सुदर्शन सुतार
Splapue News : सोलापूर जिल्ह्यातील पेनूर (ता. मोहोळ) येथील दत्तात्रय श्रीरंग चवरे यांच्याकडे साडेपाच एकर शेती असली तरी त्यातील जेमतेम अडीच एकर वहिवाटीखाली आहे. या अल्प शेतीत गेल्या दहा वर्षापासून मका आणि काकडी पिकात सातत्य ठेवत उत्तम नियोजनातून आर्थिक स्थैर्य मिळवले आहे.
मोहोळ-पंढरपूर महामार्गावर पेनूर गावामध्ये पापरी रस्त्यावर दत्तात्रय चवरे यांची शेती आहे. एकूण साडेपाच एकर शेती विभागून आहे. खरिपात तीन एकर मका, एक एकर काकडी, वांगी किंवा भुईमूग अशी पिके घेतात. सिंचनासाठी दोन बोअरवेल आणि एक विहीर असली, तरी पुढे रब्बीमध्ये पाणी कमी पडत असल्यामुळे फक्त अडीच ते तीन एकर क्षेत्रावर शेतीचे नियोजन करतात.
अल्प शेतीमध्ये पिकांच्या योग्य नियोजनातून संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह ते करतात. कमीत कमी पाण्यामध्ये चांगली पिके घेण्याकडे त्यांचा कल आहे. सध्या रब्बीमध्ये त्यांच्याकडे दीड एकरावर काकडी आणि १३ गुंठे वांगी आहेत. शिक्षण जेमतेम असले, तरी गेल्या १५-२० वर्षांपासून शेती करत असल्याने अनुभव चांगला आहे. दरवर्षी मका आणि काकडी पिकांमध्ये सातत्य ठेवले असून, उत्तम उत्पादनासोबतच बाजाराच्या अभ्यासामुळे उत्पन्नही हमखास मिळवतात. त्यांना तीन मुले आहेत. मोठा मुलगा राजकुमार बी.एस्सी. पदवी घेतल्यानंतर खासगी फायनान्स कंपनीत कार्यरत आहे. विजय आणि महेश बारावीपर्यंत शिकलेले आहेत. विजय एका मित्राबरोबर जेसीबी व्यवसायात आहे. महेश मात्र पूर्णवेळ वडिलांबरोबर शेतीत असतो. पत्नी रंभाबाई यांच्यासोबत दत्तात्रय चवरे यांनी मुलांना शिक्षण देत स्वावलंबी बनविले आहे.
विहीर खोदाई मजूर ते प्रगतिशील शेतकरी
सुमारे १५ वर्षांपूर्वी जेमतेम शेती आणि पाण्याचाही खात्रीशीर स्रोत नाही, अशा स्थिती होती. त्या काळी सर्वांत कठीण व कष्टाच्या मानल्या जाणाऱ्या विहिरींच्या खोदाईची कामे सुरू केली. त्यातून चांगली मजुरी मिळत असे. पुढे अन्य मजुरांसोबत घेत स्वतः विहीर खोदाईचा ठेका घेऊ लागले. पेनूर, तुंगत, खंडाळी, पापरी या परिसरांतील सुमारे १२५ हून अधिक विहिरींची खोदाई त्यांनी केली आहे. परंतु वयोमानानुसार ही कामे होईनात, तेव्हापासून शेतीमध्ये पूर्णवेळ लक्ष घातले. स्वतः शेतीमध्ये विहीर आणि बोअरवेल असे पाण्याचे स्रोत निर्माण केले. त्या संरक्षित पाण्याच्या जोरावर उत्तम पिके घेत प्रगतिशील शेतकरी म्हणून नाव कमावले आहे.
पिकांबरोबर आर्थिक नियोजनाला महत्त्व
खरिपात पावसाच्या तोंडावर जूनमध्ये मका करायची. मका काढली की लगेच पुढे ऑक्टोबरमध्ये काकडी करायची, असा क्रम गेली कित्येक वर्षे ठरलेला आहे. या कालावधीत काकडीला मार्केट मिळते आणि नफाही खात्रीशीर मिळतो, असा त्यांचा अनुभव आहे. खरिपातील मक्याच्या उत्पन्नातील काही पैसे घरखर्चासह पुढच्या पिकासाठी ठेवले जातात. काकडीच्या लागवडीला, कीडनाशके - खते यासाठी किती पैसे लागतात, यासह उत्पादन सुरू होईपर्यंत किती लागतील, याचा पक्का हिशेब त्यांना तोंडपाठ आहे. त्यानुसार त्यांचे आर्थिक नियोजन केले जाते. काकडीतून पुढील हंगाम आणि घरखर्चाचा सगळा हिशेब करून आर्थिक नियोजन केले जाते.
