Ravindra Prabhudesai
Ravindra Prabhudesai Agrowon
टेक्नोवन

Agriculture Technology : कृषी पर्यटन, शेती-प्रक्रिया उद्योगाचे प्रेरणादायी मॉडेल

राजेश कळंबटे

Model of Agriculture and Processing Industry : पितांबरी उद्योग समूह आणि त्यांची कृषी प्रक्रियायुक्त उत्पादने सर्वत्र प्रसिद्ध झाली असून, ती घराघरांतील गृहिणींपर्यंत पोहोचली आहेत. समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांनी दूरदृष्टी, शेतीची आवड व अंगी बाणवलेली उद्योजकता यातून उद्योगाला ठळक स्थान मिळवून दिले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात पाचल-तळवडे हे त्यांचे मूळ गाव. भात, नाचणीचे मोठे उत्पादन घेणारे आणि साठवणूक करणारे ‘कोठारवाले प्रभुदेसाई’ अशी त्यांची गावात ओळख होती.

‘बायको गेली माहेरी, काम करी पितांबरी’ ही जाहिरात व त्यासंबंधीची ‘शायनिंग पावडर’लोकप्रिय आहे. अशा या उद्योगाची सुरुवात १९८९ मध्ये श्री. प्रभुदेसाई आणि वडील कै. वामनरावयांनी घरगुती व्यवसायापासून केली. आज समूहाचे ‘होमकेअर, ‘हेल्थकेअर’, ‘ॲग्रिकेअर, ‘फूडकेअर’, ‘सोलर’, ‘परफ्युमरी’, ‘डीजीकेअर’ असे मिळून दहा विभाग आहेत. ठाणे येथे कंपनीचे मुख्यालय आहे.

साकारले विविध प्रकल्प

पितांबरी उद्योग समूहाचे दापोली तालुक्यातील साखळोली येथे ५६ ते ६० एकर, तर राजापूर तालुक्यातील तळवडे येथे सुमारे ११० एकर क्षेत्र आहे. दोन्ही ठिकाणी कृषी पर्यटन केद्रे साकारली आहेत. विविध प्रकारच्या औषधी वनस्पती, फुले- फळझाडे, भाज्यांची लागवड, मसाला पिकांची लागवड येथे पाहायला मिळते.

नावीन्यपूर्ण प्रयोग म्हणून दोन्ही ठिकाणी प्रत्येकी दोन एकरांत टुल्डा, बाल्को, काळा बांबूसह ३२ प्रकारच्या प्रजाती असलेले बांबू पार्क साकारले आहे. पर्यावरण संवर्धन ही देखील आपली जबाबदारी लक्षात घेऊन त्याच्या संवर्धनासाठी आपण काय काम करू शकतो असा विचार श्री. प्रभुदेसाई यांच्या मनात घोळत होतो.

आयुर्तेज उद्यान

औषधी वनस्पतींचे जतन व त्यांची ओळख सर्वांना व्हावी या उद्देशाने दापोली-साखळोली येथे आयुर्तेज उद्यान उभारण्यात आले आहे. येथे श्‍वेत चंदन, रक्तचंदनसह साडेपाचशेहून अधिक दुर्मीळ व आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे.

देशातील ३०० हून अधिक प्रजातींची कमळे व वॉटर लिलींचे संकलन करण्यात आले आहे. सोनचाफ्याची बाग हे इथले वैशिष्ट्य असून, चाफ्याच्या पिवळा, पांढरा, सोनचारा अशा विविध जाती पाहण्यास मिळतात.

या सर्व गोष्टी पाहण्याची, अभ्यासण्याची पर्वणी या माध्यमातून पर्यटक, विद्यार्थी व अभ्यासकांना मिळते. कृषी पर्यटन केंद्रांमध्ये राहण्याची तसेच शाकाहारी व मांसाहारी भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. साखळोली येथे रुचियाना रेस्टॉरंट उभारले आहे. मुंबई, पुण्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातील पर्यटक येथे दरवर्षी तीन हजार या संख्येने येतात. प्रति व्यक्तीला एकदिवसीय सहलीसाठी ६०० ते एक हजार रुपये शुल्क आकारले जाते.

रोपवाटिका

साखळोली व तळवडे येथे रोपवाटिका आहेच. शिवाय ठाणे- भिवंडीजवळील अनगाव येथेही कंपनीचा प्रकल्प असून, तेथेही रोपवाटिका विकसित केली आहे.

भाताच्या दुर्मीळ जातींची खरेदी- विक्रीतून शेतकऱ्यांना भात उत्पादनास प्रोत्साहन.

दर्जेदार रोपे व कलमांच्या उपलब्धतेसोबत रोपविक्रीतून शेतकऱ्यांना वर्षभर उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध व्हावा यासाठी ‘पितांबरी नर्सरी फ्रँचायसी’ हे ‘बिझनेस मॉडेल’ सुरू केले. त्याच्या ३९ शाखा तयार झाल्या आहेत. त्यातून दर्जेदार रोपांची साखळी तयार झाली आहे.

