Rain Forecast Agrowon
हवामान

Rain Forecast : राज्यात सरासरीच्या ९९ टक्के पाऊस

Monsoon Update : डॉ. साबळे यांच्या स्थानिक ठिकाणच्या पाऊस अंदाज मॉडेलनुसार संबंधित ठिकाणचे गेल्या ३० वर्षांचे हवामान आणि कृषी विद्यापीठांच्या हवामान केंद्रांनी नोंदविलेली यंदाची हवामान घटक स्थिती विचारात घेण्यात आली आहे.

अमोल कुटे

Pune News : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून (मॉन्सून) जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा राज्यात सरासरीच्या ९९ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तविला आहे. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक तफावत राहण्याची शक्यता आहे.

डॉ. साबळे यांच्या स्थानिक ठिकाणच्या पाऊस अंदाज मॉडेलनुसार संबंधित ठिकाणचे गेल्या ३० वर्षांचे हवामान आणि कृषी विद्यापीठांच्या हवामान केंद्रांनी नोंदविलेली यंदाची हवामान घटक स्थिती विचारात घेण्यात आली आहे. सन २०२४ मधील उन्हाळी हंगामातील ठराविक कालावधीचे कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग आणि सूर्य प्रकाशाचा कालावधी आदी घटकांच्या नोंदीवर हा अंदाज आधारित आहे.

डॉ. साबळे म्हणाले, ‘‘राज्यातील पूर्व विदर्भ, कोकण वगळता बहुतांश विभागात यंदा सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडणार असून, काही भागात, काही कालावधीत जोराचे पाऊस होणे शक्य आहे. महाराष्ट्राच्या दुष्काळी पट्ट्याच्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांत तेथील सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचे संकेत आहेत.

वाऱ्याचा वेग कमी आढळल्याने जून, जुलैमध्ये धुळे, राहुरी, अकोला, पोडेगाव, सिंदेवाही, पुणे, कोल्हापूर येथे पावसात मोठे खंड पडतील. तर दापोली, नागपूर, निफाड, सोलापूर, जळगाव व परभणी येथे खंडाचा कालावधी कमी राहण्याची शक्यता आहे.’’

‘‘मॉन्सूनचे आगमन कोकणात ६ जूनपर्यंत होईल. १५ जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल. यंदा पावसाच्या वितरणातील फरकाबरोबरच पावसात पडणारे खंड आणि कमी कालावधीमध्ये अधिक पाऊस ही या हंगामातील मुख्य वैशिष्ट्य ठरणार आहेत. बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही सागरातील शाखा यंदा सक्रिय राहतील,’’ असे डॉ. साबळे यांनी सांगितले.

...असे करा पीक नियोजन!

- पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज असलेल्या भागातील शेतकऱ्यांनी पीक नियोजन करताना काळजी घ्यावी.

- मॉन्सूनच्या आशेवर धुळवाफेची पेरणी करू नये. जमिनीत पुरेसा (६५ मिमी) ओलावा असल्याशिवाय पेरणी करू नये.

- १५ जुलैपर्यंत कमी पाण्यावरील व वाढीच्या काळात कमी पाणी लागणारी पिके उदा- मूग, मटकी, उडीद, चवळी, घेवडा, कारळा, बाजरी, सोयाबीन, तीळ तसेच त्यानंतरच्या पेरणीसाठी सोयाबीन, सूर्यफूल पिकाचा अवलंब करावा.

- पावसाच्या स्थितीनुसार पीक पद्धतीत बदलण्यासाठी सोयाबीन, मका, ज्वारी व तूर ही पिके महत्त्वाची राहतील. बाजरी व तूर दोनास एक आंतरपीक पद्धती अवलंबावी.

- पाणी साठवणुकीवर भर द्यावा. पाच किंवा सहा ओळीनंतर एक सरी पाडून त्यात पावसाचे पाणी मुरेल, यासाठी उतारास आडवी पेरणी करावी.

- सोयाबीनची रुंद वरंबा आणि सरी पद्धतीने लागवड करणे फायदेशीर राहील.

- मुख्य पिकाबरोबरच अंतर पीक पद्धतीवर भर द्यावा, कपाशीच्या कमी कालावधीच्या जातीची लागवड करावी.

- पिके काढणी पावसात उघडीप असताना करून त्याची मळणी करणे व माल सुरक्षित स्थळी हलविणे गरजेचे राहील.

- कोकण व पूर्व विदर्भात भात रोपांच्या रोपवाटिका तयार कराव्यात. त्यामुळे पावसाच्या आगमनानुसार भात रोपांची लागवड करणे शक्य होईल. तसेच लागवडीच्या वेळी योग्य वयाचे रोप मिळेल.

- कोकणात बासमती वाणांची निवड करावी. या वाणांच्या अधिक बाजार भावांचा लाभ घेता येईल.

- रब्बीत कमी पाण्यावर येणाऱ्या रब्बी ज्वारी, करडई, हरभरा पिकांवर भर द्यावा.

मॉन्सून हंगामातील (जून ते सप्टेंबर) पाऊस :

ठिकाण---सरासरी (मिमी)---अंदाज (मिमी)---टक्केवारी (+/- ५ टक्के)

अकोला---६८३---६७१---९८

नागपूर---९५८---९३३---९७

यवतमाळ---८८२---८८२---१००

सिंदेवाही(चंद्रपूर)---११९१---१२२६---१०३

परभणी---८१५---७८८---९७

दापोली---३३३९---३५४०---१०६

निफाड(नाशिक)---४३२---४४६---१०३

धुळे---४८१---४५६---९५

जळगाव---६४०---६०८---९५

कोल्हापूर---७०६---६७४---९५

कराड (सातारा)---६५०---६३०---९७

पाडेगाव (सातारा)---३६०---३३२---९५

सोलापूर---५४३---५००---९५

राहुरी---४०६---४०३---९९

पुणे---५६६---५६६---१००

उन्हाळी हंगामात ४ मार्च ते २० मे या कालावधीत सूर्य प्रकाशाचा कालावधी, कमाल तापमान, वाऱ्याचा वेग सरासरीपेक्षा कमी राहिल्याने जून, जुलै पावसात खंड पडतील. मात्र ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पाऊस वाढेल. विभागानुसारच्या अंदाजात जिल्हावार आणि तालुकानिहाय फरक पडणे शक्य आहे. यंदाचे वर्ष कोकणासाठी सावधानतेचे आहे. कोकणात दरडी कोसळणे, अतिवृष्टी, पूर येणे संभव आहे.
- डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT