Agriculture Mechanization : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी (Dr. Indra Mani) यांच्या अध्यक्षेतेखालील उच्चस्तरीय समितीने सोयाबीन (Soybean), कापूस, ऊस, गहू, भात, मका, भुईमूग, तूर, करडई, तीळ आदी दहा पिकांमध्ये फवारणीसाठी (Drone Spraying) राष्ट्रीय पातळीवर ड्रोन (Drone SOP) वापराची प्रमाणित कार्य पद्धती (स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग सिस्टिम ः एसओपी) निश्चित केली आहे.
उच्चस्तरीय समितीने सादर केलेल्या मसुदा अहवालाचे प्रकाशन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते गुरुवारी (ता.२०) नवी दिल्ली येथील कृषी भवन येथे करण्यात आले.
या वेळी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सचिव मनोज आहुजा, ‘आयसीएआर’चे महासंचालक डॉ. हिमांशू पाठक, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अभिलाक्ष लेखी, सहसचिव शुभा ठाकूर, एस. रुक्मणी, विजयालक्ष्मी, कृषी आयुक्त पी. के. सिंग, उपायुक्त (यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञान) सी. आर. लोही, ए. एन. मेश्राम, ड्रोन समितीचे अध्यक्ष कुलगुरू डॉ. इंद्र मणी आदींसह देशातील कृषी तज्ज्ञ, ड्रोन फेडरेशन ऑफ इंडिया, नागरी विमान मंत्रालयातील अधिकारी ऑनलाइन माध्यमातून उपस्थित होते.
श्री. तोमर म्हणाले, ‘‘दोन वर्षांपूर्वी देशात काही भागात टोळ किडींचा प्रादुर्भाव झाला. त्या वेळी ड्रोन तंत्रज्ञानाची गरज भासली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारच्या पूर्ण सहकार्याने ड्रोन तंत्रज्ञान कार्य करून ड्रोनद्वारे फवारणीची कार्य पद्धती निश्चित झाली आहे.
शेतीतील खर्च कमी करण्यासह कीटकनाशकांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी शेतकऱ्यांना ड्रोन तंत्रज्ञानाचा मोठा फायदा होईल.
पदवीधर, लहान शेतकरी आदींसह शेवटच्या व्यक्तींपर्यंत या तंत्रज्ञानाचा लाभ पोहोचण्साठी शासन प्रयत्न करीत आहे. कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, महाविद्यालये आदींनी मिळून काम करण्याची गरज आहे. विशेषतः: कृषी पदवीधरांसाठी प्रशिक्षणे घ्यावीत.’’
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागातर्फे जुलै २०२२ मध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती.
कृषी मंत्रालयातील उपायुक्त एस. आर. लोही हे या समितीचे सदस्य सचिव आहेत. तर समितीत पीक संरक्षण विभागाच्या डॉ. अर्चना सिन्हा, आयसीएआरचे डॉ. आर. एन. साहु, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डॉ. सुनील गोरंटीवार, गुंटूर येथील डॉ. ए. सामभाय, आयएआरआयचे डॉ. दिलीप कुशावाह, कोइमतूर येथील डॉ. एस. पाझानिवेलन, हैदराबाद येथील कीटकशास्त्रज्ञ डॉ. रामगोपाल वर्मा आदींची समावेश होता.
यासोबतच देशातील विविध कृषी विद्यापीठे, खासगी कंपन्यांकडील उपलब्ध संशोधनात्मक माहिती, आकडेवारीचा वापर करून ही प्रमाणित कार्य पद्धती तयार केली आहे.
श्री. तोमर म्हणाले...
- तण व्यवस्थापन, जल व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन, पीकविमा आदींसाठी ड्रोनचा वापर होणार.
- वेळ आणि श्रमाची बचत होऊन कृषी निविष्ठा व ड्रोन तंत्रज्ञानाचा सुरक्षित, कार्यक्षम आणि प्रभावी वापर करणे शक्य.
- भविष्यात रोग आणि कीटकांचा प्रादुर्भाव शोधणे, पीक आरोग्य निरीक्षण, लक्ष्यित निविष्ठांचा वापर, पीक उत्पादन आणि पीक नुकसानीचे जलद मूल्यांकन करण्यासाठी ड्रोनचा वापर होणार
‘ड्रोन कंपनीशी सामंजस्य करार’
‘वनामकृवि’, परभणीचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी म्हणाले, ‘‘‘वनामकृवि’ने अमेरिकेतील फ्लोरिडा विद्यापीठ आणि देशातील खासगी ड्रोन कंपनीशी सामंजस्य करार केले आहेत. पाच ड्रोन खरेदी केले आहेत.
विद्यापीठात अधिकृत ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था उभारण्यात येईल. ड्रोनद्वारे शास्त्रशुद्ध पद्धतीने फवारणी, तसेच ड्रोन परवान्यासाठी शेतकरी, ड्रोनचालक यांच्यासाठी प्रशिक्षणे घेण्यात येतील.
विद्यापीठात भाडेतत्त्वावरील केंद्र (कस्टम हायरिंग सेंटर) स्थापन करून भाडेतत्त्वावर ड्रोन सेवा पुरविण्याची सुविधा निर्माण करण्यात येईल. शेतकऱ्यांमध्ये जागृतीसाठी ड्रोन कंपनीच्या मदतीने ड्रोन यात्रा घऊ.’’
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.