Aeroponics  Aggrowon
टेक्नोवन

Agriculture Technology : एरोपोनिक्समध्ये नॅनो तंत्रज्ञानाचा वापर

Aeroponics Technology : नॅनो अन्नद्रव्ये ही लोह, जस्त, तांबे आणि मॅग्नेशिअमसारख्या अनेक आवश्यक खनिजांचे लहान कण आहेत, जे वनस्पतींना वाढण्यासाठी आवश्यक असतात. हे वनस्पतींद्वारे अधिक कार्यक्षमतेने शोषले जाऊ शकतात.

Team Agrowon

अमृता शेलार

एरोपोनिक्स तंत्रज्ञानामुळे मातीविरहित आणि अत्यंत कमी पाण्यावर पीक उत्पादन घेतले जाते. एरोपोनिक्स तंत्रज्ञानामध्ये नॅनो कणांमधील सूक्ष्म पोषणद्रव्यांचा वापर केला जातो. यामुळे वनस्पतींना नॅनो पोषक द्रव्ये अधिक कार्यक्षमतेने शोषून घेता येतात, वनस्पतींची जलद वाढ होते, निरोगी वाढ होते.

पर्यावरणातील प्रदूषण कमी होतो. वनस्पतींच्या मुळापर्यंत नॅनो पोषणद्रव्ये पोहोचवली जातात. अत्यंत कमी संसाधनांचा वापर करून हे तंत्रज्ञान उत्पादकता वाढवते. एरोपोनिक्स तंत्रज्ञानामध्ये जमिनीत लागवड करण्याऐवजी रोपांची नियंत्रित वातावरणात लागवड केली जाते. या तंत्रज्ञानामध्ये नॅनो कणांच्या माध्यमातून पोषक घटक मुळांवर फवारले जातात.

घटकांची कार्यक्षमता

मातीत वाढणाऱ्या वनस्पतींना मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. त्यातील बरेच पाणी वाया जाते. एरोपोनिक्स तंत्रज्ञानामध्ये पारंपरिक पद्धतीपेक्षा बऱ्यापैकी पाण्याची बचत होते. जेथे पाणीटंचाई आहे तेथे हे तंत्रज्ञान फायदेशीर आहे.

जलद वाढ

पारंपरिक शेतीमध्ये, वनस्पती जमिनीतील पोषक द्रव्ये शोधण्यात आणि ती शोषून घेण्यात ऊर्जा खर्च करतात. एरोपोनिक्स तंत्रज्ञानामध्ये पोषक तत्त्वे थेट मुळांपर्यंत पोहोचतात, ज्यामुळे वनस्पती वेगाने वाढू शकतात. यामुळे कमी वेळेत अधिक पिके घेतली जाऊ शकतात.

दर्जेदार उत्पादन

एरोपोनिक्स प्रणालीमध्ये वनस्पतीला आवश्यक पोषक तत्त्वांचे अचूक प्रमाण मिळते. त्यामुळे उत्पादनात चांगली वाढ होते. नियंत्रित आणि कृत्रिम वातावरणात एरोपोनिक्स प्रणालीद्वारे वर्षभर लागवड शक्य आहे. एरोपोनिक्समुळे कीटकनाशके आणि तणनाशकांची गरज कमी होते.

नॅनो अन्नद्रव्यांचा वापर

एरोपोनिक्स तंत्रज्ञानामध्ये नॅनो तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर दिसून आला आहे. नॅनो अन्नद्रव्ये ही लोह, जस्त, तांबे आणि मॅग्नेशियमसारख्या अनेक आवश्यक खनिजांचे लहान कण आहेत, जे वनस्पतींना वाढण्यासाठी आवश्यक असतात. हे कण त्यांच्या पारंपारिक रूपापेक्षा खूपच लहान आहेत, ज्यामुळे ते वनस्पतींद्वारे अधिक कार्यक्षमतेने शोषले जाऊ शकतात.

पोषक द्रव्यांचे चांगले शोषण

नॅनो अन्नद्रव्यांचे कण इतके लहान आहेत की ते वनस्पतीच्या पेशींमध्ये सहज प्रवेश करू शकतात, पोषक घटकांचा प्रत्येक थेंब वापरला जातो. पारंपरिक शेतीमध्ये, पिकांना दिलेली बरीचशी खते मातीत वाहून जातात किंवा पूर्णपणे शोषली जात नाहीत. नॅनो अन्नद्रव्यांच्या वापरामुळे पर्यावरणीय प्रदूषण खूप कमी होते आणि वनस्पतींना जास्तीत जास्त फायदा होतो.

खतांचा कमी वापर

नॅनो अन्नद्रव्ये कार्यक्षम असल्यामुळे खतांच्या वापरात बचत होते. तसेच पर्यावरणास अनुकूलदेखील आहे, कारण यामुळे प्रदूषणावर नियंत्रण मिळविणे शक्य होते.

उत्पादनाचा दर्जा

एरोपोनिक्ससह नॅनो अन्नद्रव्यांच्या वापराचा फायदा म्हणजे सुधारित अन्न गुणवत्ता. यामध्ये उत्पादित पिके जीवनसत्त्व आणि खनिजांनी समृद्ध असतात. नियंत्रित, मातीमुक्त वातावरण कीटकनाशके, रसायने आणि रोगांचे प्रदूषण होत नाही. हानिकारक प्रदूषकांपासून मुक्त असते. ज्या भागात जमिनीची गुणवत्ता खराब आहे किंवा जिथे पाण्याची कमतरता आहे, तसेच शहरी भागात या तंत्रज्ञानाचा वापर शक्य आहे.

आव्हाने

एरोपोनिक्स आणि नॅनो अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर अवलंब करण्याआधी या तंत्रज्ञानाच्या वापराचा खर्च जास्त आहे. तसेच याच्या वापराचे दीर्घकालीन परिणाम पूर्णपणे समजून घेण्यासाठी अधिक संशोधन करण्याची आवश्यकता आहे.

(रिसर्च फेलो, रासायनिक अभियांत्रिकी आणि जैवतंत्रज्ञान, तंत्रज्ञान विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Marathwada Assembly Election : मराठवाड्याच्या तीन जिल्ह्यांतील ४३१ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद

Maharashtra Assembly Election 2024 Voting : राज्यात ६५ टक्के मतदान; सर्वाधिक कोल्हापूर तर सर्वात कमी मुंबईत

Vidarbha Voter Turnout : पश्चिम विदर्भात मतदानाचा टक्का वाढीची शक्यता

Cotton Ball Rot Disease : बोंड सड समस्येची कारणे, उपाययोजना

Goat Milk Benefits : शेळीच्या दुधाचे आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT