Technical Information of Tractor : ट्रॅक्टरची खरेदी हा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय असतो. आपल्याकडे रोखीने ट्रॅक्टर खरेदी करणारे शेतकरी बोटावर मोजण्याइतकेच असतील. बाकी सर्व जण बॅंकेकडून कर्ज काढून ट्रॅक्टर खरेदी करतात.
ट्रॅक्टरच्या वापरातून कर्जाची परतफेड वेळेवर करण्यासोबतच स्वतःच्या उत्पन्नामध्ये लक्षणीय भर पडणे गरजेचे असते. त्यासाठी आपल्या ट्रॅक्टरची क्षमता कमी किंवा अधिक असून चालणार नाही. योग्य त्या क्षमतेचाच ट्रॅक्टर खरेदी केला पाहिजे. त्यासाठी पुढील मुद्दे उपयोगी ठरतील.
पीक पद्धती :
मागील भागामध्ये जिरायती शेतीमध्ये एकूण शेती, मातीचा प्रकार यानुसार निवड कशी करायची याची माहिती घेतली. या भागामध्ये बागायती विशेषतः बारमाही पाण्याखाली असणाऱ्या जमिनीसाठी ट्रॅक्टरची निवड करताना आपल्याला किती एकर जमीन आहे, या सोबतच त्यात घेतल्या जाणाऱ्या पीक पद्धतीचा विचार करावा लागणार आहे.
इथे कदाचित क्षेत्र कमी असेल, पण एकापेक्षा जास्त पिके घेतली जातात. एका पिकाच्या काढणी, वाहतूक, नंतर जमिनीची मशागत आणि दुसऱ्या पिकाची पेरणी अशी सारी कामे कमी वेळात करण्यासाठी मोठी अवजारे वापरावी लागतात. ट्रॅक्टरची ताकद ठरविताना सर्वात अवजड आणि वेळ खाऊ काम विचारात घ्यावे.
कामासाठी उपलब्ध असणारा वेळ :
ट्रॅक्टरची अश्वशक्ती ठरविणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे एखादे शेतीकाम करण्यासाठी लागणारा वेळ होय. वर्षात एकापेक्षा जास्त पिके घेताना त्यातील प्रत्येक कामाची वेळ आपल्या स्वतःच्या चार ते पाच वर्षाच्या अनुभवावरून लक्षात घ्यावी. विशेषतः ज्या वर्षी हवामान सर्वाधिक विपरीत होते, त्या काळात शेतीकामांसाठी मिळालेला वेळ (दिवस) लक्षात घ्यावा.
या मिळालेल्या दिवसातील पूर्णवेळ कामासाठी वापरता येईलच याची खात्री नसते. त्याची अनाहूत कारणे असू शकतात. उदा. ट्रॅक्टर किंवा अवजारांची मोड-तोड, नैसर्गिक आपत्ती किंवा थकव्यामुळे ड्रायव्हरला असलेली विश्रांतीची गरज इ. अनुभवावरून सामान्यतः उपलब्ध वेळेच्या ८० टक्के वेळ शेतात काम करता येते.
काम करताना येणाऱ्या अडचणी आणि ट्रॅक्टर अवजारांसह वळविण्यामध्ये वाया जाणारा वेळही लक्षात घेतला तरी वाहकाच्या कौशल्यानुसार उपलब्ध वेळ आणखी कमी अधिक होऊ शकतो.
ट्रॅक्टरची अश्वशक्ती ठरविणे :
(जमीन, कामासाठी लागणारा वेळ, करावयाची कामे, मातीचा प्रकार इ.)
शेती आणि पिकांविषयीची सर्व प्राथमिक माहिती गोळा केल्यानंतर त्या आधारे प्रत्येक शेतीकामासाठी लागणारी ताकद (अश्वशक्ती) मोजता येते. त्यासाठी खालील पद्धत वापरावी.
अ) उपलब्ध असणाऱ्या वेळेत काम पूर्ण करू शकेल, अशा योग्य मापाच्या अवजाराची निवड करणे.
ब) या अवजारासाठी लागणारी ताकद (अश्वशक्ती) मोजणे.
अ) अवजाराचे मोजमाप ठरविणे :
एकूण जमीन आणि उपलब्ध वेळ यावरून अवजाराचे मोजमाप करता येते.
शेतीची कामे करताना आपण किती जमिनीवर काम करणार आहोत, हे शेतकऱ्याला माहीत असते. (उदा. प्रत्येक दोन वर्षांनंतर सर्व जमिनीची नांगरणी करावयाची असते. त्यातील ५० टक्के जमिनीची नांगरणी दर वर्षी केल्यास नांगरणीसाठी मिळणारा वेळ वाढेल.
कारण नांगरणी केल्यानंतर कुळवणीसाठी, ढेकळे फोडण्यासाठी, बांधबंदिस्तीसाठी वेळ जाणार असतो. हे सर्व लक्षात घेऊन आपल्या शेतीकामांसाठी लागणाऱ्या अवजाराची क्षमता काढायची असते. त्यासाठी खालील सूत्रे उपयोगी पडतील.
अवजाराची क्षमता = क्षेत्र (हेक्टर) / वेळ (तास) .......... (१)
अवजाराची क्षमता × १० = वेग (कि.मी./तास) * अवजाराची रुंदी (मी.) / १० ........ (२)
वेग
परंतु अवजाराची पूर्ण क्षमता आपण शेतात काम करताना वापरू शकत नाही. म्हणून येणाऱ्या रुंदीला कार्यक्षमतेने भाग घ्यावा.
अवजाराची क्षमता (हे./तास) × १० / वेग (कि. मी./तास) × कार्यक्षमता
अशाप्रकारे अवजाराची रुंदी मिळेल त्यावरुन बाजारातील उपलब्ध रुंदीच्या अवजाराची निवड करावी.
शेतकऱ्यांसाठी सर्वसाधारणपणे वापरल्या जाणाऱ्या अवजारांच्या वापराचा वेग आणि कार्यक्षमता यांच्या माहिती तक्ता १ मध्ये दिली आहे.
यात एक बाब लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे फक्त ट्रॅक्टरच्या अश्वशक्तीवरूनच अवजाराचा आकार ठरत नाही. तर अवजाराचे वजन, ट्रॅक्टरची वजन उचलण्याची ताकद, ट्रॅक्टरची भूमिती हे घटकसुद्धा अवजाराचा आकार ठरवताना उपयोगी ठरतात. अवजाराची निवड करताना ते ट्रॅक्टरच्या स्थिरतेवर परिणाम करणार नाही, याचीही काळजी घ्यावी.
ब) अवजार चालविण्यासाठी लागणारी अश्वशक्ती मोजणे
प्रत्येक अवजार ओढण्यासाठी लागणारे बल किलोग्रॅम प्रति मीटर रुंदी तक्ता - १ मध्ये दिलेले आहे. अवजाराची रुंदी आपण मोजलेली आहेच. त्यावरुन आपण निवडलेले अवजार ओढण्यासाठी लागणारे बल काढता येईल.
एकूण बल (कि. ग्रॅ.) = प्रति मिटर रुंदीसाठीचे बल (कि. ग्रॅ. / मी.) गुणिले रुंदी (मी.)
अवजार ओढण्यासाठी लागणारी अश्वशक्ती काढण्यासाठीचे सूत्र पुढीलप्रमाणे -
ओढण्याची अश्वशक्ती (हॉ. पॉ.) = वेग (कि. मी. / तास) × एकूण बल (कि. ग्रॅ.) / २७०
(या सूत्रात आवश्यक असलेला अवजार वापरण्याचा वेगसुद्धा तक्ता - १ मध्ये दिला आहे.)
तक्ता क्र. १ अवजारे ओढण्यासाठी लागणारे बल, वेग आणि कार्यक्षमता
काम बल (किलोग्रॅम प्रति मीटर रुंदी) विशिष्ट वेग
(कि.मी. प्रति तास) कार्यक्षमता
(टक्के)
अ) नांगरणी (२० सेंमी खोल)
भारी काळी जमीन १६०० ४.५० ८० टक्के
मध्यम काळी जमीन १४०० ५.०० ८० टक्के
गाळाची जमीन १०५० ५.०० ८० टक्के
रेताड जमीन ७०० ६.०० ८० टक्के
ब) एका बाजूने चालणारा तव्याचा नांगर
१. जास्त बल ६०० ६.०० ८० टक्के
२. मध्यम बल ४५० ६.०० ८० टक्के
३. कमी बल ३०० ६.०० ८० टक्के
क) बाजूने चालणारा किंवा भारी तव्याचा नांगर
१. जास्त बल ६०० ६.०० ८० टक्के
२. मध्यम बल ४५० ६.०० ८० टक्के
३. कमी बल ३०० ६.०० ८० टक्के
ड) पंजाचा कल्टिवेटर
१. जास्त बल ४५० ६.०० ८० टक्के
२. मध्यम बल ३०० ६.०० ८० टक्के
३. कमी बल १५० ६.०० ८० टक्के
इ) पेरणीची पाभर तिन्ही बल १५०, ९०, ५० ५.०० ७० टक्के
ई) पेरणीयंत्र तिन्ही बल १५०, ९०, ५० ५.०० ७० टक्के
फ) चिखलणी यंत्र तिन्ही बल १७५, १५०, १२० ५.०० ७० टक्के
ओढण्याची शक्ती ही इतर घटकांवर अवलंबून असते. उदा. मातीचा प्रकार, परिस्थिती, कामाचा वेग, टायरचा आकार, ट्रॅक्टरवरील वजन इ. परंतु ट्रॅक्टरची अश्वशक्ती सांगण्यासाठी वेगळ्या अश्वशक्ती एककाचा वापर केला जातो. पी. टी. ओ. अश्वशक्ती या अश्वशक्तीवर नमूद केलेल्या घटकांचा परिणाम होत नाही. (पी. टी. ओ. म्हणजे ट्रॅक्टरच्या पाठीमागे असणारा एक आस (शाफ्ट) ज्यांच्याद्वारे मळणीयंत्र, रोटाव्हेटर किंवा पंप चालविता येतो.)
ओढण्याची शक्ती आणि पी. टी. ओ. शक्ती यांच्यातील सर्वसाधारण संबंध तक्ता - २ मध्ये दाखविला आहे. त्यावरून पी. टी. ओ. अश्वशक्ती काढता येईल.
अ. नं. मातीचा प्रकार जास्तीत जास्त पी.टी.ओ.
अश्वशक्तीचे ओढशक्तीशी गुणोत्तर
१. कडक जमीन १ः१५
२. मशागत झालेली माती १ः१८
३. मऊ माती १ः२१
क) हॉर्सपॉवरची मर्यादा माहिती असल्यानंतर ट्रॅक्टर निवडीसाठी इतर निकष
गिअरची संख्या
गिअरची संख्या जास्त असावी. तसेच प्रत्येक गिअरने मिळणाऱ्या वेगात योग्य फरक असावा. म्हणजेच ट्रॅक्टरची अवजारे ओढण्याच्या ताकदीमधील काही ताकद जास्त वेगानेसुद्धा मिळू शकते.
उदा. ‘अ’ आणि ‘ब’ हे दोन ट्रॅक्टर आहेत. त्यातील ‘अ’ ट्रॅक्टरला चार गिअर असून, ‘ब’ ट्रॅक्टरला तीन गिअर आहेत. त्याच्या ताकदीच्या केलेल्या चाचणीतून मिळालेली निरीक्षणाच्या आधारावर काढलेले निष्कर्ष पुढील प्रमाणे...
ट्रॅक्टर ‘अ’ मध्ये जास्त गिअर असल्यामुळे ट्रॅक्टरच्या ओढ शक्तीच्या मर्यादेत आपण जास्त वजन जास्त वेगाने ओढू शकतो. त्यामुळे ट्रॅक्टर ‘अ’ हा ‘ब’ पेक्षा चांगला ठरतो.
ट्रॅक्टर वापराचा खर्च :
डिझेलच्या किमती वाढतच चालल्या आहे. अशा स्थितीमध्ये कमी इंधनावर चालणारा ट्रॅक्टर केव्हाही सरस. यामुळे भारतीय मानक संस्थेने इंधन खर्चाच्या काही मर्यादा घातलेल्या आहेत. ही मर्यादा ट्रॅक्टरच्या पी. टी. ओ. शक्तीवरून ठरते. ही मर्यादा १०० ग्रॅम / हॉ. पॉ. / तास - ५० हॉ. पॉ.च्या ट्रॅक्टरसाठी ठरलेल्या आहेत.
देखभाल, दुरुस्तीचा खर्च :
काही वेळा ट्रॅक्टर कमी इंधन खात असला तरी त्याच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी लागणारा खर्च जास्त असू शकतो. त्यामुळे सर्व बाजूंनी व्यवस्थित पडताळणी करून निर्णय घ्यावा. ट्रॅक्टरच्या मोठ्या दुरुस्त्या साधारणतः २००० ते ३००० तास वापरानंतर कराव्या लागतात. तेव्हा यावेळेपर्यंत लागणाऱ्या इंधनाचा व देखभालीचा खर्च आणि पुढे काही काळानंतर करावयाच्या दुरुस्तीचा खर्च या दोन्ही बाबी एकत्रित विचार करावा. आपल्याला आवश्यक त्या एच पी श्रेणीमधील सर्व ट्रॅक्टरची माहिती तुलनात्मक मांडून पाहिल्यास एकाच नजरेत कोणता ट्रॅक्टर चांगला ते समजू शकते.
इतर क्षुल्लक वाटणाऱ्या, पण महत्त्वाच्या गोष्टी :
जर ट्रॅक्टर चिखलणीसाठी वापरला जाणार असेल तर ट्रॅक्टरचे क्लच बॉक्स, डिफरन्शियल इ. पूर्ण जलरोधक (वॉटरप्रूफ) असावेत. इंजिन किंवा गिअर बॉक्समध्ये पाणी जाणार नाही, अशी व्यवस्था ट्रॅक्टरमध्ये असावी.
ड्राफ्ट कंट्रोल प्रणाली : नांगरणीसारखी अवजड कामे करताना, अवजाराची खोली एकसारखी ठेवून ताकद कमी जास्त करणाऱ्या हायड्रॉलिक प्रणालीपेक्षा ताकद कायम ठेवून अवजाराची खोली कमी जास्त करणारी प्रणाली केव्हाही चांगली! त्यामुळे आपले अवजार आणि ट्रॅक्टर दोघांनाही सुरक्षा लाभते. मात्र पेरणीसाठी पोझिशन कंट्रोल प्रणाली उपयोगी ठरते, ज्यामुळे अवजाराची खोली एकसारखी ठेवून बिया एका पातळीत मातीत टाकता येतात.
आवाजाचे प्रदूषण टाळण्यासाठी जागतिक कामगार संघटनेने आवाजाची मर्यादा ८५ ते ९० डेसिबल्स एवढी ठरविली आहे. ट्रॅक्टरचा आवाज ड्रायव्हरच्या कानाजवळ या मर्यादेपेक्षा कमी असावा. म्हणजे चालकाला थकवा येत नाही.
वळण घेण्यासाठी कमी जागा लागणे : यामुळे प्रत्येक सरीच्या शेवटी वळणे घेताना कमी वेळ लागतो. ट्रॅक्टरची एकूण काम करण्याची कार्यक्षमता वाढते.
ट्रॅक्टर चालविताना तो चालकासाठी आरामदायक असावा. वेगवेगळ्या लिव्हर, मीटर, बटण यांच्या योग्य जागा तसेच कमीत कमी व्हायब्रेशन आवश्यक असते.
ट्रॅक्टरच्या चाचणीचे अहवाल उपयुक्त :
मध्य प्रदेशातील बुदनी येथे केंद्रीय कृषी यंत्रे प्रशिक्षण आणि तपासणी संस्था असून, ती ट्रॅक्टरच्या सर्व मॉडेलची तपासणी वेळोवेळी करत असते. त्यात ट्रॅक्टरच्या सर्व भागाच्या प्रयोगशाळेत व शेतात चाचण्या घेतल्या जातात. त्याचे अहवाल संस्थेमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असतात. त्यांच्याकडून किंवा ट्रॅक्टर विक्रेत्याकडून हे अहवाल मागवून घ्यावेत. त्याची बाजारातील अन्य ट्रॅक्टरसोबत तुलना करावी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.