डॉ. धीरज कदम, डॉ. विवेक सवडे
Integrated Pest Management: कृषी क्षेत्रात कीड नियंत्रण हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. अयोग्य कीड व्यवस्थापनामुळे पीक उत्पादनात घट येऊन मोठे आर्थिक नुकसान होते. विविध किडींच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर केला जातो. परंतु या कीटकनाशकांचे अंश माती, पाणी आणि पीक उत्पादनामध्ये शिल्लक राहतात. त्यामुळे मानवी आरोग्य आणि पर्यावरणास धोका निर्माण होतो.
यासाठी एकात्मिक कीड नियंत्रण पद्धती फायदेशीर ठरते. एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीमध्ये जैविक, भौतिक, यांत्रिक आणि रासायनिक पद्धतींचा समावेश होतो. या पद्धतीमध्ये केवळ रासायनिक कीटकनाशकांवर अवलंबून राहण्याऐवजी निसर्गपूरक आणि विज्ञानाधारित उपायांचा अवलंब केला जातो.
शेतीमध्ये नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रभावी कीड नियंत्रण करणे शक्य होते. एआय आधारित तंत्रज्ञानाच्या मदतीने कीटकनाशकांचा योग्य आणि संतुलित वापर करता येतो. त्यामुळे पीक उत्पादनामध्ये रासायनिक अंश शिल्लक राहण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळते.
कीडनाशक अंशाचे परिणाम
अति प्रमाणात रासायनिक कीटकनाशकांचा वापर केल्यामुळे त्याचे पीक उत्पादन, माती आणि पाण्यात अंश शिल्लक राहतात. त्याचे मानवी आरोग्य आणि पर्यावरणावर परिणाम होतात.
कीटकनाशकांचे अंश दीर्घकाळ अन्नधान्यात राहिल्यास मज्जासंस्थेचे विकार, प्रजनन समस्या आणि शारीरिक दुर्बलता निर्माण होण्याची शक्यता असते.
पर्यावरणीय धोका
माती आणि जलप्रदूषणात वाढ होते. तसेच जैवविविधतेला देखील धोका निर्माण होतो.
मधमाश्यांसारखे उपयुक्त मित्रकीटकांवर परिणाम होतो.
निर्यातीवर परिणाम
पीक उत्पादनामध्ये कीटकनाशकांचा अधिक प्रमाणात वापर केल्यास त्याचे अंश उत्पादनामध्ये शिल्लक राहतात. असे उत्पादन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यातीवेळी नाकारले जाते.
‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित कीड नियंत्रण
ड्रोन आणि सेन्सरद्वारे निरीक्षण
ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग करून पिकांचे नियमित निरिक्षण करता येते. कीडग्रस्त क्षेत्र ओळखण्यासाठी थर्मल इमेजिंग आणि मल्टिस्पेक्ट्रल कॅमेऱ्यांचा वापर केला जातो.
मशिन लर्निंग आणि डेटा अॅनालिटिक्स
(माहिती विश्लेषण)
ड्रोन आणि उपग्रहाद्वारे मिळणारी माहिती आणि ‘एआय’ च्या मदतीने हवामान अंदाज, मातीचे आरोग्य, कीड प्रादुर्भावाचा अंदाज लावणे शक्य होते. या माध्यमातून मागील काही हंगामातील माहिती संकलित केली जाते. उपलब्ध माहितीच्या अनुषंगाने ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित मोबाईल ॲपद्वारे किडींची ओळख आणि नियंत्रणासाठी उपाय सुचविले जातात. त्यामुळे कीड नियंत्रण अधिक सोपे होते.
प्रादुर्भावाच्या ठिकाणी फवारणी
‘एआय’ आधारित फवारणी तंत्रज्ञानाच्या मदतीने पीक लागवड क्षेत्रामध्ये केवळ किडीचा प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी अचूक फवारणी करणे शक्य होते. त्यामुळे रासायनिक कीटकनाशकांचा अतिवापर टाळला जातो.
उदाहरणे :
भारतीय कृषी संशोधन परिषदे अंतर्गत (आयसीएआर) ‘एआय’ आधारित कीड व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या प्रकल्पांमध्ये ‘एआय’ आधारित तंत्रज्ञानाचा उपयोग करून कापूस आणि ऊस या पिकांवरील कीड नियंत्रण प्रभावीपणे केले जात आहे.
अमेरिकेतील कृषी क्षेत्रातील एका कंपनीने विशिष्ट तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने एकूण पीक लागवडीपैकी केवळ आवश्यक त्या ठिकाणी रासायनिक फवारणी केली जाते. त्यामुळे प्रभावी कीड नियंत्रणासह फवारणीवरील अतिरिक्त खर्च आणि प्रदूषण दोन्ही कमी होण्यास मदत होते
एआय आधारित कीटक सापळे
(स्मार्ट ट्रॅपिंग सिस्टम)
स्मार्ट फेरोमोन सापळे (कामगंध सापळे) हे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. हे सापळे प्रत्येक किडीची ओळख पटवून संकलित माहितीच्या आधारे विशिष्ट कीटकांच्या फेरोमोनचा वापर करून किडींना आकर्षित करतात.
हे सापळे किडींच्या हालचालींचे निरीक्षण, नोंद आणि विश्लेषण करण्यास सक्षम असतात. पारंपरिक फेरोमोन सापळ्यांपेक्षा हे अधिक अचूक असून यामध्ये सतत माहितीचे संकलन होते. त्यामुळे प्रभावी कीड नियंत्रण होण्यास मदत मिळते.
आयओटी तंत्रज्ञान आणि माहिती विश्लेषणातून
कीड नियंत्रण
आयओटी सेन्सरद्वारे मातीतील आर्द्रता, तापमान आणि किडींच्या उपस्थितीची सतत माहिती घेतली जाते. उपलब्ध माहितीचे एआय आधारित तंत्रज्ञानाच्या मदतीने विश्लेषण केले जाते. आधी संकलित केलेली माहिती आणि नुकतीच संकलित केलेली माहिती यांचे विश्लेषण करून त्यानुसार कीड नियंत्रणासाठी उपाय सुचविले जातात.
कीड ओळखीसाठी मोबाइल ॲप
विविध शेतीविषयक मोबाइल ॲप उपलब्ध आहेत. त्यापैकी काही ॲपमध्ये ‘एआय’ च्या मदतीने स्थानिक भाषेत बोलून कीड व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन करतात. मोबाइल ॲपच्या मदतीने थेट मोबाइलमध्येच किडीच्या प्रादुर्भावाविषयी माहिती दिली जाते.
बहुतांश वेळा किडीची योग्य ओळख न पटल्यामुळे प्रभावी कीड नियंत्रण करणे शक्य होत नाही. त्यासाठी ‘एआय’ आधारित मोबाइल ॲप फायदेशीर ठरतात. ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित मोबाईल अॅपमध्ये किडीचे छायाचित्र काढून ते ॲपमध्ये अपलोड केल्यानंतर त्वरित माहिती मिळते.
विशिष्ट ठिकाणी आढळणाऱ्या किडींची माहिती ॲपद्वारे संकलित केली जाते. जेणेकरून परिसरातील इतर शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा मिळतो.
किडीच्या प्रादुर्भावानुसार ॲपमधून कीड नियंत्रणासाठी उपाय सुचविले जातात. त्यामुळे रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळून पर्यावरणपूरक उपायांची निवड करणे सोपे होते.
एखाद्या भागात एखाद्या विशिष्ट किडीचा प्रादुर्भाव वारंवार प्रत्येक हंगामात दिसत असेल तर अशी माहिती संकलित केली जाऊन त्याविषयी योग्य अंदाज व धोरणे तयार करणे शक्य होईल.
किडीची त्वरित ओळख पटल्यामुळे वेळेवर उपाययोजना करणे शक्य होते. त्यामुळे संभाव्य पीक नुकसान टाळता येते.
- डॉ. धीरज कदम, ९४२१६ २१९१० (कीटकशास्त्रज्ञ, संचालक, विस्तार शिक्षण व साधन सामग्री विकास कृषी परिषद, पुणे)
- डॉ. विवेक सवडे, ९६७३११३३८३(कीटकशास्त्रज्ञ, खासगी कंपनीमध्ये वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.