Pune News : कृषी खात्याच्या नियोजनाचा आत्मा समजल्या जाणाऱ्या सांख्यिकी विभागाला गेल्या काही वर्षांपासून पूर्णवेळ प्रमुख देण्यात आलेला नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सांख्यिकी विभागाच्या यापूर्वीच्या प्रमुखाने म्हणजेच मुख्य सांख्यिकने मुदतपूर्व निवृत्ती घेतली होती; तर गेले काही महिने प्रभारी सूत्रे विविध अधिकाऱ्यांच्या हातात देत सांख्यिकी विभागाचा गाडा हाकला जात होता.
नुकत्याच झालेल्या उपसंचालकांच्या पदोन्नत्यांमध्ये तीन वर्षांसाठी मुख्य सांख्यिक नियुक्त केला जाईल, अशी अटकळ होती. परंतु दोन महिन्यांत निवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्याला या पदावर बसविण्याचे आदेश मंत्रालयातून निघाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कृषी आयुक्तालयात कृषी गणना नावाचा एक स्वतंत्र विभाग आहे. या विभागाचे कामकाज कृषी उपसंचालक विठ्ठल कर्डिले यांच्याकडे होते. ते दोन महिन्यांत निवृत्त होणार आहेत. मात्र त्यांना पूर्णवेळ मुख्य सांख्यिक म्हणून नेमण्यात आले आहे.
मुळात, या पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर कामकाजाची घडी बसविण्यासाठी किमान सहा महिने जातात. अशा स्थितीत मध्येच निवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्याला मुख्य सांख्यिकीपदी नेमून हा विभागाला खिळखिळे ठेवण्याची खेळी कोण करते आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, उदय देशमुख व विनयकुमार आवटे असे दोन अधिकारी मुख्य सांख्यिक म्हणून उत्तम काम करू शकले. पंतप्रधान पीकविमा योजना, हवामान आधारित फळपीकविमा योजना तसेच पीक कापणी प्रयोग, पीकपाण्याचे अंदाज व नियोजन असे अत्यंत महत्त्वाचे विषय सांख्यिकी विभागाच्या अखत्यारीत येतात. देशमुख व आवटे यांनी हे विषय चांगले हाताळले.
देशमुख जवळपास सलग चार वर्षे सांख्यिकी विभागाचे प्रमुखपद हाताळल्यानंतर देशमुख यांची बदली करण्यात आली. आवटे यांना सहसंचालकपदी पदोन्नती मिळाल्यानंतरदेखील सध्या तेच आपली नियमित कामे सांभाळून सांख्यिकी विभागाचा गाडा हाकत आहे.
मात्र आता या वर्षी कृषी संचालक म्हणून आवटे यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवा व अनुभवी मुख्य सांख्यिक तातडीने नियुक्त होण्याची गरज होती. डी. बी. पाटील यांनी पूर्णवेळ मुख्य सांख्यिक म्हणून उत्तम कामकाज केले. परंतु कामाचा व्याप वाढल्यामुळे त्यांनी मुदतपूर्व निवृत्ती घेत सांख्यिकी विभागाला कायमचा रामराम ठोकला.
‘‘मुख्य सांख्यिकच्या अखत्यारित राज्यातील दहा हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेली पीकविमा योजना राबविली जाते. एक लाखाहून अधिक पीक कापणी प्रयोग होतात. खरीप व रब्बी हंगाम एकत्रित करता दोन कोटी हेक्टरवरील शेतजमिनीवरील पिकांचे नियोजन करावे लागते. आयुक्तालयातील हे सर्वात महत्त्वाचे पद दुर्लक्षित ठेवण्याचे कारण काय,’’ असा सवाल एका वरिष्ठ अधिकाऱ्याने उपस्थित केला.
सांख्यिकी दुर्लक्षित; ‘स्मार्ट’साठी उड्या
पदोन्नती किंवा बदल्यांमुळे पुणे मुख्यालयाला बहुतेक अधिकाऱ्यांची पसंती असते. विशेष म्हणजे मुख्य सांख्यिकी विभाग पुण्यात असतानाही या विभागात येण्यास अधिकारी तयार नसतात. त्याऐवजी स्मार्ट प्रकल्पातील पद मिळवण्याकडे बहुतेकांचा कल आहे. या गोंधळात सांख्यिकी विभागाचे प्रमुखपद किंवा या विभागातील वर्ग-एक श्रेणीतील तीनही पदे रिक्त ठेवली जातात, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.