डी. ब्लेज, ए. मणिकंडन, आर. एम. रामटेके, रोहित कटियार
Cotton Weed Management : कापूस हे भारतातील सर्वांत महत्त्वाचे नगदी पीक असून, कृषी व औद्योगिकदृष्ट्याही महत्त्वाचे आहे. या पिकावर सुमारे ६० लाख शेतकरी उपजीविकेसाठी अवलंबून असून, अप्रत्यक्षरीत्या ६ ते ७ कोटी लोकांना रोजगार उपलब्ध होतो. मात्र कापूस पिकाची सुरुवातीची वाढ अत्यंत मंद असल्यामुळे या काळातील तण नियंत्रण मोठे आव्हानात्मक ठरते. या व्यतिरिक्त, भारतीय शेतीमधील काही आक्रमक आणि हानिकारक तणे (उदा. लव्हाळा, रेशीम काटा इ.)
नियंत्रित करणे फार कठीण आहे. यामुळेच केवळ एकाच उपाययोजनेवर अवलंबून राहण्यापेक्षा एकात्मिक तण व्यवस्थापनाची अवलंब करणे आवश्यक ठरत आहे. यातीलच एक महत्त्वाची उपाययोजना म्हणजे कपाशी पिकामध्ये आंतरपिकांची वाढ करून आच्छादन करणे शक्य आहे. या पद्धतीने तणे कमी करण्यासंदर्भात आम्ही कपाशीमध्ये बोरू आणि तीळ या आंतरपिकाचा समावेश करून काही प्रयोग केले होते. त्याचे निष्कर्ष उत्तम मिळालेले आहेत.
तणांचे तोटे
खरिपामध्ये (पावसाळ्यात) कपाशी हे पीक घेतले जात असून, त्यात जास्त प्रमाणात तणे वाढतात. त्यांचे वेळीच नियंत्रण न केल्यास पिकाच्या उत्पादनात लक्षणीय घट होते. जमिनीतील पोषक द्रव्ये आणि मातीची आर्द्रता यांचा मोठा भाग तण शोषून घेतात. पिकावर थेट परिणाम करणाऱ्या तणांमुळे होणारे नुकसान खालीलप्रमाणे...
पीक उत्पादनावर व त्याच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो.
जमिनीतील ओलावा कमी होतो.
तणे कीटक आणि रोगांना आश्रय देतात.
कृषी उपकरणे, यंत्रे आणि जनावरे यांच्या कार्यक्षमतेत घट होते.
कपाशी पिकातील प्रमुख तणे
कोणत्याही क्षेत्रातील तण हे त्या भागातील हवामान आणि पीक पद्धतीवर अवलंबून असते. तथापि, नागरमोथा, अर्थात लव्हाळा (सायपरस रोटुनड्स), रेशीम काटा (अल्टरनेथेरा पेर्निकोइड्स), जंगली धान अथवा सावा (इचिनोक्लोआ कोलोना) आणि आघाडा (अकरॅन्थस एस्पेरा) या तणांच्या मुख्य प्रजाती आहेत.
गवत प्रजातीचे तण : जंगली धान अथवा सावा (इचिनोक्लोआ कोलोना), फुटानेगवत (उरोक्लोआ प्लांटिजेनिया)
रुंद पाने असलेले तण : जंगली बोरू (क्रोसेरस ट्रायक्लोरिस), रेशीम काटा (अल्टरनेथेरा पारनिकोइड्स), एकदांडी (ट्रायडॉक्स प्रोकम्बेन्स), जंगली पुदीना (ॲझर्नेटम कोनिझिडिस), कुंजर (डिझारा मुरीकाटा),
मोथा : मोथा (सायपरस एरिया), नागरमोथा (सायपरस रेडियंटस) इ.
तण व्यवस्थापन पद्धती
तणांचे नियंत्रण खुरपणी करून देखील केले जाऊ शकते, परंतु मजुरांचा तुटवडा व वाढती मजुरी यामुळे अडचणी निर्माण होतात. त्याच प्रमाणे अलीकडे तण व्यवस्थापनासाठी कृषी यंत्रे किंवा तणनाशकांचा वापर वाढत चालला आहे. यातील यांत्रिक साधनांच्या मर्यादित कार्यक्षमता ही समस्या जाणवते. काही मोठे शेतकरी तणांच्या नियंत्रणासाठी तणनाशकांचाही वापर करतात. मात्र त्याच्या अतिवापरामुळे पर्यावरणावर, माणसांच्या, प्राण्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. जमिनीच्या संरचनेवरसुद्धा व जैवविविधतेवर विपरीत परिणाम होतात.
शिवाय यातून कपाशीच्या उत्पादन खर्चात वाढ होत आहे. ही होणारी वाढ सुमारे ६ दशलक्ष लहान आणि सीमांत कापूस शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर चालली आहे. म्हणून, तण नियंत्रणासाठी पीक पद्धतीमध्ये ॲलेलोकेमिकल गुणधर्मांसाठी ओळखल्या जाणाऱ्या आंतरपिकाचा समावेश ही एक उत्कृष्ट पद्धत म्हणून ओळखली जाते. कारण या पिकातील ॲलेलोकेमिकल्स ही तणांना प्रतिबंधाचे काम करतात. या आंतरपिकाच्या सोबतच पिकांच्या अवशेषांचे आच्छादन करून तण नियंत्रणासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
केलेला प्रयोग व त्याची गृहीतके
आम्ही प्रयोगामध्ये ॲलेलोकेमिकल संयुगे तयार करणाऱ्या बोरू आणि तीळ या आंतरपिकाच्या कपाशीमध्ये समावेश करून काही गृहीतकांची चाचणी केली.
संभाव्य ॲलेलोपॅथिक क्रियाकलाप असलेल्या पीक वनस्पती कापूस ओळींमध्ये वाढल्या जातात, त्यावेळी त्या प्रभावी तण नियंत्रण देऊ शकतात. हानिकारक तणांचा प्रादुर्भाव कमी करू शकतात.
आंतरपीक घेतल्यामुळे तणांचा दबाव कमी होऊन कपाशी उत्पादन वाढण्यास मदत होते.
आंतरपीक वाढविल्याने सामान्यतः तितक्याच उत्पादन खर्चात नफा वाढतो. आंतरपीक हा किफायतशीर मल्चिंगचा पर्याय म्हणूनही उपयोगी ठरते. ते तण नियंत्रणासोबतच जमिनीसाठीही फायदेशीर ठरते.
बोरू (सनहेम्प) आणि तिळाच्या आंतरपिकांमधील संभाव्य ॲलेलोकेमिकल्सचा जांभळ्या मोथ्यावर (लव्हाळा) प्रतिबंधात्मक प्रभाव असल्याचे दिसून आले आहे.
आंतरपिकांची पेरणी आणि आच्छादन
कपाशीची पेरणी झाल्यानंतर ३० दिवसांनीच आंतरपीक पेरणी सुरू करता येते. बोरू हे पीक अतिशय वेगाने वाढणारे आहे, म्हणून त्याची पेरणी ३०-४५ दिवसांनी केली जाते. तीळ पिकाची पेरणी ३० दिवसांनी केली जाते. आंतरपिकाचे बायोमास पेरणीनंतर ४५-७० दिवसांनी कापून त्याचे जमिनीच्या पृष्ठभागावर आच्छादन केले जाते. बोरू आणि तीळ या आंतरपिकांच्या आच्छादनामुळे फिनोलिक्स आणि टेरपेनॉइड ॲलेलोकेमिकल्स बाहेर पडतात. या घटकांमुळे तणांच्या बिया निष्क्रिय केल्या जातात.
परिणामी तणांची घनता कमी होते. बोरू या आंतरपिकामध्ये तण काढण्यापूर्वी तणांची घनता आणि त्याचे बायोमास मोजले गेले, त्या काळात तणांची घनता जास्त होती. तथापि, कपाशीच्या ओळींमध्ये सनहेम्प आणि तीळ आंतरपीक पेरल्यानंतर आणि आच्छादन केल्यानंतर, आंतरपीक प्लॉटमध्ये तणांची घनता सातत्याने ४३ टक्क्याने कमी झाली. बोरू या आंतरपिकामध्ये नटसेजचे (मोथ्याचे/लव्हाळाचे) प्रमाण नगण्य होते, तर तीळ आंतरपिकामध्ये ते काहीसे कमी होते. सर्वसाधारणपणे, आंतरपीक घेतल्या कपाशीमध्ये एकदल आणि द्विदल तणांची संख्या ही आंतरपीक न घेतलेल्या कपाशी शेताच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी होती.
आंतरपीक / आच्छादनाच्या परिणामामुळे नियंत्रण झालेली तणे
बोरू / ताग : सावा (इचिनोक्लोआ कोलोना), नागरमोथा/लव्हाला (सायपरस रॅडंटस)
तीळ : रेशीम काटा (अल्टरनेन्थेरा पारनिकोइड्स)
आंतरपिकांमध्ये बोरू घेतल्यास प्रामुख्याने नागरमोथा / लव्हाळा आणि रेशीम काटा या तणांचे प्राबल्य कमी होते. आंतरपीक न घेतलेल्या कपाशीचे उत्पादन सर्वांत कमी मिळाले, तर बोरू आंतरपीक घेतलेल्या प्रक्षेत्रामध्ये कपाशीचे उत्पादन सर्वाधिक मिळाले.
आंतरपिकामुळे नागरमोथा / लव्हाळा कमी होण्याची मुख्य कारणे
तणांवर आंतरपिकांची सावली पडणे.
आंतरपिकांमधून ॲलेलोकेमिकल्स सोडणे.
वाढीच्या स्रोतांसाठी स्पर्धा होणे.
निष्कर्ष
कपाशीच्या ओळींमध्ये आंतरपीक वाढवून तणांचे व्यवस्थापन केले जाऊ शकते. विशेषतः हानिकारक, आक्रमक आणि आधी येणारी तणे कमी करण्यासाठी आंतरपिके उपयुक्त ठरतात. दीर्घकालीन विचार केल्यास तणनाशकांचा वापर कमी करण्याची क्षमता त्यात आहे. बोरूसारख्या पिकामध्ये ॲलेलोकेमिकल संयुगे सोडण्याबरोबरच जमिनीत वातावरणातील नत्र स्थिरीकरण करण्याचीही क्षमता आहे. त्याचा फायदा जमिनीची सुपीकता पीक उत्पादन वाढण्यासाठी होतो.
बडीशेप, मेथी आणि तीळ या आंतरपिकांमधील
संभाव्य ॲलेलोकेमिकल्सचा नागरमोथा/लव्हाळा
याचा प्रतिबंधात्मक प्रभाव असल्याचे दिसून येते.
आंतरपीक पद्धतीमध्ये तिळाचा समावेश केल्याने मोथा / लव्हाळा ची समस्या कमी झाली.
बोरू आणि तीळ यांसारख्या पुरेशा प्रमाणात बायोमास असलेल्या आंतरपिकांमधून काढलेल्या ॲलेलोकेमिकल्सच्या उच्च स्रोतांद्वारे प्रभावी तण नियंत्रण मिळवता येते. परिणामी, हानिकारक आणि आक्रमक तण कमी केले जाऊ शकतात.
आंतरपिके तणांची घनता कमी करण्यात महत्त्वाची ठरतात.
सावा (इचिनोक्लोव्हा कोलोना), लव्हाळा (सायपरस रेडियंटस) आणि रेशीम काटा (अल्टरनेथेरा पेर्निकोइड्स) या वेगाने वाढणाऱ्या तणांची समस्या बोरू, तीळ यांच्या आंतरपीक, आच्छादनातून कमी करणे शक्य आहे.
आंतरपीक घेण्याची गरज का?
• आंतरपिके घेतल्याने तणांचा त्रास कमी होतो.
• आंतरपिकांचे अवशेष जमिनीची भौतिक स्थिती सुधारतात.
• काही आंतरपिकांमध्ये जास्त प्रमाणात फिनॉलिक्स आणि टेरपेनॉइड्स हे घटक आढळून आले आहेत. त्यात तणांच्या बियाण्यांची उगवणक्षमता आणि वाढ रोखण्याची क्षमता असते.
• आंतरपीक एखाद्या विशिष्ट तण प्रजातीच्या वाढ दडपण्यासाठी किंवा सुलभ करण्यासाठी वापरले जाऊ शकते.
• आंतरपीक घेतल्याने शेतीतील जोखीम कमी होते. नफ्याचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
- आर. एम. रामटेके, ९०९६२२१४४३, तांत्रिक साहाय्यक, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.