
Labor Shortage Issue : अलीकडील वर्षांत मजुरांची संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे. योग्य मजुरी देऊनही वेळेत मजूर उपलब्ध होत नाहीत. या समस्येमुळे मशागतीच्या कामांसह काढणी, मळणीवेळी तर शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे यांत्रिकीकरण तसेच त्यातील प्रयोगांमधून शेतकऱ्यांनी या समस्येवर मार्ग शोधले आहेत. निंभारा (ता. बार्शीटाकळी, जि. अकोला) येथील प्रयोगशील शेतकरी गणेश नानोटे पूर्वी गव्हाची कापणी मजुरांकरवी करायचे.
आता या भागातील मजूर हे काम करायला तयार नाहीत. ते उपलब्ध झालेच तरी कापणीसाठी प्रति पोत्यामागे १२ ते १५ किलो गहू ते घेतात. गव्हाची प्रत चांगली असल्यास त्याची ‘क्वांटिटी’ कमी व तुलनेने थोडी कमी असल्यास ‘क्वांटिटी’ अधिक घेतली जाते. शिवाय मळणीसाठी थ्रेशर व्यावसायिक ८ ते १० किलोपर्यंत गहू घेतो. अशा रीतीने प्रति पोत्यामागे २५ किलोपर्यंत गहू द्यावा लागतो. त्यामुळे शेतमालकाला उत्पादनाच्या तुलनेत खर्च पेलणे कठीण होत चालले आहे. यावर यांत्रिकीकरण हा पर्याय फायदेशीर ठरतो आहे.
लागवड पद्धतीत सुधारणा
महिमळ (ता. चिखली) येथील प्रयोगशील शेतकरी हरिभाऊ येवले म्हणाले, की खरिपात सोयाबीन- तूर या पद्धतीत सोयाबीनच्या सहा ते सात ओळींनंतर तुरीचे एक तास (ओळ) शेतकरी लावतात. मात्र या पद्धतीत सोयाबीन काढणीसाठी हार्वेस्टरचा वापर करता येत नाही. शेतरस्त्यांची दुरवस्था व थोडाही पाऊस झाला तर कुठलेच यंत्र शेतात पोहोचू शकत नाही. अशा स्थितीत छोटी यंत्रे महत्त्वाची ठरू शकतात. दुर्दैवाने त्यांची उपलब्धता व वापर कमीच आहे. हीच बाब हेरून लागवडीची पद्धत मी विकसित केली आहे.
यात सोयाबीनच्या सलग ११ तासांनंतर १२ आणि १३ वे तास तुरीचे ठेवले जाते. तुरीच्या दोन तासांतील अंतर तीन फूट असते. या रचनेत मोठा हार्वेस्टरही वापरणे शक्य होते. या पद्धतीत सोयाबीनचे एकरी १२ क्विंटल तर तुरीचे १० क्विंटल उत्पादन घेतले आहे. सोयाबीन काढणीनंतर हरभरा लागवड करून एकरी १० क्विंटलपर्यंत उत्पादन घेतले आहे.
हे तंत्र मी कृषी विद्यापीठाकडे अभ्यासासाठी दिले होते. परंतु हा विषय पुढे जाऊ शकला नाही. आता विचार सुरू झाला आहे हे महत्त्वाचे आहे. या भागातील काही शेतकरी अशा प्रकारे लागवड करून सोयाबीनसाठी हार्वेस्टरचा वापर करू लागले आहेत.
हार्वेस्टर वाचवतोय खर्च
नानोटे सांगतात, की एकरी १२ ते १५ क्विंटल उत्पादन झाले तर पारंपरिक कापणी, मळणी प्रक्रियेत एकरी सुमारे ७५०० रुपयांपर्यंत खर्च येतो. त्यामुळे अलीकडील वर्षांत ‘हार्वेस्टर’ला पसंती दिली आहे. त्याद्वारे हा खर्च १५०० ते २००० रुपयांपर्यंत येतो. यंत्रांची मागणी वाढली तर हार्वेस्टर व्यावसायिक अधिक दरही आकारतात. तरीही पारंपरिक पद्धतीपेक्षा हा खर्च परवडतो. कमी आणि एकाच वेळेत सोंगणी- मळणी होते.
हरभऱ्यातील अनुभव
सवडद (ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा) येथील विनोद देशमुख म्हणाले, की हरभरा शेतीत पूर्वी कापणीसाठी मजूर लागायचे. मळणीसाठी छोटे थ्रेशर असायचे. त्यामुळे खूप वेळ जायचा. सध्या कापणी मजुरांकरवी होत असली तरी मळणीसाठी सुधारित, मोठ्या थ्रेशरचा वापर सुरू केला आहे.
त्यामुळे कमी वेळेत जास्त काम होते. मध्यंतरी हार्वेस्टरचा वापर करता येईल असे हरभरा वाण आले. परंतु ते मोठ्या प्रमाणात यशस्वी होताना दिसले नाही. कारण हरभऱ्याचे पीक एकाचवेळी कापणीला येत नाही. त्यामुळे यंत्राचा वापर तितका सोयीचा राहात नाही. पारंपरिक वाणांच्या तुलनेत नव्या वाणांची उत्पादकता कमी असल्याचा माझा अनुभव आहे. त्यामुळे जुन्या वाणांना अधिक पसंती देत आहे.
कृषी विद्यापीठाचे संशोधन
सोयाबीन- तूर पीकपद्धतीतील अल्प व मध्यम भूधारक शेतकऱ्यांसाठी अडचणी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी शक्ती अवजारे विभागाने लक्षात घेतल्या. त्यातून सोयाबीन कापणी यंत्र विकसित करण्यात येत आहे. ते स्वयंचलित असून एका मनुष्याकरवी चालवता येते.
त्याद्वारे एका वेळी दोन ओळींतील सोयाबीनची कापणी होते. कापणी केलेले पीक ओळींच्या मधील जागेत सोडले जाते. त्यामुळे सुलभपणे गोळा करता येते. पिकाची हाताळणी जास्त होत नसल्याने शेंगा फुटण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. यंत्राच्या चाचण्या घेण्यात येत असून, आगामी काळात लवकरच ते शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होईल अशा शास्त्रज्ञांन विश्वास आहे.
जवस मळणी यंत्र
जवसाच्या मळणीसाठीही सध्या सुयोग्य यंत्र उपलब्ध नाही. अन्य पिकांसाठीचे असे यंत्र जवसाचे बी स्वच्छ करीत नाही. साफ केलेल्या बियाण्यांमध्ये भुश्शाचे अवशेष आढळतात. हीच समस्या लक्षात घेऊन विद्यापीठाच्या याच विभागाने जवस मळणी यंत्र विकसित करण्यास सुरवात केली आहे.
जवसासह दाण्याचा आकार बारीक असणाऱ्या अन्य पिकांसाठीही ते उपयोगी पडणार आहे. हे यंत्र दोन अश्वशक्ती विद्युत मोटरवर चालते. मळणी तसेच साफसफाईची कार्यक्षमता, उच्च उत्पादन क्षमता आणि धान्याचे कमी नुकसान अशी यंत्राची वैशिष्ट्ये आहेत. छोट्या व मध्यम भूधारक शेतकऱ्यांसाठी ते उपयोगी पडणार आहे.
गणेश नानोटे ९५७९१५४००४, विनोद देशमुख ९८५०३७३६९०, हरिभाऊ येवले ८२७५२३३२६५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.