Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

Agriculture Irrigation : कसबा नूल (ता. गडहिंग्लज. जि. कोल्हापूर) येथील दोन सहकारी पाणीपुरवठा संस्था पन्नास वर्षांमपासून अधिक काळ कार्यरत आहेत. काटेकोर व्यवस्थापनाच्या साह्याने पाणी वितरणातून तीनशेहून अधिक अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेतात त्यांनी ऊस व अन्य शेतात हिरवाई फुलविली आहे.
Agriculture Irrigation
Agriculture IrrigationAgrowon

Indian Agriculture : कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज तालुका शहरापासून दहा किलोमीटरवर कसबा नूल गाव आहे. हिरण्यकेशी नदी गावाजवळून वाहते. गावाला ऊसशेतीची परंपरा आहे. येथील नव्वद टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. पूर्वी मा भागात दुष्काळी स्थितीमुळे जिरायती शेती व्हायची. नदी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये कोरडी पडायची. शेतकऱ्यांना खरिपासह रब्बीची पिके घेणेही मुश्‍कील असायचे.

श्री रामलिंग संस्थेची स्थापना

अल्पभूधारक शेतकऱ्यांची समस्या ओळखून गावात श्री रामलिंग सहकारी पाणीपुरवठा सेवा संस्थेची स्थापना १९७६ मध्ये झाली. गावातीलच जुने शेतकरी कै.शंकरराव चव्हाण, कै. गुरुसिद्धाप्पा वाली व त्यांचे काही सहकारी यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याचे सहकार्य घेत शेतकऱ्यांच्या नावाने कर्ज घेऊन संस्थेची उभारणा झाली. तेव्हापासून आजगायत संस्थेचे कार्य व वाटचाल अखंड सुरू आहे.

...असे होते पाणी वितरण

संस्थेचे सुमारे १५२ सभासद. ‘कमांड एरिया’ सुमारे १५० एकर. दरवर्षीचे सरासरी

भीजक्षेत्र ४० ते ५५ एकर.

सुमारे अडीच किलोमीटरवरून ५० व ३० अश्‍वशक्तीच्या दोन पंपांद्वारे शेतकऱ्यांना पाणी वितरण.

नदीतून थेट शेतकऱ्यांच्या शेतातच व्हॅाल्व्ह्ज काढले आहेत.

सन २००३ पर्यंत अनेक आव्हानांशी सामना करीत संस्थेचे कामकाज सुरू होते. त्यानंतर

चित्री प्रकल्पामुळे वर्षभर पाणी मिळणे सुरू झाले.

Agriculture Irrigation
Agriculture Success Story : नैसर्गिक उमाळ्यावर फुलली शेती, बहरले पर्यटन

पाणीपुरवठा नियोजन (ठळक बाबी)

एकूण सतरा व्हॅाल्व्ह्ज. एकाच वेळी पाच व्हॅाल्व्ह्जद्वारे पाणीपुरवठा.

प्रत्येक व्हॉल्व्ह, त्या परिसरातील शेतकऱ्यांची संख्या व ऊसक्षेत्र पाहून पाण्याचे वितरण.

एकरी सात ते आठ तास तसेच चार दिवस रात्री तीन दिवस सकाळी असे वितरण.

कोणत्याही परिस्थितीत अतिरिक्त पाणी दिले जात नाही

आदल्या दिवशी संबंधित शेतकऱ्यांना कल्पना.

वर्षभरात प्रत्येक शेतकऱ्याला किती तास, कोणत्या दिवशी पाणी दिले अशा सर्व नोंदी.

शेतात सोडलेल्या पाण्यावर पाटकऱ्याचे लक्ष. त्यामुळे पुढील क्रमांक असलेल्या शेतकऱ्यांवर पाणी देताना अन्याय होणार नाही याची दक्षता.

वार्षिक सभेत ताळेबंद. संस्थेचे स्वतःचे भांडवल असल्याने ऐनवेळी दुरुस्ती कामासाठी निधी उपलब्ध केला जातो.

मोटर व पाइपलाइनमध्ये बिघाड होऊन वेळ वाया जाऊ नये यासाठी कारागिराची नेमणूक.

सचिव, पाटकरी, ड्रायव्हर यांच्या समन्वयाने पाण्याचे वाटप.

फेब्रुवारी ते मेपर्यंत शेतकऱ्यांना समान पाणी देणे गरजेचे असते. याकाळात पाटबंधारे विभागातर्फे उपसाबंदी जाहीर होते. नेमकी याच वेळी शेताला पाण्याची गरज वाढते. मार्चनंतर तर महिन्यातले दहाच दिवस पाणीपुरवठा होतो. अशावेळी शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यादृष्टीने संस्थेचे व्यवस्थापन महत्त्वाचे ठरते.

गहू, मका आदी पिकांसाठी तासाला १५० रुपये या प्रमाणे पाणी वितरण.

उसासाठी वर्षाला एकरी १३ हजार रुपये पाणीपट्टी आकारणी. मार्चपर्यंत न भरल्यास रकमेवर १५ टक्के व्याज आकारणी.

Agriculture Irrigation
Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...
दहा गुंठे ते चार एकर क्षेत्र असणारे शेतकरी आमच्या संस्थेचे सभासद आहेत. पन्नासहून अधिक वर्षे संस्था पाणीपुरवठा कार्यक्षमपणे हाताळत असून त्यातून ऊस उत्पादकांची प्रगती झाली आहे. आर्थिक आव्हाने पार करून आम्ही संस्था फायद्यात आणली आहे. लेखापरीक्षणात अ श्रेणी मिळवली आहे. यात शेतकरी सभासदांचे योगदान मोठे आहे.
सिद्धेश्‍वर माळगी, ८००७०९७९६१ अध्यक्ष, श्री रामलिंग सहकारी पाणीपुरवठा सेवा संस्था नूल. ता. गडहिंग्लज

हिरण्यकेशी संस्थेंने जपला स्नेह

नूल गावात हिरण्यकेशी सहकारी पाणीपुरवठा मंडळ ही अजून एक संस्था कार्यरत आहे.

तिची स्थापना कै. मल्लीकार्जून नडगदल्ली, कै. सदाशिव शिंदे, कै. बाबूराव माळगी यांनी १९६८ मध्ये केली. संस्थेचे कार्यक्षेत्र ४०० एकर आहे. शंभर एकरांवर संस्थेच्या योजनेचे पाणी पोहोचले आहे. पाच गुंठ्यांपासून पाच एकरांपर्यंत शेतकरी त्याचा लाभ ऊस, खरीप, रब्बी पिकांसाठी घेतात.

पाणीपुरवठ्यातील अडचणी दूर करण्यासाठी संस्थेच्या वतीने वेळोवेळी बैठक घेण्यात येते. कमी- जास्त पाण्यामुळे शेतकऱ्यांत वाद होवू नये याची काळजी घेतली जाते. संवादामुळे अनेकदा गैरसमज टाळले जातात.

ज्या वेळी उपसाबंदीचा कालावधी येतो त्या वेळी क्षेत्र व मिळणारे पाणी याबाबत चर्चा करून प्रत्येक शेतकऱ्याचे पाणी देण्याचे तास निश्‍चित केले जातात. त्याची कल्पना शेतकऱ्यांना देण्यात येते.

पाणी टंचाईवेळी शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन नियमांत काही बदल केले जातात.

पाणीपट्टीविषयी आदर्श पद्धत

सभासदांची शासकीय पाणीपट्टी संस्था भरते हे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. संस्थेकडून पाझर पाणीपट्टी वसूल केली जात नाही. शेतकऱ्यांना थेट पैसे भरावे लागू नयेत म्हणू नयेत म्हणून संस्थेने वेगळा प्रयोग केला आहे. शेतकऱ्यांच्या संमतीने एकूण उत्पन्नातील पाच टन ऊस संस्थेच्या नावे पाठविला जातो. पाच टनांची होणारी रक्कम संस्थेला पाणीपट्टी म्हणून मिळते. अन्य पिकांसाठी तासिका तत्त्वावर पाणीपट्टी आकारली जाते. त्याचा उपयोग संस्थेच्या नियमित खर्चासाठी होतो.

चित्री प्रकल्पाचे पाणी आल्यानंतर पाणी व्यवस्थापन करणे थोडे सुलभ झाले. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना पुरेसे पाणी उपलब्ध करून देणे ही आम्ही जबाबदारी समजतो.
आनंद नडगदल्ली, ७७५५९०६०३० अध्यक्ष, ‘हिरण्यकेशी’ संस्था
शेतकऱ्यांच्या विश्‍वासातून संस्थेचे कार्य यशस्वी सुरू आहे. वीजबिल आकारणी होताना ती शेतीपूरक योजनेतून व्हावी अशी आमची मागणी आहे.
प्रकाश सावंत, सचिव नागेश चौगुले, माजी सचिव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com