Paddy Farming Agrowon
टेक्नोवन

Paddy Harvesting : भात पीक कापणीची साधने

Paddy Farming : शेतांचा प्रकार, आकार आणि पिकांच्या प्रकारानुसार योग्य त्या कापणी साधनांची निवड करणे गरजेचे असते. या लेखामध्ये भात कापणीसाठी योग्य अशा साधनांची माहिती घेऊ.

डॉ. सचिन नलावडे

Paddy Farming Management : पिकांची कापणी करणे हे सर्वाधिक मनुष्यबळ लागणारे व वेळखाऊ काम आहे. एकूण पीक व्यवस्थापनात लागणाऱ्या मजुरांच्या सुमारे २५ टक्के मजूर कापणीमध्ये लागतात. आजही माणसांच्या साह्याने विळ्यासारख्या साधनाने बहुतांश अन्नधान्य पिकांची काढणी भारतामध्ये केली जाते. मात्र, हंगामाच्या अखेरीला सर्वांची काढणी साधारण एकाच काळात येत असल्यामुळे मजुरांची मोठी कमतरता भासते. दुबार किंवा बहूपीक पद्धतीमध्ये पहिल्या पिकाची काढणी करून पुढील पिकाची तयारी करण्याची गडबड सुरू होते. त्यामुळे पीक काढणी वेळेतच करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

जास्त मजुरी देऊनही वेळेवर मजूर मिळतील याची शाश्वती नसते. त्यामुळे अलीकडे शेतकरी कापणी आणि मळणीसाठी यांत्रिकीकरणाकडे वळू लागले आहेत. मोठ्या क्षेत्रावरील पिकांची काढणी करण्यासाठी कंबाइन हार्वेस्टर वापरले जात आहेत. त्याची सुरुवात पंजाबसारख्या शेतीतील प्रगतिशील राज्यापासून झाली असली तरी त्याचा कित्ता गिरवत आपल्याकडेही हार्वेस्टरचा वापर वाढला आहे.

देशभरामध्ये साधारणपणे ३००० स्वयंचलित अथवा ट्रॅक्टरचलित कंबाइन हार्वेस्टर विकले जात आहेत. मात्र आपल्याकडे बहुतांश शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. त्यांच्या लहान क्षेत्रांसाठी सुधारीत लहान अवजारे व पॉवर टिलरचलित कापणी यंत्रे उपयुक्त ठरू शकतात. कापणीनंतर मळणी यंत्राच्या साह्याने मळून धान्य वेगळे केले जाते.

कार्यक्षमता वाढविण्यासाठी आधुनिक व सुधारित अवजारे वापरणे गरजेचे आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठामध्ये अशा छोट्या अवजारांच्या निर्मितीसाठी प्रकल्प कार्यरत आहेत. त्यातून भरपूर चाचण्यांनंतर विकसित झालेली कार्यक्षम अशी अवजारे व कापणी साधने वापरणे अनेक दृष्टीने फायद्याचे ठरते.

सुधारित कापणी साधनांचे फायदे

कामांची कार्यक्षमता वाढते. पर्यायाने मजुरांचे कष्ट कमी होऊन वेळेमध्ये बचत होते.

काढणीवेळी पिकाचे नुकसान कमी होते. उत्पादने सुरक्षित आणि उच्च गुणवत्तेची मिळाल्यामुळे बाजारात चांगला दर मिळण्यास मदत होते.

इंधनचलित यंत्रांमुळे कामांचा वेग वाढून कमी वेळेत अधिक काम करता येते.

कापणी साधनांचे प्रकार

बाजारात अनेक प्रकारची कापणी साधने उपलब्ध आहेत, परंतु काही सर्वांत सामान्य साधनांमध्ये हे समाविष्ट आहे:

विळा : हे एक पारंपरिक काढणी साधन असून, त्याचा वापर तृणधान्य पिके, भाजीपाला, गवत यांच्या कापणीसाठी होतो.

कुदळ : हे बहुउद्देशीय साधन असून, माती खोदणीसाठी वापरले जाते. काही कंद पिके जमिनीतून काढण्यासाठी वेगवेगळ्या आकाराच्या कुदळी बाजारात उपलब्ध आहेत.

खुरपे : धान्य पिकांच्या कापणीसाठी खुरपे वापरतात. त्यावर एकसमान दातरे तयार केल्यामुळे कापणीच्या कार्यक्षमतेत वाढ होते.

योग्य कापणी साधन कसे निवडावे?

शेताचा प्रकार आणि आकारानुसार योग्य कापणी साधन निवडावे.

शेतात लागवड केलेले पीकही महत्त्वाचे आहे. उदा. धान्य पिकांसाठी कुदळीपेक्षा विळा अधिक उपयुक्त असेल.

कापणी साधनांची खरेदी करताना त्याची क्षमता व आपले आर्थिक बजेट यांचा विचार करावा. आपण गुंतवत असलेल्या किमतीसाठी सर्वोत्तम मूल्य देणारी साधने निवडावीत.

साधनांच्या नियमित देखभाल, दुरुस्ती आणि विक्रीपश्चात सेवेचा विचार करावा.

आधुनिक साधने ही विविध न गंजणारे धातू, उच्च दर्जाचे प्लॅस्टिक यांच्या वापरामुळे पूर्वीपेक्षा अधिक टिकाऊ बनत आहेत. त्यांच्या विकासासाठी उच्च दर्जाच्या अभियांत्रिकी मूल्यांचा वापर केलेला असल्याने कार्यक्षमतेमध्ये वाढ होते.

या लेखात आपण भात कापणीसाठी उपलब्ध अवजारे व यंत्रांची माहिती घेऊ.

कापणी योग्य झालेल्या भात पिकाची कापणी ही प्रामुख्याने मनुष्यबळाद्वारे विळ्याने केली जाते. अलीकडे मनुष्यबळाची कमतरता भासू लागल्यापासून ट्रॅक्टर किंवा पॉवर टिलरचलित रिपरचा वापर वाढू लागला आहे. मोठे सलग क्षेत्र असलेल्या ठिकाणी भात कापणीसाठी शेतकरी कम्बाईन हार्वेस्टरची निवड करू लागले आहेत.

कापणीदरम्यानची दक्षता

भात पिकाची कापणी जमिनीच्या अगदी जवळून करणे आवश्यक असते. त्यामुळे भात खाचरामध्ये खोडाचा कमी भाग राहून खोड किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. कापणी करतेवेळी भात पिकाची हाताळणी अत्यंत काळजीपूर्वक करावी लागते. भाताच्या लोंब्या आदळून त्यातील दाणे गळून पडणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागते.

कापणी यंत्रे (रिपर)

धान्य पिकांच्या कापणीसाठी स्वयंचलित, पॉवर टिलर अथवा ट्रॅक्टरचलित रिपर हे यंत्र वापरले जाते. या यंत्राद्वारे कापलेले पीक एक सलग ओळीत जमिनीवर टाकले जाते. त्यासोबत बाइंडर असल्यास पिकाच्या छोट्या-छोट्या पेंढ्या बांधून टाकल्या जातात.

कापणी यंत्रणा

रिपरमधील कापण्याचे काम करणारी सर्वात महत्त्वाची यंत्रणा असून, त्यावर अनेक धारदार दातेरी पाती बसवलेली असतात. एक लांब पट्टीवर ही त्रिकोणी आकाराची पाती रिव्हेटने घट्ट केली जातात. पॉवर टिलरची शक्ती पट्टा आणि पुलीचा वापर करून कापणी यंत्रणेपर्यत पोहचवली जाते. सर्व पाती एकाच वेळी क्रॅन्क आणि पीटमनच्या साह्याने आडवी पुढे-मागे हलवली जातात. या हालचालीमुळे आधारपट्टी आणि पाते यांच्यामध्ये रोपट्याचे खोड कापले जाते. कापलेले पीक ओळीत टाकण्यासाठी ते कापल्यानंतर एका उभ्या पत्र्याच्या फाळक्याला लागून एका बाजूला वाहून नेले जाते. हे काम करण्यासाठी दोन पट्टे सतत फिरते ठेवले जातात. या पट्ट्यांना पत्र्याचे किंवा प्लॅस्टिकचे कानपे लावलेले असतात. कापल्यानंतर पीक उभे राहून पट्ट्यासोबत आडवे सरकत एका कडेला घेऊन जाता यावे म्हणून तारेच्या लांब स्प्रिंगा लावलेल्या असतात.

रिपर (स्वयंचलित)

गहू आणि भाताचे तयार झालेले पीक कापून एका सरळ रेषेत टाकण्याचे काम यामुळे केले जाते. पॉवर टिलरच्या शक्तीवर चालत असून यासाठी ५ अश्वशक्तीच्या डिझेल इंजिनाची गरज भासते. या यंत्राच्या साह्याने ताशी ०.८० लिटर डिझेलमध्ये सुमारे ०.२ हेक्टर क्षेत्रावरील भात कापणी केली जाते.

ट्रॅक्टरचलित कापणी यंत्र (रिपर)

या यंत्रणेमध्ये रिपर हा ट्रॅक्टरच्या पुढे जोडलेला असतो. त्याला सामान्यतः ट्रॅक्टरच्या पी.टी.ओ. द्वारे शक्ती पुरविली जाते. पॉवर टिलर चलित यंत्राप्रमाणेच संरचना असणारे, परंतु आकाराने मोठे कापणी यंत्र (१.६ ते २.२ मीटर रूंद) ट्रॅक्टरच्या साहाय्याने चालविता येते. कापणी यंत्राच्या विविध यंत्रणांना ट्रॅक्टरच्या पी.टी.ओ. पासून शक्ती मिळते. त्यासाठी पीटीओ ते कापणी यंत्राचा गिअर बॉक्स यांच्यामध्ये एक लांब शाफ्ट जोडावा लागतो. कापणी यंत्र ट्रॅक्टरच्या पुढच्या बाजूला जोडण्यासाठी समांतर जोडणीचा वापर केला जातो. ही जोडणी खाली-वर करण्यासाठी वायर रोपने हायड्रॅालिक यंत्रणेशी जोडली जाते. जेणेकरून कापणी यंत्र वाहतूक करताना वर उचलता येईल. तसेच पीक कापणीची उंचीसुद्धा निश्चित करता येते. ट्रॅक्टरचलित कापणी यंत्राद्वारे एकाच वेळी २.२ मीटर लांबीचे क्षेत्र म्हणजेच ७ ते ९ ओळी कापत यंत्रणा पुढे सरकत जाते. त्यासाठी २५ ते ६५ अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरची आवश्यकता असते. या यंत्राचा वापर १.८ ते ४.५ कि.मी. प्रती तास वेगाने करता येतो. यासाठी ताशी ३ लिटर डिझेलची आवश्यकता असते. या यंत्रणेमुळे ६० ते ७० टक्के मनुष्यबळ वाचते. समतल जमीन आणिय व्यवस्थित उभे पीक असल्यास ताशी अर्धा ते एक एकर पिकाची कापणी वेगाने करून होते.

पॉवर टिलरचलित रिपर

या प्रकारच्या कापणी यंत्राची रुंदी १ ते १.६ मीटर असून, ते ३ ते १० अश्वशक्तीच्या पॉवर टिलरने चालवता येतो. या यंत्रामध्ये ओळीत लावलेले धान्य पीक कापण्यासाठी ओळी वेगवेगळ्या करण्यासाठी विभाजक असतात. पाइपच्या पुढील टोकावर बसवलेले विभाजक तिरकस पत्र्याचे बनवलेले असतात. त्यामुळे तिरके झालेले किंवा खाली झोपलेले पीकही उचलून कापण्यास मदत होते. या विभाजकांच्या खाली दातेरी चक्रे असतात. ती फिरणाऱ्या पट्ट्याच्या कानप्याला लागून गोल फिरतात. उभे असणारे पीक कापणी यंत्रणेकडे ढकलतात.

रिपर बाइंडर

(कापणी आणि बांधणी यंत्र)

एक किंवा दोन ओळींची कापणी करणारे हे स्वयंचलित यंत्र कापलेल्या पिकाच्या पेंढ्या बांधू शकते. त्यासाठी या यंत्रामध्ये दोरीला गाठ मारण्याची यंत्रणा असते. सर्वसाधारण रिपरप्रमाणेच कापण्याची यंत्रणा असते. पीक कापल्यानंतर साधारणतः एक फुटाचा परिघ असणाऱ्या पेंढ्या बांधल्या जातात. ४० सेंमी. रुंदीचे हे यंत्र ४.५ अश्वशक्तीच्या इंजिनने चालवले जाते. यांत्रिक पद्धतीने कापणी करण्यासाठी शेत आणि पिकांच्या संबंधी काही पूर्वअटी असतात. उदा.

शेत सपाट असावे.

पीक व्यवस्थित एका ओळीत असावे.

ते काढणीवेळी उभे व एकसमान उंचीचे असल्यास यंत्राचा वेग वाढतो.

लहान शेतांसाठी लहान रिपर आणि बाइंडरसाठी उपयोगी असून, त्यासाठी लागवड एका ओळीत आवश्यक आहे.

मोठ्या शेतामध्ये कापणी यंत्रे जास्त कार्यक्षम ठरतात.

भात कापणीपूर्वी काही दिवस तरी शेतातील पाणी नियंत्रित केलेले असावे. म्हणजे कापणीच्या वेळी शेत तुलनात्मकदृष्ट्या कोरडे राहून यंत्राचा वेग वाढतो.

वैभव विळा दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये विकसित केलेला दातेरी विळा आहे. विळ्याची मूठ आणि पाते यामध्ये विशिष्ट अंतर ठेवलेले असल्यामुळे हाताला इजा न होता भाताची अगदी जमिनीलगत कापणी करता येते. जमिनीलगत कापणी केल्यामुळे भविष्यातील वाढू शकणारा खोडकिडीचा प्रदुर्भाव टाळता येतो. विळ्याच्या दातेरी पात्यामुळे कमी ताकदीमध्ये भाताचे काड कापले जाते. विळ्याचे वजन केवळ १७५ ग्रॅम आहे. या विळ्याच्या साहाय्याने एक माणूस ताशी ०.०११ हेक्टर एवढ्या क्षेत्राची कापणी करू शकतो. डॉ. सचिन नलावडे, ९४२२३८२०४९ (प्रमुख, कृषी यंत्रे आणि शक्ती विभाग, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Export : निर्यातीचा पकडा ‘धागा’

Rabi Crop Demonstration : तेलबिया उत्पादनाचे रब्बीत १७,८०० हेक्टरवर पीक प्रात्यक्षिके

Distillery Project : आसवनी प्रकल्पांच्या पाण्याचे वर्गीकरण वादात

Malegaon Sugar Factory : ‘माळेगाव’चे १५ लाख टन ऊस गळिताचे उद्दिष्ट

Quality Control Department Issue : ‘गुणनियंत्रण’च्या बदल्यांसाठी समुपदेशन हाच एकमेव पर्याय

SCROLL FOR NEXT