Ubale Family Agrowon
यशोगाथा

Fodder Crop : चारा पिकांमध्ये मिळवली स्वयंपूर्णता

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Success Story of Fodder Farming : नगर जिल्ह्यात वरखेड हे जिरायती किंवा अवर्षणप्रवण गाव आहे. भागात शाश्‍वत सिंचन नाही. मात्र जुन्या काळात ओढे, नाल्यांवर झालेल्या बंधाऱ्यांमुळे विहिरी, विंधन विहिरींना पाणी उपलब्ध होत असते.

त्यातून पाण्याचा काटकसरीने वापर करत इथले शेतकरी पिकांचे नियोजन करीत असतात. गावातील ज्ञानेश्‍वर आणि संदीप या उबाळे बंधूंची वडिलोपार्जित १३ एकर शेती आहे. सोबतीला त्यांचा दुग्ध व्यवसाय देखील आहे.

चारा पिकांची शेती

उबाळे यांचा दुग्ध व्यवसायाचा पसारा मोठा आहे. लहान-मोठ्या मिळून ४० ते ४५ गायी आहेत. साहजिकच मोठ्या प्रमाणात चाऱ्यावर खर्च करावा लागतो. त्याच्या उपलब्धतेत तडजोड करून चालत नाही. चाऱ्यात स्वयंपूर्णता मिळवली तरच दुग्ध व्यवसाय फायद्यात आणता येतो हे उबाळे यांनी जाणले.

या भागात दुष्काळी परिस्थितीला सातत्याने सामोरे जावे लागते. एकूण परिस्थिती पाहून पंधरा वर्षांपासून सहा ते सात एकर क्षेत्र उबाळे यांनी चारापिकांसाठी राखीव ठेवले आहे. त्यात प्रत्येकी तीन एकरांवर गावरान मेथीघास व गिन्नी गवत, एक एकरात कडवळ व एक ते दीड एकर मका असा समावेश असतो. शेतीची जबाबदारी संदीप तर दुग्ध व्यवसायाची जबाबदारी ज्ञानेश्‍वर पाहतात. चारा उत्पादनासोबत कांदा, बाजरी, गहू, ऊस आदी पिकेही घेतात.

दुग्ध व्यवसाय झाला फायदेशीर

उबाळे कुटुंब पंचवीस ते तीस वर्षांपासून दुग्ध व्यवसाय करीत आहेत. शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील नातेवाईक नितीन काकडे- पाटील व आव्हाणे येथील अंबादास कळमकर यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यानंतर व्यवसायाचा विस्तार केला. सुरुवातीला चार गायी होत्या.

टप्प्याटप्प्याने विस्तार करत व्यवसाय ७५ गायींपर्यंत नेला. मात्र मजुरांच्या अडचणीमुळे ही संख्या आज ४० ते ४५ पर्यंत सीमित ठेवावी लागली. १८० बाय २५ फूट आकाराचा शेडमधील गोठा आहे. तर आठ वर्षांपूर्वी मुक्तसंचार गोठाही बांधला आहे. गाभण गायी, वासरे आदींसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे.

चारा व्यवस्थापनातील ठळक मुद्दे

गिन्नी गवत व गावरान गवत यांची लागवड केल्यानंतर तीन वर्षे ते उत्पादन देत राहतात. गावरान घासासाठी एकरी बियाणे सात ते आठ किलो बियाणे लागते. दर १५ दिवसांनी किंवा त्याहून कमी दिवसांत त्याची कापणी होत असते. वर्षभरात एकरी दहा ते बारा टन एकरी उत्पादन मिळते.

गिन्नी गवत दर दीड महिन्याने एक टनापर्यंत उपलब्ध होते. नेवासा तालुक्यातून ठोंब आणली आहेत. गिन्नी गवत १५ फुटांपर्यंत वाढते. चार फुटांच्या सरीवर दोन ठोंबांत दोन फुटांचे अंतर ठेवून त्याची लागवड केली जाते. दोन ओळी व दोन ठोंबांत पुरेसे अंतर असल्याने हवा खेळती राहतो. फुटवे वाढण्यास मदत होते. प्रति ठोंब वीस ते पंचवीसपर्यंत फुटवे मिळतात.

दोन्ही बहुवार्षिक पिकांसाठी शेणखताचाच अधिक वापर केला जातो. त्यातून जमिनीची सुपीकता आणि चाऱ्याचा दर्जाही वाढला आहे. जनावरांची संख्या पाहता दरवर्षी मुरघास तयार केला जातो. वर्षभर ३० ते ३५ टन मुरघास तयार ठेवण्याचे नियोजन असते. प्रसंगी मका बाहेरूनही खरेदी केला जातो. सर्व चारा पिकांना पाणी देण्यासाठी पाच विहिरी आहेत. शिवाय पाच वर्षांपूर्वी कृषी विभागाच्या मदतीने उभारलेले एक कोटी लिटरपेक्षा अधिक क्षमतेचे शेततळे आहे.

यशस्वी अर्थकारण

सध्या दररोज २०० ते २२५ लिटर दूध संकलित होते. वीस वर्षांपासून अन्य शेतकऱ्यांकडूनही दुधाचे संकलन सुरू केले. आज सुमारे चार गावांमधून दररोज दीड हजार लिटर दुधाचे संकलन होते. शेवगाव येथे दोन प्रकल्पांना २६ ते २७ रुपये प्रति लिटर दराने दूध पुरविले जात आहे. वर्षाला ६० टनांपर्यंत शेणखत मिळते. घरच्या शेतीत वापरून साडेतीन हजार रुपये प्रति टन दराने त्याची विक्री होते.

एकूण व्यवसायातून ४० टक्क्यांपर्यंत फायदा होतो. शेवगाव तालुक्याला आतापर्यंत दहा वर्षांत चार वेळा दुष्काळासारख्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागले. मात्र उबाळे परिवाराने चारा उत्पादनाचे काटेकोर नियोजन केल्यानेच दुष्काळातही त्यांना हा व्यवसाय टिकवता आला. जनावरे चांगल्या प्रकारे जगवता आली.

बियाणे विक्री

दरवर्षी प्रत्येकी दीड एकरात असे एकूण तीन एकरांत गावरान मेथी घासाचे बियाणे उत्पादित केले जाते. एकरात एक ते सव्वा क्विंटल किलो उत्पादन मिळते. यंदा एक क्विंटल बियाणे विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे उबाळे सांगतात. त्याच्या विक्रीतून अतिरिक्त उत्पन्न मिळते.

प्रत्येक शेतकऱ्याने चारा पिकांमध्ये स्वयंपूर्णता मिळवावी. त्यातूनच दुग्ध व्यवसाय फायद्यात आणता येतो. आम्ही हेच केले आहे. पूर्वी आमची तीन-चार एकर शेती होती. आज खरेदी करीत १३ एकरांवर पोहोचलो आहोत. वाहतुकीसाठी तसेच जीप धरून दोन-तीन वाहने आहेत. ट्रॅक्टर व त्यासहित अवजारे आहेत. जनावरांना पाण्यासाठी सोय म्हणून टॅंकरदेखील घेतला आहे.

ज्ञानेश्‍वर उबाळे, ९८२२३१६५२४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT