Hydroponics farming
Hydroponics farmingAgrowon

Hydroponics farming : डेन्मार्कमधील हायड्रोपोनिक्स शेती

Denmark Hydroponics farming : डेन्मार्कमधील कोपनहेगन शहराजवळ असणाऱ्या हायड्रोपोनिक्स ग्रीनहाउसमध्ये साठ प्रकारच्या भाजीपाला रोपांची निर्मिती होते.

डॉ. राजेंद्र सरकाळे

Denmark farming : डेन्मार्कमधील कोपनहेगन शहराजवळ असणाऱ्या हायड्रोपोनिक्स ग्रीनहाउसमध्ये साठ प्रकारच्या भाजीपाला रोपांची निर्मिती होते. या रोपांचा देशांतर्गत तसेच परदेशातील शेतकऱ्यांना पुरवठा होतो. अत्याधुनिक रोपनिर्मिती प्रणाली तसेच संगणक तंत्रज्ञानाचा या ठिकाणी चांगल्या प्रकारे वापर करण्यात आला आहे.

डेन्मार्कमधील हवामान, नैसर्गिक घटक, भौगोलिक क्षेत्र, अर्थव्यवस्था, सामाजिक स्थिती आणि भारतातील परिस्थितीचा तौलनिक आढावा घेतला असता, आपल्याला त्यांच्याकडील नवीन तंत्रज्ञानाचा चांगल्याप्रकारे अवलंब करणे शक्य आहे. उच्च तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी आम्ही कोपनहेगन शहरानजीक असलेल्या हायड्रोपोनिक्स प्रकल्पास भेट दिली. निसर्गाच्या अनियमितपणामुळे डेन्मार्कला नैसर्गिक व कृत्रिम संकटांना सामोरे जावे लागत आहे. या देशात आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार झाल्यानंतर कृषी उत्पादनामध्ये वाढ होऊन देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. त्यापुढील काळात उतिसंवर्धन, संकरित जाती तसेच फळपिकांच्या कलमांबाबत संशोधन झाल्याने उत्पादनाचा आलेख वाढतच गेला. त्यानंतर पुढचे पाऊल म्हणजे हायड्रोपोनिक्स (मातीविना शेती) ही संकल्पना उदयास आली.

हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानामध्ये मातीशिवाय वनस्पतींची वाढ व जोपासना केली जाते. या पद्धतीमध्ये वनस्पतींची वाढ एका विशिष्ट भांड्यामध्ये पाणी किंवा मातीचा काही अंश नाही अशा माध्यमांचा वापर करतात. कमी जागेत पाणी, वाळू, पीटमॉस, व्हर्मिक्युलेट, परलाइट, खडकांचा चुरा, कोकोपीट अशा मातीविरहित माध्यमांचा उपयोग करून तसेच बाहेरून पाहिजे त्या प्रमाणात अन्नद्रव्ये देऊन वेगवेगळ्या वनस्पतींची वाढ करून अपेक्षित उत्पादन मिळवता येते. या पद्धतीत वापरण्यात आलेले पाणी आणि खतांचा काही अंशी पुनर्वापरसुद्धा करता येतो. सध्या इस्राईल, डेन्मार्क, मेक्सिको, जपान, युरोप आणि हवाई देशांमध्ये हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाचा चांगला प्रसार झाला आहे. ज्या देशांमध्ये उत्पादनक्षम जमिनी कमी प्रमाणात आहेत, अशा देशांमध्ये मातीविना शेती ही संकल्पना जोर धरू लागली आहे. पिकांचे लवकर उत्पादन घेण्याच्या दृष्टीने या संकल्पनेचा उपयोग प्रामुख्याने हरितगृहांमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो. पिकांच्या गरजेप्रमाणे आवश्यक अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात पुरवून, खर्च कमी करून दर्जेदार उत्पादन घेणे शक्य झाले आहे. याचबरोबरीने शहरातील लोक उपलब्ध जागेत या तंत्रज्ञानाचा वापर करून फुलझाडे, भाजीपाला पिकांची लागवड करतात.

Hydroponics farming
Hydroponic Farming : हायड्रोपोनिक शेती कशी केली जाते?

१) हायड्रोपोनिक्स तंत्रामध्ये हरितगृहात पीटमॉस, कोकोपीट, व्हर्मिक्युलटचा वापर करून सिमला मिरची, ब्रोकोली, ब्लुबेरी, फुलझाडांची लागवड करून दर्जेदार उत्पादन घेता येते.
२) मातीविरहित माध्यमाचा वापर केल्याने वनस्पतींमध्ये रोगांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो. ठिबकद्वारे वनस्पतीच्या गरजेएवढी अन्नद्रव्ये दिल्याने अधिकचा खर्च वाचतो, उत्पादन व दर्जा अपेक्षेप्रमाणे मिळतो.
३) पिकांना आवश्यक असणारे तापमान व आर्द्रता हे घटक आपणांस नियंत्रित करता येत असल्याने उत्पादित भाजीपाला, फळे व फुले टवटवीत राहतात. टिकवणक्षमता वाढते.
४) दुसऱ्या एका तंत्रात वनस्पतीच्या वाढीसाठी पाण्याचे द्रावण पीकवाढीसाठी वापरले जाते. मोठ्या ट्रेमध्ये किंवा सिमेंटच्या टाकीमध्ये स्वच्छ पाणी घेऊन त्यामध्ये वनस्पतीच्या गरजेप्रमाणे अन्नद्रव्यांचा पुरवठा केला जातो. पाण्याचा सामू, ईसी वेळोवेळी तपासून सर्व घटक योग्य असल्याची खात्री केली जाते. पाण्याच्या वापर प्रामुख्याने कमी कालावधीत येणारा भाजीपाला, हंगामी फुले, इनडोअर गार्डनिंगसाठी केला जातो. काही ठिकाणी ५ ते १० फूट उंचीच्या प्लॅस्टिक पाइपला १ फूट अंतरावर पुन्हा सबपाइप जोडून त्या पाइपमध्ये पाण्याचे द्रावण सोडून त्यामध्ये रंगीबेरंगी फुले, भाजीपाल्याची लागवड करून गार्डनिंगबरोबर उत्पादनाचा हेतू साध्य
केला जातो. हे तंत्र आम्ही चीनमधील शांघाय शहरात अभ्यासले होते. त्याचप्रमाणे डेन्मार्कमध्ये हे तंत्रज्ञान यशस्वीपणे वापरले जाते. हायड्रोपोनिक्स तंत्र आधुनिक शेतीच्या दृष्टीने किफायतशीर असले, तरी यासाठी आर्थिक गुंतवणूक, पायाभूत सुविधा आणि काटेकोर व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.

Hydroponics farming
Hydroponics Fodder : दुभत्या जनावरांना हायड्रोपोनिक्स चाऱ्याचे फायदे

हायड्रोपोनिक्स शेतीला भेट ः
डेन्मार्कमधील कोपनहेगन शहराजवळील एका खासगी हायड्रोपोनिक्स ग्रीनहाउसला आम्ही भेट दिली. या ग्रीनहाउसमध्ये भाजीपाला रोपांची निर्मिती करून स्थानिक मॉलच्या माध्यमातून देशांतर्गत तसेच परदेशातील शेतकऱ्यांना पुरवली जातात. सुमारे चार वर्षांपूर्वी ही रोपवाटिका सुरू झाली. या ठिकाणी वेगवेगळ्या ६० प्रकारच्या भाजीपाला पिकांच्या रोपांची निर्मिती केली जाते. गुणात्मक चाचण्या करून देश आणि परदेशात रोपांची विक्री होते.
सुमारे ५००० चौरस मीटर क्षेत्रावरील हायड्रोपोनिक्स ग्रीन हाउसमध्ये फक्त पाच व्यक्ती काम करतात. अत्याधुनिक संगणक तंत्रज्ञानाचा चांगल्या प्रकारे वापर करण्यात आला आहे. अत्यंत व्यावसायिक पद्धतीने ही रोपवाटिका कार्यरत आहे. या ठिकाणी भारतातील दोन तरुण शेती पदविकाधारक या ठिकाणी प्रशिक्षण घेत होते. त्यांच्याशी चर्चा करताना असे समजले, की असा आधुनिक प्रकारच्या हायड्रोपोनिक्स ग्रीन हाउसची उभारणीसाठी ३ ते ३.५० कोटी रुपये खर्च आला आहे. डेन्मार्कचे हवामान अतिथंड असल्याने भाजीपाला, सॅलड आणि फळभाज्यांचे उत्पादन घेण्यासाठी ग्रीनहाउसमध्ये तापमान नियंत्रित केले जाते. त्यासाठी एलईडी लाइट्‍स वापरतात. संगणकीकृत पद्धतीने तापमान नियंत्रित केले जाते. ग्रीनहाउसच्या छतावरील टर्बाइन्सद्वारे उपलब्ध झालेली वीज वापरली जाते. सध्या पाच व्यक्तींनी शेअर्सच्या माध्यमातून ही कंपनी स्थापन केली आहे. त्याद्वारे हा व्यवसाय सुरू आहे. निधीच्या उपलब्धतेसाठी शेअर्स होल्डर वाढवून कंपनीचा विस्तार करण्यात येणार आहे.

हायड्रोपोनिक्सच्या पद्धती ः
ग्रीनहाउसमध्ये प्रामुख्याने बेड आणि फ्लॅट कोको पद्धतीचा वापर ग्लास हाउसमध्ये करतात. घरातील छोट्या जागेत, प्रयोगशाळेत एरोपोनिक्स पद्धतीचा वापर केला जातो.
१) वीक पद्धती ः पंप किंवा विजेची आवश्यकता नाही. पाण्यामध्ये एअर पंप्सद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. लहान झाडांसाठी परमिक्युलाइट, व्हर्मिक्युलाइट माध्यमांचा वापर केला जातो.
२) ड्रीप वॉटर कल्चर : अत्यंत साधी आणि परिणामकारक पद्धत, पाण्याच्या माध्यमामध्ये मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होते.
३) ईबीपी आणि ड्रेन : घरगुती वनस्पती/झाडे वाढविण्यासाठी योग्य. पाणी देण्यासाठी वॉटर पंपचा वापर.
४) ड्रीप व ड्रेन : टोमॅटो, काकडी लागवडीसाठी योग्य, रोपांची कन्टेनरमध्ये वाढ केली जाते. प्रामुख्याने क्ले पॅलेट्स किंवा रॉकवुलचा वापर.
५) न्यूटीएंट टेक्नॉलॉजी ः प्रामुख्याने लेट्युस आणि औषधी वनस्पती लागवडीसाठी योग्य. लहान मुळे असलेल्या वनस्पतींसाठी फायदेशीर. पाइपमध्ये रोपांची लागवड करून अन्नदव्ये व पाणी व्यवस्थापन.
६) एरोपॉनिक्स ः सर्वांपेक्षा खर्चिक, परंतु उच्च तंत्रज्ञानाचा अवलंब. वाढीसाठी माध्यम वापरले जात नाही. फक्त अन्नद्रव्यांच्या द्रावणाद्वारे मुळांची वाढ केली जाते.
७) बेड पद्धती ः
८) फ्लॅट कोको पद्धत ः

-------------
- डॉ. राजेंद्र सरकाळे, ९८५०५८६२२०,
(लेखक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com