Chandrapur Jaljeevan News : केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी असलेल्या जल जीवन मिशनसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. २०२४ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत मिशनचे काम पूर्ण करण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात या कामाचा वेग बघता २०२४ पर्यंततरी ही कामे पूर्ण होण्याची शक्यता तशीच कमीच आहे. गेल्या दोन वर्षांत केवळ ३० ते ४० टक्केच कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे हर घर जलचे स्वप्न स्वप्नच राहण्याची शक्यता आहे.
प्रत्येक नागरिकांना मुबलक, शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे हा उद्देश समोर ठेवून केंद्र शासनाने जलजीवन मिशन हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला. २०२० पासून या उपक्रमाला सुरवात करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यात एक हजार ४५० गावे आहेत.
त्यापैकी एक हजार ३०३ गावांत जलजीवन मिशनअंतर्गत कामे सुरू करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने घेतला. मोठ्या प्रमाणावर ही कामे असल्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.
निविदाप्रक्रियेत चंद्रपूर जिल्ह्यासह अन्य जिल्हे, परराज्यातील कंत्राटदारांनी सहभाग घेतला. मात्र, सगळ्यात जास्त कामे चंद्रपूर जिल्ह्यातील कंत्राटदारांना मिळाली आहेत. जलजीवन मिशनच्या कामासाठी तब्बल दीड हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती.
जलजीवन मिशनची कामे सुरू करण्यासाठी गावागावांत जनजागृती करण्यात आली. त्यासाठी एका एजन्सीची नियुक्ती करण्यात आली. या एजन्सीच्या माध्यमातून पाण्याचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यात आले.
कामाचा व्याप बघता कामांचे अंदाजपत्रक, तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता आणि कार्यारंभ आदेश तातडीने देणे अपेक्षित होते. मात्र, मधल्या काळात तत्कालीन एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अडेलतट्टु धोरणांमुळे जलजीवन मिशनची अनेक कामे मागे पडली.
प्रादेशिक पाणीपुरवठा योजना चालविणाऱ्या अनेक कंत्राटदारांनी जलजीवन मिशनची कामे घेतली आहे. एकएका कंत्राटदाराने पाच ते दहा कामे घेतली आहेत. २०२४ पर्यंत कामे पूर्ण करावयाची असल्याने अनेक कंत्राटदारांनी कामे केली.
मात्र, अनेक कामे योग्य पद्धतीने झाली नाही. त्यामुळे मधल्या काळात मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन्सन यांनी शंभरावर कंत्राटदारांनी नोटीस दिली होती. विहिरीची कामे, पाण्याच्या टाकीसह अन्य कामे योग्य पद्धतीने झाली नसल्याचा ठपका त्यांनी ठेवला होता.
त्यांना खुलासाही मागविण्यात आला होता. एकएका कंत्राटदारांकडे पाच ते हा कामे आहे. कंत्राटदारांचे देयकेही वेळेत मिळत नसल्याने ते मजुरांना मजुरी देण्यास असमर्थ ठरत आहे.
पावसाळ्यात कसरत
पुढील महिन्यापासून पावसाळा सुरू होणार आहे. पावसाळ्याच्या दिवसांत जलजीवन मिशनची फारशी कामे होणार नाही. त्यामुळे मे महिन्यांतच अनेक कामे पूर्ण करण्याची गरज आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून दररोज जलजीवन मिशनचा आढावा घेतला जात आहे. मात्र, काही कंत्राटदार जाणीवपूर्वक कामे रेंगाळत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.