कमी कालावधीत अधिक उत्पादन देऊ शकणाऱ्या वाणांची निर्मिती हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आंब्याचे केसर, हापूस, पायरी, रत्ना हे वाण, तर आवळा, चंदन, रक्त चंदन, नारळ, सुपारी, चिकू, जांभूळ, कोकम, पेरू, कृष्णकमळ, पारिजातक, रातराणी आदी सुगंधी फुलझाडे, मसाल्यामध्ये जायफळ, काळी मिरी, तसेच चिंच आदी मिळून दोनशेहून अधिक प्रकारची रोपे येथे उपलब्ध केली आहेत. चाफ्याचे सहा हजार मातृवृक्ष आहेत. केसर आंबा, चंदन, बांबू आदींच्या रोपांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. गावांच्या सार्वजनिक ठिकाणी म्हणजे रस्ते, शाळा, ग्रामपंचायत, मंदिरे, जलस्रोत अशा ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण झाडांची लागवड केली आहे.

मियावाकी संकल्पना

नक्षत्रवन, पंचमहाभूतवन, राशी उद्यान, मसालाबाग, लाखी फळ बाग अशा विविध संकल्पनांवर आधारित झाडे मार्गदर्शनासहित उपलब्ध केली आहेत. साखळोलीत १० गुंठ्यांत मियावाकी या जपानी संकस्पनेवर आधारित (कमी क्षेत्रात अधिक झाडे) मात्र देवराई प्रमाणे जंगल उभे करण्याचा प्रयत्न आहे. त्याअंतर्गत (देशी वृक्षांमध्ये जांभूळ, हिरडा, बेहडा, आवळा, टेटू, शिवण, जितसया, खैर, उंडी, सीता अशोक, कदंब, फणस आदींची लागवड केली आहे.

प्रक्रियायुक्त उत्पादने

चाफ्यापासून अर्क व त्यापासून जास्त काळ टिकणाऱ्या काँक्रीटचे उत्पादन घेण्यात येते. चाफा फुलांवर आधारित तयार केलेली अगरबत्ती ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. त्यातून पितांबरी देवभक्ती अगरबत्ती उत्पादनांची मालिका सुरू झाली. पूर्वी अगरबत्तीच्या स्टिक्स आशियायी देशातून भारतात आयात व्हायच्या. साधारण १०१५ च्या दरम्यान देशाचे धोरण बदलल्यानंतर ही आयात बंद झाली. त्यानंतर पितांबरी उद्योग समूहाने तळवडे येथे टुल्डा जातीच्या बांबूची २३ एकरांत रोपवाटिका उभारली. त्यापासून अगरबत्तीसाठी २४० टन कच्ची काडी (स्टिक) उत्पादित केली.

गूळ पावडर

तळवडे परिसरात ७० एकरांत ऊस लागवड करण्यात आली आहे. परिसरातील शेतकऱ्यांकडूनही सेंद्रिय पद्धतीने उत्पादित ऊस घेऊन सुमारे पाच हजार टनांपर्यंत उसाचे दरवर्षी गाळप होते. गुऱ्हाळघर उभारून पितांबरी रुचियाना गूळ पावडर तयार केली जाते. त्यातून सरासरी ३.५ ते ४ कोटी रुपयांची उलाढाल होते. अमेरिका, आखाती देशांतही विक्री होते. तळवडे येथे ३०० मधपेट्या ठेवण्यात आल्या असून, ४० किलोपर्यंत मध संकलित मिळतो. विविध सुगंधी व औषधी भाताच्या जातींची १० एकरांत लागवड असून, त्यापासून पोहे व अन्य उत्पादने तयार केली जातात.

राज्याच्या विविध भागांमधील शेतकरी, बागायतदार, ग्राहक ‘पितांबरी’ उद्योग समूहाशी जोडले गेले आहेत. दापोली आणि तळवडे येथे आम्ही कृषी पर्यटन केंद्रे साकारली आहेत. विविध प्रकारच्या औषधी वनस्पती, फुले व फळझाडे, भाजीपाला, मसाला पिके, रोपवाटिका आदी विविध गोष्टी पाहण्याची व अभ्यासण्याची पर्वणी या माध्यमातून पर्यटकांना ळत आहे. ही आमच्यासाठी निश्‍चितच समाधानकारक बाब आहे. नावीन्यपूर्ण प्रयोग म्हणून बांबू पार्क आम्ही साकारले आहे. शेतकऱ्यांना आत्मबळ देण्यासाठी तसेच कृषी मूल्यवर्धन उद्योगात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी आमचा उद्योग समूह कायम प्रयत्नशील आहे.

रवींद्र प्रभुदेसाई, व्यवस्थापकीय संचालक, पितांबरी उद्योग समूह मृदुला आपटे (कृषी पर्यटन केंद्र विभाग),८८८६६१९०९१

पराग साळवी (रोपवाटिका व फार्म विभाग), ९५४५७०७०६६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Scheme : शेतकऱ्यांसाठी ५० हजार गावांमध्ये विशेष योजना; शेतकऱ्यांना हवामान बदलात उत्पादन वाढीसाठी करणार मदत

Soybean Sowing : सोयाबीनचा ४ लाख ४७ हजारांवर हेक्टरवर पेरा

Ashadhi Wari 2024 : 'रामकृष्ण हरीचा जयघोषात' संत तुकाराम महाराजांचा पहिला रिंगण सोहळा संपन्न

Employment Opportunities : रानभाज्यांतून रोजगार संधी

APMC Market : सभापतींची बैठकही निष्फळ; बाजारात शुकशुकाट

SCROLL FOR NEXT