Agriculture Mechanization Agrowon
टेक्नोवन

Agriculture Mechanization : विदर्भात पीक काढणीपश्‍चात यांत्रिकीकरणाला चालना

Post Harvest Mechanization : तीव्र मजूरटंचाई व त्यांचे वाढलेले दर ही गंभीर समस्या लक्षात घेऊन विदर्भात मशागत, पेरणीपासून ते काढणीपर्यंत यांत्रिकीकरणाला मोठी चालना मिळाली आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Cost Saving Farming Technology : पूर्व विदर्भातील दुर्गम, नक्षलप्रवण आणि धान (भात) उत्पादक जिल्हा म्हणून गडचिरोली ओळखला जातो. जिल्ह्यात सुमारे एक लाख हेक्‍टरवर धान लागवड होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांच्या म्हणण्यानुसार उन्हाळी धानाखालील जिल्ह्यातील क्षेत्र सुमारे आठ हजार हेक्‍टर आहे. याच जिल्ह्यातील शेतकरी आता वेळ, पैसा आणि मजुरीबळ यात बचत करण्यासाठी मशागतीपासून ते काढणीपर्यंतच्या यांत्रिकीकरणाकडे वळले आहेत.

धान पेरणी व रोवणीच्या यंत्रांचा वापर

सिंदेवाही येथे विभागीय कृषी संशोधन केंद्र कार्यरत आहे. येथील ३० ते ४० हेक्टरवरील धानाची रोवणी ‘ट्रान्स्प्लांटर’द्वारे होते. त्यासाठी १५ ते २० दिवसांची मॅट नर्सरी तयार केली जाते. तयार झालेली रोपे यंत्रावर ठेवून रोवणी होते. अर्थात, यांत्रिकीकरणाची ही पद्धत काही अंशी वेळकाढू असल्याने शेतकऱ्यांची पसंती मात्र पेरीव धान लागवड पद्धतीला असते. यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्राला डीएसआर (डायरेक्ट सिडेड राइस) असे म्हणतात.

या ट्रॅक्टरचलित यंत्राद्वारे धानाची व खताचीही थेट पेरणी होत असल्याने मॅट नर्सरीची गरज नसते. त्यामुळे रोपेनिर्मितीचा वेळ व त्यावरील खर्चातही बचत होते. डीएसआर यंत्राच्या वापरात दोन ओळींतील अंतर वीस सेंटिमीटर तर दोन बियाण्यांत अंतर १० सेंटिमीटर अपेक्षित आहे. दोन ओळींतील अंतर वाढवणेही शक्य असते. कारण या पद्धतीत उगवणाऱ्या तणाला नियंत्रित करण्यासाठी छोट्या यंत्राचा वापर करणे शक्य होते.

डीएसआर तंत्राचा फायदा

केंद्राचे वरिष्ठ भात पैदासकार डॉ. जी. आर. श्‍यामकुंवर सांगतात, की पूर्व विदर्भात सुमारे एक लाख ६० हजार हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी धान घेण्यात येतो. डीएसआर पद्धतीत बारीक वाणाच्या एकरी दहा ते बारा किलो तर जाड वाणाच्या १२ ते १५ किलो बियाण्याचा वापर होतो. त्यामुळे बियाणे बचतीचा उद्देश साधला जातो. डीएसआर पद्धतीने भात पेरणी किंवा ट्रान्स्प्लांटरद्वारे रोपे रोवणी अशा कोणत्याही पद्धतीत धान उत्पादकता जवळपास सारखीच मिळते. पंजाब, हरियाना भागांत पेरीव भाताखालील क्षेत्र काही वर्षांत वाढीस लागले आहे.

पाऊस पडल्यास मजुरांद्वारे रोवणी शक्य होत नाही. अशावेळी या यंत्राव्दारे पेरणी करता येते. रोवणी खर्चात बचत होते. तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उगवणीपूर्व किंवा उगवणीपश्‍चात अशा दोन्ही प्रकारे तणनाशकांचा वापर शक्य होतो. यंत्राची किंमत एक ते सव्वा लाख रुपये आहे. कृषी विभागाकडून महाडीबीटी अंतर्गत अनुदानाची सोय आहे.

‘हार्वेस्टर’चा वापर

जिल्ह्यातील रायपूर येथील रवींद्र होळी आपल्या ३५ एकरांत धान घेतात. कोरोना काळात आई-वडिलांचे निधन झाल्यानंतर शेतीची जबाबदारी त्यांच्याकडे आली. त्या वेळी धान कापणी, मळणी मजुरांकरवी होई. रवींद्र सांगतात, की मजुरांकरवी कापणी आणि धान पेंड्या बांधणीवर एकरी पाच हजार रुपयांचा तर १०० रुपये प्रति पोत्याप्रमाणे मळणी खर्च होतो. मजूर वेळेवर न मिळाल्यास व अवकाळी पाऊस पडल्यास होणाऱ्या नुकसानीची मर्यादाच नसते.

अशावेळी यंत्राचा आधार घेण्यासाठी २०२१ मध्ये शासकीय अनुदानातून त्यांनी २७ लाख रुपयांचे ‘हार्वेस्टर’ खरेदी केले. होळी सांगतात, की आमच्या या भागातील जमिनीची संरचना आणि अधिक पाऊसमान पाहता धानाच्या बांधांमध्ये चाके असलेले हार्वेस्टर योग्य प्रकारे चालत नाहीत. त्याऐवजी रणगाड्याप्रमाणे चेन असलेल्या कंबाइन हार्वेस्टरचा वापर सुरू केला. त्याची ६८ एचपीची क्षमता असून सहा फुटी कटर बार आहे.

तासाला पाऊण ते एक एकरातील धानाची कापणी आणि मळणी त्याद्वारे होते. यंत्र सुलभ पद्धतीने शिवारात चालावे यासाठी कापणीवेळी ऊन अपेक्षित राहते. शेतकऱ्यांना ३२०० रुपये प्रति एकर दराने हे यंत्र त्यांनी उपलब्धही करून दिले आहे. मजुरी खर्चाच्या तुलनेत त्याद्वारे कापणी- मळणीचे काम अर्ध्या खर्चात आणि सुलभ होते असा रवींद्र यांचा अनुभव आहे.

तीळपट्ट्यात यांत्रिकीकरण

गाजीपूर (ता. दारव्हा, यवतमाळ) भागात सुमारे ३५० एकरांत उन्हाळी तिळाची लागवड होते. येथील प्रयोगशील शेतकरी ओंकार काळमेघ सांगतात की पूर्वी तिळाची काढणी प्रक्रिया मजुरांच्या माध्यमातून करायचो. मात्र ती खर्चिक, वेळकाढू असायची. त्यावर उपाय म्हणून थ्रेशरचा वापर सुरू केला आहे. दाणा बारीक असल्याने यंत्रामुळे तो वाऱ्याने उडून जाऊन नुकसान होईल अशी भीती येथील शेतकऱ्यांत होती.

मात्र मी केलेल्या प्रयोगांमध्ये असे काहीही घडले नाही. त्यामुळे विश्‍वासार्हता तयार होऊन गावशिवारातील बहुतांश शेतकरी तिळात थ्रेशरचा वापर करू लागले आहेत. तीळ कापणी प्रक्रियेची पद्धत सांगताना काळमेघ म्हणतात की तिळाची कापणी मजुरांकरवी विळ्याने होते. त्यानंतर पेंड्या उन्हात वाळवल्या जातात. यात झटकणी व काडीकचरा काढून टाकणे यासाठी मजुरीवर एकरी दोन हजार रुपये खर्च होतात.

आता पेंड्या उन्हात वाळवण्यानंतर थ्रेशरचा वापर करता येतो. त्यास केवळ एकरी १२०० रुपये येतो. म्हणजेच एकरी ८०० रुपयांची बचत होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही सर्व प्रक्रिया पूर्वी १५ ते २० दिवस चालायची. आता दोन तासांत तीन एकरांतील काम पूर्ण होते. तिळाऐवजी अन्य पीक थ्रेशरच्या खालील बाजूस असलेल्या चाळणीतून खाली पडते. परंतु तिळाचा आकार लहान असल्याने त्यासाठी थ्रेशरच्या खालील बाजूस पत्रा लावावा लागतो.

अवजारे बॅंकेची सुविधा

वर्धा येथील वरदा शेतकरी उत्पादक कंपनीने शेतकऱ्यांना अवजारे बॅंकेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ट्रॅक्‍टर, रोटाव्हेटर, व्ही- पास, ग्रासकटर, धान्य प्रतवारीच्या चाळण्या आदींचा त्यात समावेश आहे. पाणी वापर संस्थेअंतर्गत नियमित पाणसरा भरणाऱ्यांना अवजारांच्या वापरापोटी १०० रुपये कमी कर आकारण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे पाणसरा वसुली १०० टक्क्यांवर पोहोचली आहे.

शेतकरी कंपनीने ड्रोनही खरेदी केला आहे. विनेश काकडे कंपनीचे कार्यकारी संचालक आहेत. कंपनीचे मदनी येथे गोदाम असून तेथून मुरघासचा पुरवठा शेतकऱ्यांना होतो. टाकळी चना (ता. देवळी) येथेही कंपनीची अवजारे बॅंक आहे. सोयाबीन, हरभरा, कापूस आदी पिकांवर या भागातील शेतकऱ्यांची भिस्त आहे. नजीकच्या काळात तीळ लागवडीला कंपनीने प्रोत्साहन दिले आहे.

डॉ. जी. आर. श्‍यामकुंवर ९४०३०४९४७२ रवींद्र होळी ९४२२८४०९४२

ओंकार काळमेघ ७२१८७२८५०९

विनेश काकडे ९८५०४८५६५३

संत्रा प्रक्रियेला आधुनिक तंत्राद्वारे चालना

विदर्भाचे मुख्य पीक असलेल्या संत्राफळावर पहिल्या टप्प्यात प्रक्रिया झाल्यास त्याची टिकवण क्षमता वाढण्यासोबतच ग्राहकांची मागणीही वाढते. विदर्भात अशा प्रक्रिया उद्योगाची संख्या सुरुवातीच्या एक-दोनवरून आता २३ वर पोहोचली आहे. कै. वासुदेवराव देशपांडे, लक्ष्मीकांत दुसात, बबनराव बेलागडे, योगेंद्र खंडेलवाल, निळकंठराव आंडे, (कै.) राजन चानुगो यांच्यासह ५० शेतकऱ्यांनी एकत्रित येत विदर्भात सर्वप्रथम १९९७-९८ मध्ये सिट्रस किंग मॅन्डेरीयन ऑरेंजेस कंपनीची स्थापना केली.

त्यातून वरूड येथे ‘मॅन्युअल क्लिनिंग, ग्रेडिंग युनिट’ उभारले. प्रकल्पाची वाटचाल आशादायी होती. त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर संत्रा निर्यातही झाली. सन २००२ मध्ये पहिला कंटेनर अबुधाबी, दुसरा सिंगापूर, तिसरा व चौथा कंटेनर नेदरलॅंड येथे पाठविण्यात आला. पुढील काळात राजकीय हस्तक्षेपाच्या परिणामी हा प्रकल्प आर्थिक अडचणीत येऊन तो बाजार समितीकडे हस्तांतरित झाला.

जिल्ह्यात २३ प्रकल्प

अमरावती जिल्हा संत्रा उत्पादनाचा हब आहे. राज्यातील एकूण दीड लाख हेक्‍टरपैकी सुमारे एक लाख हेक्‍टर क्षेत्र याच जिल्ह्यात आहे. येथील वरुड, मोर्शी या दोन तालुक्‍यांमध्येच संत्रा क्‍लिनिंग, ग्रेडिंग युनिट्सची संख्या २३ वर पोहोचली आहे. प्राथमिक प्रक्रियेचे महत्त्व संत्रा बागायतदारांना समजल्यानंतर युनिट्‍सच्या संख्येत चार वर्षात वाढ नोंदविण्यात आली. कृषी विभागाच्या माध्यमातून गट शेती, स्मार्टतसेच मॅग्नेट या प्रकल्पांमधून या प्रकल्पांना अनुदान दिले जाते. राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाद्वारेही अनुदानावर दोन प्रकल्प उभे राहिले आहेत.

सेन्सर आधारित ऑप्टिकल यंत्रणा

सुरुवातीच्या काळात ग्रेडिंगमध्ये ६०, ६५, ७०, ८० एमएम. आकाराचे चाळे राहायचे. पुढील काळात ‘सेन्सर’ आधारित ऑप्टिकल यंत्रणा बसविण्यात आली. यात इटलीमधील तंत्रज्ञानाचा वापर व्हायचा. सन २०१८-१९ मध्ये ऑरेंज प्रोसेसिंग कंपनी (सालबर्डी) व श्रमजीवी नागपुरी संत्रा उत्पादक कंपनी (वरुड) या दोन्ही शेतकरी कंपन्यांच्या वतीने भारतीय बनावटी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. आता या भागात १२ ते १३ कंपन्यांद्वारे भारतीय बनावटीचे सयंत्र बसविण्यात आले आहेत. सेन्सरवर आधारित यंत्रणेत क्लिनिंग (स्वच्छता) झाल्यानंतर ‘फ्रूड ग्रेड’चे वॅक्‍स फळांना लावले जाते.

पुढील टप्प्यात फळांवर ‘ड्रायर’मधून प्रक्रिया होते. यात ८०-८५ ७५-८०, ७०-७५, ६५-७०, ६०-६५, ५५-६०, ५०-५५ एमएम अशा आकारनिहाय प्रतवारीची सोय होते. भारतात याच आकाराच्या फळांना मागणी राहते असे श्रमजीवी शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक रमेश जिचकार सांगतात. ५५ एमएम. पेक्षा कमी आकाराच्या फळांचा उपयोग प्रक्रिया उद्योगात होतो. उर्वरित आकाराच्या फळांना टेबल फ्रूट म्हणून मागणी राहते असे त्यांनी सांगितले.

...असा होतो फायदा

नागपुरी संत्राच्या आंबिया बहरातील फळाची टिकवण क्षमता १५ ते १८ दिवस आहे. फळांवर वॅक्‍स प्रक्रिया केल्यास संत्र्याच्या सालीवर असलेल्या छिद्रांमध्ये हे वॅक्‍स बसते. त्यामुळे त्यातील ओलावा बाहेर न पडता आतील बाजूस तसाच राहतो. परिणामी, टिकवणक्षमतेत सुमारे आठ दिवसांची वाढ होते. सोबतच फळाची चकाकी वाढते.

संत्रा उत्पादकतेत स्पेनची आघाडी

मॅग्नेट प्रकल्प, नाशिक येथील सह्याद्री फार्म्स आणि महाऑरेंज यांच्या संयुक्‍त सहकार्याने नुकताच विदर्भातील ३२ शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा स्पेनमध्ये आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पत्नी कांचनताई यांच्यासह ३२ शेतकरी दौऱ्यात सहभागी झाले होते. शास्त्रोक्‍त व्यवस्थापनाच्या बळावर स्पेनची संत्रा उत्पादकतेत आघाडी आहे.

स्पेनमध्येही मजूरटंचाई आहे. त्यामुळे फळे तोडणीसाठी मजुरांची उपलब्धता दक्षिण आफ्रिकेतून केली जाते. क्‍लिनिंग- ग्रेडिंग युनिटमधील बहुतांश तसेच क्रेटमध्ये माल भरणे, वाहनात लोडिंग ही कामेही रोबोटद्वारे केली जातात. त्यामुळे मजुरांवरील खर्चात बचत होते. अशी माहिती महाऑरेंजचे संचालक श्रीधर ठाकरे यांनी दिली.

रमेश जिचकार ९८२३२५३५०१

(संचालक, ‘श्रमजीवी’शेतकरी कंपनी, अमरावती)

श्रीधर ठाकरे ९८२२२२८५३३

(संचालक, महाऑरेंज)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT