख्या सुमारे ५९० च्या दरम्यान आहे. पैकी ३०० ते ३५० कुटुंबे डाळिंब शेतीत गुंतली आहेत. दहा ते पंधरा वर्षांपूर्वी गावातील ८० ते ९० टक्के शेतकरी ऊस घ्यायचे.
परंतु या पिकातून पैसे हाती येण्यास किमान दीड वर्ष वा त्याहून अधिक कालावधी लागायचा. खर्च व उत्पन्न यात फार अंतर उरत नसे. उत्पन्नवाढीसाठी मग शेतकऱ्यांनी अन्य पर्याय शोधण्यास सुरुवात केली. काही शेतकरी भाजीपाला पिकांवर अवलंबून होते. परंतु डाळिंब शेती हा तुलनेने अधिक सक्षम पर्याय असल्याचे काही शेतकऱ्यांनी जाणले.
डाळिंब बागा आणि दुग्ध व्यवसाय
गावात दुग्ध व्यवसायही मोठ्या प्रमाणात होता. प्रत्येक कुटुंबाकडे किमान दोन ते तीन गाई वा म्हशी असायच्या. दररोज तीन हजार लिटरपर्यंत दुधाचे संकलन गावात होत होते. दरम्यान, गावातील देविदास काशिनाथ टिळेकर, श्याम टिळेकर यांनी धाडसाने गावात डाळिंब लागवडीसाठी पुढाकार घेतला. त्यांना केशव टिळेकर, गणेश टिळेकर, बाळासाहेब चौरे, संतोष टिळेकर यांची साथ मिळाली.
व्यवस्थापन चांगले साधून त्यांना उत्पन्नही चांगले मिळू लागले. त्या प्रेरणेतून अन्य तरुण शेतकरीही या पिकाकडे वळू लागले. डाळिंब क्षेत्र वाढू लागले. पण त्याचवेळी दूध संकलन अवघ्या ३०० लिटरपर्यंत खाली आले. डाळिंब पीक म्हटले की त्यास जिवामृत, सेंद्रिय स्लरी आलीच. पण त्यासाठी आवश्यक शेण- गोमूत्र यांची कमतरता भासू लागली. अशावेळी गायींची संख्या पुन्हा वाढली. सध्या गावात दीड हजार लिटरपर्यंत दूध संकलन होऊ लागले आहे.
डाळिंबात तयार झाली ओळख
गावात डाळिंब पीक रुजविणाऱ्या शेतकऱ्यांना सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. परंतु हार न मानता जिद्द कायम ठेवत त्यांनी बागा टिकवल्या. आजमितीस खडकाळ जमिनींवर प्रत्येक शेतकरी एक ते दोन एकरांपर्यंत डाळिंबाच्या बागा फुलवत आहेत. गावात या पिकाखाली १०० ते १५० एकर क्षेत्र असून नवी भर पडत आहे. जोडीला ५० ते २०० एकरांवर फुलशेती, कांदा, शेवगा अशी विविधता आहे. येथील जमीन हलकी ते मध्यम असून डाळिंबासाठी वातावरणही पोषक आहे.
आधुनिक तंत्रज्ञान व व्यवस्थापन
गावात भगवा हेच वाण प्रामुख्याने आहे. शेतकऱ्यांनी डाळिंबात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. आधुनिक अवजारे, फवारणीसाठी ब्लोअर्स आहेत. तण काढणे, छाटणी, खते देणे, डाळिंब काढणी, प्रतवारी अशा विविध कामांमध्ये महिलांचा सहभाग असतो. त्यामुळे मजूरबळाची काही प्रमाणात बचत होऊन कुटुंबातील कामाचा ताण कमी होतो. फुलशेती, भाजीपाला पिकांसाठी ठिबकसह प्लॅस्टिक मल्चिंगचा वापर होत आहे.
राहणीमान उंचावले
गावातील शेतकऱ्यांनी एकरी १० ते १२ टनांच्या आसपास व काही प्रसंगी त्यापुढील उत्पादनक्षमता प्राप्त केली आहे. प्रत, चकाकी, वजन यावर लक्ष केंद्रित करून ६०० ते ७०० ग्रॅम वजनाचे फळ ते पिकवतात. पुणे, मुंबई या बाजारपेठा जवळ असल्याचा फायदा ग्रामस्थांना झाला आहे. प्रति किलो ७० ते १०० रुपये व कमाल २०० रुपयांपर्यंत दर डाळिंबाला मिळतो.
काही लाख रुपयांपर्यंत निव्वळ उत्पन्न शेतकऱ्यांना मिळते. गावात या माध्यमातून वार्षिक काही कोटींच्या आसपास उलाढाल होते.कष्ट, धाडस, जोखीम, प्रयोगशीलता यातून टिळेकरवाडीतील शेतकऱ्यांनी प्रगती केली, त्यातून राहणीमान उंचावले. बहुतांश शेतकऱ्यांचे टुमदार घरे किंवा बंगले आहेत. घरांसमोर दोन चाकी,चारचाकी, ट्रॅक्टर उभा आहे. घरातील मुले- मुली उच्चशिक्षण घेत असून डॉक्टर, वकील, इंजिनिअर या रूपात वा अन्य क्षेत्रात ती यशस्वी झाली आहेत.
शाकाहारी गाव आणि उत्सवातील एकी
टिळेकरवाडीची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतात. शतकापासून गावात महानुभव पंथ जोपासला जातो. गावात १९९५ मध्ये उभारलेले कृष्णाचे एकमेव मोठे मंदिर आहे. गावात कोणीही मांसाहार करत नाही. संपूर्ण शंभर टक्के शाकाहारी असलेले राज्यातील हे एकमेव गाव असावे. नवरात्र, गोकूळ अष्टमी असे विविध उत्सव गावकरी एकत्र साजरे करतात. नवरात्रीत नऊ दिवस गावकऱ्यांना भोजन असते. त्यासाठी प्रत्येक घरातील महिला स्वयंपाकात सहभागी होते. केटरिंग किंवा आचारी अशी पद्धत अवलंबिली जात नाही.
रूढींमध्ये केले बदल
सरंपच गणेश टिळेकर म्हणाले, की गावात एखाद्याच्या घरी निधन झाले तर त्या दहा दिवसांत लागणारी सामग्री किंवा अन्य कामांसाठी त्या घरच्या सदस्यांना शारीरिक कष्ट किंवा धावपळ करावी लागत नाही. ही सर्व मदत गावकरी करतात. निधनानंतर दहाव्याच कार्यक्रम पाचव्या दिवशी करण्याची परंपरा गावाने सुरू केली. जेणेकरून घरातील कर्ती किंवा अन्य व्यक्तींचे काम फार काळ थांबून राहून प्रपंचाचे वा शेतीकामांचे नुकसान होऊ नये.
विधायक उपक्रमांना चालना
गावच्या भौगोलिक परिस्थितीनुसार वृक्षांची निवड करून देशी वृक्ष व फळझाडांची लागवड गायरान व रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना केली आहे. यात वड, पिंपळ, जांभूळ, आंबा, चिंच, आवळा, फणस, बांबू आदी मिळून सुमारे दोन हजार वृक्षांचा समावेश आहे. त्यासाठी ठिबक सिंचन आहे. या माध्यमातून पर्यावरणाचे संतुलन गावाने जपले आहे.
विधायक उपक्रम
आदर्श, सुसज्ज अशी ग्रामपंचायतीची नूतन इमारत उभारली आहे. स्मशानभूमी, महात्मा फुले सभागृह, सार्वजनिक स्वयंपाकघर, आरोग्य विभाग, डिजिटल शाळा, एक रुपयांत वीस लिटर पाणी, वर्षाच्या सुरुवातीस घरपट्टी भरल्यास वर्षभर मोफत पाणी असे विधायक उपक्रम राबवले आहेत. ‘जलजीवन मिशन’ची कामे वेगात सुरू आहेत. '
गावाचा सन्मान : आर. आर. आबा पाटील स्मार्ट व्हिलेज. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छग्राम. आदर्श आणि तंटामुक्त पुरस्कार
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.