
अमोल ढोरमारे, डॉ. श्रीराम शिंदे
Traditional and Environmentally Friendly Solutions: सामान्यतः शेतकरी पीक संरक्षणासाठी केवळ रासायनिक घटकांची फवारणी या एकाच मुद्द्यावर अधिक भर देतात. त्यातून पिकामध्ये विषारी अवशेष राहण्याची भीती असते. तसेच सातत्याने वापरल्या जाणाऱ्या कीडनाशकांसंबंधी किडींमध्ये प्रतिकारशक्ती विकसित होण्याचा धोका असतो. त्या ऐवजी मशागतीपासून काढणीपर्यंत वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करणे म्हणजेच एकात्मिक कीड व्यवस्थापन होय.
या पद्धतीमध्ये निसर्गाला समजून घेत त्याच्या मदतीने किडींची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्या खाली ठेवली जाते. यामुळे पर्यावरणाचा समतोल साधला जातो. कीडनाशकांचा वापर कमीत कमी होतो. एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये मशागतीय, भौतिक, रासायनिक, जैविक, आनुवंशिक पर्यावरण पद्धतींचा वापर केला जातो. त्यातील मशागतीय कीड नियंत्रण पद्धतीमधील महत्त्वाच्या घटकांची माहिती आपण घेऊ.
यामध्ये कीड आल्यानंतर उपचार करण्यापेक्षा कीड शेतामध्ये येऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक आणि खबरदारीचा मार्ग वापरले जातात. परिसरातील शेतकऱ्यांनी सामुदायिकपणे मोठ्या क्षेत्रावर मशागतीय कीड नियंत्रण पद्धतीचा वापर केल्यास पिकांवरील किडींच्या प्रादुर्भावाच्या शक्यता कमी होतात. त्यामुळे पीक संरक्षणाच्या खर्चात मोठी बचत साधते.
एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये उन्हाळ्यात खोलवर नांगरणी करणे या बाबीला खूप महत्त्वाचे स्थान आहे. कारण बहुतांश किडीचे कोष आणि सुप्तावस्था या जमिनीत ५ ते १० सेंमी खोलीपर्यंत लपलेल्या असतात. खोलवर नांगरणी केलेल्या नांगरणीमुळे या अवस्था जमिनीवर उन्हात उघड्या पडतात. प्रखर सूर्यप्रकाशामुळे नष्ट होतात. निसर्गातील पक्षी, पाळिव कोंबड्या, बदके, कुत्री, मांजरे यासारखे खे किटकभक्षी सजीव त्यांना खातात. त्यामुळे त्यांची संख्या कमी होते.
उदा. या पद्धतीने घाटे अळीची कोषावस्था, टोमॅटोवरील फळे पोखरणाऱ्या अळीची कोषावस्था, विविध फळपिकातील फळमाशीची कोषावस्था उन्हामध्ये येऊन नष्ट होतात.
ज्या शेतात गोगलगायीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो, अशा शेतात खोलवर नांगरणीमुळे प्रादुर्भाव कमी राहण्यास मदत होते. सिताफळातील पिठ्या ढेकूण किडींची मादी मे-जून महिन्यात ३०० ते ४०० अंडी असलेले अंडीपुज झाडाच्या अवतीभवती जमिनीत घालते. या भागामथ्ये उन्हाळ्यात खोलवर नांगरणी केल्यानेही पिठ्या ढेकणाचा संभाव्य प्रादुर्भाव कमी राहण्यास मदत होते.
मोसंबी बागेतील तण गुळवेल व वासनवेल या वनस्पती मुळासकट नष्ट कराव्यात. कारण त्यामुळे रस शोषणाऱ्या पतंगाच्या अळीसाठी पर्यायी खाद्य उपलब्ध होते. हळद लागवडीपूर्वी शेताची खोलवर नांगरणी करून त्यानंतर कमीत कमी ३० दिवसांपर्यंत सूर्यप्रकाशात तापू द्यावी. शक्य असलेल्या हलके पाणी देऊन प्लॅस्टिकने जमीन झाकून ठेवल्यास मातीचे चांगल्या प्रकारे निर्जंतुकीकरण होते. यामुळे सूत्रकृमींचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.
उन्हाळ्यात कुजलेले शेणखत टाकत असताना मेटारायझिम ॲनिसोप्ली ही जैविक बुरशी एक किलो प्रति टन शेणखतात मिसळावे. म्हणजे मातीतील किडीपासून पिकांना संरक्षण मिळेल. उदा. हुमणी अळी, रोप कुरतडणारी अळी इ. शेतातील मागील पिकांचे शिल्लक अवशेष नष्ट करावेत. उदा. कापूस पिकाच्या खाली पडलेल्या बोंडातील सरकीमधे गुलाबी बोंड अळी सुप्तवस्थेत राहू शकते. त्यांचा पुढील हंगामामध्ये प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे असे अवशेष गोळा करून नष्ट करावेत.
उन्हाळ्यात म्हणजे मे किंवा जून महिन्यांत शेतात प्रकाश सापळा लावावा. त्यासाठी शक्य असल्यास विजेचा बल्ब किंवा पेट्रोमॅक्सचे दिवा लटकून ठेवावा. त्याखाली एका टबमध्ये रॉकेलमिश्रित पाणी किंवा किटकनाशक मिश्रित पाणी ठेवावे. प्रकाशाकडे आकर्षित होणारे वेगवेगळ्या प्रजातीचे पतंग, भुंगे या पाण्यात पडून मरतात. उदा. हूमणी प्रौढ भुंगेरे, विविध किडीचे पतंग इ.
उन्हाळ्यात शेतामध्ये व जिनिंग परिसरात गुलाबी बोंड अळीसाठी कामगंध सापळ्यांचा वापर करावा. म्हणजे त्यात मोठ्या प्रमाणावर पतंग अडकून त्यांचा प्रादुर्भाव कमी होईल. उन्हाळ्यात बांध स्वच्छ करून घ्यावेत. या बांधावरील गवतांमध्ये नाकतोडे अंडी घालतात. त्यांची पिले पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात.
ऊस शेतातील, बांधावरील वाळवीची वारुळे खोदून वाळवीच्या राणीसह नष्ट करावीत. म्हणजे उसात वाळवीचा प्रादुर्भाव कमी होईल.विविध पिकांतील सूत्रकृमीच्या व्यवस्थापनाकरिता जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा पावडर एकरी २ किलो प्रति २५० किलो कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून वापरावी.
- अमोल ढोरमारे, ९६०४८३३७१५
- डॉ. श्रीराम शिंदे, ७५८८०८२०३४
(सहायक प्राध्यापक, कृषि कीटकशास्त्र विभाग, सौ. के. एस. के (काकू) कृषी महाविद्यालय, बीड)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.