Poultry Farming Industry Agrowon
यशोगाथा

Poultry Farming : पोल्ट्री उद्योगात रोवले भक्कम पाऊल

Success Story of Poultry Industry : मनोज कापसे यांनी २४ वर्षांपूर्वी प्रतिकूल परिस्थितीत पोल्ट्री उद्योग सुरू केला. आव्हाने झेलत, मार्गदर्शन घेत, व्यावसायिक व शास्त्रीय दृष्टिकोनातून चिकाटीने व्यवसाय विस्तारला.

मुकुंद पिंगळे

Poultry Business : नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव वाखारी येथील मनोज आनंदा कापसे यांची वडिलोपार्जित अवघी अडीच एकर जमीन होती. कला शाखेतून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत कमजोर असल्याने ‘एसटीडी बूथ’ सुरू केला. त्या वेळी परिसरातील पोल्ट्री उत्पादक हे व्यापाऱ्यांशी संपर्क करण्यासाठी मनोज यांच्या बूथवर यायचे. मनोज यांच्याकडे प्रभावी संभाषणाची हातोटी असल्याने पोल्ट्री उत्पादकांना ते व्यवहारात मदत करायचे. हे कौशल्य पाहून काही व्यापाऱ्यांनी त्यांना पोल्ट्री उद्योग सुरू करण्याचा सल्ला दिला. मनोज यांनी मग बारकाईने अभ्यास करून विचारांती १९९९ मध्ये त्यात पाऊल टाकले. पतसंस्था, बँक व उसनवारी करून पाचहजार पक्षी क्षमतेचे ४,८०० चौरस फुटांचे शेड बांधले.

जिद्दीने व्यवसायात रोवले पाय

सुरुवातीला अनेक चढ-उतार सहन केले. कधी पक्ष्यांची मरतुक सहन केली. विक्रीत अनेक अडचणी आल्या. पण हार न मानता वडिलांच्या मार्गदर्शनाखाली मनोज यांनी व्यवसायातील बारकावे आत्मसात करण्यास सुरुवात केली. जिद्द व चिकाटीतून २४ वर्षांपासून हा प्रवास आज अखंड सुरू आहे. प्रश्‍नांवर पर्याय शोधून पुढे जाण्याचा कल असतो. एकेकाळी देवळा तालुक्यात पोल्ट्री उद्योग विस्तारित होता. त्याच वेळी पिले व खाद्याची उपलब्धता यात अडचणी होत्या. रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास तत्काळ सुविधा मिळत नव्हत्या. अशावेळी स्थानिक अभ्यासू पोल्ट्री उत्पादक व तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत मनोज एकेक पाऊल पुढे रोवत निघाले.

पोल्ट्री व्यावसायिकांसाठी जिल्हास्तरावर हेल्पलाइनस्वावलंबी व अर्थपूर्ण व्यवसाय

उद्योगात स्वावलंबी होण्यासाठी व उत्पादन खर्च कमी करण्यासाठी स्वतःचीच फीड मिल उभारून खाद्य निर्मिती सुरू केली. भांडवल ही मुख्य समस्या होती. पण मिळणाऱ्या उत्पन्नातून कर्जाची वेळेवर परतफेड करत गेल्याने पत वाढली. त्यातून कॅश क्रेडिट सुविधा उपलब्ध झाली. त्यातून आर्थिक वाट प्रशस्त होत गेली. शास्त्रीय पद्धतीचा अवलंब, व्यवस्थापन व सूक्ष्म नियोजनाची जोड दिली. चर्चासत्रे, परिसंवाद व अभ्यास दौऱ्यात मनोज सहभागी होऊ लागले. तज्ज्ञ व नामवंत उद्योजकांचे मार्गदर्शन मिळू लागले. त्यातून उद्योग विस्तारण्यास मदत झाली.

आजचा विस्तारलेला उद्योग

सुरुवातीला पाच हजार पक्षी क्षमतेपासून सुरुवात केलेल्या या उद्योगात आज दहा पटीने वाढ होऊन ५० हजार पक्षीक्षमतेची शेड्‍स आहेत.

याशिवाय ३० हजार पक्षीक्षमतेची शेड्‍स भाडेतत्त्वावर घेतली आहेत.

अशा प्रकारे एकूण ८० हजार पक्ष्यांचे संगोपन आजमितीला होते.

एक दिवस वयाची पिले आणून संगोपन. वर्षभर सुमारे पाच बॅचेस घेतल्या जातात. वार्षिक एकूण पक्षी उत्पादन क्षमता साडेतीन लाख ते चार लाखांपर्यंत पोहोचली आहे.

पक्ष्यांची ‘प्लेसमेंट’ करण्यापूर्वी शेड स्वच्छता, निर्जंतुकीकरण. त्यामुळे नवीन पक्ष्यांना रोगांचा अटकाव करता आला. वॉटर सॅनिटायझर’, प्रतिजैविके भुकटी सुविधा.

फीड मिलमध्ये दररोज १२ ते १३ टन खाद्यनिर्मिती. यात सोया, मका यांचा संतुलित वापर. आवश्‍यक औषधांचे मिश्रण. त्यातून पक्ष्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत.

स्थानिक शेतकऱ्यांकडून मका खरेदी. त्यांच्यासोबत ऋणानुबंध जुळले आहेत.

खाद्यपुरवठा, औषधे, आरोग्य, वजन, मरतुक आदी दैनंदिन नोंदी.

सर्व नियोजनातून पक्ष्यांची मरतुक कमी केली. अपेक्षित वाढ व वजन मिळत आहे.

सुमारे १० ते १२ जणांना रोजगार.

उद्योगाचे अर्थकारण

जुलैपासून पुढे श्रावण महिना तसेच पावसाळ्यात बाजारपेठांत मागणी घटते. त्यामुळे एकूण परिस्थितीचा अभ्यास करून पुरवठा संतुलित होण्याच्या दृष्टीने पक्षांची प्लेसमेंट मर्यादित ठेवण्याकडे कल असतो. एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव काळ असतो, त्या वेळी जोखीम, अत्यंत दक्षता घेऊन काटेकोर संगोपन केले जाते. परिणामी, बाजारपेठेत आवक कमी झाल्याने या नियोजनाचा फायदा होतो. पक्ष्यांचे दर दररोज बदलतात. कधी ते किलोला ६० ते ६५ रुपये, तर कधी १२० ते १२५ रूपयेही होतात. प्रति किलोमागे खर्च मात्र ८५ रुपयांच्या पुढेच असतो. त्यामुळे नफा-तोटा गणित कायम बदलत राहते.

कुटुंबाची साथ, उद्योगातून प्रगती

वडिलांनी व्यवहारज्ञान शिकवले. आई सिंधूबाई यांचेही मार्गदर्शन मिळते. पत्नी दीपाली यांची साथ मनोज यांना लाखमोलाची ठरली आहे. या उद्योगाने समृद्धी आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली.मुले कृष्णा व सार्थक चांगले शिक्षण घेत आहेत. भविष्यात मुलांनीही या उद्योगात उच्च व तांत्रिक शिक्षण घ्यावे अशी वडिलांची इच्छा आहे. याच उद्योगातून अडीच एकर असलेली शेती सात एकरांवर नेणे शक्य झाले. उद्योगासाठी आवश्यक साठवणूक गृह, वाहतूक सुविधा तयार केली. पिंपळगाव वाखारी व्यतिरिक्त धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर (ता. साक्री) येथेही जागा घेत शेड उभारले आहे.

देशात मिळविली बाजारपेठ

चाळीस ते ४५ दिवसांची एक बॅच असते. ती पूर्ण झाल्यानंतर वजन तपासून मुंबई, नाशिक, नागपूर, बीड, यवतमाळ येथे व्यापाऱ्यांना पुरवठा होतो. परराज्यांत गुजरातमधील सुरत, अंकलेश्‍वर, बडोदा, नवसारी, वापी, राजस्थानात अजमेर उदयपूर, जयपूर तर मध्य प्रदेशात भोपाळ, इंदोरे, बडवानी, रतलाम, खांडवा, देवास येथे पक्षी पाठवले जातात. देशभरातील व्यापाऱ्यांसोबत मनोज यांचा परिचय आहे. अलीकडे परराज्यात उद्योग विस्तारल्याने जोखीम टाळण्यासाठी स्वतः बाजारपेठ तयार करण्याचे गरजेचे असल्याचे मनोज सांगतात. त्यादृष्टीने नियोजन सुरू आहे.

मनोज कापसे ८८८८७७२२११

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT