Paddy Farming Management :
शेतकरी नियोजन पीक : भातशेती
शेतकरी : सुहास पुरुषोत्तम लिंगायत
गाव : राजवाडी ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी
भात क्षेत्र : एक एकर
पारंपरिक पद्धतीने राजवाडी येथे सुहास लिंगायत हे शेतकरी भात लागवड करतात. रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जास्तीत जास्त भात उत्पादन घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. गतवर्षी त्यांनी एक एकर क्षेत्रामधून सुमारे ६ क्विंटल भात उत्पादन घेतले आहे. रोपवाटिकेत पेरणी करण्यासाठी मागील वर्षी उत्पादित भाताचे दर्जेदार बियाणे वापरले जाते. त्यामुळे बियाणे खरेदीसाठी अतिरिक्त खर्च लागत नाही. शिवाय पुनर्लागवडीच्या कामांना मजूर लावले जात नाही. त्यामुळे मजुरी खर्चातही बचत होते. असे सुहास लिंगायत सांगतात.
मागील कामकाज :
पारंपरिक पद्धतीने मे महिन्यात भाजावळ करून घेतली. त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात बियाणे पेरणीची तयारी केली. पेरणीसाठी गतवर्षीच्या भात लागवडीतून राखून ठेवलेले दर्जेदार बियाणे रोपवाटिका तयार करण्यासाठी वापरले.
रोपवाटिकेसाठी पाच गुंठे जमिनीवर १२ किलो बियाणांची पेरणी केली. पेरणीपूर्वी चांगले कुजलेले शेणखत शेतात पसरून घेतले. कुजलेल्या शेणखतामुळे रासायनिक खतांचा वापर कमी होतो. तसेच रोपांची वाढ ही चांगली होते, असे लिंगायत यांनी सांगितले.
पेरणीनंतर २१ दिवसांनी रोपे पुनर्लागवडीसाठी तयार झाली.
लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीमध्ये नांगरणी करून घेतली. साधारण १ जुलैला पुनर्लागवडीला सुरुवात केली. दोन दिवसांमध्ये लागवड पूर्ण झाली.
रोप लागवडीवेळी एका आव्याला चार ते पाच काड्या वापरत पारंपारिक पद्धतीने लागवड केली. लावणीनंतर १५ किलो युरिया खताचा डोस दिला.
लागवडीनंतर एक महिन्याने ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भात लागवडीत उगवलेले गवत काढून घेतले. बांध तणमुक्त केले. कारण, बांधावर उगवलेली काही तणे ही विविध किडींसाठी यजमान म्हणून काम करतात. त्यासाठी वेळोवेळी बांध तणमुक्त आणि स्वच्छ करण्यावर भर दिला जातो.
पुनर्लागवडीनंतर भात खाचरात पाण्याची योग्य पातळी राखण्यावर भर देण्यात आला. अतिरिक्त पावसाचे पाणी त्वरित बाहेर काढण्यात आले.
लावणीनंतर काही दिवसातच मुसळधार पावसामुळे खाचरात जास्त पाणी साचून राहिले होते. त्यामुळे पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. रोगाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी शिफारशीप्रमाणे रासायनिक फवारणी घेतली.
आगामी नियोजन :
सध्या भात लागवडीत प्रत्येक रोपाला भरलेल्या लोंब्या दिसत आहेत. येत्या आठ दिवसांमध्ये पावसाचा अंदाज घेऊन भात कापणीच्या कामांना सुरुवात होईल.
भात लागवड क्षेत्राच्या आजूबाजूला जंगलाचा भाग आहे. भात शेतीत रानडुक्करांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. रानडुकरांपासून भात शेतीचे संरक्षण करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे उपाययोजना केल्या आहेत.
भात कापणीनंतर उन्हामध्ये सुकवून लगेच झोडणी केली जाईल.
झोडलेले भात सुकवून बांधून ठेवण्यात येईल. या भाताचा वापर घरगुती केला जातो.
सुहास लिंगायत, ८०१०११४२१५
(शब्दांकन : राजेश कळंबटे)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.