औरंगाबाद : भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत, (ICAR) केंद्रीय कापूस संशोधन संस्था, (Cotton Research Center) नागपूर आणि आयसीएआर-अटारी, पुणे यांच्याद्वारे कापूस पिकातील गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनासाठी (Cotton Pink Boll Worm Management) औरंगाबाद व बीड जिल्ह्यासाठी ‘‘किटकनाशक प्रतिकार व्यवस्थापन:गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन धोरणांचा प्रसार’’ हा प्रकल्प राबविला जातो आहे.
हा प्रकल्प भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूरचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद व नोडल अधिकारी म्हणून डॉ. चिन्नाबाबु नायक यांच्या मार्गदर्शनात कृषी विज्ञान केंद्र-१ औरंगाबाद व कृषी विज्ञान केंद्र खामगाव जि. बीड यांच्या मार्फत राबविण्यात येत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद तालुक्यातील पिंपळगाव व पांढरी तसेच बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील पाडळशिंगी व हिरापूर या चार गावाची प्रकल्पासाठी निवड केली गेली आहे.
चार गावातील ५० एकरावर हा प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पामधून गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येणार आहे. केव्हीके, औरंगाबादचे कार्यक्रम समन्वयक डॉ. किशोर झाडे व खामगावच्या प्रा. दीप्ती पाटगावकर या प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तर अनुक्रमे डॉ. बस्वराज पिसुरे व डॉ. भैय्यासाहेब गायकवाड हे सहप्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
कापूस पिकामध्ये गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी खूप मोठया प्रमाणात कीटकनाशकांचा वापर करण्यात येतो. त्यामुळे किडींमध्ये विविध प्रकारच्या किटकनाशकांप्रती प्रतिकारशक्ती निर्माण होत आहे. मित्रकिडींचा ऱ्हास मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे प्रयोग म्हणून हा प्रकल्प हाती घेण्यात आला असल्याची माहिती कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने देण्यात आली. दोन्ही कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
..असा राबविणार प्रकल्प
केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांच्याकडून देण्यात आलेले प्रजनन व्यत्यय तंत्रज्ञानावर आधारित गॉसील्युर ४ टक्के आरटीयु जेलचा वापर आणि कामगंध सापळ्यांचा वापर या तंत्रज्ञानात करण्यात येणार आहे. यामध्ये सलग २५ एकर क्षेत्रावर ४०० झाडांवर गॉसील्युर ४ टक्के आरटीयु जेल लावणे व त्यासोबत ५ एकर क्षेत्रामध्ये प्रति एकर दोन कामगंध सापळे लावणे तसेच या प्रयोगासोबत तुलना करण्यासाठी त्या क्षेत्रापासून कमीत कमी १० किलोमीटर अंतरावर पाच एकर क्षेत्रामध्ये प्रति एकर दोन सापळे याप्रमाणे दोन्ही क्षेत्रांवरील किडींच्या संख्यांची निरिक्षणे घेऊन तुलना करण्यात येणार आहे.
प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या प्रयोगातील निष्कर्ष भविष्यात गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.डॉ. बी. एल. पिसुरे, विषय विशेषज्ञ, विस्तार शिक्षण, केव्हीके औरंगाबाद
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.