काकडीची थेट विक्री
काकडीची सध्या रोज काढणी केली जाते. काकडीची विक्री बाजार समितीमध्ये करण्याऐवजी किरकोळ विक्रेत्यांना करण्यावर त्यांचा भर असतो. पंढरपूरच्या मंडईत स्वतः काकडी घेऊन जातात. तिथल्या किरकोळ विक्रेत्यांना काकडीची विक्री केली जात असल्यामुळे बाजार समितीपेक्षा जादा दर मिळतो. त्यासोबतच आडत, हमाली व अन्य छुपे खर्च वाचतात. मात्र माल जास्त असल्यास बाजार समितीमध्ये जावे लागते. मक्याची विक्री मात्र बाजार समितीत करतात.
उसनवारी नाही...
आज मुले कमावती झाली आहेत. पण घरातील सर्वांचा आर्थिक हिशेब दत्तात्रय यांच्याकडे एकहाती असतो. मुख्यतः शेतीतला पैसा शेतीत खर्च करायचा, हा त्यांचा कटाक्ष असतो. तर मुलांचे पैसे गरज पडली तर घरखर्च आणि तातडीच्या वैद्यकीय कारणांसाठी वापरला जातो. सामान्यतः त्यातून बचत करण्याचा प्रयत्न असतो. अनावश्यक खर्च टाळण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे कोणाकडूनही उसनवारी करण्याची वेळ येत नाही.
चारचाकी गाडी आणि आलिशान बंगला
आयुष्यभर शेतीमध्ये कष्ट करत कुटुंबाने मुलांचे शिक्षण पार पाडले. आता तिन्ही मुले हाताशी आल्याने त्यांच्या भवितव्याचा विचार करून मोठ्या दुमजली घरांचे बांधकाम सुरू केले आहे. या कुटुंबाचे मोठ्या घराचे स्वप्न येत्या पाच-सहा महिन्यांमध्ये पूर्ण होईल. अर्धी रक्कम कर्जाऊ घेत तेरा लाखांची चारचाकी गाडीही घेतली आहे. हे सारे अल्प शेती, कष्टाच्या बळावर उभे केल्याचा अभिमान त्यांना वाटतो.
कमी खर्चात चांगला नफा ः
काकडीतून गेल्या वर्षी २०२३ मध्ये काकडीतून ५ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. २०२२ मध्ये ३ लाख ९६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. तर मक्यातून गेल्या वर्षी ६५ हजार रुपये आणि २०२२ मध्ये ४० हजार रुपये इतके उत्पन्न मिळाले. बेसल डोस, खते-कीडनाशके, फवारणी, मजुरी असा दरवर्षी खरिपातील मका लागवडीत काढणीपर्यंत साधारण १५ हजार रुपये, तर पुढे मल्चिंग, काकडी लागवड, जाळी उभारणी ते काढणीपर्यंत एकरी ५५ हजार रुपये खर्च येतो. योग्य नियोजनातून खर्चात बचत साधत असल्यामुळे एकूण खर्चाच्या दीडपट ते दुप्पट नफा त्यांना मिळतो.
घरच्या दुधाची सोय होते
३ म्हशी, जर्शी गाय एक, खिलार गाय एक आणि शेळ्या २ अशी जनावरे आहेत. कणसे काढून हिरवा असतानाच मका धांडे काढून त्याच्या मकवानाचा मुरघास करून ठेवला आहे. त्यांच्यासाठी चाऱ्याची सोय केली. घरगुती दूधदुभते भरपूर होते. त्यानंतर रोज म्हशीचे ५ लिटर दुधाचे रतीब घालतो. जर्शीचे दूध दोन्ही वेळेचे ११ लिटर दूध डेअरीला देतात.
काकडी व मका पिकाचे एकरी उत्पादन आणि सरासरी दर ः
वर्ष --- उत्पादन --- सरासरी दर (प्रतिकिलो)
काकडी
२०२४ --- आतापर्यंत ६ टन (आणखी ३२ टन अपेक्षित) --- ३० रुपये
२०२३ --- २२ टन --- २५ रुपये
२०२२ --- १८ टन --- २२ रुपये
मका ः
२०२४ --- ३० क्विंटल --- अद्याप विक्री केले नाही
२०२३ --- २८ क्विंटल --- २३०० रुपये प्रति क्विंटल
२०२२ --- २२ क्विंटल --- १८०० रुपये प्रति क्विंटल
संपर्क ः दत्तात्रय चवरे, ९८९००८५७७९
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.