सुदर्शन सुतार
Varieties of Fodder Cultivation : सोलापूर हा दुष्काळी, कोरडवाहू जिल्हा आहे. जिल्ह्याचा मुख्य हंगाम रब्बी असला, तरी उजनी धरणामुळे पंढरपूर, माढा, करमाळा, माळशिरस यांसह मंगळवेढा, मोहोळच्या काही भागांत बागायती क्षेत्र वाढले आहे. तरीही सांगोला, अक्कलकोट, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि बार्शी पट्ट्यात जिरायती क्षेत्र अधिक आहे.
अर्थात, जिल्ह्यात सर्वच भागांत मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसायाकडे शेतकऱ्यांचा कल आहे. जिल्ह्यातून दररोज गाई, म्हशीचे मिळून सुमारे साडेबारा लाख लिटर दूध संकलन होते. यात जिल्हा दूध संघ, शिवामृत दूध संघ या स्थानिक संघांव्यतिरिक्त राज्य, परराज्यांतील खासगी दूध संघांचा समावेश आहे.
हे महत्त्व लक्षात घेता दुभत्या जनावरांसाठी कमी खर्चातील, अधिक उत्पादन देणाऱ्या चारापिकांच्या विविध वाणांच्या प्रात्यक्षिकांवर खेड (ता. उत्तर सोलापूर) येथील शबरी कृषी प्रतिष्ठान संचलित विज्ञान केंद्राने (केव्हीके) भर दिला आहे. ‘केव्हीके’चे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे व पशुवैद्यक शास्त्र विभागाचे विषय विशेषज्ञ डॉ. पी. व्ही. कदम यांचे मार्गदर्शन लाभते आहे.
एका अभ्यासानुसार सोलापूर जिल्ह्यात लहान-मोठी मिळून १२ लाख ४१ हजार ८९६ एवढी जनावरे (गायी, म्हशी आदी) आहेत. लहान जनावरांना दररोज नऊ किलो, तर मोठ्या जनावरांना १८ किलो चारा लागतो. काही जण तयार पशुखाद्य आणतात. तर काही मुरघास तयार करतात. यासंबंधीचे अर्थशास्त्र व तंत्रज्ञानाचा प्रसार केव्हीकेमार्फंत झाल्याने अनेक शेतकरी चारापिकांच्या लागवडीकडे वळले आहेत
चारावाणांचा प्रसार दृष्टिक्षेपात
सन २००८ पासून केव्हीकेच्या प्रक्षेत्रावर चारापिकांच्या वाणाची प्रात्यक्षिके. केव्हीकेला भेट देणाऱ्यांनी ती पाहावी आणि व आपल्या शेतात लागवड करावी हा त्यामागे उद्देश.
संकरित नेपियर प्रकारातील फुले गुणवंत, फुले जयवंत, सुपर नेपियर, रेड नेपियर, डीएचएन-६ यासह दशरथ, मारवेल, अंजनग्रास आणि मेथी घास आदी वाणांचा प्रात्यक्षिकांत समावेश.
प्रातिनिधिक वाणांविषयी माहिती
सुपर नेपियर
दोन वर्षांपासून केव्हीकेतर्फे संकरित नेपियर प्रकारातील सुपर नेपियर या बहुवार्षिक एकदल पिकाचा प्रसार करण्यात येत आहे. या पिकाची वैशिष्ट्ये अशी.
१० ते १६ फूट उंचीपर्यंत वाढणारे पीक.
१२ ते १४ टक्के प्रथिनांचे प्रमाण.
लागवडीसाठी मध्यम, हलक्या जमिनीची आवश्यकता.
वर्षभर केव्हाही लागवड करता येते. मात्र जून ते ऑगस्टमध्ये लागवड फायदेशीर.
तापमान १५ अंश सेल्सियसपेक्षा कमी असताना किंवा थंडीत लागवड करू नये.
एका वर्षात किमान पाच कापण्या करता येतात. पहिल्या कापणीस १५ ते २० फुटवे, त्यानंतर तिसऱ्या कापणीपर्यंत ३० ते ३५ फुटवे.
लागवडीनंतर किमान तीन वर्षे उत्पादन. वर्षभर मिळून एकरी ८०० ते १००० क्विंटलपर्यंत उत्पादन.
दुधात २ ते ४ टक्क्यांपर्यंत वाढ मिळते असा शेतकऱ्यांचा अनुभव.
मेथी घास
द्विदल वर्गातील बहुवार्षिक पीक. सुमारे २० ते २२ टक्के प्रथिनांचे प्रमाण.
एका वर्षात ११ ते १३ कापण्या.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे आरएल ८८ सारखे मेथीघासचे निवड पद्धतीने विकसित केलेले सुधारित वाण. तीन वर्षांपर्यंत उत्पादन देते.
दुधात ८ ते १० टक्के वाढ.
मध्यम, हलकी निचरा होणारी जमीन आवश्यक.
पेरणीची वेळ १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर. बी विस्कटून किंवा पेरणी करून दोन ओळींत ३० सेंटिमीटर अंतरावर.
पहिली कापणी ४० दिवसांनंतर. नंतरच्या कापण्या २५ ते ३० दिवसांनी करता येतात.
एकरी वर्षभर मिळून ४५० ते ५०० क्विंटल उत्पादन.
वरील दोन वाण कापण्यासाठी मऊ आणि जनावरांना खाण्यासाठी रुचकर. त्यामुळे शेतकऱ्यांची अधिक पसंती.
चारापिकांच्या कांड्या पुरवल्या
केव्हीकेतर्फे आपल्या प्रात्यक्षिक प्लॉटमधून सन २००८ पासून आतापर्यंत चाऱ्याच्या विविध वाणांच्या आठ लाखांहून अधिक कांड्या माफक दरात शेतकऱ्यांना पुरवल्या आहेत. सन २०२० मध्ये ९७ शेतकऱ्यांनी ८० हजार, २०२१ मध्ये ६५ शेतकऱ्यांनी ७३ हजार, तर २०२२ मध्ये १८७ शेतकऱ्यांनी सव्वालाखापर्यंत कांड्या नेल्या. यंदा ९० हून अधिक शेतकऱ्यांना ७७ हजारपर्यंत कांड्या पुरवठा झाला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.