Amol Deshmukh Agrowon
यशोगाथा

Zucchini Farming : ‘ए ग्रेड’ झुकिनीस मिळवली तगडी ओळख

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Success Story of Farmer : सांगली जिल्ह्यातील तासगाव या तालुक्याची द्राक्ष व बेदाण्यासाठी सातासमुद्रापार ओळख तयार झाली आहे. तालुक्यातील काही गावे दुष्काळाचा सामना करतात. परिस्थितीचे आव्हान स्वीकारून इथल्या शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा यशस्वी केल्या आहेत. तालुक्यातील खुजगाव गावातही द्राक्ष बागा पाहण्यास मिळतात.

सुमारे आठ वर्षांमागे टेंभू योजनेचे पाणी गावशिवारात फिरले. कोरडवाहू शेतांमधून हिरवाई फुलली. गावातील अमोल देशमुख हे युवा शेतकरी आहेत. वडील बाळासाहेब, आई सावित्री, पत्नी स्मिता, मुलगा शार्विल व बंधू मदन असे त्यांचे कुटुंब आहे. वडिलोपार्जित दोन एकर शेती आहे. पूर्वी पाण्याअभावी शेती पिकविणे मुश्कील झाले होते. शेतीवरच उदरनिर्वाह अवलंबून होता.

वेळप्रसंगी दुसऱ्यांच्या शेतात कामाला जावे लागायचे. अमोल यांनीही संघर्ष करीत एम.फार्मपर्यंतचे उच्चशिक्षण घेतले. पालघर भागात औषध निर्मिती कंपनीत काही काळ नोकरी केली. पण काही तांत्रिक कारणांमुळे नोकरी सोडून आपल्या शेतीतच लक्ष घालावे या मानसिकतेत ते आले. शेतीची सूत्रे हाती घेतल्यानंतर पाण्याची शाश्वती मिळवण्यासाठी ३० गुंठ्यांत शेततळे घेतले. बोअर घेतले.

व्यावसायिक पिकांचे प्रयोग

सुमारे ११ वर्षांपूर्वी अमोल कलिंगड, मिरची आदी पिकांकडे वळले. कृषी विभागाच्या मदतीने पॉलिहाउस उभारले. त्यात रंगीत ढोबळी मिरची घेण्यास सुरुवात झाली. विक्रीच्या निमित्ताने व्यापाऱ्यांच्या ओळखी झाल्या.

त्यातूनच व्यापाऱ्यांनी परदेशी (एक्झॉटिक) भाजीपाला असलेल्या झुकिनीचे पीक घेण्याबद्दल सुचवले. अभ्यासूवृत्तीच्या अमोल यांनी पिकाची मागणी, अर्थकारण तपासले. हा प्रयोग करून पाहण्याचे ठरवले.

झुकिनीची शेती

सन २०१६ मध्ये झुकिनीचा प्रयोग करण्याचे धाडस केले. अपुऱ्या अनुभवामुळे पहिले दोन हंगाम नुकसानीचे ठरले. पण निर्धार पक्का होता. चुका तसेच नुकसानीची कारणे लक्षात घेतली.
परदेशी भाज्यांची मागणी मर्यादित असते. त्यामुळे विविध ठिकाणच्या व्यापाऱ्यांशी संपर्क करून मागणी आणि दरांचा अंदाज घेण्यास सुरुवात केली.

त्यानुसार क्षेत्रनिश्‍चिती व हंगाम ठरवले. तिसरा हंगाम यशस्वी ठरला. दर चांगले मिळाले. मग मागे वळून न पाहता आठ वर्षांपासून या पिकात सातत्य ठेवले आहे. ए ग्रेड उत्पादनात हातखंडा तयार केला आहे.

व्यवस्थापनातील बाबी

मागणी व दर लक्षात घेऊन त्या त्या हंगामात एक एकर, अर्धा एकर ते १० गुंठे असे क्षेत्र.

पिवळी व हिरवी अशा दोन्ही प्रकारांतील झुकिनी.

सुमारे ७५ दिवस कालावधीचे पीक. वर्षातून घेतात दोन ते तीन हंगाम.

गादीवाफा पद्धत (बेड) व पॉली मल्चिंग पेपरचा वापर.

साडेचार बाय अडीच फूट अंतरावर लागवड.

शक्यतो घरीच रोपे तयार करतात. त्यातून दर्जा चांगला मिळतो. मर कमी होते.

वीस गुंठ्यांसाठी दोन हजार रोपे लागतात.

दुसरा हंगाम घेताना आधीच्या हंगामातील बेड, मल्चिंग पेपर यांचा वापर. त्यातून बेड तयार करणे व अन्य मिळून दुसऱ्या हंगामात किमान २० हजार ते ३० हजारांच्या खर्चात बचत होते. दर चांगला मिळाल्यास निव्वळ नफ्यात वाढ होते.

दर एक ते दोन वर्षांनी एकरी १२ ट्रॉली शेणखताचा वापर. हे खत पसरून दिल्यानंतर
रोटर वापरून बेड तयार केले जातात.

काढणी हंगाम सुरू झाल्यानंतर दररोज १०० ते १५० किलो उत्पादन. सुमारे ३० दिवस सुरू
राहते काढणी.

मजुरांची फारशी मदत न करता देशमुख दांपत्यच शेतीत राबते.

परदेशी भाज्यांमध्ये आईसबर्ग, सेलेरी आदींचेही घेतले अनुभव.

‘ए’ ग्रेड मालाला चांगला उठाव

मुंबई, गोवा, पुणे, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता या बाजारपेठांत अमोल यांची झुकिनी जाते. सध्या ८० टक्के व्यापाऱ्यांना दिला जातो. त्यास किलोला २० रुपयांपासून ४०, ५० रुपयांपर्यंत दर मिळतो.

सरासरी दर ३० रुपये मिळतो. वीस टक्के मालाची थेट स्थानिक ग्राहकांना विक्री होते.
आपला माल ‘ए ग्रेड’चा असल्याने व्यापाऱ्यांकडून आगाऊ मागणी असते. अन्य कोणत्याही झुकिनीपेक्षा आपल्याच मालाला पहला उठाव होतो असे अमोल सांगतात.

‘सोशल मीडिया’चा वापर करून पिकाची छायाचित्रे, दर असा उल्लेख करून आपली झुकिनी त्यांनी ग्राहकांत लोकप्रिय केली आहे. त्यांचे नेहमीचे ग्राहक तयार झाले आहे. तारांकित हॉटेल्सला मुख्यतः झुकिनीला मागणी असते. पुढील काळात २० टक्के माल व्यापाऱ्यांना तर ८० टक्के माल थेट ग्राहकांना देण्याचे अमोल यांचे उद्दिष्ट आहे.

मालाची गुणवत्ता कशी जपली?

पीक व्यवस्थापन ठेवले काटेकोर.

झुकिनीची चांगल्या प्रकारे प्रतवारी केली जाते. त्यातून व्यापाऱ्यांच्या ती चांगली नजरेस भरते.

हातमोजे घालून तसेच चाकूचा वापर करून तोडणी होते.

तोडणीनंतर छोट्या गाड्यांमध्ये क्रेट ठेवून ती शेताबाहेर नेली जाते. जेणे करून नेण्यामध्ये

‘व्हायब्रेशन’ न होता झुकिनी एकमेकांवर घासली जात नाहीत. त्यावर डाग किंवा ‘स्क्रॅचेस’ येत नाहीत.

अमोल देशमुख, ९९८७६०७२७३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT