Agriculture Success Story Agrowon
यशोगाथा

Agriculture Success Story : पारंपरिक काजू, सुपारीला दिली काकडीची जोड

Agriculture Update : सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यातील विलवडे (ता. सावंतवाडी) येथील प्रकाश जगन्नाथ दळवी यांनी पारंपरिक भात, काजू, सुपारी या पिकांना काकडी पिकाची जोड देत आर्थिक स्थिरता मिळविली आहे. मालाची गुणवत्ता चांगली असल्याने व्यापारी थेट शेतावर येऊन मालाची खरेदी करून जातात.

Team Agrowon

एकनाथ पवार

Economic Stability through Agriculture : सावंतवाडी तालुक्यातील बांदा-आंबोली मार्गावर विलवडे हे कृषिप्रधान गाव. इतर गावांप्रमाणे येथेही खरीप हंगामात भात आणि नाचणी लागवडीवर अधिक भर दिला जात असे. परंतु मागील काही वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या लघू प्रकल्पाच्या माध्यमातून पाझर तलावाचे पाणी गावातील व्हाळाने शेतापर्यंत पोचले. गोवा बाजारपेठ गावापासून हाकेच्या अंतरावर असल्याने शेतकऱ्यांनी खरीप पिकानंतर उन्हाळी पिकांची लागवडीस सुरुवात केली. पारंपरिक भाजीपाला पिकांच्या जोडीला उन्हाळ्यात कलिंगड, काकडीसारखी कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांची लागवडी वाढल्या. त्यातून गावाची वाटचाल समृद्धीकडे सुरू आहे.

याच गावात प्रकाश दळवी यांचे घर आहे. शालेय शिक्षण घेत असतानाच वडील जगन्नाथ दळवी यांच्याकडून शेतीचे बाळकडू उपजत त्यांना मिळत गेले. बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी, धंद्याचा विचार न करता थेट शेती करण्याचे ठरविले. कुणाचीही गुलामगिरी करायची नाही असा कानमंत्र वडिलांनी लहानपणीच दिल्यामुळे श्री. दळवी यांचा शेतीमध्येच करिअर करण्याचा निर्णय पक्का झाला.

हमखास उत्पादनासाठी काजू लागवड :

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी घरच्या सहा एकर शेतजमिनीत काम सुरू केले. सुरुवातीला कायमस्वरूपी आणि हमखास उत्पादनासाठी काजू लागवडीवर भर दिला. तीन एकरांत ५०० काजू झाडांची घन पद्धतीने लागवड केली. तसेच सुपारीची १ हजार तर नारळाच्या ७० झाडांची यांची लागवड केली. याशिवाय खरीप हंगाम पारंपरिक भात आणि नाचणी लागवड करत आले.

काकडी लागवड ठरली किफायतशीर :

प्रकाश दळवी हे शेतीमध्ये सतत नवनवीन प्रयोग करीत असतात. प्रयोग म्हणून केलेली कलिंगड लागवड यशस्वी करून चांगले उत्पादन घेत आहेत. एक वर्ष त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने काकडी उत्पादनाचा प्रयोग केला. योग्य व्यवस्थापन, शेणखत आणि रासायनिक खतांचा संतुलित वापर यामुळे काकडीचे चांगले उत्पादन हाती आले. अवघ्या दीड महिन्यात उत्पादनाला सुरुवात होत असल्यामुळे काकडी लागवड किफायतशीर वाटू लागली. गेली वीस वर्ष ते सातत्याने काकडी उत्पादन घेत आहेत.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर :

सुरुवातीचा काही काळ पारंपरिक पद्धतीने काकडी लागवड केली. सध्या ते लागवडीसाठी मल्चिंग, ठिबक सिंचन अशा आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे काकडी लागवड करत आहेत. त्यासाठी बँकेकडून दोन लाख रुपयांचे कर्ज घेतले. बेडवरील काकडी लागवडीस ठिबकद्वारे विद्राव्य खतांचा संतुलित वापर केल्यामुळे उत्पादन वाढीस मदत झाली. उत्पादन खर्चातही बचत झाली.

कोरोनात मोठे नुकसान :

कोरोना संसर्गामुळे मार्च, २०२० मध्ये लॉकडाउन सुरू झाले. दरवर्षी साधारण मार्च ते मे या कालावधीत काकडीला सर्वोत्तम दर मिळतो. दर्जेदार उत्पादनास सुरुवात झाली असतानाच अचानक लॉकडाउन लागले. त्यामुळे मोठे संकट निर्माण झाले. शेतामध्ये दर्जेदार माल तयार होत होता, परंतु त्याची विक्री करायची कुठे असा प्रश्‍न निर्माण झाला. त्यामुळे संपूर्ण माल वाया गेला. लाखो रुपयांचे नुकसान झाले. परंतु त्यांनी हार मानली नाही. पुढील वर्षी नव्या उमेदीने आणि ताकदीने पुन्हा काकडी लागवड करून बाजारपेठ मिळविली.

काकडी लागवडीतील महत्त्वाच्या बाबी :

- दीड एकरात टप्प्याटप्प्याने काकडी लागवड.

- फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांत लागवडीचे नियोजन.

- एकावेळी साधारणपणे ७ हजार २०० काकडी रोपांची लागवड.

- शेणखत, सेंद्रिय खतांसह रासायनिक खतांचा संतुलित वापर.

- फुले आल्यानंतर रासायनिक कीटकनाशकांची फवारणी घेत नाही.

- लागवडीनंतर ४५ दिवसांनी उत्पादनास प्रारंभ. त्यानंतर ९० दिवसांपर्यंत मिळते उत्पादन.

- वेली आधार देऊन वाढीकरिता बाबूंच्या काठ्यांचा वापर.

- हंगामात प्रतिदिन ४ ते ५ हजार काकडीची तोडणी.

- लहान, मध्यम आणि मोठी याप्रमाणे प्रतवारी.

- नगावर विक्री. २००, २५०, ३०० रुपये प्रतिशेकडा सरासरी दर.

- गोवा भागात अधिक मागणी. व्यापाऱ्यांकडून थेट शेतावर येऊन खरेदी.

वार्षिक उलाढाल (काजू, सुपारी, काकडी) :

वर्ष---सरासरी उलाढाल (रुपये)

२०२१---६ लाख रुपये

२०२२---६ लाख ४५ हजार

२०२३---७ लाख

झुकेनी, भाजीच्या केळी यशस्वी लागवड :

दीड एकर क्षेत्रामध्ये सावरबोंड या केळी जातीच्या ६०० झाडांची लागवड केली आहे. ही केळी भाजीकरिता जास्तकरून वापरली जात असल्याने मागणी आणि दर चांगला मिळतो. मागील वर्षी कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार श्री. दळवी यांनी यशस्वीरीत्या झुकेनी लागवड केली.

आजोबा, वडीलच शेतीतील आयडॉल :

श्री. दळवी यांचे आजोबा सहदेव राघोबा दळवी हे प्रयोगशील शेतकरी होते. या भागात ऊसशेती नव्हती, त्या वेळी त्यांनी ऊसशेती केली. उसाचे गुऱ्हाळ गावात सुरू केले होते. त्या भागात त्या काळात तसा प्रयोग कुणी केला नव्हता. याशिवाय त्यांनी शेतीमध्ये विविध प्रयोग केले. आजोबांप्रमाणे वडील जगन्नाथ यांनी विलवडे परिसरात भाजीपाला लागवडीचा प्रयोग यशस्वी केला. शिवाय उत्पादित भाजीपाल्याला गोव्यात बाजारपेठ मिळविली. त्यामुळे गावातील अनेक शेतकरी भाजीपाला लागवडीकडे वळले.

गोव्यात करारावर शेती :

दोन वर्षे गोव्यामध्ये करारावर जमीन घेऊन कलिंगड आणि काकडी लागवड केली. शिवाय आणखी काही ठिकाणी करार शेती केली. शेती कामांमध्ये प्रकाश यांना पत्नी सौ. पूर्वा आणि आई सौ. सुवर्णा दळवी यांचे भक्कम पाठबळ मिळते. शेतीच्या माध्यमातून श्री. दळवी यांनी स्थानिक पाच ते सहा पुरुष आणि महिलांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

प्रकाश दळवी, ९४०४३९५८७८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT