Millet Processing Agrowon
यशोगाथा

Millet Processing : तृणधान्य प्रक्रियेतून तयार झाली 'ती'ची उत्तम ओळख...

कोल्हापूर शहरातील राजश्री प्रल्हाद सावंत यांनी नावीन्यपूर्ण पदार्थ तयार करण्याच्या इच्छेतून पाककलेला व्यावसायिकतेचे स्वरूप दिले. तृणधान्यापासून चॉकलेट, नूडल्स, पिझ्झा, मोमोज निर्मिती आणि विक्रीतून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख तयार केली.

Raj Chougule

Success Story : कोल्हापुरातील राजश्री प्रल्हाद सावंत अल्पशिक्षित असल्या तरी त्यांच्या पाककलेतील निपुणतेला शिक्षण आडवे आले नाही. त्यांचे पती स्थानिक हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करतात. राजश्रीताईंना असणारी पाककलेची आवड स्वस्‍थ बसू देत नव्हती.

त्यांचा कोल्हापुरातील स्वयंसिद्धा संस्थेशी संपर्क आला. कांचनताई परुळेकर यांनी राजश्रीताईंना प्रक्रिया उद्योगासाठी प्रोत्‍साहन दिले. सुरुवातीच्या काळात त्यांनी मलई बर्फी, पेढे, लस्सी, रसगुल्ले, गुलाबजाम आदी पदार्थ तयार केले.

या पदार्थांना स्वयंसिद्धा संस्थेच्या स्टॉलवर ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी मिळाली. यातून त्यांना आत्मविश्‍वास आला. कोणतीही यंत्रसामग्री न वापरता घरगुती स्वरूपातच त्यांनी दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती केली. विविध कृषी प्रदर्शनांच्या माध्यमातून या पदार्थांना चांगली बाजारपेठ तयार झाली.

तृणधान्यापासून पिझ्झा, बर्गर, नूडल्स...

दुग्धजन्य पदार्थानंतर राजश्रीताईंनी पौष्टिक तृणधान्यांवर आधारित खाद्यपदार्थ तयार करण्यास सुरुवात केली. नाचणी, बाजरी, ज्वारी, वरी, राळा, राजगिऱ्यापासून विविध पदार्थ तयार करतात. तृणधान्य पदार्थांपासून भाकरी, आंबिल असे मर्यादित स्वरूप न ठेवता ग्राहकांना जे पदार्थ आवडतात, अशा पदार्थांच्या निर्मितीवर भर दिला.

शहरी ग्राहकांकडून पिझ्झा, बर्गर, नूडल्सची मागणी असते, हे लक्षात घेऊन राजश्रीताईंनी हे सर्व पदार्थ तृणधान्यांपासून बनवले. बाजरी नूडल्स, मोमोज, सूप याबरोबरच ज्वारी, बाजरी, नाचणीचे चॉकलेट तयार केले. या पदार्थांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

सध्या अपायकारक, तब्येत बिघडवणारे पदार्थ मुलांना आवडू लागले आहेत. याच पदार्थांना पारंपरिक टच दिला तर हे पौष्टिक घटक नक्कीच मुलांच्या पोटात जातील, असा विचार त्यांनी केला. अशा प्रयोगातून अनेक घरगुती ग्राहक त्यांच्याशी जोडले गेले.

तृणधान्याचे चॉकलेट

नाचणी, बाजरी, ज्वारीचे चॉकलेट्स ही राजश्रीताईंची खासियत आहे. विक्री होणाऱ्या पदार्थांमध्ये या चॉकलेटला मागणी सर्वाधिक आहे. दहा ग्रॅमचे एक चॉकलेट दहा रुपये या दराने विकले जाते.

तृणधान्याचे पीठ तयार करून दूध, गुळाचा वापर करून चॉकलेट तयार केली जातात. यासाठी खास साचा तयार केला आहे. जशी मागणी येईल त्या प्रमाणात चॉकलेट तयार केली जातात. परदेशी जाताना ग्राहक त्यांच्याकडून चॉकलेट घेऊन जातात.

खाद्य पदार्थांमध्ये जपले नावीन्य...

जे पदार्थ बाजारात उपलब्ध होणार नाहीत असे वैविध्यपूर्ण पदार्थ तयार करण्याकडे राजश्रीताईंचा कल आहे. स्वतःच्या मेहनतीतून त्या नवनवीन पदार्थ शिकतात.

वेगळेपण जपण्याच्या विचारातूनच त्यांनी नाचणीची पुरणपोळी, नाचणीचे सूप, बाजरीचा पुलाव, ज्वारीचा पुलाव, नाचणीचे कोल्ड्रिंक्स, आइस्क्रीम, सोलकढी आदी नावीन्यपूर्ण पदार्थ तयार केले आहेत. या पदार्थांचा एक वेगळा ग्राहक तयार झाला आणि तो कायमचा जोडला गेला आहे.

पदार्थांची किंमत सर्वसामान्यांना परवडेल इतकीच ठेवली आहे. ग्राहकांकडूनही त्याला चांगला प्रतिसाद आहे. कल्पकतेतून पदार्थ निर्मिती हे त्यांच्या व्यवसायाचे उद्दिष्ट आहे.

सणासुदीला खास पदार्थ

प्रत्येक सणाला वेगवेगळे पदार्थ तयार करण्यासाठी राजश्रीताईंचा प्रयत्न असतो. दिवाळीला मोतीचूर लाडू, तुपातील लाडू, संक्रातीला बाजरी चॉकलेट, खजूर आणि तिळाची रेवडी, गुढीपाडव्याला गुढीसाठी गुळाची माळ असे वेगवेगळे पदार्थ त्या तयार करतात.

पूजेसाठी त्यांनी खास नैवेद्य ताट बनवले आहे. पूजा किंवा पुरणपोळीचे जेवण असेल तर त्यासाठी खास ताटाचे पॅकेज तयार केले आहे. या ताटामध्ये मागणीनुसार पुरणपोळी, बटाटा भाजी, आमटी, सांडगे, पापड तसेच अन्य कोणते पदार्थ असतील ते ताटाच्या सोबत दिले जातात.

ग्राहक गरजेनुसार ताटांची मागणी नोंदवितात. याशिवाय गणपतीला मलई मोदक, राइस बॉल, सँडविच वडा यासारखे नावीन्यपूर्ण पदार्थही त्या तयार करतात. शाकाहारी पदार्थ बरोबर मांसाहारी जेवणाची ऑर्डर त्या घेतात.

सोशल मीडियाचा वापर

राजश्रीताईंनी ग्राहकांचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला आहे. होलसेल दुकानदार, शॉपी या नियमित ग्राहकांशिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून पदार्थ विक्रीवर त्यांचा भर आहे. जो पदार्थ तयार करणार असतात, त्याची माहिती सोशल मीडियावर आदल्या दिवशी दिली जाते.

सुमारे ५०० ग्राहकांचा हा व्हॉट्सॲप ग्रुप आहे. पदार्थांची माहिती दिल्यानंतर ग्राहक मागणी नोंदवितात. त्याची नोंद घेऊन त्या पदार्थ तयार करतात. जे ग्राहक कोल्हापूर सोडून बाहेरगावी आहेत, त्यांना कुरिअरने पदार्थ पाठवले जातात.

तृणधान्यांची शेतकऱ्यांकडून खरेदी

ज्वारी, बाजरी, नाचणीची जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून आवश्यकतेनुसार खरेदी केली जाते. त्यांना बाजारभावाप्रमाणे दर दिला जातो. राजश्रीताईंचा प्रशिक्षणाच्या निमित्ताने विविध गावांतील शेतकऱ्यांशी संपर्क आला.

यामुळे कोणत्या शेतकऱ्याकडे बाजरी, नाचणी आहे हे त्यांना माहिती असते. आवश्यकतेनुसार त्या धान्य खरेदी करतात. शेतकऱ्यांनाही अपेक्षित दर मिळाल्याने फायदा होतो. एकावेळी पन्नास किलोपर्यंत धान्य खरेदी केले जाते.

घरच्यांची साथ मोलाची...

राजश्रीताईंकडे पदार्थ तयार करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. सर्व पदार्थ घरीच तयार केले जातात. पदार्थांच्या विक्रीतून वर्षाला पाच लाखांची उलाढाल होते. यातून खर्च वजा जाता सुमारे वीस टक्क्यांहून अधिक नफा मिळतो. पदार्थ तयार करण्यासाठी आई नलिनी, पती प्रल्हाद, भाऊ संदीप, मुलगा निसर्ग आणि मुलगी पौर्णिमा यांची साथ असते.

स्वयंसिद्धा संस्थेबरोबरच राजश्रीताई आत्मा आणि कृषी विभागाशी जोडलेल्या आहेत. या माध्यमातून शेतकरी महिलांना दूध प्रक्रिया, तृणधान्य प्रक्रियेचे प्रशिक्षण देतात. आजपर्यंत १५० हून अधिक शेतकरी महिलांना त्यांनी प्रशिक्षण दिले आहे. राजश्रीताईंना शासनाचा ‘आदर्श उद्योजिका‘ आणि स्वयंसिद्धाचा ‘यशस्वी उद्योजिका’ पुरस्कार मिळाला आहे.

शेळीपालनाचीही साथ...

विविध पदार्थ निर्मिती बरोबरच त्यांनी घरा शेजारच्याच मोकळ्या जागेत बीटल्स जातीच्या १२ शेळ्यांचे संगोपन केले आहे. वर्षाला किमान दोन शेळ्यांची विक्री होते, यातूनही त्यांना अर्थप्राप्ती होते. खाद्य पदार्थ निर्मिती बरोबरच शेळ्यांचे संगोपनही त्या कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने करतात.

संपर्क : राजश्री सावंत, ९२८४५८८९१८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT