Organic Farming Technique: कोल्हापूर ते गगनबावडा रस्त्यालगत असलेल्या म्हाळुंगे (ता. गगनबावडा) गावशिवारात नारायण महादेव पाटील यांची कुंभी नदीकाठी सहा एकर ऊस शेती आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील इतर भागांच्या तुलनेत हा भाग डोंगराळ आणि हलक्या जमिनीचा आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात उसाचे एकरी उत्पादन ९० ते १०० टनांपर्यंत मिळते, पण गगनबावडा तालुक्यात मात्र एकरी पंचवीस टनांपर्यंत उत्पादन निघणे मुश्कील आहे.
या तालुक्यात पावसाचे मोठे प्रमाण आहे. यामुळे जून ते ऑक्टोबरपर्यंत तालुक्यात सूर्यदर्शन होणे अवघड असते. पुरेसा सूर्यप्रकाश नसल्याने उसाची वाढ खुंटते, याच बरोबर पुराचाही फटका बसतो. तुकड्याने शेती असल्याने मशागतीलाही मर्यादा येतात. जमीन हलक्या प्रकारची असल्यामुळे अपेक्षित उत्पादन फारसे येत नाही. अशा स्थितीतही सुधारित पद्धतीने लागवड, बेणे बदल, माती परीक्षणानुसार खतमात्रा आणि पाचटाचे योग्य व्यवस्थापन करून नारायण पाटील यांनी ऊस उत्पादनात सातत्य राखले आहे.
तीन भावांची एकत्रित शेती नारायण पाटील सांभाळतात. त्यांचे बंधू लक्ष्मण हे कोदे गावातील चार एकर शेतीचे नियोजन पाहतात. पाटील यांच्याकडे चार ट्रॅक्टर आहेत. मुलगा रणजित आणि पुतण्या अमर हे ट्रॅक्टर मशागतीची कामे करतात. त्यातून पाटील कुटुंबाने उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत तयार केला आहे.
गेल्या चाळीस वर्षांपासून नारायण पाटील हे ऊस शेतीमध्ये आहेत. हलकी जमीन, प्रतिकूल हवामान तसेच अडीच फुटी सरीमध्ये पारंपरिक पद्धतीने ऊस लागवड असल्याने एकरी केवळ १५ ते २० टन उत्पादन यायचे. हा ऊस पाटील स्वतःच्या गुऱ्हाळासाठी वापरायचे. पंधरा वर्षांपासून नारायण पाटील यांनी शेतीत बदल केले. लावण करताना मांडणी नीट न केल्याने एकरी १६ हजार कांड्या ऊस लागायचा आता हे प्रमाण १० हजारांवर आले आहे. सुरू हंगामात ऊस लागणीसाठी को-८६०३२, फुले २६५ या जातींवर भर आहे. दर पाच वर्षांनी बेणे बदल केला जातो. यंदा २० गुंठ्यावर फुले २६५ जातीचा बेणे प्लॉट केला आहे.
ऊस लागणीबाबत पाटील म्हणाले, की बेणे प्रक्रियाकरून लागण केली जाते. सरीतील अंतर चार फुटांपर्यंत वाढवले आहे. नदीकाठ असल्याने पाण्याची टंचाई नाही. पूरस्थितीमुळे ठिबक सिंचन बसवले नाही. पिकाच्या जोमदार वाढीसाठी माती परीक्षणाच्या शिफारशीनुसार खत मात्रा दिली जाते. या सर्व व्यवस्थापनात पाचटाचे आच्छादन महत्त्वाचे ठरले. शेतात सलग पाचट ठेवल्याने खोडव्याबरोबर नव्या लागणीलाही फायदा झाला. यामुळे एकरी वीस टनांवरून चाळीस टनांपर्यंत वाढ झाली. पाचटाचे महत्त्व ओळखून मी गेल्या पंधरा वर्षांपासून सहा एकरांत लावणीनंतर खोडवा, बेडवा आणि निडवा अशी चार पिके घेतो. यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही समाधानकारक ऊस उत्पादन वाढीचा टप्पा राखला आहे.
पाचट व्यवस्थापन
पाचट व्यवस्थापनाबाबत पाटील म्हणाले, की ऊस तुटल्यानंतर पाचट सरीत ओढले जाते. एक सरी आड एक पाचट ठेवले जाते. भोंड्यावर शिल्लक असलेल्या उसाची छाटणी केली जाते. यानंतर एक सरी आड पाणी दिले जाते. यामुळे पाण्याचे प्रमाण आणि वेळेत बचत होते. प्रत्येक सरीला पाणी द्यायचे झाल्यास एकरी आठ ते दहा तास लागत होते. आता एक सरी आड पाणी दिल्याने चार तास लागतात. प्रत्येक पंधरा दिवसांनी पाण्याचा फेरा होतो.
पाचट असलेल्या सरीला पाणी दिले जात नसले तरी पाझरामुळे सरी ओलसर राहते. पाचट असल्याने या सरीतही वाफसा स्थिती चांगली राहते, यामुळे पाणी दिले नसलेल्या सरीतील देखील ऊस जोमदार राहतो. ऊस तुटून गेल्यानंतर सुमारे तीन महिन्यांत पाचट पूर्णपणे कुजते. जूनपर्यंत पाचट पूर्णपणे मातीमध्ये मिसळून जाते. या दरम्यान गांडुळे तयार होऊन जमीन भुसभुशीत बनते. यामुळे जमिनीच्या गुणवत्तावाढीसाठी इतर कोणतीही जादा खत मात्रा देण्याची गरज राहत नाही. जमीन भुसभुशीत असल्याने उसाची वाढ चांगली होते. पाचटामुळे जमिनीत सातत्याने गारवा राहतो. पुरामुळे जमिनीची फारशी धूप होत नाही. पंधरा दिवसाला कटाक्षाने पाणी देण्याचा क्रम असल्याने शेतीला पाण्याचा ताण पडत नाही.
प्रत्येक वर्षी सरीत बदल
लावणीनंतर खोडवा, त्यानंतर बेडवा आणि निडवा पीक घेतले जाते. या वेळी मात्र पाणी देण्याची सरी आणि पाचट ठेवण्याच्या सरीमध्ये बदल केला जातो. खोडव्याच्या वेळी ज्या सरीत पाचट होते ती सरी पाणी देण्यासाठी वापरली जाते आणि पाणी असलेल्या सरीत पाचट ठेवले जाते. यामुळे खोडवा, बेडवा आणि निडवा पिकांमध्ये सर्व शेतीला पाचटच्या उपयुक्ततेचा फायदा होतो. प्रत्येक वर्षी सरी बदल करीत पाणी आणि पाचटाचे योग्य नियोजन पाटील यांनी साधले आहे.
माती परिक्षणानुसार खतांचा वापर
उसाला माती परीक्षण आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने रासायनिक खताची मात्रा दिली जाते. ही खत मात्रा तीन टप्प्यांत दिली जाते. लावण, भरणी आणि पावसाळ्याच्या कालावधीत खते दिली जातात. या भागात शेणखत फारसे उपलब्ध नसते. परंतु पाचटापासून चांगले सेंद्रिय खत शेतातच तयार होत असल्याने रासायनिक खतांचे प्रमाण मर्यादित ठेवले जाते. भरणीच्या वेळी माती टाकून खत दिले जाते. पाचट आच्छादनामुळे रासायनिक खत वापरात पन्नास टक्के बचत झाल्याचे पाटील सांगतात.
खर्चात बचत
नारायण पाटील यांना लावणीसाठी जादा खर्च येतो. लावण तुटली की दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या पिकापर्यंत केवळ खत, पाणी व्यवस्थापन खर्च असतो. लावणीच्या वेळी नवीन बेणे, नांगरट आणि आंतरमशागतीचा खर्च पुढच्या तीन वर्षांत येत नाही. पाचटामुळे तणही फारसे उगवत नाही. थोडेफार तण आल्यास शिफारशीत तणनाशकांची फवारणी केली जाते. लावणीला संपूर्ण शेतीला पाणी द्यावे लागते. परंतु पुढील तीन पिकांत हे प्रमाण एक सरी आड आणले जाते. लावणीच्या तुलनेत खत, पाणी व्यवस्थापन आणि भांगलणीच्या खर्चात पन्नास टक्के बचत होत असल्याचा पाटील यांचा अनुभव आहे.
कृषी विभागाचे मार्गदर्शन
गेल्या पंधरा वर्षांपासून कृषी विभागाने गगनबावडा विभागात ऊस शेतीमध्ये पाचट अभियान राबवत शेतकऱ्यांच्यामध्ये जागृती सुरू केली. सुरुवातीला तीन वर्षे काहीसा प्रतिसाद कमी होता. परंतु पाचट ठेवल्यानंतर हळूहळू ऊस उत्पादन आणि जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होऊ लागल्याने शेतकरी आपोआपच पाचट जाळण्यापासून परावृत्त होत पाचट ठेवण्याकडे वळू लागले. सध्या म्हाळुंगेसारख्या छोट्या गावातील ऊस शेतीमध्ये सुमारे पन्नासहून अधिक एकरांवर पाचट ठेवले जाते. जमिनीची सुपीकता कायम राहत असल्याने शेतकरी स्वतःहून उसामध्ये पाचट राखत असल्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट यांनी सांगितले.
जमीन सुपीकतेवर भर
नारायण पाटील यांना लावणीच्या उसाचे एकरी चाळीस टनांपर्यंत उत्पादन मिळते. खोडवा, बेडवा पिकाचे उत्पादन ३५ टनांपर्यंत आणि निडवा पिकाचे उत्पादन ३३ टनांपर्यंत येते. लावण तुटून गेल्यानंतर उत्पादन खर्च कमी होत असल्याने खोडवा, बेडवा आणि निडव्याला उत्पादन थोडे कमी असले तरी ही पद्धत त्यांना फायदेशीर ठरते. पाचटाच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता कायम ठेवणे शक्य झाले आहे. यामुळे जमिनी टणक न बनता सुपीक बनल्याचा पाटील यांचा अनुभव आहे.
गगनबावड्यासारख्या उसासाठी प्रतिकूल असणाऱ्या भागातही प्रत्येक वर्षी खोडव्याचे एकरी ३५ टनांपर्यंतचे उत्पादन हे या भागाच्या तुलनेत समाधान देणारे असल्याचे पाटील सांगतात. इतर शेतकऱ्यांना ऊस शेतीत फारसे उत्पादन मिळत नसले तरी पाचटाचा योग्य वापर करीत उत्पादनात सातत्य राखण्याचे कौशल्य पाटील यांनी मिळविले आहे.
- नारायण पाटील ७२६१९३७८०७
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.