Rice Management : भात रोपवाटिका व्यवस्थापन

Paddy Farming : अनेक ठिकाणी अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे अद्याप भाताच्या रोपवाटिका करणे शक्य झालेले नाही. अशा स्थितीमध्ये भात रोपवाटिकेच्या व्यवस्थापनासंबंधी माहिती घेऊ.
Paddy Farming
Paddy FarmingAgrowon

प्रा. सुरेश परदेशी, डॉ. दीपक डामसे

Paddy Production : भात हे प्रमुख अन्नधान्य पीक असले तरी सुधारित भात जातीचा वापर न होण्यासह विविध कारणांमुळे भात उत्पादनात मोठी घट येते. अनेक ठिकाणी अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे अद्याप भाताच्या रोपवाटिका करणे शक्य झालेले नाही. अशा स्थितीमध्ये भात रोपवाटिकेच्या व्यवस्थापनासंबंधी माहिती घेऊ.

भात पिकाच्या उत्पादकता वाढविण्यासाठी सुधारित व संकरित भात जातींचा वापर करावा. निवडीसाठी आपल्या भागातील पावसाचा कालावधी, पाण्याची उपलब्धता, जमिनीची प्रत व जमिनीचा उंच सखलपणा यानुसार योग्य कालावधीच्या जातीची निवड करावी.

अ) हळव्या जाती - राधानगरी-९९-१ (फुले राधा), फुले भागीरथी, रत्नागिरी-७११, राधानगरी-१८५-२, रत्नागिरी-७३, रत्ना, कर्जत- १८४ .

ब) निमगरव्या जाती - फुले मावळ, पालघर-१, कुंडलिका, जया, कर्जत- ५.

क) गरव्या- कर्जत-२, कर्जत- ६, रत्नागिरी-२, मसुरी, सुवर्णा.

ड) सुवासिक व बासमती जाती - भोगावती, इंद्रायणी, पवना, आंबेमोहर-१५७, पुसा बासमती, बासमती-३७०

इ) संकरित जाती - सह्याद्री, सह्याद्री-३, सह्याद्री-४.

सुधारित भात जातींची वैशिष्ट्ये

कमी उंचीच्या, न लोळणाऱ्या व नत्र खतास उत्तम प्रतिसाद देतात.

पाने जाड, रुंद व उभट आणि हिरव्या रंगाची असल्याने कर्ब ग्रहणाचे कार्य अधिक होते. पाने अधिक काळ हिरवी व कार्यक्षम राहून पळींजांचे प्रमाण कमी होते.

तांदळाचा तुकडा कमी होतो. भरडाई प्रमाण अधिक असते. प्रथिनांचे प्रमाण जास्त राहते. तांदूळ पांढरा शुभ्र असतो.

फुटवा चांगला येतो. फुटवे कमी कालावधीत निसवतात. फुलोऱ्यातील अंतर कमी होते. दाणे शेतात झडत नाहीत.

सूर्यप्रकाशाचा कालावधी कमी जास्त होणे, तापमानातील फरक यासाठी असंवेदनशील आहेत. त्यामुळे त्यातील फरकांचा उत्पादनावर सरळ परिणाम कमी होतो.

अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर होतो. पिकाची फाजील वाढ न होता दाण्यांचे उत्पादन वाढते.

Paddy Farming
Paddy Farming : पट्टा पद्धतीच्या भात लागवड तंत्रातून मजूरसमस्येवर मात

रोपवाटिकेचे व्यवस्थापन

पुनर्लागवड पद्धतीमध्ये उत्पादन कमी येण्याच्या कारणामध्ये रोपवाटिका व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष हे अत्यंत महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे योग्य रोपवाटिका व्यवस्थापन हे फायदेशीर भात शेतीचे मूळ आहे.

भात पिकाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी चारसूत्री भात लागवड तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. हे तंत्र सोपे, शास्त्रीयदृष्ट्या कार्यक्षम, एकूण लागवडीतील बी, मजूर व खत यांचा खर्च कमी करणारे, वातावरणाचे प्रदूषण टाळणारे व भातशेती फायदेशीर करणारे आहे.

चारसूत्रांपैकी पहिले सूत्र रोपवाटिकेसाठी दिलेले आहे. त्यात भाताच्या तुसाची काळसर राख रोपवाटिकेत बी पेरण्यापूर्वी गादी वाफ्यात मिसळावी. खात्रीशीर व भेसळविरहित बियाण्यांचा वापर करावा.

पूर्वमशागत

भात पिकाच्या योग्य वाढीसाठी शेताची योग्य प्रकारे पूर्वमशागत करणे अत्यंत महत्त्वाचे असते. पूर्वमशागतीमुळे जमिनीच्या विविध थरांची उलथापालथ होते आणि काही प्रमाणात तण, कीड व रोगांचेही नियंत्रण होते.

सेंद्रिय खतांचा वापर : नांगरणीच्या वेळी हेक्टरी १० मे.टन शेणखत अथवा कंपोस्ट खत मातीमध्ये पूर्णपणे मिसळून द्यावे.

रोपवाटिका नियोजन

सुधारित जाती

पद्धत बियाणे (किलो प्रति हेक्टरी)

पुनर्लागवड ३५-४०

पेरणी ७५

टोकण (१५-२५ × १५-२५ सें.मी.) २५-३०

Paddy Farming
Paddy Variety : कोकणवासीयांसाठी भाताचे ‘कोकण सुहास’ वाण विकसित

भाताच्या संकरित जातींसाठी प्रति हेक्टरी २० किलो बियाणे वापरावे.

बीजप्रक्रिया

पेरणीपूर्वी बियाण्यास कॉपर ऑक्सिक्लोराइड २ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणे प्रक्रिया करावी. त्यानंतर ॲझोटोबॅक्टर, स्फुरद विरघळणारे जिवाणू व ॲझोस्पिरिलिअम या जिवाणू खतांची २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.

पेरणी

भाताची बियाणे पेरणीसाठी शक्यतो गादीवाफ्यावरच करावी. त्यासाठी १ मीटर रुंदी, १५ सें.मी. उंची व सोईनुसार लांबीचे गादीवाफे तयार करावेत. सिंचनाची सोय असल्यास खरीप हंगामामध्ये १ जून ते ३० जूनपर्यंत पेरणी करावी. सिंचनाची सोय नसल्यास आपल्या भागातील पावसाचा अंदाज घेऊन पेरणीचे नियोजन करावे.

१ हेक्टर लागवडीसाठी साधारणत: १० गुंठ्यांची रोपवाटिका पुरेशी ठरते. रोपवाटिकेसाठी २५० ग्रॅम शेणखत, ५०० ग्रॅम नत्र, ४०० ग्रॅम स्फुरद, ५०० ग्रॅम पालाश प्रति गुंठा द्यावे. पेरणी ओळीत करावी. पेरणीनंतर १५ दिवसांनी ५०० ग्रॅम नत्र प्रति गुंठा रोपे वाढीसाठी द्यावे.

रोपवाटिकेसाठी बियाण्याची पेरणी पुरेशा ओलाव्यावरच गादीवाफ्यावर करावी. कोरड्या जमिनीत भात बियाण्याची पेरणी करू नये.

गादीवाफ्यावर पेरणी ओळीत व विरळ करावी.

पावसाअभावी व अन्य कारणाने लागवड लांबणीवर पडल्यास प्रति गुंठा क्षेत्रातील रोपास १ किलो युरियाचा तिसरा हप्ता द्यावा. योग्य पाणी व्यवस्थापन करावे. कीड, रोग व तणनियंत्रणाकडे लक्ष द्यावे.

तणनियंत्रण

रोपवाटिकेतील तणनियंत्रणासाठी ऑक्झिफ्लोरफेन (२३.५ टक्के ई.सी.) १५ मि.लि. प्रति १० लिटर पाणी पेरणीनंतर दोन ते तीन दिवसांत फवारावे.

पीक संरक्षण

रोपवाटिकेत वाफ्यात बियाणे टाकतेवेळी किंवा पेरणीनंतर १५ दिवसांनी दाणेदार क्लोरपायरिफॉस (१० टक्के) १० किलो किंवा क्विनॉलफॉस (५ टक्के) १५ किलो प्रति हेक्टर या प्रमाणात जमिनीत मिसळावे.

रोपवाटिकेतील वाफ्यात खोडकिडीचे कामगंध सापळे प्रति हेक्टरी पाच या प्रमाणात लावावेत.

रोपवाटिकेत तुडतुडे, खोडकिडी, गादमाशी यांचे प्रादुर्भावानुसार निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा ॲझाडिरॅक्टिन (१००० पीपीएम) २ ते ३ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

खेकड्यांच्या बिळाशेजारी विषारी आमिष ठेवून खेकड्यांचे नियंत्रण करता येते. यासाठी ॲसिफेट (७५ टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी) ७५ ग्रॅम घेऊन १ किलो शिजवलेल्या भातामध्ये मिसळावे. या आमिषाचे १० लहान-लहान गोळे करून खेकड्यांच्या बिळात टाकावे.

डॉ. हेमंत पाटील, ७५८८०२८९२९

प्रा. सुरेश परदेशी, ७५८८०५२७९३

(विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com