फुले ऊस १५०१२ Agrowon
टेक्नोवन

Sugarcane Variety : फुले ऊस १५०१२ : अधिक साखर उतारा देणारी ऊस जात

Sugarcane Production : फुले ऊस १५०१२ या जातीची सुरू, पूर्वहंगामी आणि आडसाली हंगामासाठी शिफारस करण्यात आली आहे. या जातीचा ऊस जाड असून कांड्या सरळ आहेत. पाण्याचा ताण सहन करणारी आणि न लोळणारी जात आहे. ही जात फुले २६५ एवढे उत्पादन देणारी आहे.

Team Agrowon

डॉ. राजेंद्र भिलारे, डॉ.सुरेश उबाळे, डॉ.सूरज नलावडे

Flower Sugarcane 15012 : फुले ऊस १५०१२ ही मध्यम पक्वता गटातील अधिक उत्पादन देणारी, साखरेचे प्रमाण अधिक असणारी, पाण्याचा ताण सहन करणारी, रसवंतीस योग्य तसेच फुले २६५ प्रमाणेच चोपण जमिनीत येणारी जात आहे.

पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने २०२२ मध्ये ही जात प्रसारित केली. फुले ऊस १५०१२ या जातीची निर्मिती फुले २६५ (अधिक ऊस उत्पादन) आणि को ९४००८ (अधिक साखर उतारा) यांच्या संकरातून झालेली आहे. या जातीची सुरु, पूर्वहंगामी आणि आडसाली हंगामात पश्‍चिम महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे.

फुले ऊस १५०१२ या मध्यम पक्वता गटातील जातीचे ऊस उत्पादन, प्रचलित ऊस जात को ८६०३२ या जातीपेक्षा १६ टक्के आणि साखर उत्पादन १५.५१ टक्के अधिक मिळाले. फुले २६५ जातीबरोबर तिन्ही हंगाम आणि खोडव्याची सरासरीची तुलना केली असता उत्पादन जवळपास फुले २६५ एवढे मिळाले.

तसेच साखर उत्पादनात ६ टक्के वाढ दिसून आली. उसातील व्यापारी शर्कराचे प्रमाण हे को ८६०३२ पेक्षा ०.४० युनिट अधिक आणि फुले २६५ पेक्षा ०.८० युनिटने अधिक आहे. साखर कारखान्यांना अधिक साखर उतारा देणारी आणि फुले २६५ एवढे उत्पादन देणारी ही जात आहे.

फुले ऊस १५०१२ जातीची वैशिष्ट्ये :

१) सुरू, पूर्वहंगामी आणि आडसाली या हंगामासाठी शिफारस.

२) ऊस जाड असून कांड्या सरळ आहेत. कांड्यावर मेणाचा थर आहे.

३) पाण्याचा ताण सहन करणारी आणि न लोळणारी जात असल्यामुळे सध्याच्या परिस्थितीला उत्तम प्रतिसाद देऊ शकते.

४) तुरा अल्प प्रमाणात व उशिरा येत असल्याने जास्त पाऊस काळ असल्यास किंवा जास्त पावसाच्या प्रदेशात कमी तुरा आल्यामुळे इतर जातींपेक्षा उत्पादनात वाढ.

५) पाने मध्यम रुंद आणि सरळ असल्याने बाष्पीभवन कमी होऊन पाण्याचा ताण सहन करते.

६) पानावर किंवा पानाच्या टोपणावर कूस नाही, त्यामुळे ऊस तोडताना त्रास होत नाही. वाढे म्हणून जनावरास त्रासदायक नाही.

७) खोडवा उत्तम असल्याने व साखर कारखान्यांनी गाळप क्षमता वाढविल्यामुळे येत्या काळात या जातीला वाढती मागणी.

८) चाबूक काणी रोगास प्रतिकारक, लालकुज व काणी रोगास मध्यम प्रतिकारक.

९) खोड कीड, कांडी कीड, शेंडे कीड आणि खवले किडीस कमी प्रमाणात बळी पडते. साखरेचे प्रमाण अधिक असल्याने मिलीबग किडीस काही प्रमाणात बळी पडते.

१०) चोपण जमिनीत उत्तम उगवण आणि उत्पादन. रसवंतीसाठी उत्तम जात.

अ) द्वीपकल्पीय विभाग चाचणी :

१) अखिल भारतीय पातळीवरील द्वीपकल्पीय विभाग चाचणीत दक्षिण भारतातील केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, छत्तीसगड, मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातील एकूण दहा वेगवेगळ्या संशोधन केंद्रावर फुले ऊस १५०१२ या जातीची २०२०-२१ वर्षात विविध चाचण्या घेण्यात आल्या. या चाचणीमध्ये फुले ऊस १५०१२ जातीचे सुरू हंगामात ऊस आणि साखरेचे हेक्टरी उत्पादन को ८६०३२ जातीपेक्षा ६.१० टक्के आणि ५.५३ टक्के अधिक मिळाले. साखर उतारा को ८६०३२ जाती इतकाच मिळाला.

फुले ऊस १५०१२ जातीचे द्वीपकल्पीय विभाग चाचणीत सुरू हंगामातील उत्पादन

वर्ष ---चाचणी ठिकाण--- हेक्टरी उत्पादन (टन)--- हेक्टरी साखर

उत्पादन (टन)--- व्यापारी शर्करा (टक्के)--- सुक्रोजचे प्रमाण (टक्के)

-------फुले ऊस १५०१२---को ८६०३२---फुले ऊस १५०१२---को ८६०३२---फुले ऊस १५०१२--- को ८६०३२---फुले ऊस १५०१२---को ८६०३२

२०२१--- १०---१४०.४६--- १३२.३९--- १९.०४---१८.०४---१३.५७---१३.७७---१९.५५--- १९.६९

ब) बहुस्थानिय चाचणी

१) लागण उसाचे उत्पादन :

१) फुले ऊस १५०१२ या ऊस जातीचे सरासरी आडसाली उसाचे हेक्टरी उत्पादन १८३ टन, पूर्व हंगामामध्ये १६३ टन आणि सुरूमध्ये १३७ टन उत्पादन मिळाले.

२) टक्केवारीनुसार आडसाली, पूर्व हंगाम व सुरु हंगामात अनुक्रमे को ८६०३२ या जातीपेक्षा १६.५५ टक्के, १४.७२ टक्के आणि ४.७५ अधिक उत्पादन मिळाले.

३) फुले २६५ जातीशी तुलना केली असता आडसाली व पूर्व हंगामामध्ये ४ टक्के अधिक ऊस उत्पादन मिळाले.

४) साखर उत्पादन आडसाली, पूर्वहंगामी व सुरु हंगामात अनुक्रमे को ८६०३२ जातीपेक्षा १४.१९ टक्के, १३.७७ टक्के आणि ५.९३ अधिक मिळाले. फुले २६५ जातीशी तुलना केली असता आडसाली, पूर्व हंगाम व सुरु हंगामामध्ये या नवीन जातीचे साखर उत्पादन ७.५१ टक्के, ७.३२ टक्के आणि २.१० टक्के अधिक मिळाले.

२) लागण ऊस अधिक खोडवा ऊस उत्पादन :

१) फुले ऊस १५०१२ जातीचे आडसाली, पूर्वहंगामी व सुरु हंगामामध्ये हेक्टरी अनुक्रमे १६४ टन, १५६ टन आणि १३० टन उत्पादन मिळाले.

२) तिन्ही हंगामामधील खोडव्याचे सरासरी हेक्टरी उत्पादन १३० टन मिळाले. प्रचलित को ८६०३२ जातीच्या उत्पादनाशी तुलना केली असता नवीन जातीचे ऊस उत्पादन आडसाली, पूर्वहंगामी, सुरु आणि खोडव्यामध्ये अनुक्रमे १३.३६ टक्के, ११.६८ टक्के, ७.६९ टक्के आणि ८.० टक्के अधिक मिळाले.

३) फुले २६५ या जातीच्या उत्पादनाशी तुलना केली असता नवीन जातीचे ऊस उत्पादन आडसालीमध्ये २.४४ टक्के आणि पूर्व हंगामात २.६१ टक्के अधिक मिळाले.

३) साखर उत्पादन :

१) फुले ऊस १५०१२ या जातीचे साखर उत्पादन आडसाली, पूर्व हंगाम व सुरु हंगामात अनुक्रमे को ८६०३२ या जातीपेक्षा १३.०४ टक्के, १५.४७ टक्के आणि ९.०६ अधिक मिळाले.

२) फुले २६५ जातीची तुलना केली असता आडसाली, पूर्व हंगाम व सुरु हंगामात नवीन जातीचे साखर उत्पादन ६.३४ टक्के, ७.९८ टक्के आणि ३.८७ टक्क्यांनी अधिक मिळाले.

३) सुक्रोज आणि व्यापारी शर्करा टक्केवारीचा विचार करता लागवड ऊस अधिक खोडवा या चाचण्यांमध्ये फुले ऊस १५०१२ या जातीचे उसातील सुक्रोजची टक्केवारी आडसाली २०.५० टक्के, पूर्वहंगामी २०.४२ टक्के, सुरु २०.२७ टक्के आणि खोडवा उसात २०.०२ टक्के आहे. त्याचप्रमाणे व्यापारी शर्करा टक्केवारी आडसाली १४.६ टक्के, पूर्वहंगामी १४.४ टक्के, सुरु १४.५ टक्के आणि खोडवा उसात १४.१ टक्के मिळालेली आहे. को ८६०३२ जातीपेक्षा व्यापारी शर्करा ०.४ युनिटने आणि फुले २६५ पेक्षा ०.८ युनिटने जास्त मिळाली.

४) हेक्टरी ऊस संख्या आणि एका उसाचे वजन :

१) फुले ऊस १५०१२ जातीमध्ये हेक्टरी ऊस संख्या आडसालीमध्ये १,१०,९५०, पूर्व हंगामीमध्ये १,०१,८४०, सुरूमध्ये ९१,६३० आणि खोडव्यामध्ये ९९,७६० एवढी मिळाली. उसाचा सरासरी व्यास ३ ते ३.१५ सेंमी आहे.

एका उसाचे वजन १.७५० किलो ते १.८१० किलो मिळते. हे वजन को ८६०३२ जातीच्या उसाच्या वजनाच्या १५ टक्क्यांनी अधिक आहे. यामुळे निश्चितच अपेक्षित उत्पादन हे को ८६०३२ जातीपेक्षा जास्त मिळत आहे.

इन्फो :

क) शेतकऱ्यांच्या शेतावरील प्रात्यक्षिके :

शेतकऱ्यांच्या शेतावरील वीस प्रात्यक्षिकांमध्ये अनुक्रमे पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, नगर आणि मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यामध्ये फुले ऊस १५०१२ या जातीची प्रात्यक्षिके घेण्यात आली.

१) सुरू हंगामातील सरासरी ऊस उत्पादन हेक्टरी १३५.९८ टन मिळाले. को ८६०३२ जातीपेक्षा १९ टक्के अधिक मिळाले. सर्वाधिक उत्पादन हेक्टरी १५६.३८ टन मिळाले.

फुले ऊस १५०१२ जातीचे शेतकऱ्यांच्या शेतावर सुरू हंगामात प्रात्यक्षिकामधील उत्पादन (टन)

प्रात्यक्षिकांची संख्या ---फुले ऊस १५०१२---को ८६०३२---को ८६०३२ पेक्षा वाढ (टक्के)

२०--- १३५.९८--- ११३.९९---१९.२९

अधिक उत्पादन ---१५६.३८--- १३२.६५---१७.८९

संपर्क : डॉ. राजेंद्र भिलारे, ८२७५४७३१९१

(मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, ता.फलटण, जि.सातारा )

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT