Garlic Technology Agrowon
टेक्नोवन

Agriculture Technology : लसूण प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक यंत्रे

Agrotech Farming : लसूण प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक यंत्राची माहिती घेऊ.

Team Agrowon

डॉ. विकास तागड, डॉ. शहाजी कदम

Smart Farming : लसूण हा व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे पीक आहे. महाराष्ट्रामध्ये लसणाचे चांगले उत्पादन घेतले जाते. त्याची साठवणूक योग्य प्रकारे न केल्यास लसूण कुजतो, सडतो किंवा त्याला कोंब येतात. यातून शेतकऱ्यांचे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी लसूण प्रक्रिया उद्योग उभारणे शक्य आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे सामान्य घरांसोबतच हॉटेल, खाणावळ, दुकान, फूड इंडस्ट्री, मॉल या ठिकाणी लसणाच्या पेस्ट, पावडर, प्युरी, लोणचे, पाकळ्या (फ्लेक्स), चकत्या (स्लाइस) यांसारख्या विविध मूल्यवर्धित पदार्थांची मागणी वाढत आहे. निर्यातीसाठीही चांगली संधी आहे.

व्यक्तिगत शेतकरी, महिला बचत गट यांच्यापैकी कोणीही लसूण प्रक्रिया उद्योग छोट्याशा १० बाय १५ फुटांच्या खोलीमध्ये करता येतो. लहान उद्योगासाठी ३ ते ४ लाख रुपये भांडवल पुरेसे होईल. खाद्यपदार्थांशी संबंधित उद्योगाच्या उभारणीसाठी एफ.एस.एस.ए.आय.चे(FSSAI) परवाना काढणे अनिवार्य आहे. या उद्योगासाठी आवश्यक यंत्राची माहिती घेऊ.

लसूण प्रतवारी करण्याचे यंत्र

(गार्लिक ग्रेडर) -

या यंत्राद्वारे लसणाची वजन, आकार यानुसार प्रतवारी केली जाते. हाताने लसूण निवडण्याची प्रक्रियेसाठी अधिक मनुष्यबळाची आवश्यकता असते. या यंत्रामध्ये स्टेनलेस स्टीलच्या चकतीवर तीन छिद्रे असून, त्याचे आकार ३० मि.मी. पेक्षा लहान, ३० - ४० मि.मी. आणि तिसरे ४५ मि.मी. व त्यापेक्षा मोठे असतात. सर्व लसूण यंत्रामध्ये टाकल्यानंतर रोटरी स्क्रीनच्या साह्याने वेगवेगळ्या आकाराच्या छिद्रानुसार लसणाची विभागणी होत जाते.

ते वेगवेगळ्या क्रेटमध्ये पाठवले जातात. याची अचूकता ८२ टक्के आहे. हे यंत्र पूर्णपणे स्टील व लोखंडाचे बनलेले असून, वजन ७० किलो आहे. थ्री फेजवर चालणाऱ्या या यंत्रात ३ एच. पी.ची विद्युत मोटार लावलेली असते. या यंत्राच्या क्षमता तासाला १०० ते १२० किलो आहे. या यंत्राची किंमत ५० हजारांपासून पुढे आहेत. मशिन कार्य करत असताना अधिक कंपने तयार होतात. त्यामुळे यंत्र जागा सोडू शकते. हे टाळण्यासाठी त्याच्या ग्राउंडिंग साइडला नट, बोल्ट लावून लाकडाचा बेस तयार केला जातो. हे यंत्र राजस्थान व मध्य प्रदेशमध्ये उपलब्ध आहे.

लसूण पाकळ्या काढणारे यंत्र

(लसूण बल्ब ब्रेकर) -

लसूण गड्ड्यापासून पाकळ्या मोकळ्या करण्यासाठी या यंत्राचा वापर केला जातो. यात कुशीड बटन्स, कन्व्हेयर आणि एक पोकळ सिलिंडर असते. लसूण यंत्रामध्ये टाकल्यानंतर कन्व्हेयरने पुढे ढकलले जाऊन त्यावर बटन्सच्या साह्याने घर्षण केले जाते. त्यामुळे पाकळ्या वेगळ्या होतात. या पाकळ्या खाली कंटेनरमध्ये जमा केल्या जातात. उरलेला लसणाचा कचरा हा पोकळ सिलिंडरच्या साह्याने बाहेर फेकला जातो.

पूर्णपणे लोखंडाच्या या यंत्राचे वजन ५० किलो असून, ते थ्री फेजवर चालते. त्याला ५ एच.पी.ची मोटार लावलेली असते. यंत्राला ठेवण्यासाठी २ बाय २ फूट जागा पुरेशी असून, कुशल कामगारांची आवश्यकता नाही. यंत्राची कार्यक्षमता तासाला ६० ते ८० किलो आहे. यामध्ये स्वयंचलित व अर्धस्वयंचलित असे दोन प्रकार आहेत. यंत्राची किंमत २० हजारांपासून सुरू होते. हे यंत्र आपल्याला महाराष्ट्रात व गुजरातमध्ये मिळते. प्रत्येक वापरानंतर यंत्र गरम पाण्याने धुऊन घ्यावे.

लसूण साल काढणारे यंत्र

(गार्लिक पिलिंग मशिन) -

लसणाची साल काढणे हे किचकट आणि वेळखाऊ काम आहे. मोठ्या प्रमाणात लसूण सोलणीसाठी बाजारात सोलणी यंत्र उपलब्ध आहे. या यंत्राच्या हॉपरमध्ये लसणाच्या पाकळ्या टाकल्या जातात. त्यामुळे फिरत्या स्क्रबर बॅरलमध्ये लसणावर घर्षण होऊन त्याची साल वेगळी केली जाते. डी- स्क्रीनच्या साह्याने सोललेले लसूण हे खालच्या बाजूस कंटेनरमध्ये जमा होतात. सोललेली साले प्रायटरच्या साह्याने बाहेर फेकली जातात. प्रायटरची गती १४४० फेरे प्रति मिनीट इतकी असते.

या यंत्राची क्षमता प्रति तास ३० ते ४० किलो असून, टाकलेल्या पाकळ्यांच्या ९० टक्क्यांपर्यंत साल वेगळी केली जाते. पूर्णपणे फूड ग्रेडच्या स्टेनलेस स्टीलपासून बनविलेल्या या यंत्राचे वजन ४५ किलो आहे. त्यासाठी ०.५ एचपीची मोटार बसविलेली असून, त्यासाठी २२० व्होल्ट ऊर्जा लागते. असून यंत्राचे वजन हे ४५ किलो आहे. यंत्राला ०.५ एच. पी.ची विद्युत मोटार जोडलेली असते. यंत्र मागणीनुसार सिंगल फेज व थ्री फेजमध्ये उपलब्ध आहे. यंत्राची किंमत ४० हजारांपासून सुरू होते. या स्वयंचलित यंत्राचे ‘ड्राय पिलिंग’ व ‘वेट पिलिंग’ असे दोन प्रकार उपलब्ध आहेत. ड्राय पिलिंग या यंत्राची किंमत ही वेट पिलिंग यंत्रापेक्षा जास्त असते. हे यंत्र महाराष्ट्र व गुजरातमध्ये मिळते.

लसणीची पेस्ट करण्याचे

यंत्र (गार्लिक पेस्ट मशिन)

बहुतांश प्रत्येक भाजीमध्ये चवीसाठी लसूण पेस्ट वापरली जाते. त्यामुळे तयार लसूण पेस्टला घरगुती आणि हॉटेल व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते. या यंत्राच्या हॉपरमध्ये सोललेले लसूण ओले करून टाकले जातात. पुढे त्याला ठेचले जातात. त्यानंतर बसविलेला रोलर उलट्या दिशेने फिरून क्रश केलेल्या लसणावर दाब टाकत पुढे ढकलतो. पुढे आपल्या गरजेनुसार योग्य त्या आकाराची पेस्ट मिळविण्यासाठी वेगवेगळ्या व्यासाची (२ ते ८ मि.मी.) छिद्रे असलेल्या चाळण्या लावलेल्या असतात.

तयार पेस्ट चाळणीतून कंटेनरमध्ये जमा होते. त्याचे पुढे पॅकिंग केले जाते. या यंत्राची क्षमता प्रति तास ८० ते १०० किलो आहे. ३० ते ४० किलो वजनाच्या या यंत्राची बांधणी पूर्ण स्टेनलेस स्टीलची असून, आतील भागातील क्रशर, रोलर, कटर इ. फूड ग्रेड स्टीलचे बनवलेले आहेत. थ्री फेजवर चालणाऱ्या या यंत्रामध्ये ०.३ एच.पी.ची मोटार जोडलेली आहे. हे यंत्र अर्धस्वयंचलित असून, वेगवेगळ्या चाळण्या लावण्याची सोय असल्यामुळे यात लसणासोबत कांदा, आले, मिरची यांच्याही पेस्ट करता येतात. या यंत्राला चाके असून, एका जागेवरून दुसऱ्या जागी हलवणे सोपे आहे. यंत्राची किंमत १५ हजारांपासून सुरू होऊन क्षमतेनुसार वाढत जाते. हे यंत्र महाराष्ट्रात उपलब्ध आहे.

लसणाचे वाळवलेले काप करण्याचे यंत्र

(गार्लिक फ्लेक्स मशिन)

लसणाच्या वाळवलेल्या कापांचा (फ्लेक्सचा) उपयोग भाज्या, ब्रेड यासह औषध निर्मिती उद्योगात केला जातो. सोललेल्या लसूण पाकळ्या स्वच्छ पाण्याने धुऊन घ्याव्यात. स्लायसरच्या साह्याने त्याचे बारीक बारीक काप बनवून घ्यावेत. हे काप ट्रेमध्ये पसरून वाळवण यंत्रामध्ये ८० अंश सेल्सिअस तापमानाला ७ ते ८ तासांसाठी वाळवावेत. वाळवलेले काप एलडीपीई पिशवीमध्ये भरून वर्षभर साठवता येतात.

या प्रक्रियेमध्ये वापरले जाणारे ट्रे ड्रायर बाह्यतः लोखंड वा पत्र्याचे बनलेले असून, आतील भाग ॲल्युमिनियमचे असतात. त्यात आपल्या गरजेनुसार ६, ८, १२, ३६, ४८, ७२, ९६ ट्रे बसण्याइतके प्रकार उपलब्ध आहे. थ्री फेजवर चालणारे हे यंत्र संपूर्ण स्वयंचलित आहे. त्यात ५० ते २०० अंश सेल्सिअसपर्यंत उष्णता देता येते. आपल्याला बाहेरून तापमान कळण्यासाठी व नियंत्रणासाठी डिजिटल दर्शकपेटी जोडलेली असते. आतील बाजूला लहान आकाराचा पंखा असून, आत उष्ण हवा खेळती ठेवतो. ट्रेनुसार यंत्रांची क्षमता बदलत असली तरी १० किलो क्षमतेच्या यंत्रांची किंमत ३० हजार रुपये आहे. हे यंत्र महाराष्ट्रामध्ये मिळते.

लसूण दळणी यंत्र

(गार्लिक ग्राइन्डर मशिन) -

लसूण पावडरचा उपयोग बेकरीजन्य पदार्थांत केला जातो. वाळलेल्या लसणापासून स्टेनलेस स्टीलच्या ग्राइंडरमध्ये भुकटी बनवली जाते. आवश्यकतेनुसार थ्री फेज व सिंगल फेजवर चालते. यंत्राचे वजन हे ३० किलो असून, यंत्राला २, ४, ६, ८, १० मि.मी.च्या जाळ्या जोडलेल्या असतात. यंत्राला खालच्या बाजूला १० किलोची टाकी जोडलेली असते. या अर्ध स्वयंचलित यंत्राची क्षमता प्रति तास ५० किलो असून, किंमत २५ हजारांपासून पुढे आहेत.

हे यंत्र महाराष्ट्र व गुजरात या ठिकाणी मिळते. या उद्योगाची उभारणी कच्चा माल मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या ठिकाणी करावी. म्हणजेच वाहतुकीवरील खर्चात बचत होते. प्रक्रिया पदार्थाच्या विक्रीसाठी उत्तम व आकर्षक पॅकिंग आवश्यक असते. त्याचीही छोटी यंत्रे उपलब्ध असून, त्याचाही वापर केल्यास फायद्यामध्ये वाढ होते.

डॉ. विकास तागड, ९४२००२५०५२, डॉ. शहाजी कदम, ९८२२७३००१०, (सहायक प्राध्यापक, सौ. के. एस. के. (काकू) अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, बीड)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT