Modern Agricultural Technology:
माणसांच्या साह्याने हाताने केली जाणारी प्रतवारी
ज्या उत्पादनामध्ये एकापेक्षा अधिक घटकांचा किंवा निकषांचा विचार करावा लागतो, अशा ठिकाणी यंत्रांचा वापर करण्यामध्ये अनेक अडचणी येततात. उदा. फळे, भाज्या, अंडी यांसारख्या अन्न उत्पादनांची प्रतवारी बहुधा हातानेच केली जाते. प्रतवारी करणारा कुशल मजूर उत्पादनाच्या गुणवत्तेबाबत निर्णय घेत असल्याने त्याचे निरीक्षण, त्याचा अनुभव आणि कुशलता या गोष्टी संतुलित निर्णयासाठी महत्त्वाच्या असतात.
उत्पादनांच्या भौतिक दर्जाप्रमाणे प्रतवारी करताना अन्य काही छोट्या मोठ्या साधनांचा वापर केला जातो. उदा. डाळिंब आणि सफरचंदांच्या प्रतवारीसाठी रंगानुसार प्रतवारी करताना रंगीत कार्ड वापरले जातात. अशा कार्डमुळे फळे रंगाच्या आधारावर त्वरित वेगळी करतात.
फळांचा रंगामध्ये परिपक्वतेतील कमी अधिकपणा, रोग-किडींच्या प्रादुर्भावामुळे उमटलेल्या विविध रंगच्छटा, पृष्ठभागातील काही अपूर्णता इ. वैशिष्ट्ये दर्शविणाऱ्या ग्रेड्स तयार केल्या जातात. चेरीच्या आकाराची तुलना करण्यासाठी प्लॅस्टिकच्या गोलाकार रिंगा किंवा मॉडेल वापरले जातात. अंड्याचे अर्धपारदर्शक कवच अंधाऱ्या खोलीमध्ये शक्तिशाली प्रकाशासमोर फिरवले असता त्याची प्रतवारी करणे सोपे जाते.
केवळ डोळ्यांनी पाहून केल्या जाणाऱ्या अंड्याच्या प्रतवारीच्या तुलनेमध्ये प्रकाशाच्या साह्याने केली जाणारी प्रतवारी अधिक वेगाने करता येते. त्यातच कन्व्हेअर बेल्टने स्वयंचलितपणे पुढे जात असताना कामगार एका तासात हजारो अंड्यांची प्रतवारी ३ ते ४ दर्जाप्रमाणे करू शकतो.
हाताने प्रतवारीमधील समस्या व तोटे
कुशल आणि अधिक मनुष्यबळांची आवश्यकता असते. हंगामामध्ये मनुष्यबळांची उपलब्धता हीच मोठी समस्या असते.
माणसांच्या अनुभव आणि कुशलतेनुसार अचूकतेचे प्रमाण कमी जास्त राहते. त्यात अचूकता असेलच, याची खात्री नसते.
सलग एकसारखे काम करून माणसांना थकवा येऊन चुकीचे निर्णय होऊ शकतात. म्हणून सलग आणि फार अधिक काळ काम करणे शक्य होत नाही.
फळे आणि भाज्यांचे प्रतवारी करण्यासाठी खूप श्रम लागतात. परंतु तरीही भारतात आंबा, संत्री, किन्नो आणि भाज्या यांसारख्या फळांचे बहुतेक प्रतवारी हातानेच केले जाते.
यंत्राद्वारे प्रतवारी
धान्यांसाठी प्रतवारी यंत्रे सामान्यतः फिरकीची चाळणी, धान्य निवडणी आणि प्रतवारी यंत्र आणि सर्पिलाकार विलगक (स्पायरल सेपरेटर) या प्रकारची असतात.
फळे आणि भाज्यांसाठी प्रतवारी यंत्रे
फळे आणि भाज्यांसाठी त्यांच्या त्यांच्या गुण वैशिष्ट्यानुसार स्वतंत्र प्रतवारी यंत्रे विकसित करण्यात आली आहे. त्याचे सामान्यतः चार प्रकार पडतात. १) चाळणी, २) फिरणारे रूळ प्रतवारी यंत्र (रोलर ग्रेडर), ३) डायव्हर्जिंग बेल्ट ग्रेडर आणि ४) वेट ग्रेडर आहेत.
चाळण्या (स्क्रीन)
तांबे, स्टेनलेस स्टील किंवा प्लॅस्टिकपासून बनवलेल्या हलणाऱ्या चाळण्याच्या (व्हायब्रेटिंग स्क्रीन) मदतीने विविध प्रकारची फळे आणि भाज्यांची प्रतवारी केली जाते. यात कोणत्याही रासायनिक घटकांचा समावेश नाही. प्रतवारी करावयाची सामग्री हलणाऱ्या किंवा गोल फिरणाऱ्या चाळणीवर टाकली जाते. सुरुवातीला सर्वांत लहान सामग्री नंतर मध्यम आणि शेवटी सर्वांत मोठी सामग्री खाली पडण्यायोग्य छिद्रे असलेल्या चाळण्यांची रचना केलेली असते. त्यामुळे आकारानुसार त्या त्या विभागामध्ये फळे किंवा भाज्या खाली पडतात. उदा. अशी यंत्रणा सफरचंद, संत्री, किन्नो या सारख्या फळांसाठी आणि बटाटा, टोमॅटोसारख्या फळभाज्यांच्या प्रतवारीसाठी उपयोगी ठरते.
रुळाचे प्रतवारी यंत्र (रोलर ग्रेडर)
रोलर ग्रेडर प्रकारची यंत्रे जलद व अचूक काम करतात. फळ उद्योगात त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. प्रत्येक रोलर घड्याळाच्या उलट दिशेने फिरतो, त्यावर सोडले जाणारे प्रत्यके फळ सतत फिरत फिरत पुढे जाते. या दरम्यान त्याचे रोलरसोबत किमान घर्षण होते. तिरके ठेवलेल्या दोन रुळांमधील अंतर हे कमीपासून वाढत जाते. त्यामुळे आकारानुसार प्रतवारी वेगवेगळ्या कप्प्यामध्ये केली जाते.
अंतर वाढत जाणारे पट्टे प्रतवारी यंत्र (डायव्हर्जिंग बेल्ट ग्रेडर)
यात रुळांप्रमाणेच अंतर वाढत जाणाऱ्या व हलणाऱ्या पट्ट्यांचा (बेल्ट) वापर केला जातो. हे पट्टे हलताना वेगळे होतात. फळे पुढे अन्य पट्ट्यांमध्ये वाहून नेली जातात. दोन पट्ट्यांमधील अंतर हळूहळू आणि पद्धतशीरपणे वाढत असल्याने प्रवासामध्ये सुरुवातीला लहान फळे पट्ट्यांमधून खाली पडतात. त्यानंतर आकारानुसार एकेक फळ वेगवेगळ्या कप्प्यात पडत जाते.
रिळामधील अंतर वाढत जाणारी प्रतवारी यंत्रणा
(एक्सपांडिंग पिच रबर स्पूल साइझर)
या यंत्रात दोन बाजूंना दोन सर्पिलाकार खाचांमध्ये बसवलेले स्क्रू असतात. त्यांच्या दोन खाचांमधील अंतर हळूहळू वाढते. या खाचांमध्ये फिरणारे रबर किवा स्टीलचे रीळ जोडले जातात. जसजसे स्क्रू घड्याळाच्या दिशेने फिरतात, तसतसे रीळ पुढे ढकलले जातात. जेव्हा बटाटे अथवा कांद्यांची प्रतवारी करताना ते पट्ट्याच्या साह्याने यंत्रणेवर हळूहळू टाकले जातात. पुढे सरकणाऱ्या रीळसोबतच ती सामग्रीही पुढे सरकते. परंतु खाचेतील अंतर वाढत जात असल्याने आकारानुसार लहानापासून मोठ्यापर्यंत सामग्री खाली पडत जाते.
त्यामुळे लहान, मध्यम आणि मोठ्या आकाराची उत्पादने वेगवेगळी करणे शक्य होते. अशा यंत्रणेचा फायदा म्हणजे सामग्रीच्या हव्या तितक्या ग्रेड करता येतात. जी. आय. पाइपवर वेगवेगळ्या जाडीचा सौम्य स्टीलची (एम. एस.) पट्टी गुंडाळल्याने स्क्रू बनतो. या यंत्राची लांबी १.८३ मीटर असते, ज्यामुळे प्रत्येकी ०.६१ मीटर आकाराचे तीन कप्पे किंवा प्रत्येकी ०.४६ मीटर आकाराचे चार कप्पे मिळतील. मुख्य चौकट लोखंडी ॲंगलने बनलेली असते.
ती त्याच्या बाजूने चालणाऱ्या ड्रायव्हिंग हेलिक्स, एक सलग प्रतवारी पट्टा आणि त्याला ऊर्जा देणारी यंत्रणा या सर्वांना आधार देण्यासाठी वापरली जाते. दोन वाहतूक पट्टे सामग्री घेऊन जात प्रतवारी पट्ट्यांवर सोडतात. उताराच्या फलाटामुळे (प्लॅटफॉर्म) साहित्याचा प्रवाह सुलभ होतो. प्लॅटफॉर्मचे भाग वेगवेगळ्या ग्रेडच्या बटाट्यांच्या गरजेनुसार समायोजित करता येतात. हे यंत्र केवळ एका अश्वशक्तीच्या (हॉर्सपॉवर) मोटरद्वारे चालवता येते. एका तासात २ ते ३ टन बटाट्यांची प्रतवारी शक्य होते.
वजनावर आधारित प्रतवारी यंत्र (वेट ग्रेडर)
उत्पादनाच्या वजनाच्या आधारावर देखील प्रतवारी केले जाते. ही पद्धत अचूक, जलद आहे. यात फळे किंवा भाज्यांचे नुकसान कमीत कमी होते. सामान्यतः डाळिंब, सफरचंद, संत्री, किन्नो, आंबा, बटाटा, टोमॅटो, अंडी इ. मोठ्या आकाराच्या उत्पादनांसाठी याचा वापर केला जातो. या यंत्रामध्ये उत्पादनाच्या रंग, पोत किंवा आकारापेक्षाही केवळ वजनावर काम करते. त्यामुळे वर्गीकरणाचे निकष अन्य असल्यास या प्रकारचे ग्रेडर वापरता येत नाहीत.
उत्पादने स्वयंचलित फीडद्वारे वेगवेगळ्या कपामध्ये ठेवली जातात. त्यानंतर ती वजन करणाऱ्या यंत्रणेमधून जाते. तिथे ते स्प्रिंगने आधार दिलेल्या पट्ट्याच्या मदतीने प्रतवारी केली जाते. स्प्रिंग सुरुवातीपासून शेवटपर्यंत हळूहळू कमकुवत होतात. सुरुवातीला जड सामग्री पडते, तर पुढे मध्यम आणि शेवटी हलकी सामग्री खाली पडते.
- डॉ. सचिन नलावडे ९४२२३८२०४९,
(प्रमुख, कृषी यंत्रे आणि शक्ती विभाग, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.