Agriculture Technology : बहुउपयोगी पॉवर वीडर...

Power Weeder : पॉवर वीडर या नावातूनच यंत्राच्या कामाचा अर्थ समजून येतो. यामध्ये विविध माध्यमांतून मिळविलेल्या ऊर्जेचा किंवा ताकदीचा वापर करून तणे काढली जातात.
Power Weeder
Power WeederAgrowon

Indian Agriculture : पॉवर वीडर या नावातूनच यंत्राच्या कामाचा अर्थ समजून येतो. यामध्ये विविध माध्यमांतून मिळविलेल्या ऊर्जेचा किंवा ताकदीचा वापर करून तणे काढली जातात. खनिज इंधनाच्या साह्याने चालणाऱ्या इंजिनाद्वारे आवश्यक ती ऊर्जा मिळवली जातात. या ऊर्जेने धारदार पाते चालवून शेतामध्ये पिकाव्यतिरिक्त वाढणारी गवते, झुडपे किंवा छोटी झाडे (म्हणजेच तणे) कापून टाकली जातात.

आपल्याकडे बहुतांश शेतकऱ्यांची पेरणी ही मॉन्सूनच्या पावसावर अवलंबून असते. त्यामुळे साधारणपणे एकाच काळामध्ये सर्वाधिक पेरणी होते. परिणामी पिकामध्ये तणांच्या वाढीचा काळही साधारणपणे एकच येतो. अशा वेळी भांगलणीसाठी मजुरांची उपलब्धता होत नाही. त्यातही भारतामध्ये अल्पभूधारकांची संख्या सर्वाधिक असून, त्यांच्याकडे कामही कमी असल्याने मजुर कामाला येण्यासाठी टाळाटाळ करतात. या छोट्या शेतकऱ्यांऐवजी मोठ्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्याकडे त्यांचा कल असतो.

Power Weeder
Agriculture Technology : टनेल्समध्ये फळे, भाजीपाला उत्पादनाचे कॅनडात प्रयोग सुरू

मजूर उपलब्ध असल्यास त्यांची मजुरीची मागणी जास्त असते. बैलजोडी पाळणेही आता अल्पभूधारकांना तितके परवडणारे राहिलेले नाही. त्यामुळे बैलचलित अवजारेही मागे पडत आहेत. बरे, या लहान शेतकऱ्यांचे क्षेत्रही कमी असल्याने ट्रॅक्टरसारखी मोठी यंत्रे व अवजारे परवडत नाही. तणे काढणीसारख्या छोट्या कामांसाठी ट्रॅक्टर भाड्याने घेणे किंवा देणे हे दोन्ही परवडत नाही. अशा स्थितीमध्ये पॉवर वीडर हे सर्वसामान्य शेतकऱ्यांना अधिक परवडणारे ठरते.

या पॉवर वीडरवर चालणारी आकाराने लहान अशी अवजारेही उपलब्ध आहेत. (उदा. फाळाचा नांगर, सरी रीजर, सीडड्रील, कल्टिवेटर, बटाटा खोदण्याचे यंत्र, कापणी यंत्र (रिपर), ट्रेलर, एचटीपी फवारणी यंत्र, वॉटर पंप, अल्टरनेटर, थ्रेशर, केज व्हील इ.)

ज्या ठिकाणी ट्रॅक्टर किंवा पॉवर टिलरकाम करू शकत नाहीत, अशा ठिकाणी आंतरमशागतीची विविध कामे करण्याच्या दृष्टीनेच पॉवर वीडरचे डिझाइन केलेले असतात.

कमी देखभाल खर्च.

एक व्यक्ती (पुरुष किंवा स्त्री) सहजपणे चालवू शकते.

पॉवर वीडर खरेदीसाठी राज्य व विभागनिहाय वेगवेगळे सरकारी अनुदान आहे.

पॉवर वीडर हे तण काढून टाकण्यासाठी, ढवळण्यासाठी (मिश्रण करण्यासाठी) आणि माती मळण्यासाठी (दळण्यासाठी) आणि पीक वाढू लागल्यावर माती सैल करण्यासाठी वापरता येते.

साधारणपणे पॉवर वीडरची शक्ती १ एचपी ते ८ एचपी (०.७ किलोवॉट ते ६ किलोवॉट) पर्यंत असते.

पॉवर वीडरचे सेंटर रोटरी, बॅक रोटरी आणि फ्रंट रोटरी असे तीन प्रकार आहेत.

वैशिष्ट्ये :

विशेषत: ऊस, आले आणि हळद पिकात मातीची भर वापरणे शक्य.

एक व्यक्ती (स्त्री किंवा पुरुष) सहजपणे वापरू शकतो.

कमी अंतराच्या वाहतुकीसाठी (घर ते शेत) उपयोगी.

चालविणाऱ्या व्यक्तीच्या उंचीनुसार हॅण्डलच्या उंचीचे समायोजन करता येते.

Power Weeder
Agriculture Technology : शेतात निविष्ठा निर्मिती करताना माहीत हवे तंत्र

पॉवर वीडरची देखभाल :

वंगण : पाते, थ्रॉटल जोडणी आणि चाकांच्या बेअरिंग्ज यांसारख्या घटकांवर नियमितपणे ग्रीस लावावे. हे घर्षण आणि झीज कमी करण्यास मदत करते. तुमच्या पॉवर वीडरचे इंजिन आणि हलणारे भाग सुरळीत चालण्यासाठी नियमित वंगण किंवा तेल महत्त्वाचे आहे. वेगवेगळ्या भागांसाठी आवश्यक असलेल्या वंगणाचा प्रकार आणि बदलण्याचा कालावधी यासाठी कंपनीच्या माहितीपुस्तिकेतील संदर्भाचा उपयोग करावा.

इंजिन ऑइल : प्रत्येक वापरापूर्वी इंजिनमधील इंजिन ऑइलची पातळी तपासावी. उत्पादकाच्या शिफारस केलेल्या वेळापत्रकानुसार तेल बदलले पाहिजे. त्यासाठी कंपनीने ठराविक कामांच्या तासानंतर तेल बदलण्याचे नियोजन करावे.

फिल्टर ः इंजिनच्या संरक्षणामध्ये एअर आणि ऑइल फिल्टर हे महत्त्वाची भूमिका बजावतात. धूळ अडकलेल्या एअर फिल्टरमुळे हवेचा प्रवाह रोखला जातो. त्यामुळे इंजिनची शक्ती कमी होते आणि इंधन अधिक वापरले जाते. परिणामी खर्चात बचत होते. ऑइल फिल्टर खराब असल्यास इंजिनाची झीज वेगाने होते. त्यामुळे इंजिन तेलासोबत ऑइल फिल्टर नक्की बदलावा. तसेच एअर फिल्टरही नियमितपणे अंतराने बदलावा.

स्वच्छता : प्रत्येक वापरानंतर पॉवर वीडर साफ करून ठेवावा. विशेषतः त्याची पाती, इंजिन हाउसिंग आणि इतर भागांमधून अडकलेली माती व तणांचे अवशेष वेळीच काढून टाकावेत. त्यामुळे यंत्रणेला गंज पकडत नाही. या स्वच्छतेसाठी हवेच्या हलक्या प्रवाहाचा वापर करावा. शक्यतो उच्च दाबाने पाणी वापरणे टाळावे, अन्यथा विद्युत प्रणाली खराब होण्याचा धोका असतो.

पात्यांना धार लावावी : पाती बोथट असल्यास तण योग्य प्रकारे कापली जात नाही. एकूणच यंत्राची कार्यक्षमता कमी होते. पात्यांना धार लावण्याचे काम घरच्या घरी कानशीने करता येते. किंवा ही पाती काढूनही व्यावसायिक धार लावणाऱ्या व्यक्तींकडून हे काम करून घेता येते. मात्र त्या बाबत यंत्र निर्मात्याच्या काही सूचना असल्यास त्याचा अवलंब करावा.

हंगाम पॉवर वीडरची देखभाल : आपला पॉवर वीडर जर जास्त दिवस कामाशिवाय राहणार असेल, तर पुढील गोष्टींवर भर द्यावा.

इंधन टाकी भरून ठेवा. त्यामुळे टाकीमध्ये गंज धरण्याची प्रक्रिया टळते.

इंजिन ऑइल योग्य पातळीपर्यंत असल्याचे खात्री करा. नवीन ऑइल साठवणुकीदरम्यान संरक्षणात्मक थर प्रदान करते.

स्पार्क प्लग डिस्कनेक्ट करून ठेवावा. त्यामुळे यंत्र चुकून चालू होऊन अपघात होण्याचे टळते.

पॉवर वीडरची साठवण कोरड्या, संरक्षित ठिकाणी करावी. त्यावर थेट सूर्यप्रकाश, पाऊस पडणार नाही, याची काळजी घ्यावी.

योग्य प्रकारे देखभाल केलेले कोणतेही यंत्र दीर्घकाळ काम करते. त्यातून वेळ आणि पैशाची बचत होते.

कार्ये :

पेरणीपूर्वी मशागत करणे.

तण काढणे आणि वाढणाऱ्या पिकांमधील आंतरमशागत करणे.

पिकांवर रासायनिक खतांची फवारणी.

यासोबत विविध अवजारे जोडून शेतीची विविध कामे पूर्ण करू शकतो. उदा. पूर्व मशागत, पेरणी, निंदणी, फवारणी, जलसिंचन, कापणी आणि वाहतूक इ.

डॉ. सचिन नलावडे, ९४२२३८२०४९,

(प्रमुख, कृषी यंत्रे आणि शक्ती विभाग,

डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com